2014सालचे शांततेचे ‘नोबेल’ भारतातील गांधीवादी समाजसेवक कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफजाई या दोघांना विभागून मिळाले. त्या दोघांच्या कार्याची व जीवनाची ओळख करून देणारा लेख…

नुकतेच ऑक्टोबर 2014 मध्ये नोबेल पुरस्कार जाहीर झाले. यात भारतातील गांधीवादी समाजसेवक कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई-मानवाधिकार कार्यकर्ती या दोघांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी भारतातील सातजण हे नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत सत्यार्थी हे आठवे मानकरी आहेत आणि शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ते दुसरे आहेत. पाकिस्तानची मलाला तिच्या देशातील दुसरी नोबेल पुरस्कार विजेती ठरली आहे. जगभरातून 278 व्यक्तींची नामांकने निवड समितीपुढे आली होती, या सर्वांमध्ये मलाला व सत्यार्थी यांनी बाजी मारली. दोघेही समाजातील दबल्या गेलेल्या वर्गासाठी लढत आहेत. सत्यार्थी यांनी बालमजुरी विरोधात काम केले आहे, तर मलालाने पाकमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी तालिबान्यांविरूद्ध लढा दिला आहे. एक हिंदू आणि एक मुस्लीम, एक भारतीय आणि एक पाकिस्तानी या दोघांनी बालके व मुलींसाठी केलेला संघर्ष अत्यंत महत्वाचा आहे. भारत पाकिस्तान दरम्यान सीमेवर कमालीच्या संघर्षाची परिस्थिती उद्भवलेली असताना शांततेच्या नोबेलसाठी दोन्ही देशातील व्यक्तींची निवड झाली आहे.
कैलाश सत्यार्थींना कोणत्या कामासाठी हा पुरस्कार मिळाला? या कामाकडे ते कसे वळले?
सत्यार्थी यांचा जन्म 11 जानेवारी 1954 रोजी मध्य प्रदेशातील भोपाळपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘विदिशा’ येथे झाला. शाळेत प्रवेश करतेवेळी मनात उमटलेल्या प्रश्नाने त्यांची भविष्यातील कामाशी ओळख झाली. बुटापासून कॅपपर्यंत सर्वप्रकारे तयार होऊन कपाळाला कुंकुमतिलक लावून शाळेत प्रवेश करणार्या सत्यार्थीला शाळेच्या दारातच त्याच्याच वयाचा मुलगा शाळेत न जाता वडिलांबरोबर बुटपॉलिश करताना दिसला. ‘हा मुलगा शाळेत का नाही?’ हा पहिला प्रश्न त्याच्या मनात आला. त्याने वर्गात गेल्यानंतर हा प्रश्न वर्गशिक्षकांना विचारला. त्यांनी प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. शाळेचे मुख्याध्यापक ओळखीचे होते. त्यांनाही त्याने हाच प्रश्न विचारला. त्यांनी उत्तर दिले, “त्या मुलाचे वडील गरीब आहेत. शाळेत पाठवणे त्यांना परवडत नाही.” या उत्तराने त्याचे समाधान झाले नाही. त्याने त्या मुलाच्या वडिलांना हाच प्रश्न विचारला, “तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत का पाठवत नाही?” त्यांनी उत्तर दिले, “बाबुजी, यापूर्वी मला कोणी असा प्रश्न विचारला नाही. माझे वडील चर्मकार होते, मी तेच काम करतो. माझा मुलगाही तेच काम करेल. यात नवीन काही नाही. आमचा जन्मच काम करण्यासाठी झाला आहे.”

सत्यार्थीच्या मनात तेव्हापासूनच बालमजुरांविषयी अपार सहानुभूती निर्माण झाली. थोडा मोठा झाल्यावर तो व त्याचे समविचारी मित्र यांनी फुटबॉल क्लब सुरू केला. क्लबच्या फीमधून काही मुलांना मदत केली. कधी यात्रेत स्नॅक्सचा स्टॉल चालवला आणि पैसे उभे केले. त्याच्या लक्षात आले की या मुलांनी शाळेत न जाण्यामागे दोन कारणे आहेत; पहिले म्हणजे शिक्षण मोफत नाही आणि दुसरे म्हणजे पुस्तके खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च देखील मोठा आहे.
