Categories
बुवाबाजी

भोंदू देवऋषी लक्ष्मण चाळकेचा अंनिसपुढे माफीनामा

जून – २०१३

चाळकेवाडी, ता.जि.सातारा येथील प्रसिद्ध देवऋषी लक्ष्मण गणू चाळके याने अंनिस कार्यकर्त्यांसमोर सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये सपशेल माफीनामा लिहून दिला. गेली अनेक वर्षेकालभैरव-चाळकेवाडी ग्रामदैवत मंदिरात भूत, भानामती, करणी, मूठ मारणे, मांड भरणे यावर कालभैरव अंगात आणून भक्तांच्या समस्या सोडवण्याचा दावा करणारा हा बाबा अंनिसपुढे लडबडला. सकाळी 8 वाजता अंनिसची टीम सातारा तालुका पोलिसांसह देवऋषाच्या दरबारात पोचली. भैरवनाथ अंगात येण्याचा प्रकार अत्यंत भयानक पद्धतीने देवऋषी करत होता. अंनिसचे कार्यकर्ते मारूती थोरात व प्रशांत पोतदार यांच्या समस्यांना वार्‍या करण्याचा व अंगारा धुपार्‍याचा इलाज करताच कार्यकर्त्यांनी खरे रूप सांगताच त्याची बोबडी वळली. दरबारातील सर्व भक्तांना त्याचा भोंदूपणा स्पष्ट करून देवऋषाला सरळ पोलीस ठाण्यात आणले. कार्यकर्त्यांनी त्याचे प्रबोधन करून पोलिसांसमक्ष माफीनामा लिहून घेतला. यापुढे असा भोंदू देवऋषाचा धंदा मी करणार नाही. माझ्या साथीदारांनाही असे करू देणार नाही असे लिहून दिले.

            या सर्व मोहिमेत अंनिसचे वसिम बागवान, मारूती थोरात, सिताराम चाळके, शंकर कणसे, महेश थोरात, सुमंत मोरे, जयदीप वाटकर, किशोर धरपडे, प्रशांत पोतदार यांनी सहभाग घेतला. 5 मे रोजी चाळकेवाडी गावात ‘अंधश्रद्धेची दुनिया, चमत्काराची किमया’ या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले. पोलीस ए.पी.आय.वाघ, फडतरे यांनी विशेष सहकार्य केले.                       

-प्रशांत पोतदार