अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रामध्ये अनेक अभ्यासपूर्ण व दुर्मिल विषयावरचे लेख प्रसिद्ध होतात. बाजूला पडलेले विषय प्रकाशात येतात. वाचक अंतर्मुख बनतात. समाजात खळबळ उडते. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. काही वेळा अशा लेखांचे पुस्तकही बनते.
असेच डॉ.शंतनु अभ्यंकर यांच्या लेखांचे झाले आहे. अं.नि.वा.च्या दिवाळी अंकात 2008 साली लेख प्रसिद्ध झाला. आता तो टिका-टिपणीसह ‘माझा प्रवास-होमिओपॅथी ते अॅलोपॅथी’ या नावाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला आहे.
लेखावरच्या प्रतिक्रिया आणि त्याची उत्तरे पुढील 2-4 अंकात वाचावी लागतात. पुस्तकामध्ये मात्र ही त्रुटी दूर केली जाते. पुस्तक वाचताना हे ठळकपणे लक्षात येते.
मुळात लेखकाने लेख लिहिला तो त्यांचा वैचारिक आणि मानसिक प्रवास चितारण्यासाठी. ते सांगताना त्यांनी किती अवघड आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेडिकलला प्रवेश मिळवला याचे वर्णन आले. त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल झालेला भ्रमनिरास, होमिओ कॉलेजमधील विदारक अनुभव यांचेही चित्रण झाले. आणि मुख्य प्रवासाऐवजी होमिओपॅथीवरील टीकाच महत्वाची बनली.
टीकेवर प्रतिटीका झाली. त्याला सविस्तर उत्तर मिळाले.
होमिओ कॉलेजमधून बाहेर पडलेले विद्यार्थी बहुधा अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करतात, हे वास्तव लेखकाने नोंदवले आहे. त्यांच्या मते डॉ.हनिमाननी त्या काळात अॅलोपॅथीवर ओढलेले कोरडे योग्य होते, पण त्यांनी सुचवलेला होमिओपॅथीचा पर्याय मात्र अयोग्य निघाला. होमिओपॅथीचे दृश्य परिणाम हे प्लॅसिबो परिणामच असतात. ‘व्हायटल फोर्स’ या मूलभूत संकल्पनेला विज्ञानात स्थान नाही. होमिओतत्वे अंतिम व अपरिवर्तनीय मानतात हे अवैज्ञानिक आहे, असे विविध आक्षेप नोंदवून लेखक म्हणतात – होमिओपॅथीच्या वापरामुळे वेळेत आणि योग्य उपचार मिळविण्याचा रूग्णाचा हक्क हिरावून घेतला जातो. त्यामुळे रोग बळावून घातक ठरतो. म्हणून – ‘होमिओपॅथीची निष्पक्ष चौकशी होईल अशी समिती नेमायला हवी.’
एकूणच ललित लेख म्हणून सुरू केलेला प्रवास होमिओपॅथीची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा करत शेवटपर्यंत उत्कंठा टिकवून ठेवतो.
–अनिल चव्हाण (मोबा.9764147483)
प्रकाशक व लेखक :
डॉ. शंतनू अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक, ब्राम्हणपुरी, मु.पो.ता.वाई, जि.सातारा.
किंमत : रु. 120