अवघा 11 वर्षांचा सत्यार्थी आणि त्याचा मित्र रमेश व्यास या दोघांनी यावरही उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 30 एप्रिलला परीक्षांचे निकाल जाहीर होत असत. या दोघांनी या दिवशी एक हातगाडी भाड्याने घेतली. मुले निकाल घेऊन घरी निघाली तेव्हा सधन वस्तीत हातगाडीसह सत्यार्थी व रमेश पोहोचले. सत्यार्थी गाडीवर चढून उभा राहिला व ओरडू लागला, “परिक्षेत पास झालेल्या मुलांचे अभिनंदन!” आणि रमेश स्वत:हूनच गाडी ढकलू लागला. लोक बाहेर आले. त्याचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या लोकांना सत्यार्थी म्हणाला, “तुमची मुले पास झालीत ती पुढच्या वर्गात जातील. त्यांची जुनी पुस्तके आम्हाला द्या. काही गरीब मुलांना शिकण्याची इच्छा आहे, पण पुस्तके घेणे परवडत नाही. आम्ही ही पुस्तके त्यांना देऊ.” त्याच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी पुस्तके आणून हातगाडीवर ठेवली. गाडी भरली. दोघांनी ढकलत गाडी रमेशच्या घरी नेली कारण सत्यार्थीचे पालक याला फारसे अनुकूल नव्हते. पुस्तके रमेशच्या घरी ठेवून दोघे पुन्हा असेच ओरडत गल्लीतून फिरले. त्या दिवशी रमेशच्या घरी 2000 पुस्तके जमा झाली. दोघांनी पुस्तकांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. अगदी शाळेपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतची पुस्तके होती. आता ही पुस्तके कोणाला आणि कशी द्यायची? सत्यार्थी मित्रांसह पुन्हा मुख्याध्यापकांना भेटला. अडचण सांगितली. त्यांनी मदत करण्याची तयारी दाखवली. एवढेच नाही तर ते आणखी काही मुख्याध्यापकांशी बोलले. अनेक शाळा यात सहभागी झाल्या. गरीब मुलांना पुस्तके दिली गेली. सत्यार्थीने पुन्हा मुख्याध्यापकांना विनंती केली. “या मुलांची पुस्तके वर्ष संपल्यावर परत घ्या. पुढच्या वर्षी आणखी मुलांना देता येतील.” सर्वांनी सहकार्य केले. विदिशामधील अनेक शाळांमध्ये अशा बुक बँक सुरू झाल्या. अनेक गरीब मुलांना त्यातून पुस्तके उपलब्ध झाली.

संवेदनशील मनाच्या कैलाशच्या आयुष्यातील आणखी एक संस्मरणीय प्रसंग. पावसाळा होता. वडिलांनी रेनकोट दिला, भावाने एक सुंदर रंगीबेरंगी छत्री आणली. छत्री इतकी देखणी होती की, कैलाशची नजर तिच्यावरून हटत नव्हती. ती त्याला फारच आवडली होती. या दोन्ही गोष्टी घेऊन तो शाळेत निघाला. पावसाचा एक थेंबही अंगाला लागू नये असा कडेकोट बंदोबस्त केलेला कैलाश एकीकडे तर दुसरीकडे शाळेच्या दारातच तो चर्मकार आपल्या कैलाश एवढ्याच मुलाला निर्दयपणे मारत होता. मुलगा जोरजोराने रडत होता. कैलाशला राहवले नाही. त्याने चौकशी केली तेव्हा चर्मकाराने सांगितले, “मी घरी गेलो, जाताना या मुलाकडे प्लॅस्टिक कागद दिला आणि सांगितले की, पाऊस आला तर बुटचप्पल चांगले झाकून ठेव. या मुर्खाने बुट चप्पल भिजत ठेवले आणि स्वत: प्लॅस्टिक कागद पांघरून बसलाय. हे भिजलेले बूट कातड्याचे आहेत. ते पाण्याने खराब होतील. माझे गिर्हाईक आता मला सोडेल का? त्यांनी भरपाई मागितली तर मी ते कसे भरून देऊ? आताही माझे कसेबसेच भागते आहे.” कैलाशने मागचा पुढचा विचार न करता आपली सुंदर छत्री त्या मुलाला देऊन टाकली.
