Categories
भानामती संपादकीय

लताची नाजूक भानामती : काही प्रश्न

जून – २०१३

चेटूक-करणी-भानामतीची प्रकरणे महाराष्ट्रात सर्वत्र आढळून येतात. मराठवाड्यात भानामतीचे मोठे प्रस्थ आहे. भानामती ही अंधश्रद्धा आहे. तिच्या प्रभावाने कुटुंबातील लोक भयभीत होतात, हवालदिल होतात. अघोरी शक्तीमुळे भानामती घडते या चुकीच्या समजुतीपायी तंत्र-मंत्राचे उपचार लोक घेतात व कुटुंबाचे मानसिक व आर्थिक नुकसान करून घेतात. प्रसिद्ध जागतिक विवेकवादी डॉ.अब्राहम कोवूर यांनी ‘भानामती’ प्रकरणे मनोवैज्ञानिक पद्धतीने व विज्ञानदृष्टीकोनाच्या आधारे हाताळली.

            महाराष्ट्र अंनिसने डॉ.कोवूरांचे तंत्र अवलंबून ‘भानामती’च्या घटना हाताळायला सुरवात केली. डॉ.दाभोलकर व मी सातार्‍यात घरावर दगड टाकणार्‍या भानामतीचा प्रकार प्रथम हाताळला व अशा गूढ घटनांना कोणीतरी मनोविकृत व्यक्ती कारण असते याचा अनुभव घेतला. त्यानंतर अंनिसच्या अनेक कार्यकर्त्यांनी विशेषत: डॉ.प्रदीप पाटील, माधव बावगे व इतरांनी ‘भानामती’ प्रकाराचा शोध घेऊन हे प्रकार थांबविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आजअखेर घरावर दगड पडणे, वस्तू गायब होणे, कपड्यांना अचानक आग लागणे, अंगावर फुल्या उठणे असे शेकडो प्रकार अदृश्यशक्तीमुळे घडत नसून भौतिक-रासायनिक कारणांनी कोणातरी व्यक्तीमार्फतच घडतात असा आमचा निष्कर्ष आहे. कुटुंबातील कुणाचा तरी स्वार्थ किंवा अगतिकता यापोटी असे प्रकार घडवले जातात व संपूर्ण कुटुंब अदृश्य शक्तीच्या दहशतीखाली वावरते. मुलाखत तंत्र व सूक्ष्म निरीक्षण यांच्या मदतीने भानामती करणार्‍या व्यक्तीचा कबुलीजबाब घ्यावा लागतो. त्याला योग्य ती समज देऊन व नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भानामतीचे प्रकार बंद करण्याचे आवाहन केले जाते.  भानामतीचा गुंता उलगडताना कुटुंबाला अविवेकी भीतीपासून मुक्त करणे हे मोठ्या कौशल्याने करावे लागते. दैवीशक्ती, अघोरी शक्ती, चमत्कार या अंधश्रद्धांपासून संबंधित कुटुंबाला प्रबोधित करून भानामती थांबविणे शक्य असते हे अनेक कार्यकर्त्यांनी सिद्ध केले आहे.

            या विषयावर लिहिण्याचे कारण असे की, वार्तापत्राच्या गेल्या काही अंकात शहाजी भोसले यांनी हाताळलेल्या भानामतीच्या घटनांची मालिका आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. लेखांच्या शेवटी काही प्रश्न वाचकांसाठी उपस्थित केलेत. त्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे भोसले यांनी ‘भानामती’ थांबविण्यासाठी अवैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणे योग्य आहे का? असा आहे. एप्रिल 2013 च्या अंकात  ‘लताच्या भानामतीची नाजूक गोष्ट’ ह्या केसचे वर्णन आहे. लता ही विवाहीत तरूणी. विवाहानंतर तिला दिवस गेले. पण विवाहापूर्वी तिचे माहेरातील एका पुरूषाशी प्रेमसंबंध होते. विवाहानंतरही ती त्या पुरूषाला भेटत होती. आपले मूल त्याचे असू शकेल या भीतीने ती अस्वस्थ झाली व गर्भपाताचा प्रयत्न करू लागली. त्यासाठी अंगात येऊन ती गडाबडा लोळू लागली.

