Categories
अभिवादन

शाहुंचे स्मरण

जून – २०१३

            “फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा” हा शब्द प्रयोग आपण भाषणातून, लिखाणातून नेहमीच करतो. महाराष्ट्रातील संघ परिवारातील लोक सोडले तर बाकीचे जे राजकारणी लोक आहेत त्यांनी कुठल्याही विषयावर तोंड उघडले की, वरील शब्दप्रयोग सुरवातीला उच्चारला जातो. इतका हा शब्दप्रयोग आपल्या सामाजिक, राजकीय जीवनाशी निगडित झाला आहे. आज प्रत्यक्ष व्यवहारात काय परिस्थिती आहे हा भाग आपण सोडून देऊ पण बहुजनांत तुम्हाला तुमची ओळख निर्माण करण्यासाठी वरील शब्द प्रयोगाला पर्याय नाही. ब्रिटीश राजवटीनंतर महाराष्ट्रात सुरू झालेल्या जातीव्यवस्था विरूद्ध जनसंघर्षाचे फुले, शाहू, आंबेडकर हे महानायक आहेत. आणि आज बहुजन समाजाची, दलित समाजाची जी काही प्रगती आहे तिची पायाभरणी या महापुरूषांनी केली. त्यामुळेच जनसामान्यावर त्यांच्या कार्यकर्तृत्वाची मोहर काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे उमटली आहे. त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची व्यापक जाण जनमानसात खोलवर रूजली आहे.

            त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा कालखंड जेमतेम 100 वर्षांचा आहे. आणि हा कालखंड भारतीय इतिहासातील सर्वात महत्वपूर्ण, क्रांतीकारी असा कालखंड आहे. भांडवलशाहीचा उदय हे या कालखंडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. भांडवलशाहीच्या अंगाने येणारे नवे विचार ज्यामध्ये राष्ट्रवादाच्या भावनेचा उगम आणि जुने कालबाह्य झालेले जातीव्यवस्थेवर आधारलेले आर्थिक संबंध यांची मोडतोड हे या अनुषंगाने घडत जाणे आणि त्यामुळे नव्या प्रकाशाची एक तिरीप मध्ययुगाच्या अंधार युगातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सापडली ती याच काळात म्हणूनच मार्क्सने सार्थपणे म्हटले होते की, “ब्रिटीश त्यांच्या स्वार्थासाठी जरी भांडवली विकास भारतात घडवत असले तरी ते त्यांच्या नकळत भारताच्या आधुनिक युगाची मुहूर्तमेढ रोवत आहेत.” मार्क्सचा शब्द न शब्द आज खरा ठरला आहे. फुले, शाहू, आंबेडकरही या काळाची देण आहे. नारायण सुर्वेयांनी त्यांच्या एका कवितेत म्हटले आहे, “एकटाच आलो नाही, युगाचीही साथ आहे, सावध असा तुफानाची ही सुरवात आहे” तर फुले, शाहू, आंबेडकर या युगाचे प्रतिनिधी आहेत.

            प्रकांड पंडीत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तीन गुरूंमध्ये फुले यांना स्थान दिले आहे. त्यांचे दोन गुरू बुद्ध, कबीर आणि तिसरे फुले याचा अर्थ काय होतो, तर ही विचारधारा फुले, शाहू, आंबेडकर अशी मर्यादित न राहता बुद्ध, कबीर, फुले शाहू, आंबेडकर अशी महाव्यापी होते आणि भारतखंडाच्या एका महान सांस्कृतिक, सामाजिक, तत्वज्ञानीय बहुजनहिताय, बहुजनसुखाय विचारधारेचे प्रतिनिधीत्व करते. ती केवळ जातीव्यवस्थेला प्रतिकार करून थांबत नाही तर नव्या पावर समाजाच्या उभारणीची मागणी करते. शिवाय ती भारतापुरती मर्यादित राहत नाही तर वैश्विक बनते. प्रत्येक माणूस सुखी, आनंदी, समृद्ध, शोषणविरहित भेदाभेद विरहित असेल अशा आदर्श समाजव्यवस्थेचं ती स्वप्न पाहते. त्यासाठी त्याच्या वेळच्या शोषणवर्गाविरूद्ध दोन हात करण्याची तयारी ठेवते. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनसंघर्षातून हेच दिसून येते. फुले यांनी यासाठी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली, शाहूंनी या ‘सत्यशोधक समाजाच्या’ प्रसाराला भरीव मदत करून त्याचा विस्तार करण्याचे प्रयत्न केले. त्यातून महाराष्ट्रातील सामाजिक संघर्षात हिरीरीने भाग घेणारे अनेक नेते निर्माण झाले. तर बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिताना सामाजिक, आर्थिक, राजकीय समतेचा आणि धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करीत एका नव्या समाजाची रचना पुढे ठेवली. आणि बौद्ध धर्म स्वीकारून ब्राम्हणीवर्चस्ववादी परंपरेच्या विरोधी असणार्‍या अवैदिक विचारधारेशी कायमची नाळ तोडून टाकली.