अशा या कैलाश सत्यार्थीने पुढे सम्राट अशोक टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्युट या संस्थेतून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. विदिशाहून ते नंतर भोपाळला गेले व तेथे हाय व्होल्टेज इंजिनिअरिंगमधून पोस्ट ग्रॅज्युएट झाले. प्राध्यापक म्हणून नोकरी केली. 1980 साली वयाच्या 26 व्या वर्षी त्यांना आपले करिअर सोडून ‘बचपन बचाव आंदोलन’ची स्थापना केली. बालमजुरी, बालकांचे शोषण, वेठबिगारी, बालकांची वाहतुक-हस्तांतरण या विरोधात कार्य करणारी ही देशातील अग्रणी संस्था बनली. ग्लोबल मार्च अगेन्स्ट लेबरमध्येही त्यांनी काम केले. आंतरराष्ट्रीय बालमजूर व शिक्षणकेंद्र या मंडळावर ते कार्यरत आहेत. त्यांनी सुरू केलेले ‘बचपन बचाव आंदोलन’ हे देशातील पहिले बालहक्क संरक्षणासाठीचे आंदोलन ठरले. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी 80,000 हून अधिक बालकांची मरणयातनांतून सुटका केली. सुटका झालेल्या मुलांची त्यांच्या आईवडिलांशी भेट घडवून आणली. त्यांचे पुनर्वसन केले. आर्थिक परिस्थिती नसलेल्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. जगभरात बालकांच्या हक्कासाठी आवाज उठवला. विविध उत्पादनांच्या निर्मितीमध्ये बालमजुरांच्या होणार्या व्यापाराविरोधात प्रचार केला आणि बालकांच्या तस्करीला प्रतिबंध घालण्यासाठी जनजागृती केली.
बालकामगारांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सत्यार्थींनी बालमित्र ग्राम हा कार्यक्रम राबविला. बालपंचायत, युवक मंडळ, महिला मंडळ आणि ग्रामपंचायतीशी संवाद साधणे, बालविवाह टाळणे, शाळांतून मुलींची होणारी गळती थांबवणे असे महत्वाचे काम या बालमित्र ग्राममधून होताना दिसते. देशातील सत्तर टक्के बालकामगार ग्रामीण भागातून येतात. बालमित्र ग्राममुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी मोठी मदत मिळाली. देशांतील अकरा राज्यांतील 356 गावांमध्ये त्यांनी जनजागृती केली. बिहार, झारखंड, राजस्थान या सर्वाधिक बालकामगार असणार्या राज्यांमध्ये अधिक लक्ष दिले. देशाच्या बहुतेक सर्व भागांमध्ये जाऊन ही प्रथा मोडून काढण्याचा धाडसी प्रयत्न सत्यार्थी यांनी केला. सुरवातीला कारखान्याचे मालक आणि पोलीस यांच्याकडून त्यांना विरोध झाला, त्यांची अवहेलना झाली पण या मूल्यांवर त्यांची निष्ठा एवढी प्रखर होती की, हळूहळू अवहेलना आणि विरोध मावळला.
बालकामगारांना सक्तीचा आणि मोफत शिक्षणाधिकार मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतली. ही मोहीम भारताबाहेरही जगभर पसरवली. आशिया व आफ्रिका खंडातील तिसर्या जगातील देशांमध्ये बालकांकडे सहानुभूतीने पाहिले जात नाही, म्हणून या देशांमध्ये आपली चळवळ नेऊन पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला.
जगभर गालिचे विणण्यासाठी लहान मुलांना सर्रास जुंपले जाते. ही अनिष्ट प्रथा संपविण्यासाठी त्यांनी चळवळ हाती घेऊन ती तडीला नेली. परिणामी या गालिच्यांवर आता ‘गुडवीव्ह’ असा शिक्का मारला जाऊ लागला. ‘हा गालिचा विणताना लहान मुलांचे हात लागलेले नाहीत’ अशी खात्री हा शिक्का देतो.
