Categories
बुवाबाजी

भोंदूबाबाच्या सल्ल्याने अत्याचारी गर्भपात

जून – २०१३

            सौ.सुवर्णा खंडेराव गायकवाड ही नाशिकच्या म्हसरूळ भागात राहणारी अवघी वीस वर्षांची नवविवाहित तरूणी. मागील वर्षी तिचे लग्न झाले. नवरा औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारा. अतिशय आनंदात संसार चालू होता. तिच्या घरातील सासू-सुनेचे संबंध फारसे काही बरे नव्हते. तिच्या घरचं वातावरणही अंधश्रद्धेने प्रभावित झालं होतं. कारण तिची सासू व नवरा हे निफाड येथील एका भोंदू बाबाकडे नित्यनियमाने जात असत व त्याच्या सांगण्यावरून स्वत:चे व परिवाराचे निर्णय घेत असत. सुवर्णाला हे फारसे रूचत नव्हते. तरीही ह्या भोंदूबाबामुळेच तिच्या आयुष्यात मोठे वादळ आले व तिचं अवघं जीवनच उध्वस्त होऊन गेलं.

            सुवर्णाला आता गर्भधारणा झाली होती. घरात नवीन बाळ येणार ह्या कल्पनेने ती आनंदात होती. सासूने व नवर्‍याने ही बातमी भोंदूबाबास सांगण्यासाठी त्याच्या आश्रमात नेले. सुवर्णाला असा प्रकार आवडत नव्हता तथापि तिचा विरोध अपुरा पडला. भोंदूबाबाने सुवर्णाकडे बघून असे सांगितले की, हिच्या पोटातील गर्भ हा मुलीचा आहे तो तुमच्या घराण्यास अपशकुन आहे. तो तुमच्या खानदानाचे नाव खराब करेल त्यामुळे सुवर्णाचा गर्भपात करावा. हे ऐकून सुवर्णा घाबरली. केवळ दोन महिन्याच्या गर्भाबद्दल असं निदान करणं तिला रूचलं नाही. परंतु तिचा नवरा व सासूला तो भोंदूबाबा देवच वाटत होता. त्याचा प्रत्येक शब्द यांनी पाळला होता. घरी गेल्यानंतर त्यांनी सुवर्णाला गर्भपात करण्यासाठी विनंती केली परंतु सुवर्णाने त्यांना स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे दोघेही चिडले. तिला उपाशी ठेवले. वेगवेगळ्या पद्धतीने तिचा मानसिक छळ सुरू केला. तरीही सुवर्णा तिच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे त्यांनी तिला बेदम मारहाण केली. सुवर्णा मात्र पोटावर हात ठेवून त्या गर्भास इजा होणार नाही एवढंच करत रडत होती. तिचा प्रतिकार कमी पडला. नवर्‍याने पोटावर लाथांनी मार दिला. ती बेशुद्ध पडली. तिच्या माहेरचे लोक तिच्यापर्यंत पोहचण्यास उशीर झाला होता. तिला नाशिकच्या एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. तिला रक्तस्त्राव होऊन गर्भपात झाला होता. गुन्हा नोंदविण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. शेवटी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. शासकीय रूग्णालयात सुवर्णाला दाखल करण्यात आले. तिथे पंच व पोलीसांसमोर तिची जबानी घेण्यात आली परंतु त्यामध्ये बाबाचे नाव मात्र पोलिसांनी जाणीवपूर्वक वगळले. सुवर्णा अस्वस्थ होती. नातेवाईक काळजीत होते. त्यामुळे त्यांनी जबानी न वाचता सही केली.