            मुलाखत तंत्राने शहाजी व त्यांची पत्नी अरूणा यांनी लताच्या विचित्र वागण्यासंदर्भात इतर कोणी जबाबदार नसल्याची खात्री केली. हे योग्यच होते. लताची दातखिळी बसणे व अंगात येणे तसेच तिने गडाबडा लोळणे याबाबत तिच्या मनात कशाची तरी भीती आहे हे पण भोसले पती-पत्नींनी ओळखले. इथपर्यंत त्यांचा तार्किक मागोवा बरोबरच आहे. लताला विश्वासात घेऊन अरूणाने तिला बोलते केले व अंगात येऊन गडाबडा लोळण्याने तिच्या जिवालाही धोका आहे हे सुचविले. त्यानंतर लता बोलती झाली. पण या नंतर ही केस सोडविताना गरोदरपणात अंगात येत असेल तर होणारे मूल ‘हिजडा’ म्हणून निपजते अशी भीती भोसलेंनी लताला घातली. या भीतीचा उपयोग करून त्यांनी लता व तिचे होणारे मूल वाचविले. या संदर्भात असा अवैज्ञानिक उपचार योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. यावर अनेक वाचकांनी असा उपचार योग्यच आहे असे लेखी अभिप्राय पाठविले. मे च्या अंकात या प्रतिक्रिया सविस्तर प्रसिद्ध केल्यात. याबाबत या क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवरांचे विचार प्रसिद्ध करण्याचे आश्वासन संपादकांनी दिले होते. ह्यानुसार डॉ.नरेंद्र दाभोलकर, माधव बावगे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या साररूपाने खाली देत आहे.

            प्रश्नाचा गुंता सुटणे महत्वाचे असले तरी तो सोडविण्याचा मार्गही तितकाच महत्वाचा आहे. अंनिस ही दैववादी मानसिकता व तसलेच उपचार नाकारते व विवेकी विचारांचे समर्थन करते. याला महत्वाचे कारण आहे. एखादे मूल रडत असेल तर त्याला आपण अंधारातील बागुलबुवाची भीती घालतो. मूल रडायचे थांबते पण बागुलबुवाच्या भीतीचे काय? हा बागुलबुवा त्या मुलाच्या मनात कायम राहू शकतो. असे विविध आभासी बागुलबुवा, भूते, वेताळ, मुंज्या, चेटूक जे अस्तित्वात नाहीत त्यांची भीती पुढच्या आयुष्याला व्यापून राहू शकते. अस्तित्वात नसलेल्या Gods, Demons व Spirits यांना अंनिस नकार देते. अविवेकी भीती व भ्रम दूर करणे हे अंनिसचे साध्य आहे.

            अंगात आलेला देव किंवा देवी तुझ्या होणार्‍या मुलाला हिजडा करील ही अविवेकी भीती लताला घालणे योग्य नाही. कारण ते सत्य नाही. गर्भातील बाळाचे लिंग देव/देवी बदलते ही अंधश्रद्धा लताच्या मनात अशा इतर नव्या अंधश्रद्धांना जन्म देईल म्हणून ‘भानामती’ किंवा अंधश्रद्धांचे प्रकार हाताळताना ‘साध्य-साधन विवेक’ सुटता उपयोगी नाही. लताचे विवाहानंतर दोन पुरूषांशी संबंध होते. एक तिचा नवरा व दुसरा माहेरचा पुरूष. पैकी या दुसर्‍यामुळे आपणास गर्भ राहिला असेल तर ती आपल्या नवर्‍याशी प्रतारणा ठरेल ही तीची भीती अज्ञानमूलक आहे. या भीतीपायी गर्भपात करणे हेही अयोग्यच. त्यातही सातवा महिला लागला तरी गडबडा लोळून गर्भपात करणे हे धोकादायकच होय. पण हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी ‘मूल’ हिजडा असेल अशी भीती घालणे हे तितकेच अयोग्य आहे.