‘सर्वांसाठी शिक्षण’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बालमजुरी विरोधातील चळवळ महत्वपूर्ण आहे. युनेस्कोच्या ‘शिक्षणासाठी जागतिक भागीदारी’ या उपक्रमात सत्यार्थी सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्रांच्या ‘सहस्त्रक विकास उद्दिष्टां’तर्गत 2015 पर्यंत बालमजुरी आणि बालगुलामगिरी नष्ट करण्यासाठी स्थापलेल्या मोहिमेत ते सहभागी आहेत. सत्यार्थी यांना विरोधाचा जसा सामना करावा लागला तसे अनेक सन्मानही प्राप्त झाले.
(वृत्तपत्रे, मासिके, टेलीव्हीजन, माहितीपट, चित्रपट अशा अनेक माध्यमांतून त्यांचे कार्य जगासमोर मांडले गेले आहे.)
सत्यार्थी म्हणतात, “बालमजुरी हा मनुष्यजातीवरील कलंक आहे. मानवी हक्कांची ती पायमल्ली आहे, मानवता हेच खरे तर सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. त्याच्या प्रस्थापनेसाठी मी काम करत आहे. व्यसनाधिनता, मनुष्यतस्करी, लहान मुलांचे लैंगिक शोषण, आरोग्याच्या समस्या हे सर्व बालमजुरीशी संबंधित आहे. आज जग ग्लोबल झाले आहे पण ग्लोबलायझेशनमध्ये मानवी हक्कांची किंमत कमी झाली आहे.” आसाम, मेघालय, ईशान्य भारतातील अनेक शहरे लहान मुलांच्या तस्करीचे अड्डे बनली आहेत. त्यातही मुलींची तस्करी अधिक प्रमाणात होते आहे. ‘प्लेसमेंट एजन्सीज’ या जणू बालतस्करीचे सर्वात मोठे अड्डे बनल्या आहेत. नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयाने यावर कायदा बनवण्याची सूचना राज्यसरकारला केली आहे. न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे व लोकांमध्ये होणारी जागृती यामुळे भारतातील बालमजुरांची संख्या हळूहळू कमी होत आहे.”
भारत म्हणजे ‘मदर ऑफ हंड्रेड प्रॉब्लेम्स बट मदर ऑफ मिलिअन सोल्यूशन्स’ असे म्हटले जाते. प्रत्येक प्रश्नावर उपाय शोधण्याची वृत्ती आपल्याकडे आहे. म.गांधींची प्रेरणा, सत्य-अहिंसा-करूणा ही आधुनिक जगाला बदलू पाहणारी मूल्ये यामुळे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील समस्यांवरचे उपाय आपण शोधू शकतो असा सत्यार्थींना विश्वास आहे.
यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी मलाला युसुफझाई ही सर्वात लहान वयाची नोबेल मानकरी. अवघ्या 17 व्या वर्षी तिला हा पुरस्कार मिळाला. निधड्या वृत्तीची, जगासाठी धैर्यशालिनी ठरलेली पण स्वदेशात अवहेलना सहन करणारी ही बालशिक्षण दूत, मलाला अवघ्या 15 व्या वर्षी जगासमोर आली. मलाला या तिच्या नावाचा अर्थ आहे, ‘दु:खाने त्रासलेली’ पण ‘मी मलाला’ ही तिची कहाणी वेगळाच अर्थ सांगते; ‘दु:खाविरूद्ध ठाम उभी राहणारी!’

तिचे वडील झियाउद्दिन यांचे तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन होते. तालिबानचा शिरकाव झाला आणि मुलींनी शाळेत जाण्यावर तालिबान्यांनी बंदी घातली. मुलींसाठीच्या 400 शाळा बंद झाल्या. 2009 च्या प्रारंभी म्हणजे 11 वर्षांची असताना मलालाने टोपणनावाने बीबीसीसाठी ब्लॉग लिहिला. आपल्या आयुष्यावर तालिबान्यांनी कसे वर्चस्व मिळवले आहे आणि स्वात खोरे ताब्यात घेण्याचे त्यांचे कसे प्रयत्न सुरू आहेत, याविषयी तिने कथन केले. त्यामुळे प्रभावित झालेल्या न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकाराने तिच्या जीवनावर एका महितीपटाची निर्मिती केली. त्यात पाकिस्तानी लष्करासंबंधी भाष्य केले आणि ‘स्वातचे दुसरे युद्ध’ असे त्याला संबोधण्यात आले.
वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणीने तिच्या मुलाखती घेतल्या व छापल्या. तालिबान्यांकडून शाळेत जाणार्या मुलींवर हल्ले सुरू झाले होते. सप्टेंबर 2008 मध्ये मलाला हिने पेशावरमध्ये एक भाषण केले होते, ‘माझा शिक्षणाचा मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचे साहस तालिबान कसे करू शकतो?’ हे त्या भाषणाचे शीर्षक होते. तहरीक-ए-तालिबनच्या जुलमी राजवटीविषयी ती उर्दू भाषेतून बीबीसीच्या ब्लॉगवर लिहित होती. प्रथम पोरवय म्हणून तालिबान्यांनी दुर्लक्ष केले. पण सांगूनही ऐकेना तेव्हा धमकावणी, दटावणी असे प्रकार सुरू झाले. तालिबानने तिला ठार मारण्याचा फतवा काढला. हे तिच्या वडिलांना समजले पण कट्टरवादी लहान मुलांना नुकसान पोहचवणार नाहीत असे वाटल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
9 ऑक्टोबर 2012 रोजी नेहमीप्रमाणे मलाला शाळेत गेली. बसने शाळेतून परत येताना त्याच बसमध्ये एक कट्टरवादी बंदुक घेऊन चढला. मलालाचे नाव घेऊन त्याने हाक मारली. “मलाला कोण?” असा प्रश्न त्याने विचारताच इतर मुलींनी मलालाकडे पाहिले. हल्लेखोराला मलालाची ओळख पटली. त्याने आपली गन मलालाकडे रोखली. तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक डोक्याच्या डाव्या बाजूला लागली. दुसरी चेहर्यावरील त्वचेतून गेली, तिसरी खांद्याला लागली. ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने पेशावरमधील लष्करी रूग्णालयात दाखल केले. तेथे तिच्या कवटीचा तुकडा काढून इजा झालेल्या मेंदूवर उपचार करण्यात आले. पुढील उपचारांसाठी तिला इंग्लंडला हलवले. बर्मिंगहॅम येथील एलिझाबेथ रूग्णालयात तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ती वाचली हे आश्चर्यच होते. आता जगाने तिला डोक्यावर घेतले, तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या; परंतु तिच्या गावी स्वात खोर्यात मात्र तिला सहानुभूती ऐवजी तिरस्कार व अवहेलना सहन करावी लागली. नातेवाईकही संशयाने पाहू लागले जणू तिला वाळीत टाकले. पाश्चात्य राष्ट्रांचा हा कुटील कावा असल्याचा समज करून घेतला गेला.
मलालावरील जीवघेणा हल्ला आंतरराष्ट्रीय झोतात आला. हल्ल्याच्या दुसर्याच दिवशी पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये आंदोलने झाली. शिक्षणहक्क मोहिमेसाठी पाकमधील 20 लाख नागरिकांनी सह्यांची मोहीम उघडली. याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानातील पहिले शिक्षण हक्क विधेयक मंजूर झाले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपासून देशविदेशातील अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. दुसरीकडे पाकिस्तानी तालिबानींचा प्रवक्ता एहसनुल्ला एहसात याने मलालावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, तिला ‘अमेरिकी गुप्तहेर’ असे संबोधले आणि पुन्हा मारण्याची धमकी दिली.
संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष दूत गॉर्डन ब्राऊन यांनी ‘मलालाने ज्या कारणासाठी लढा दिला’ त्याच्या समर्थनार्थ याचिका दाखल केली. ‘मी मलाला’ ही मोहीम सुरू करण्यात आली. याचिकेअंतर्गत ‘पाकिस्तानमधील प्रत्येक मुलाला शिक्षण द्यावे, मुलींना दुय्यम वागणूक देण्यापासून रोखावे आणि 2015 पर्यंत जगभरातील प्रत्येक मुलाला शिक्षण हक्क मिळावा अशा तीन मागण्या करण्यात आल्या. मलालाने हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यान दिले; बराक ओबामांची भेट घेतली. दि.12 जुलै 2013 या दिवशी मलालाने संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण दिले, तो तिचा 16 वा जन्मदिन होता. या दिवसालाच ‘मलाला दिन’ संबोधण्यात आले. यावेळी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी तिला ‘हिरो’ असे संबोधले.
