Categories
कायदा

महिलांच्या धर्मभोळपणाचा गैरफायदा घेणार्‍या बुबा-बाबांना जादूटोणाविरोधी कायद्याने बसेल चाप!

मार्च - २०१४

अर्ध्या वर्षात तक्रारींचे अर्धशतक

जादूटोणाविरोधी कायदा होऊन आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्यात 50 तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी 43 गुन्हे या कायद्यांतर्गत नोंद आहेत. मात्र यातील 80 टक्के गुन्हे हे महिला शोषणाशी संबंधित आहे. हा कायदा महिलांच्या धर्मभोळेपणाचा गैरफायदा घेणार्‍या बुवा-बाबा-बापू यांना चाप लावेल असा आहे. एका खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने बुवाला स्पष्टपणे सुनावले की, “महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा संमत झाल्यामुळे येथून पुढे अमानुष, अनिष्ट व महाराष्ट्रात अघोरी प्रथा चालणार नाहीत.”

इतर प्रकरणांचा संक्षिप्त आढावा घेऊ या.

यवतमाळच्या वणी तालुक्यातील बोर्डा येथील उषा गजानन राजूरकर ह्या महिलेस करणीच्या संशयावरून काही लोकांनी मारहाण केली. हनुमान मंदिरापर्यंत मारहाण करत नेत मुर्तीवर हात ठेवत करणी करणार नाही अशी शपथ दिली व मानवी विष्ठा तोंडात कोंबली. दि. 2 फेबु्रवारी रोजी ही घटना घडली. अशा अमानुष घटनेची फारशी दखल पोलिसांनी घेतली नाही. परंतु अविनाश पाटील व मुक्ता दाभोलकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईकवाडे यांच्याशी चर्चा करून जादूटोणाविरोधी कायद्यातील कलमांचा आधार घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे अनुसया काकडे, शांताबाई काकडे, अनील, पांडुरंग, गजानन, कवडू काकडे ह्या सहा आरोपींविरूद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. स्थानिक कार्यकर्ते सुरेश वरभे व डब्बावार यांनी ह्या घटनेचा पाठपुरावा केला.

अलौकीक शक्तीचा दावा करून त्याद्वारे मूल होईल अशी बतावणी करून नवविवाहितेचा लैंगिक छळ केल्याची घटना आलूर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद येथे घडली. भोंदू महेबूब याकत कुरणे व इतर चार व्यक्तींविरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. एका 25 वर्षीय महिलेचे तीन वर्षांपूर्वी रवीशंकर जगन्नाथ मडिवाळ याच्याशी लग्न झाले होते. परंतु मूलबाळ होत नसल्यामुळे सासरच्या लोकांनी हॉटेलमध्ये उतरलेल्या भोंदूकडे नेले. त्याने उपचाराच्या नावाने जिवंत कोंबडा जमिनीत पुरल्यानंतर मंतरलेला पेढा सदर महिलेस खाण्यास दिला. त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले. ह्या प्रकरणानंतरही ह्या भोंदूने पुढच्या तीन महिन्यात अनेकवेळा त्या महिलेचे शारीरिक शोषण केले. सासरच्या लोकांचा ह्यात सहभाग असल्यामुळे तिचा पती, सासू, सासरे सहीत भोंदूवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कुंडलीत दोष असल्यामुळे लग्न जमविण्यासाठी पूजाविधी करावा लागेल ह्या बहाण्याने कर्नाटकमधील तरूणीस मिलिंद कांबळे ह्या भोंदूने पंढरपुरास आणले. तिच्या आई वडीलांचा डोळा चुकवून त्या तरूणीस पळवून नेत तिच्यावर बलात्कार केला. पंढरपूर पोलीस ठाण्यात सुरवातीला हरविल्याची नोंद झाल्यानंतर कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक साळुंके यांनी मोठ्या हुशारीने ह्या गुन्ह्याची उकल केली. आरोपीचे नाव-गाव माहीत नसतांना, पूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे करणार्‍या कर्नाटकमधील हंपीजवळील एका मठात राहणारा व मुळचा सांगलीचा मिलिंद कांबळे ह्या भोंदूविरोधात गुन्हा नोंदविला. विठ्ठल मंदिरातील सीसीटीव्हीवरून साळुंके यांच्या संशयाला पुष्टी मिळाली.

वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर व इतर बारा व्यक्तींविरोधात परांडा(जि.उस्मानाबाद) पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 18 जानेवारीच्या रात्री पुरातन मठाजवळ गुप्तधन काढण्यासाठी खोदकाम करताना पोलिसांनी ह्या सर्वांना पकडले. पुजेचे व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. बार्शी शिवसेना शहरप्रमुख दिपक आंधळकर आरोपींपैकी एक आहे तर भाऊसाहेब आंधळकरांकडे येत्या विधानसभेचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. जागरूक नागरिकांमुळे हा प्रकार उजेडात आला.

गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी लोकांना फसविणे, अघोरी उपचार करणार्‍या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. कोंढाली (ता. काटोल, जि. नागपूर) येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भोयर रात्री गस्त घालत असतांना अशा टोळीला पकडले. पुजेचे साहित्य व इतर आक्षेपार्ह वस्तुंसह त्यांची सफारी गाडी पोलिसांनी हस्तगत केली. 6 फेब्रुवारी रोजी घडलेल्या ह्या गुन्ह्यात आठ व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे.

काळी शक्ती वापरून सासूने केलेली करणी घालवितो व सासरी संसार करण्यास पाठवितो अशी थाप मारून महिलेवर बलात्कार करणार्‍या सोलापूरमधील नागनाथ मंदिराचा पुजारी नरसिंग नरसप्पा तंसकार यास सदर बझार पोलिसांनी अटक केली. पुजार्‍याने सदर महिलेस बाटलीतील पाणी पिण्यास दिल्याने तिला गुंगी आली. त्यानंतर पुजार्‍याने तिच्यावर बलात्कार केला. पतीच्या भांडणामुळे ही महिला माहेरी राहत होती. त्याचा गैरफायदा पुजार्‍याने घेतला.

डोंगरी (मुंबई) येथील एका महिलेच्या मुलीचे लग्न जमत नव्हते, त्यासाठी ती सय्यद रहेमान अली या भोंदूकडे गेली. तंत्र मंत्र करून विवाह जुळविण्याचे अघोरी उपचार सुचवत त्याने तीन महिन्यात 2 लाख 4 हजार रूपये उकळले. मात्र मुलीचा विवाह काही जुळून आला नाही. पोलिसांनी ह्या भोंदूस उत्तरप्रदेशातील मुज्जपुरला जाऊन अटक करत मुंबईस आणले. भोंदूने ही रक्कम महिलेस परत केली. उच्च न्यायालयाच्या परवानगीने ही तक्रार रद्द करण्यात आली. न्यायालयाने ह्या भोंदूस सहा हजार रू.दंड ठोठावला. हे पैसे पोलीस कल्याण केंद्रात जमा होणार आहे. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आल्यामुळे येथून पुढे असे प्रकार चालणार नाहीत असे न्यायालयाने सुनावले आहे.

पैशाने पाऊस पाडण्याच्या चमत्काराचा दावा करून लोकांना फसविल्याच्या अनेक घटना राज्यात घडत आहेत. नाशिकच्या म्हसरूळ भागात राहणार्‍या मम्मी बाबा उर्फ संतोष गोरडे ह्या तृतीयपंथी भोंदूने कलावती चव्हाण ह्या महिलेकडून एक लाख ऐंशी हजार घेतले होते. वर्षभर पाठपुरावा करूनही पैसे परत भेटत नसल्यामुळे कलाबाईंनी अंनिसकडे संपर्क केला. अंनिसचे डॉ.टी.आर.गोराणे, महेंद्र दातरंगे व मी नेहमीच्या पद्धतीने पर्दाफाश करत दरबार बंद केला. केस एक वर्षापूर्वीची(कायद्याच्या अस्तित्वात येण्याअगोदरची) असल्यामुळे व कलाबाई तक्रार करण्यास तयार होत नसल्यामुळे कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकली नाही. परंतु कलाबाईंचे पैसे अंनिसमुळे परत मिळाले. अंनिसने मम्मीबाबाच्या दरबारासमोर प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम केला तर मम्मीबाबाने पोलिसांसमोर माफीनामा लिहून दिला.

अंगावर जखम नसलेल्या तरूणीची विशिष्ट अघोरी पूजा केल्यास पैशाचा पाऊस पडतो असा चमत्काराचा दावा करत तरूणींचे लैंंगिक शोषण करणार्‍या टोळीचा पर्दाफाश दापोलीला झाला. अंनिसचे कार्यकर्ते मुक्ता दाभोलकर, अनिश पटवर्धन व इतरांनी ह्या गंभीर प्रकरणाला वाचा फोडली. तरूणींना जाळ्यात ओढणार्‍या संगिता नार्वेकर ह्या मध्यस्थी महिलेस पोलिसांनी अटक केली. लांब केस व अंगावर कोणतीही जखम नसलेल्या मुलींची तपासणी रत्नागिरीच्या लोकांकडून केली जात असे. ह्यामध्ये वीसपेक्षा अधिक तरूणींचे लैंगिक शोषण झाल्याची चर्चा आहे. आणखी उकल होण्याची शक्यता आहे. ह्या गुन्ह्यात जादूटोणाविरोधी कायद्याचा आधार घेण्यात आला.

कृष्णा चांदगुडे