मग योग्य काय? लताचा प्रश्न विवेकी मार्गाने सोडविणे जरी तिच्या कमी शिक्षणामुळे कठीण असले तरी अशक्य नाही. यासाठी बुद्धीचातुर्य वापरावे लागेल. अनेक प्रकारचे विवेकी मार्ग आपणाला सुचू शकतील. उदा.सातव्या महिन्यात गर्भपात झाला तर काय अनर्थ घडू शकतो याच्या घटना तिला सांगणे. यासाठी डॉक्टरांची मदत घेणे, इथून पुढे नवर्‍याशी व कुटुंबाशी प्रामाणिक रहाणे, अपराधाची बोच काढून टाकण्याचे मनोपचार देणे व असेच इतरही मार्ग असू शकतात. भोसले यांची पत्नी अरूणा हिच्याशी लताचा संवाद जुळला होता. ती मोकळी होत होती. याचाच फायदा घेऊन अरूणाला विवेकी मार्गाचा वापर करून लताची भीती व अज्ञान दूर करणे शक्य होते. अशिक्षित माणसाला विचारच करता येत नाही असे नाही. काहीही असो पण आपले प्रश्नाचा संबंध अदृश्य शक्तीशी जोडला जात कामा नये. नाहीतर डोक्यात ट्यूमर असताना तो अंगारा लावून बरा करणे याला मान्यता द्यावी लागेल. पाऊस पडत नाही म्हणून देव पाण्यात ठेवण्याचे व डोक्यावर फरशी ठेवून कॅन्सर बरा करण्याचे समर्थन करावे लागेल.

            भानामती घटनेबाबत संबंधितांची नावे गुप्त ठेवण्याबाबत दुसर्‍या एका वाचकाने प्रश्न उपस्थित केला आहे. तो बरोबर आहे. पण लताच्या केसबाबत भोसले यांनी ती खबरदारी घेतली आहे. कारण या कथेतील स्थळ व पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. मूळ नावे व मूळ स्थळ गुप्तच ठेवले आहे. व ही घटना घडून गेल्यानंतर बर्‍याच काळानंतर प्रसिद्ध केली आहे.

            एक गोष्ट मुद्दामहून नमूद करावीशी वाटते. ‘भानामती’ वरील प्रतिक्रियेतून वाचक-लेखक यांच्यातील वाद-प्रतिवाद-संवाद वाढतो आहे. मात्र भानामती प्रकरणे हाताळताना साध्य-साधन विवेक सुटता कामा नये. शहाजी भोसले यांनी भानामतीचा गुंता सोडविला. हे त्यांचे यश आहे. पण अंगात येण्यामुळे मूल हिजडा होईल अशी भीती घालणे एक वेळ क्षम्य म्हणता येईल. पण ते विवेकी नाही.

            या संदर्भात एक तात्विक मुद्दा उपस्थित होतो. एखादी गोष्ट उपयोगी असेल पण सत्याला धरून नसेल तर तिचा अवलंब करावा काय?( Useful but not true) अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंधश्रद्धांचा वापर करावा काय? चमत्कारामागे विज्ञान असते असे आपण मानतो. मग बुवा बनून भानामती किंवा तत्सम अंधश्रद्ध वर्तन बदलण्यासाठी विज्ञानाचे चमत्कार वापरावे काय? याची चर्चा अंनिसमध्ये व्हावी अशी सूचना करावी वाटते.

            वाचकांनी लताच्या भानामतीची नाजूक गोष्ट (वार्तापत्र एप्रिल 2013 पान नं.29) अवश्य वाचावी व लताचा प्रश्न विवेकी पद्धतीने(असत्याचा वापर न करता) कसा सोडवता आला असता यावरील आपली मते वार्तापत्राला अवश्य पाठवावीत. योग्य उत्तरांना वार्तापत्रात प्रसिद्धी दिली जाईल. -संपादक

अलका चाफेकर आणि विजयकुमार जोखे यांना अंनिसचा पुरस्कार
यावर्षीचा श्री.सुधाकर उद्धवराव आठले अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार पुरस्कार गोरेगाव येथील अत्यंत तळमळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती अलकाताई चाफेकर यांना देण्यात येणार आहे. समितीचा कार्यगौरव पुरस्कार प्रा.विजयकुमार जोखे यांना देण्यात येईल. शनिवार ता. 8 जून रोजी सायंकाळी 6 वाजता जब्बार पटेल यांच्या हस्ते इस्लामपूर येथे त्याचे वितरण होईल. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप रूपये 10 हजार व सन्मानपत्र असे आहे.