संयुक्त राष्ट्रांमध्ये शेकडो प्रतिनिधींसमोर मलालाने केलेले आत्मविश्वासपूर्ण भाषण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. ‘कट्टरवाद्यांना वाटले आपण हिचे उद्दिष्ट आणि महत्वाकांक्षा संपवून टाकू. प्रत्यक्षात त्यांच्या हल्ल्यामुळे आमच्यातील भीती, अगतिकता व दुर्बलता संपली आणि शक्ती व धैर्याचा जन्म झाला’ असे वास्तववादी विचार मलालाने मांडले तेव्हा सर्वांनी उभे राहून तिला मानवंदना दिली. इतकी खंबीर आणि कणखर मलाला जीवघेण्या हल्ल्यानंतरही तालिबान्यांचा द्वेष मात्र करत नाही. ‘मला ज्याने गोळी घातली तो माझ्यापुढे आला आणि माझ्या हातात बंदूक असली तरीसुद्धा मी त्याच्यावर गोळी चालवणार नाही’ या तिच्या उद्गारांनी तर तिने अवघे जगच जिंकून घेतले.
पण मलालाला आपला देश, आपला गाव सोडावा लागला आहे. ती आणि तिचे कुटुंबीय ब्रिटनमध्येच स्थायिक झाले आहेत. ती परत गेली तर अतिरेकी तिला व तिच्या कुटुंबियांना ठार मारून टाकतील अशी भीती आहे. केवळ वडिलांचा ठाम आधार आहे म्हणूनच मलालाने शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळवून एक इतिहास रचला आहे. खरे तर 2013 साली नोबेलसाठी मलालाचे नाव सुचवले होते पण वयाने फारच लहान, पुढील जबाबदारीचे ओझे मोठे म्हणून ही निवड थांबवण्यात आली. तिला अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
अभिमानास्पद कामगिरी असलेल्या मलालाचा तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने निषेध केला आहे. मलाला परमेश्वराला न मानणारी असल्याचे तालिबानने म्हटले आहे. पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एहसानुल्ला एहसान याने मलालाचा निषेध करून ती इस्लामचे प्रतिनिधीत्व करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. इस्लामविरोधी कृत्य करणार्या नागरिकांविरोधात आमची लढाई सुरूच राहील असेही त्याने म्हटले आहे.
मलालाने विनंती केली आहे की, पुरस्कार स्वीकारताना नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांनी उपस्थित राहावे. मी म्हणते, ‘नोबेल शांतता पुरस्कार हे माझे ध्येय नाही, तर शांतता हे ध्येय आहे. प्रत्येक मुलाला शिक्षण हे ध्येय आहे. कारण एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक, एक लेखणी एवढ्या बळावर जग बदलता येते. दहशतवादाशी लढायचा सोपा मार्ग म्हणजे पुढची पिढी सुशिक्षित करणे.’
बंदुंकांमधून गोळ्या सुटताहेत, तोफा दणाणताहेत आणि कुरापती काढल्याबद्दल चोख उत्तर देण्याचे खणखणीत इशारे दिले जात आहेत. हे चित्र आहे भारत-पाक सीमेवरचे. याचवेळी नोबेल पुरस्कार तोही शांततेचा या दोन्ही शेजार्यांना विभागून मिळावा हा निव्वळ योगायोग नाही तर त्यामागे मोठा अर्थ आहे. तो नक्कीच काहीतरी सुचवित आहे. सत्यार्थी आणि मलाला यांचे वयोगट वेगळे, देश वेगळे, पार्श्वभूमी वेगळी, वाट वेगळ्या पण कामाचा उद्देश एकच आहे. महात्मा गांधींच्या शिकवणीला अनुसरून चोखाळलेली वाट आणि त्यावर नोबेल समितीने उठवली आहे मानाची मोहोर!
-प्रमोदिनी मंडपे