            जातीच्या अनुषंगाने विचार करता मराठा, महार, माळी या जाती समुहात हे महापुरूष जन्माला आले. त्यामुळे त्यांचे प्रत्येक लढ्यातील तपशील वेगवेगळे आहेत. त्यातही याच वेळी स्वातंत्र्याचे आंदोलन सुरू झाल्यामुळे या संघर्षाला एक वेगळे आणि वादग्रस्त परिमाण लाभले आहे. फुले, आंबेडकरांच्याबाबतीत परिस्थिती सरळ सरळ आहे. कारण जातीभेदाचे प्रत्यक्ष चटके त्यांना भोगावे लागले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रतिकाराचा लढा हा स्वाभाविक आहे. शाहुंचे तसे नाही. आणि म्हणूनच शाहुंच्या जीवनकार्याबद्दल अनेक वादग्रस्त मुद्दे पुढे आलेले आहेत. यात हितसंबंध दुखावलेल्या सनातनी ब्राम्हणांचे कारस्थान आहेच. अनेक खोट्या नाट्या गोष्टी शाहुंच्या संदर्भात या लोकांनी पेरल्या आहेत. त्याला वास्तवात काडीचाही आधार नाही. पण स्वातंत्र्य आंदोलनाच्या परिणामामुळे या सनातनी ब्राम्हणांची सगळी कृष्णकृत्ये झाकली गेली आहेत. कारण हाच वर्ग सुरवातीच्या काळात स्वातंत्र्य आंदोलनात पुढे होता. पण स्वातंत्र्यापेक्षा त्यांच्या प्रेरणा ब्राम्हणीवर्चस्व टिकवण्याच्याच अधिक होत्या. कारण सार्वत्रिक शिक्षणामुळे भविष्यकाळात त्यांना मिळणारे आव्हान हा त्यांच्या चिंतेचा विषय होता. नवी आधुनिक भांडवली विचारसररणी त्यांच्या धार्मिक जातीय श्रेष्ठत्वाला मारक होती. त्यामुळे त्यांनी ब्रिटीशांच्या प्रत्येक सामाजिक सुधारणांच्या भूमिकांना विरोध केला. “शिक्षण” हा त्यात कळीचा मुद्दा होता. फुले, शाहू, आंबेडकरांच्या जीवनकार्याचा एक मोठा भाग ‘शिक्षण’ या विषयाने व्यापला आहे. ‘शिक्षणा’शिवाय बहुजनांना मुक्ती नाही हे त्यांना पुरतेपणी ठाऊक झाले होते. टिळकयुगाचा अंत होईपर्यंत आणि गांधीयुगाचा प्रारंभ होईपर्यंत स्वातंत्र्य आंदोलन एका ब्राम्हणीवर्णवर्चस्ववादी विचारसरणीच्या लोकांच्या हातात होते. गांधीजींनी स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ शोधला, जरी जातीव्यवस्थाविरोधी लढ्याला त्यांनी मूलभूतरित्या हात घातला नाही. जरी हा प्रश्न त्यांनी स्वातंत्र्याच्या केंद्रस्थानी ठेवला. तरी हा प्रश्न हातात घेऊन त्यांना बाबासाहेबांच्या दलित मुक्ती आंदोलनाला शह द्यायचा होता. “मीच अस्पृश्यांचा प्रतिनिधी आहे” हे त्यांनी गोलमेज परिषदेत धडधडीत सांगितले होते. त्याला हे परिमाण होते. कारण बाबासाहेबांनी स्वातंत्र्य आंदोलनात म्हटले की, “तुम्ही 150 वर्षेब्रिटीशांचे गुलाम आहात आम्ही हजारो वर्षेतुमचे गुलाम आहोत, येणार्‍या स्वातंत्र्यात आमचे स्थान काय याचे उत्तर आम्हाला मिळाले पाहिजे.” असा प्रश्न उपस्थित केला. फुले, शाहू, आंबेडकरांना साम्राज्यवाद कळला नाही असा नाकाचा शेंडा उडवीत म्हणणार्‍या भारतीय क्रांतीकारकांनाही या प्रश्नाचे उत्तर त्यावेळी देता आले नाही. कारण जातीसंस्कारातून त्यांचीही सुटका झालेली नव्हती. आजही ती कितपत झाली माहीत नाही. अजूनही “शाहुंचे” सोडून द्या फुले, आंबेडकरांचे मुल्यांकन करणेही त्यांना नीट जमलेले नाही.

