Categories
कायदा परिषद

मुंबईत जादूटोणा विरोधी कायदा : स्वागत व अंमलबजावणी परिषद संपन्न

महाराष्ट्रात भोंदू बुवा-बाबांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार!
मार्च - २०१४

महाराष्ट्रातील अघोरी, अमानुष व अनिष्ट प्रथांच्या निर्मूलनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पारित केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याचे पाऊल संपूर्ण भारताला दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणीसाठी जादूटोणाविरोधी कायदा : स्वागत व अंमलबजावणी राज्यव्यापी परिषद रविवार दि.9 फेब्रुवारी 2014 रोजी चेतना कॉलेज, बांद्रा येथे घेण्यात आली.

परिषदेस राज्यभरातून महाराष्ट्र अंनिसचे सुमारे 500 कार्यकर्ते, विविध पुरोगामी परिवर्तनवादी पक्ष संघटनाचे प्रतिनिधी तसेच मुंबई विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे युवक-युवती व प्राध्यापक सहभागी झाले होते. अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथारूपी बंद कुलूप कायद्याच्या किल्लीने उघडून परिषदेचे अभिनव पद्धतीने उद्घाटन झाले. उद्घाटक होते सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते व दिग्दर्शक नंदू माधव. परिषदेची सुरवात दाभोलकरांना गीतरूपाने अभिवादन करून झाली. विवेक आणि विज्ञानाने दाभोलकरांनी आम्हा सर्वांना बळ दिलं अशा आशयाच्या या गीताद्वारे अंनिसची चळवळ आम्ही पुढे नेऊ असा निश्चय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

परिषदेचे प्रास्ताविक राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी केले. हा कायदा हिंदूधर्म विरोधी आहे असा अपप्रचार करणार्‍यांना या कायद्याने घातलेला पहिला खटला मुस्लीम बाबावर आहे असे सांगून टीकाकारांना सणसणीत उत्तर दिले. या कायद्याबद्दल इतर राज्यातून मागणी येऊ लागली आहे याचा अभिमान त्यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.

परिषदेच्या पहिल्या सत्रात नंदू माधव, आमदार विद्याताई चव्हाण व मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.बिडवे सर व प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी या मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. विद्याताईंनी विधानसभेत व विधानपरिषदेत कायद्याची पाठराखण करताना विरोधकांना कसे समर्थ उत्तर दिले याचा अविनाशने अभिमानाने उल्लेख केला. नंदू माधव दिग्दर्शित नाटक ‘शिवाजी अंडरग्राऊंड….’ परिवर्तनवादी विचारधारेचे कसे समर्थन करते व शिवाजी राजे हे धर्मद्वेष्टे नव्हते हा विचार कसा मांडते याची माहिती सांगून परिवर्तनवादी संघटनांना एकत्र आणणार्‍या ‘सांगड’ चे नंदू माधव निर्माते आहे अशी त्यांची ओळख करून दिली.

कायदा जनमानसात रूजावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत प्रभावी प्रबोधन करता येईल व यासाठी मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग समितीला सहकार्य करेल अशी ग्वाही प्रा.बिडवे सरांनी कार्यकर्त्यांना दिली.

