स्वत:ला जीवापाड जपणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला नेहमीच दिसत असतात. स्वार्थासाठी दुसर्याचा जीव घ्यायला मागेपुढे न पाहणारी माणसेदेखील या समाजात दिसून येतात. या पार्श्वभूमीवर जिया खानसारखी पंचवीस वर्षांची एक तरूण अभिनेत्री जिने अजून आयुष्याचा पुरेसा अनुभवदेखील घेतलेला नाही, ती स्वत:च्याच हाताने आयुष्य संपवून घेते, या घटनेकडे कुठल्या नजरेने बघावे, हा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडणे स्वाभाविक आहे.
गुरूदत्तपासून ते सिल्क स्मितापर्यंत बॉलीवुडमधील आत्महत्यांमध्ये आणखीन एक भर म्हणत तात्पुरती हळहळ व्यक्त करून आपण हा सगळा प्रसंग विसरू शकतो. पण भारतातल्या तरूणाईमधील वाढत्या आत्महत्येच्या सुप्त लाटेतील एक घटना म्हणून जर आपण जिया खानच्या आत्महत्येकडे पाहिले, तर मात्र अनेक गंभीर गोष्टी समजून घेण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते.
पहिली व महत्वाची गोष्ट अशी की, आपल्यातील अनेकांना हे माहीतच नाही, की आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर तरूणाई स्वत:च्या हाताने स्वत:चे आयुष्य संपवून घेते आहे. ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’च्या पुढाकाराने झालेला भारतातील आत्महत्यांचा शास्त्रीय अभ्यास ऑगस्ट 2012 च्या ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख आत्महत्या होतात. आणि त्यामधील 40 टक्के पुरूष व 59 टक्के महिला या 15 ते 29 वयोगटातील आहेत. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर दरवर्षी देशातील जिया खानसारखी ऐंशी हजार ते एक लाख तरूण मुले-मुली स्वत:च्या हाताने स्वत:चे आयुष्य संपवून घेत आहेत. भारतातील आत्महत्यांची नोंद ठेवणार्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या या वर्षीच्या रिपोर्टनुसार 2006 पासून दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या 2.5 टक्क्यांनी वाढते आहे. भारताने लढलेल्या कुठल्याही लढाईत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींपेक्षा ही संख्या कितीतरी जास्त भरेल.
भारतातील तरूणाईमधील वाढत्या आत्महत्यांची विशिष्ट कारणे समजून घेण्याआधी एकूणातच एखादी व्यक्ती आत्महत्या का करते, हे मुळातून समजून घेणे आवश्यक आहे. आत्महत्येच्या कारणांविषयी आपल्या समाजात शास्त्रीय माहितीपेक्षा गैरसमजच जास्त आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात महत्वाचा गैरसमज म्हणजे मनात आत्महत्येचे विचार येणे हा त्या व्यक्तीच्या मनाचा कमकुवतपणा होय.
आत्महत्येच्या कारणांचा शास्त्रीय अभ्यास मात्र आपल्याला असे सांगतो की, एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येणे हे जैव-मनो-सामाजिक अशा तीन प्रकारच्या कारणांच्या एकत्रीकरणातून दिसून येणारा परिणाम आहे. व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येण्यामागे ‘जैविक’ कारणे असतात, हे आपल्यातील अनेकांना आश्चर्यकारक वाटू शकते पण आत्महत्येचे विचार मनामध्ये येणार्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये ‘सिरोटोनीन’ या जैव घटकाची कमी असते, हे आता शास्त्राने सिद्ध केले आहे. आत्महत्येचे विचार मनात येण्यासाठीच्या जैविक कारणांमध्ये ‘अनुवंशिकता’ हा देखील महत्वाचा भाग असतो. हेमिंग्वे या प्रख्यात साहित्यिकाच्या सात पिढ्यांमध्ये आत्महत्यांची नोंद आढळते. स्वत: हेंमिग्वेनेदेखील आत्महत्या करूनच आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्येचे विचार मनामध्ये येण्यामागच्या मानसिक कारणांमध्ये औदासीन्य(डिप्रेशन) व व्यसनाधिनता हे मानसिक आजार प्रमुख आहेत. त्याचबरोबर व्यक्तीच्या स्वभावातील उतावळेपणा व अस्थिर स्वप्रतिमा हीदेखील दोन महत्वाची मानसिक कारणे आहेत.
