Categories
प्रतिसाद

वाचणारे म्हणतात

जुलै - २०१३

म. फुले यांचा आदर्श समोर असावा

            शहाजी भोसले यांच्या भानामती लेखावरील प्रतिक्रिया वाचल्या. आपण प्रश्न सोडवण्याच्या नादात परिवर्तनापासून लांब गेलो हे आपल्या लक्षात आले नाही. ‘हिजडा’ ह्या व्यक्तीबद्दल पारंपारिक तुच्छतादर्शक मताचा पाया सोडला नाही. ही एक जैविक पेशी व संप्रेरकाच्या आखीव मार्गापासून भरकटल्यामुळे व्यक्तीच्या पूर्णत्वात आलेली कमतरता आहे, अशीच कमतरता मूकबधीर, अपंग यांनाही असते. पण पुरूषी मर्दानगीचा अहंकार व धार्मिक छळवादातून आपण त्या व्यक्तीला ‘माणूस’ स्वीकारायला अजून तयार नाही. ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

            दुसरा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्यानंतर विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीत कमी पडलो म्हणून अज्ञानी व्यक्तीला जुन्या भ्रमातून बाहेर काढू शकलो नाही. भ्रामक भीती व भ्रामक उपचार यातच समाज गुरफटून गेला आहे. पूजा, कर्मकांड, पाप, शाप, वास्तुशास्त्र इत्यादीची दोन ठळक उदाहरणे म्हणजे सत्यनारायण पुजेचा उपद्व्याप व रामसेतूची दंतकथा.

            रसेल म्हणतो, सारी मानवजात सुखासमाधानात राहावी अशी जर तुमची आकांक्षा असेल तर काही प्रकारचे हीन सुखाचे मार्ग तुम्हाला खुले नसतात. बुद्धीचे सच्चेपण असलेला पिता-मुलाच्या आजारपणात वैद्यकीय तपासणीचा निष्कर्ष मग तो निराशजनक आणि दु:खद असलातरी स्वीकारील.

            आगरकर म्हणतात, सत्यशोधनाच्या प्रयत्नात बुद्धीनिष्ठेशिवाय अन्य कोणत्याही मार्गाचा अवलंब करून चालणार नाही. भानामती केसमध्ये अपराधीपणाची भावना कायम चालू राहिल्यास मानसिक ताणतणाव छळत राहतात. अपराध घडल्यास भविष्यातील जीवन दु:खी होऊ शकते.

            हे सर्व करताना फसविल्या गेलेल्या महिलांची बाळंतपणाची सोय करून मानववादी कृती करण्याचे धैर्य असणार्‍या महात्मा फुले यांचा आदर्श आपल्यापुढे असावा.

-रमेश माणगावे,  जयसिंगपूर, जि.कोल्हापूर

लताच्या भानामतीचा तिढा

            एप्रिल 2013 मधील आपल्या अंकातील ‘लताचा प्रश्न’ विवेकी पद्धतीने कसा सोडवावा? असे आवाहन आपण जून 2013 च्या आपल्या अंकामध्ये केले आहे.

            वास्तविक तो लताचा प्रश्न त्याच अंकामध्ये शेवटी विवेकी पद्धतीनेच सुटला आहे, हे कोणाच्याही लक्षात न आल्यामुळे, तो प्रश्न खोटे बोलून व अवैज्ञानिक मार्गाने सोडविला आहे, असा सर्वांचा समज झालेला आहे.

            प्रथम शहाजी भोसले व अरूणा यांनी लताच्या घरी जाऊन तिच्या सर्व परिवाराकडून, त्याचबरोबर घरगडी व समवयस्क असणारी शेजारीण यांच्याकडे पूर्ण चौकशी केली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

            त्यानंतर त्या दोघांनी लताची समक्ष भेट घेतली. सत्य वस्तूस्थितीची माहिती घेण्यासाठी खोटे बोलून अवैज्ञानिक माहिती दिली. तिला होणारे मूल हिजडे होईल वगैरे वगैरे.

            परंतु त्यातूनही तिने सत्य असे काहीच सांगितले नाही. नंतर विवेकी पद्धतीने संवाद करून तू तुझ्यासाठी खरी माहिती दिली तर आम्ही दोघेही त्या माहितीची वाच्यता कोठेही करणार नाही. असे म्हटल्याबरोबर त्या शर्तीवर तिने सर्व माहिती खरी सांगितली. याच विवेकी पद्धतीने तो प्रश्न ताबडतोब सुटला आहे.

            यापेक्षा साधा व सरळ विवेकी पद्धतीचा दुसरा मार्ग नसावा असे वाटते.

-मगन हसन तांबोळी,  दिघंची, जि.सांगली.

वार्तापत्राचे देखणे रूप…

          म.अं.नि.स.ला वीस वर्षे झाली. त्याचबरोबर अंनिसच्या वार्तापत्रासही वीस वर्षे होऊन गेली. वार्तापत्राच्या अंतरंगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले असून प्रत्येक विभाग वाचनीय, चिकित्सक, प्रेरणादायी झालेत. यामध्ये संपादक व सहसंपादकांचे खूप कष्ट आहेत. सदर बाबीमुळे प्रत्येक महिन्याचा अंक वाचून काढल्याशिवाय चैन पडत नाही. त्याचबरोबर प्रत्येक अंकाचे मुखपृष्ठ हे चित्त आकर्षक रंगीबेरंगी अर्थपूर्ण असते.

-विलास भांदिर्गे, तारळे, जि.सातारा.