आमदार विद्याताई चव्हाण यांनी कायदा मंजूर होताना विधानसभेत आपण कसा आवाज उठविला याची माहिती सभागृहाला दिली. अंनिसचे कार्यकर्ते डॉ.दाभोलकर यांचे कार्य ऐतिहासिक आहे. या कार्याला सलाम करून त्या म्हणाल्या, आता महाराष्ट्रापुरतं थांबून चालणार नाही. पैसे मिळविण्याचे सोपे साधन म्हणजे बुवाबाजी- तिला लगाम घालायलाच हवा. टी.व्ही.चा अंधश्रद्धा वाढविण्यात मोठा प्रभाव दिसतोय याबद्दल चिंता व्यक्त करून विद्याताईंनी सिने-नाट्य क्षेत्रातील मंडळींनी हा प्रभाव रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात, दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेनंतरच अभूतपूर्व परिस्थितीच्या वेळीच राज्यकर्त्यांना कायदा करण्याची बुद्धी झाली याबद्दल दु:ख व्यक्त केले. आपल्या देशात हीच वृत्ती सर्वत्र आढळते. नाकापर्यंत पाणी आलं तरच कृती ही वृत्ती राज्यकर्त्यांनी बदलायला हवी अशी टीका केली. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध माध्यमांचे सहकार्य घ्यावे अशी सूचना करून सोनाली कुलकर्णींनी अमीरखान निर्मित ‘सत्यमेव जयते’ या मालिकेतून कायद्याबाबत प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मौलिक सूचना केली.

डॉ.दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा विचार संपेल अशी धारणा काही हितशत्रूंची होती. पण चळवळीचे मोजमाप करता चळवळ अधिक गतीमान झाल्याचे जाणवते. वारकरी, सेलिब्रिटी, एन.एस.एस., विद्यार्थीभारती पथनाट्य ग्रुप असे विविध सामाजिक घटक चळवळीला सहकार्य करू लागलेत ही आश्वासक बाब आहे असे सांगून मुक्ता दाभोलकर यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीतून स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचे भयानक वास्तव पुढे आलेले आहे असा निष्कर्ष आपल्या मनोगतात व्यक्त केला.

नंदू माधव यांनी पहिल्या सत्राचा समारोप करताना सिनेनाट्य क्षेत्रातील मंडळीकडचा प्रचंड पैसा या मंडळींना अंधश्रद्ध बनवितो. त्यांचे वर्तन चूक आहे असे सांगून, कुठलंही कर्मकांड न करता, नारळ न फोडता ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा सिनेमा ऑस्करपर्यंत जातो व ‘शिवाजी अंडरग्राऊंड’चे एका वर्षात 200 प्रयोग होतात हा अनुभव कथन केला. त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्याला ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे समर्थ रूप द्यावे जेणेकरून गुण नाही तर पैसे परत अशी परिस्थिती निर्माण व्हावी असा मौलिक उपाय सांगितला.

दुपारच्या सत्राची सुरवात प्रख्यात शाहीर संभाजी भगत यांच्या बहारदार गायनाने झाली. शहाजी भोसले, प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे व प्रशांत पोतदार यांनी चमत्काराची प्रात्यक्षिके सादर केल्यावर शामसुंदर महाराज या कीर्तनकारांनी आपले विचार व्यक्त केले.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार 700 वर्षांपूर्वीच संतांनी सुरू केला. अविवेकाची काजळी जावी असे ज्ञानेश्वर म्हणाले. पांडुरंग हा विचार आहे, पंढरपूरच्या वाळवंटात विवेकाचा गजर होत राहिला. पांडुरंग शस्त्रधारी नाही. तो कुणाकडून काही मागत नाही व कुणाला काही देत नाही. पांडुरंगाचे नाव हे अविवेक मुक्तीचे साधन आहे. पांडुरंग हा आईप्रमाणे आहे. सुई काढून खेळणे हातात देणारी आई. संतांनी मोक्षाची, पापाची व देवाची भीती संपविली असा अंधश्रद्धाविरोधी संत कार्याचा प्रभाव त्यांनी सुंदरपणे श्रोत्यांना पटवून दिला.

राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम यांनी कायद्याला विरोध करणार्‍या वारकर्‍यांचा विरोध श्यामसुंदर महाराज व अन्य विवेकी वारकर्‍यांनी कसा परतवून लावला याचा दाखला देऊन सर्व पुरोगामी मंडळींनी एकत्रितपणे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत राहण्याची सूचना केली. प्रसिद्ध समाजवादी अर्थतज्ञ मा.गजानन खातू यांनी संत हे केवळ श्रद्धा व भक्ती यांचे समर्थक नव्हते तर त्यांनी समाजाला विवेकाचे भान दिले असे सांगून संतपूर्व काळात व त्यांच्या समकालीन सामाजिक व्यवस्थेत मठपरंपरा व इतर अनाचार कसा माजलेला होता, काळ्या जादूची कशी चलती होती याची उदाहरणे दिली. संतांनी भक्ती ही स्वार्थी श्रद्धा होय, समाजावर श्रद्धा हवी असा विचार सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे दिला. प्रथम स्वत:चे अज्ञान दूर करा, स्वावलंबी व्हा असे सांगून खातू यांनी तरूणांच्या प्रबोधनाचे कार्य हाती घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

आदिवासी स्त्रियांच्या प्रश्नांवर संघर्ष करणार्‍या सुरेखा दळवी दुपारच्या सत्रात सहभागी होत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाचे नाव न घेता अंधश्रद्धा विरोधी कार्य कसे केले यांचे अनुभव सुरेखाताईंनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कायदा झाला म्हणून शिथील होऊ नका, सरकारवर सर्व जबाबदारी ढकलू नका, कायद्याचे बारकावे माहीत करून पुरावे शोधा व कायदा समर्थकांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करा असा मौलिक सल्ला त्यांनी अंनिस कार्यकर्त्यांना दिला.

शेवटच्या सत्राला प्रख्यात पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश हे प्रमुख मार्गदर्शक लाभले. समारोपाच्या मनोगतात राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी ज्या समविचारी संघटनांनी कायदा पारित होण्यासाठी अंनिसला पाठबळ दिले त्या सर्वांचे आभार मानले. आजपर्यंत दाखल झालेल्या 36 गुन्ह्यांचा उल्लेख करून सक्षम अधिकार्‍यांचे सहकार्य कायद्याला मिळत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. शासन व समिती मिळून काय करता येईल यावर बावगे सरांनी विस्तृत विवेचन केले. चौदा मंत्रालयाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगून सुशीला मुंडे राज्यप्रधान सचिव यांनी कायदा अंमलबजावणी साठीची चतु:सुत्री व घोषणा पत्र वाचून दाखविले.

समारोपाच्या मनोगतात कृष्णप्रकाश यांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना प्रभावित करणारे विचार मांडले. एक पोलीस अधिकारी इतके प्रभावी व शैलीदार भाषण करतो याचा सुखद अनुभव सभागृहाला आला. भारत हा जादूटोण्याचा देश राहणार नाही तर तो ज्ञानभूमी बनावा यासाठी अंनिसची चळवळ समर्थपणे पुढे चालू रहावी अशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. चेहरा कुरूप असेल तर आरसा साफ करून काय उपयोग? मन हा आरसा नाही तर तो पेला आहे. हा पेला अज्ञान-अंधश्रद्धाने भरला आहे. ते दूर करून ज्ञानाने हा पेला भरून युटोपिया टाका व बुद्धीप्रामाण्य स्वीकारा असा सल्ला कृष्णप्रकाश यांनी कार्यकर्त्यांना दिला.

कायदा अंमलबजावणी परिषदेचा समारोप अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला. सज्जनांची शक्ती आमच्या पाठीशी आहे. आव्हान पेलायचं आहे त्यासाठी विवेकाचा आवाज बुलंद करू या. अशा शब्दात अविनाश पाटीलनी परिषदेचे सार मांडले.

हम होंगे कामयाब या गीताने परिषदेचा समारोप झाला!

मुंबई अंनिस शाखेचे कार्यकर्त्यांनी या परिषदेचे उत्कृष्ट संयोजन केले होते. चेतना कॉलेजचे चेअरमन आ.शिरीष चौधरी यांची यासाठी मोलाची मदत झाली.

