Categories
कायदा

जादूटोणाविरोधी कायद्याचे महत्व विरोधकांनाही मान्य

एप्रिल - २०१४

“जादूटोणा विरोधी कायदा हा संमत झालेला आहे. तेव्हा आपण त्याचे स्वागतच करायला पाहिजे या कायद्यामुळे अनिष्ट प्रथांना चाप बसेल.” असे सर्वसाधारण मत जादूटोणाविरोधी कायद्यासंदर्भात झालेल्या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

‘चित्पावन अस्तित्व’ या संस्थेतर्फे पुणे येथे ‘जादूटोणा विरोधी कायदा-किती वास्तव किती विपर्यास’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात महाराष्ट्र अंनिसचे राज्यप्रधान सचिव मिलिंद देशमुख, पतित पावनचे अ‍ॅड.नंदू फडके, निवृत्त आय.पी.एस.अधिकारी अशोक धिवरे, ज्ञानेश्वर महाराजांचे परंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार हे सहभागी झाले होते. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी कार्यक्रमाचे सुत्र-संचालन केले. मिलिंद देशमुख यांनी या कायद्यासंदर्भातील अंनिसची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडली आणि विरोधकांच्या सर्व शंकांचे व्यवस्थित निरसन केले.

आधीचे कायदे असताना या कायद्याची काय आवश्यकता होती याचे योग्य स्पष्टीकरण मिळत नाही असे मत नंदू फडके यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच या कायद्यामुळे हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा व भोंदूगिरी नष्ट होण्यास मदत होईल म्हणून या कायद्याचे स्वागतच करायला पाहिजे असे विचार व्यक्त केले. “सामाजिक कायदे जनतेला व्यवस्थित समजावून सांगितले जात नाहीत. कायदा पारित करणार्‍या लोकप्रतिनिधींचीच ती जबाबदारी आहे.” असे मत अशोक धिवरे यांनी व्यक्त केले.

“वारकर्‍यांचा या कायद्याला विरोध नव्हताच. फक्त आमच्याशी चर्चा करून मगच निर्णय घ्यावा अशी आमची मागणी होती. हिंदू जनजागृतीने कायद्याविषयी वारकर्‍यांची दिशाभूल केली.” असे प्रतिपादन राजाभाऊ चोपदार यांनी केले. संतांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचारच फक्त आम्ही मान्य करत नाही तर त्यांच्या प्रत्येक शब्दावर आमची श्रद्धा आहे. संतांनी चमत्कार केले हेही आम्ही मानतो, असेही राजाभाऊ चोपदार म्हणाले. यावर मिलिंद देशमुख म्हणाले, “केवळ ग्रंथात सांगितले म्हणून चमत्कारांवर विश्वास ठेवणे हे अंनिसला मान्य नाही. प्रचिती आल्यावरच त्यावर विश्वास ठेवणे ही अंनिसची —–

‘देवा धर्माच्या नावाखाली होणारे शोषण या कायद्यामुळे रोखले जाईल. सर्व धर्मांना हा कायदा लागू आहे. या कायद्याविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आता वारकरीही अंनिसबरोबर एका व्यासपीठावर येत आहेत हे चळवळीचे यश आहे.’ असे प्रतिपादन मिलिंद देशमुख यांनी केले. कायद्याच्या बाजूनेच बव्हंशी बोलो जात आहे हे पाहून ‘हा कायदा हिंदूंच्या विरोधी असून त्यात नंतर परिशिष्ट का जोडण्यात आले?’ असा प्रश्न विचारत काही जणांनी परिसंवादात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅड.नंदू फडके आणि संयोजकांनी या कार्यकर्त्यांना गप्प करून गोंधळ घालण्यापासून परावृत्त केले. हे कार्यकर्ते कोणत्या संघटनांचे होते हे सांगण्याची गरज मला वाटत नाही.

–श्रीपाल ललवाणी, पुणे.