            वरील घटना अंनिसचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे व मला समजली. आम्ही तात्काळ पंचवटी पोलीस स्टेशन गाठले. परंतु पहिली खबर व रूग्णालयातील जबानीत बाबाचा कुठेही उल्लेख नव्हता. आम्ही सुवर्णा व तिच्या नातेवाईकांशी व्यवस्थितपणे चर्चा केली. बाबाचा उल्लेख टाळल्यामुळे सुवर्णाची बाजू कमकुवत झाली होती. आम्ही मात्र सुवर्णाला न्याय देण्याचे ठरविले. पोलीस अधिकार्‍यांना परत पहिली खबर नोंदविण्याची विनंती केली मात्र त्यांनी आमची मागणी फेटाळली. सुवर्णाला त्या भोंदूबाबाचे नाव माहीत नव्हते कारण ती एकच वेळ त्याच्याकडे गेली होती. त्याचा आश्रम कुठे आहे एवढीच माहिती सुवर्णाने दिली. मग मी निफाडजवळ असलेल्या त्या आश्रमात गेलो. सुवर्णाने सांगितलेले ठिकाण तेच होते. निफाडच्या नदीजवळच अगस्ती ऋषीचं एक मंदिर आहे. त्याच्या सभोवतालीच शामबाबा शिंदे ह्या 55 वर्षीय बाबाचा आश्रम आहे. आठवड्यातून शुक्रवार व सोमवार ह्या दिवशी तिथे दरबार भरतो. हा दरबार बर्‍याच वर्षांपासून चालू असल्यामुळे शामबाबाला विविध क्षेत्रांतून पाठबळ मिळालं होतं. आश्रमाचा काही भाग हा अतिक्रमणात असल्याची माहिती मिळाली.

            दुसर्‍या दिवशी आम्ही दै.लोकमतमधील एका हितचिंतक बातमीदारास बातमी छापण्याची विनंती केली. हाती काहीही पुरावा नसतानाही दै.लोकमतने मोठी बातमी दिली. बातमीचा योग्य तो परिणाम झाला. आम्ही विविध समविचारी महिला संघटनांशी चर्चा केली. सर्वांनी पोलीस आयुक्तांना व इतरांना निवेदन दिले. ‘सुवर्णा सांगते तसा गुन्हा नोंदविला गेला नाही त्यामुळे पुन्हा गुन्हा नोंदवून घ्या व भोंदूबाबासह सुवर्णाच्या सासू व नवर्‍यास अटक करा अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने निषेध मोर्चा काढू’ अशी आम्हा सर्वांची मागणी होती. स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न आज गंभीर झाला आहे त्यातच दोन महिन्याच्या गर्भाचं लिंगनिदान होत नसतानाही त्या गर्भास शामबाबाने स्त्रीगर्भ असल्याचे सांगून गर्भपातास प्रवृत्त केले. त्यामुळे नाशिककर नागरिक सुवर्णा व आमच्या मागे उभे राहिले. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी पोलीस प्रशासनास या संदर्भात फोन केले. अंनिसने आपली भूमिका वृत्तपत्रांमधून व इलेक्ट्रॉनिक मीडियातून मांडली. शेवटी सर्वांच्या दबावामुळे दि.14 एप्रिलच्या रात्री सुवर्णाच्या सांगण्यानुसार पुन्हा गुन्हा नोंदविला गेला. आमच्या लढ्याला थोडसं तरी यश आलं.

            महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा करावा ह्या मागणीसाठी आम्ही नाशिक अंनिसचे कार्यकर्ते16 एप्रिलला सकाळी मुंबईला जाण्यास निघालो. सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर सुवर्णाच्या घटनेची बातमी आली होती. आम्ही मुंबईजवळ पोहचतच होतो तेवढ्यात नाशिकहून फोन आला की, आत्ताच शामबाबा शिंदेला अटक झाली. आझाद मैदानावर कायद्यच्या मागणीसाठी आंदोलन चालू होतं आम्ही सर्वांना वृत्तपत्रांचे वाटप केले, नेमकं आंदोलनाच्या दिवशी वृत्तपत्रांत अशी बातमी येणं हा काही योगायोग नाही. दररोज कुठे न कुठे असा अन्याय होत असतो. सुवर्णाला अंनिसचं पाठबळ मिळालं म्हणून ते प्रकरण समाजासमोर आलं एवढंच.

            ह्या मोहिमेत महेंद्र दातरंगे, डॉ. ठकसेन गोराणे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत कावळे, व्ही. टी. जाधव, डॉ. डेर्ले, दिपक श्रीवास्तव आदींनी सहभाग घेतला.

-कृष्णा चांदगुडे