राहुल थोरात

जादूटोणा विरोधी कायदा : प्रभावी अंमलबजावणी घोषणापत्र

आमचा चतु:सूत्री कार्यक्रम :

1) विविध प्रचार साहित्य निर्मिती व वितरण : त्यामध्ये चित्रमय पुस्तिका, कायद्याचे कॅलेंडर, पोस्टर्स, स्टिकर्स इत्यादी.

2) मानसिकता निर्मितीसाठी व्यापक प्रबोधनाचे कार्यक्रम : त्यामध्ये सजवलेल्या वाहनासह प्रशिक्षित कार्यकर्त्यांकडून पुढील 4 महिने जिल्हानिहाय शहर व ग्रामीण भागातून प्रबोधन कार्यक्रमांचे सादरीकरण.

3) प्रशिक्षकांचे प्रशिक्षण : महाराष्ट्र अंनिस व समविचारी कार्यकर्त्यांचे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या पाच महसूल विभागनिहाय प्रशिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन. प्रशिक्षित कार्यकर्त्यांकडून जिल्हानिहाय विविध समाजघटकांसाठी(उदा. पोलीस व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, महिला व सामाजिक कार्यकर्ते) प्रशिक्षण व प्रबोधन कार्यक्रम.

4) अनिष्ट, अघोरी व अमानुष प्रथांविरोधात गुन्हे नोंद प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न : राज्यभरातील बुवाबाजी व अंधश्रद्धांच्या प्रकारांचे सर्वेक्षण करून त्यामधील गुन्हे दाखल करण्याची क्षमता तपासणे आणि गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी सामाजिक बांधिलकी मानणार्‍या वकिलांचा अनौपचारिक समन्वय करून सहकार्य करणारी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करणार.

जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम (Rules) लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने तयार करावे. महाराष्ट्र अंनिस यशवंतराव चव्हाण, मुंबई यांच्या विधी व सहाय्य केंद्रांच्या मदतीने त्याचा पाठपुरावा करणार.

जादूटोणाविरोधी कायदा प्रभावी अंमलबजावणी मोहीम” महाराष्ट्र अंनिसच्या वतीने येत्या मार्च महिन्याच्या सुरवातीला चवदार तळे, महाड, जि.रायगड येथून सुरू करणार आहोत. त्याचप्रमाणे पावसाळा सुरू होईपर्यंत “जादूटोणा विरोधी कायदा प्रबोधन वाहिनी” हे सजवलेले वाहन प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या सहभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून फिरवले जाणार आहे.

जादूटोणा विरोधी कायदा : मागणी पत्र

(महाराष्ट्र शासनासाठी पाच कलमी कृती कार्यक्रम)

अठरा वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीनंतर व डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा मंजूर केला. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे हार्दिक आभार व अभिनंदन.

कायदा झाला पण त्याची प्रभावी अंमलबजावणी ही महाराष्ट्र अंनिसला महत्वाची वाटते. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री व विविध विभागांच्या सचिवांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीत महाराष्ट्र अंनिसच्या वतीने कायदा प्रभावी अंमलबजावणीसाठी सोबतचे मागणी पत्र दिलेले आहे. त्यातील प्रमुख महत्वाच्या बाबी या शासनाच्या 14 मंत्रालयांशी निगडित आहेत. या मागणी पत्राची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी ही परिषद करीत आहे.

1. शासनाची मान्यता, अनुकुलता व सहकार्य.

2. राज्य पातळीवर व जिल्हानिहाय कार्यवाहीची यंत्रणा.

3. प्रचार साहित्य निर्मिती व वितरण व्यवस्था.

4. राज्यस्तरीय प्रशिक्षक प्रशिक्षण व जिल्हानिहाय प्रशिक्षण कार्यक्रम.

5. या कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्यासाठीची सहानुभूतीपूर्वक मानसिकता व कायदा अंमलबजावणीसाठीचे नियम तयार करून दक्षता अधिकार्‍यांपर्यंत पोहचवणे.