सामाजिक कारणांमध्ये शेतीमालाच्या अस्थिर भावामुळे होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या अथवा परीक्षा पद्धतीच्या ताणाने होणार्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या गोष्टी येतात. जैव-मनो-सामाजिक यातील एकाच एका कारणाने व्यक्ती आत्महत्या करायला प्रवृत्त होते असे नसून, या तिन्ही गोष्टींच्या कमी अधिक संयोगामधूनही व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात. तरूणवर्गातील वाढत्या आत्महत्यांचा विचार करताना मात्र तरूण वर्गाची बदलती जीवनशैली व कुटुंबव्यवस्था या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे. आयुष्यामध्ये अपयशी होणे म्हणजे जणू काही भयंकर गोष्ट आहे व कुठल्याही प्रकारे आयुष्यात यशस्वी झालेच पाहिजे, ही धारणा सध्याच्या तरूणवर्गात मोठ्या प्रमाणावर रूजलेली आहे. यशस्वी होण्यासाठी जिवाचा अटापिटा करणार्या तरूणाईची संस्कृती एका बाजूला घडवीत असतानाच अपयश पचवायला शिकवणारी संस्कृती घडवण्यात आपली म्हणून कुठेतरी पिछेहाट झाली आहे. तरूणांमधील वाढत्या आत्महत्यांमागे हे एक महत्वाचे कारण आहे.
खास करून करिअर व प्रेमाच्या नातेसंबंधात आलेले अपयश पचवायला आजच्या तरूण पिढीला अवघड जाते आहे. प्रेम व आकर्षण या संकल्पनांमधील गोंधळ, एकदा प्रेमात अपयश आले म्हणजे आयुष्य संपले अशी मनोधारणा आजच्या तरूणाईत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. बदलत्या कुटुंबव्यवस्थेचादेखील एक महत्वाचा संदर्भ या आत्महत्यांना आहे. आयुष्यात टोकाच्या ताणाच्या प्रसंगी जवळचे नातेसंबंध आपल्याला भावनिक आधार देण्याचे काम करत असतात. बदलत्या कुटुंबव्यवस्थेत अशा आधाराच्या जागा झपाट्याने कमी होत आहेत. त्याचा सगळ्यात मोठा फटका मुलांना व तरूणांना बसताना दिसतो आहे. आयुष्याच्या प्रचंड वाढलेल्या वेगामुळे शांतचित्ताने समोरच्या प्रसंगाचा विचार करण्याचे माणसाचे कौशल्यदेखील कमी होते आहे की, काय अशी शंका येते. आपणा बहुतांश लोकांच्या आयुष्यात असा प्रसंग कधी ना कधीतरी येतो की, दैनंदिन जीवनातले त्रास सहन करण्यापेक्षा नसलेले बरे असा विचार आपल्या मनामध्ये चमकून जातो. अशा परिस्थितीत त्या विचारावर उतावळेपणाने कृती करण्याऐवजी आपण आयुष्यातील सकारात्मकतेचा विचार करून स्वत:ला सावरतो. आपल्या व्यक्तिमत्वाची परीक्षा पाहणार्या या क्षणांना सामोरे जाण्याचे कौशल्य तरूण पिढीमध्ये कमी पडल्यामुळे तर अशा घटना घडत नाहीत ना, अशी शंका येते.
यासाठी शासन व समाज यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. शासनाने वाढत्या आत्महत्या हे तरूण वयातील मुलांमुलींच्या मृत्यूचे एक महत्वाचे कारण आहे हे मान्य करून काही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. राज्यपातळीवर वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी कार्यक्रमाची आखणी करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मानसिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे मोठे पाऊल ठरू शकते. उदासीनता व व्यसनाधिनतेचे आजार हे आत्महत्येमागे एक महत्वाचे कारण असल्याने या आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर उपलब्ध असलेले उपचार हे वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
आत्महत्येच्या प्रयत्नातून बचावलेली व्यक्ती ही परत आत्महत्या करण्याची मोठी शक्यता असते. महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्हा रूग्णालयामध्ये वर्षातील कुठल्याही दिवशी असे एक-दाोन रूग्ण तरी उपचार घेत असतात. त्यांना मानसिक आधार व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास या व्यक्ती परत आत्महत्येच्या विचारांकडे वळणार नाहीत. मानसिक अस्वस्थतेच्या वेळी हमखास मदत मिळेल अशा 24 तास चालणार्या टोल फ्री टेलिफोन सुविधादेखील जिल्हापातळीवर सुरू करणे सहज शक्य आहे.
आत्महत्या अथवा आत्महत्येचा प्रयत्न ही गोष्ट आजदेखील कायद्याने गुन्हा समजली जाते. त्यामुळे कायद्याच्या भीतीने अनेक वेळा वैद्यकीय उपचार घेण्यात दिरंगाई होते. त्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. आत्महत्येच्या घटनेकडे मानसिक अस्वस्थतेचा निर्देशांक म्हणून पाहून या घटनेचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे.
