Categories
अंधश्रद्धा

अन् भूत दिसलेच नाही!

एप्रिल - २०१४

अमावास्येची रात्र…. सर्वत्र किर्र काळाकुट्ट अंधार दाटून आलेला…. मध्यरात्र उलटलेली… महामार्गावरील वेगाने जाणारी वाहने…. अचानक एक सुंदर स्त्री अवतरली….तिने गाडी अडविली आणि क्षणात नाहीशी झाली…. हा थरार अनुभवण्यासाठी डोळ्यात तेल घालून बसलेल्या अंनिसच्या कार्यकर्त्यांना पाहता पाहता दिवस उजाडला पण भूत दिसलेच नाही. यावरून पुन्हा एकदा भूत अस्तित्वात नसल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केले आहे.

धुळे-सुरत महामार्गावर सांजोरी फाटा ते उडाणे फाट्यादरम्यान अमावास्येच्या रात्री एक सुंदर स्त्री अचानक अवतरते आणि वाहनांना अडवून अचानक नाहीशी होते. अशी अफवा परिसरात व वाहन चालकांमध्ये पसरली आहे. याची शहानिशा करून सत्य उजेडात आणण्याचा विडा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उचलला. यासाठी दि. 28 फेबु्रवारी हा शनिअमावास्येचा दिवस निवडण्यात आला. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याविषयी निवेदन दिले. कार्यकर्तेअमावास्येच्या रात्री 11.30 वाजता सांजोरी फाटा ते उडाणे फाट्यादरम्यान धुळे-सुरत महामार्गावर जाऊन बसले. पसरलेली अफवा खरी आहे की खोटी याची शहानिशा करायची होती. रात्री 12 वाजेपर्यंत त्यांना काहीही दिसले नाही. दरम्यान धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील पथकाने कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर पहाटे 4 वाजेपर्यंत कार्यकर्ते तेथेच थांबून होते. मात्र कुठलीही स्त्री अथवा भूत तेथे अवतरले नाही. अखेर ही केवळ अफवा असून भूत वगैरे काहीही नाही. हे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. महामार्गावरील भूतासंदर्भातील पसरलेल्या अफवेबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांनी हा प्रयोग केला. त्यात त्यांना यश आले आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात अंनिसचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख शंकर सगरे, सहप्रमुख रणजीत शिंदे, मोहन पवार, अमरदीप पवार, नितीन बागुल, सूरज पानपाटील, गोकुळ देवरे यांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी का. स. वाणी संस्थेत इस्लामपूर येथील खगोल शास्त्राचे प्रा. डॉ. नितीन शिंदे यांच्यासह अवकाश निरीक्षण करून विज्ञान दिन साजरा केला.