हे झाले शासन व कायद्याच्या पातळीवरील प्रयत्न! परंतु आपणा सर्वांच्या संवेदनशील आणि कृतिशील सहभागाशिवाय केवळ कायदा अथवा शासनाच्या प्रयत्नांनी हा प्रश्न सुटू शकत नाही हे सर्वांनीच जाणायला हवे. आत्महत्येचा प्रयत्न करणार्या बर्याच व्यक्ती अशी कृती करण्याच्या आधीच्या महिन्याभरामध्ये थेट अथवा अप्रत्यक्षपणे याविषयी आपल्या जवळच्या व्यक्तीला सूचित करण्याचा प्रयत्न करतात. बहुतांश वेळा आपल्या समाजात असे विचार करणारी व्यक्ती ही स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी असे करते आहे किंवा नाटक करते आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
आपल्या आजूबाजूला अशी कोणी व्यक्ती असल्यास आपण हा इशारा गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. जवळच्या नातेवाईकांचे प्रेमाचे दोन शब्ददेखील अशावेळी त्या व्यक्तीसाठी जीवनदायी ठरू शकतात. त्यापलीकडे गरज भासल्यास अशा व्यक्तीला समुपदेशकाकडे घेऊन जाण्यातदेखील आपण महत्वाची भूमिका बजावू शकतो. या सगळ्यात सर्वात महत्वाचे आहे ते आपल्या आजूबाजूच्या तरूणाईशी संवाद साधणे! बदलत्या जीवनशैलीला सामोर जाताना आपल्या आयुष्याचा समतोल तर ढळत नाही नाहीए ना, हे तपासून पाहायला आपण त्यांना उद्युक्त केले पाहिजे.
प्रत्येक तरूण-तरूणीच्या आयुष्यात येणार्या आकर्षण, प्रेम, जोडीदाराची निवड या आनंददायी टप्प्याकडे तरूणाईला निकोपपणे बघण्यासाठी आपण मदत करणे आवश्यक आहे. आपल्या घरात या विषयांवर मोकळेपणाने बोलता यावे असे वातावरण तयार करणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. आयुष्याच्या या टप्प्यामध्ये निर्णय घेताना भल्या-भल्यांकडून गोंधळ होतात. तरूण वयात प्रेमातील नकारामुळे आयुष्यच व्यर्थ आहे ही भावना प्रेमाच्या उत्कटतेचा निर्देशांक नसून उतावळेपणा व अपरिपक्वता आहे… आयुष्य प्रत्येकाला परत परत संधी देत असते, हे या तरूणाईपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्वाचे आहे. करिअरच्या बाबतीतदेखील यश व अपयश या आयुष्याच्या दोन महत्वाच्या बाजू असून, हे दोन्ही अनुभव आयुष्यात आपल्याला भरपूर काही शिकवत असतात, हे देखील तरूणांशी आपण बोलले पाहिजे.
प्रसार माध्यमांचीही याबाबतीत मोठी जबाबदारी आहे. आत्महत्येच्या बातम्यांचे वार्तांकन हे दुधारी शस्त्र आहे. हे वार्तांकन अनेकदा आत्महत्यांविषयी समाजामध्ये जागृती वाढविण्याऐवजी त्यातून ‘कॉपीकॅट’ प्रकारातील आत्महत्या वाढण्याची भीती असते. जागतिक आरोग्य संघटनेने माध्यमांनी आत्महत्यांचे वार्तांकन कसे करावे, याविषयी दिशादर्शक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये माध्यमांनी आत्महत्यांचे सनसनाटीकरण टाळावे, पहिल्या पानावर अशा बातम्यांना ठळक प्रसिद्धी देणे टाळावे, अशा अनेक गोष्टी सुचविल्या आहेत. त्यांचे आपल्याकडे सर्रास उल्लंघन होताना दिसते. आत्महत्यांचा प्रश्न समाजासमोर मांडताना त्याचा उलटा परिणाम तर होणार नाही ना, याबाबतची संवेदनशीलता माध्यमांनी बाळगण्याची गरज आहे.
देशाबाहेरून होणार्या हल्ल्यांविषयी आपण जेवढे संवेदनशील असतो, त्याच्या एक-दशांश संवेदनशीलता जरी आपण या प्रश्नाविषयी दाखवली, तसेच शासन, समाज व माध्यमे यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर आपण तरूणाईचे हे आत्महत्येचे सत्र निश्चितपणे थांबवू शकू.
-डॉ.हमीद दाभोलकर
‘लॅन्सेट’मधला शोधनिबंध काय सांगतो?
1) आत्महत्यांमुळे होणार्या मृत्यूंची संख्या एच.आय.व्ही.ने होणार्या मृत्यूंच्या संख्येच्या दुप्पट आहे.
2) महाराष्ट्र, तामिळनाडू व आंध्र प्रदेश या तुलनेने प्रगत राज्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण अधिक.
3) ग्रामीण व निमशहरी भागामध्ये राहणार्या उच्चशिक्षित वर्गामध्ये आत्महत्यांचे प्रमाण जास्त.
4) कीटकनाशकांच्या प्राशनामुळे होतात सर्वात जास्त आत्महत्या. त्यामुळे कीटकनाशकांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी गांभीर्यपूर्वक प्रयत्न आवश्यक.