            स्वातंत्र्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटीश अधिपत्याखालील एका मर्यादित अधिकार असलेल्या शाहूंसारख्या राजाचे त्यांच्या त्या काळच्या मर्यांदाचा विचार न करता मूल्यमापन करणे हे अन्यायकारकच आहे. आधी सामाजिक की आधी राजकीय हा ब्राम्हणी खल सुरू असतानाच्या काळात आगरकरांना कोणी राष्ट्रद्रोही म्हणत नाही किंवा त्यांना साम्राज्यवाद कळला नाही असे म्हणत नाही. पण फुले, शाहू, आंबेडकरांना मात्र ती सवलत नाही. याचा अर्थ ब्राम्हणी दृष्टीतून इतिहासाची मांडणी करण्यात येते. खरंतर सामाजिक संदर्भात टिळकांवर जेवढी झोड उठायला पाहिजे होती तेवढी उठली नाही. उलट लोकमान्य, तेल्या तांबोळ्यांचा पुढारी अशी विशेषणे त्यांच्या भाटांनी त्यांना लावली. राजकीय चळवळीच्या पडद्याखाली त्यांची ही वर्णवर्चस्ववादी ब्राम्हणी भूमिका दडवण्यात आली. आणि ‘शाहूंना’ ब्रिटीशांचे मित्र ठरवून जणू वाळीत टाकले गेले. “शाहूंनी” ब्राम्हणांच्या हितसंबंधांना बाधा न येणारे काम केले असते त्यांना भरघोस दक्षिणा, जमीन, जुमले बहाल केले असते तर ते आधुनिक ‘गोब्राम्हण प्रतिपालक’ नक्कीच झाले असते. छ.शिवाजी महाराजांना ज्यांनी आधी विरोध केला त्यांनी तसे नसलेल्या शिवाजी महाराजांना गोब्राम्हण प्रतिपालक म्हणून आपलेसे केले. शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता. त्या त्या काळाच्या मर्यादा कुठल्याही महापुरूषाला ओलांडता येत नाहीत. शाहुंनी ब्राम्हणीवर्णवर्चस्वाला जो शह दिला तो आधुनिक काळामुळे आणि ब्रिटीश सत्तेमुळे आपल्या मर्यादित अधिकारात आणि आपल्या छोट्या राज्यात त्यांनी 1902 साली आरक्षणाचे तत्व लागू गेले तसेच शिक्षण आणि स्त्रियांचा छळ आणि अत्याचाराला पायबंद घालणारे विशेष कायदे त्यांनी आपल्या राज्यात लागू केले. स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी त्यांच्या संस्थानात विशेष कायदे केले. ते मनुस्मृतीला सुरूंग लावणारे होते. त्यांनी सबनीस नावाच्या सी.के.पी.समाजातील माणसाला मुख्य दिवाण बनवले, हे सर्व त्या समाजातील सनातनी ब्राम्हण्यांच्या मर्मावर आघात करणारे होते. यावेळी नेमस्त आणि उदारमतवादी समजल्या जाणार्‍या नामदार गोखले यांनी कोल्हापुरात राहणार्‍या आपल्या ब्राम्हण मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “सबनीस आपल्यासारखे काम करू शकतील का?” म्हणजे जातीय पूर्वग्रहातून गोखले यांच्यासारखे लोकही त्यावेळी मुक्त नव्हते. याच गोखल्यांनी “चितपावनांच्या नादी लागू नका, ते जड जाईल” अशी ब्रिटीशांना धमकी दिली होती. आणि या कोल्हापुरातील सनातन्यांना टिळकासारख्यांचे पाठबळ होते. त्यामुळे शाहूंना अडचणीत आणण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. त्यांचे व्यक्तीगत चारित्र्य हनन करण्यासाठी खोटेनाटे प्रवाद त्यांनी पसरवले.

            शाहूंना ब्रिटीशांचे मित्र पर्यायाने स्वातंत्र्यविरोधी समजले जाणे हा या खोट्यानाट्या प्रचाराचा भाग आहे. त्यांनी त्यांच्या मर्यादा अंतर्गत टिळकांपासून अनेकांना जी वेळोवेळी मदत केली त्यांचा विचार करता हे म्हणणे खोटे पडते. कारण ब्रिटीश सत्तेखाली राज्य करताना या मर्यादा येणारच. त्या समजून न घेता त्यांच्यावर बेलगाम आरोप करणे हे ब्राम्हणी हितसंबंधांना त्यांनी जो धोका निर्माण केला त्यांची प्रतिक्रिया आहे. सामाजिक पातळीवर जातीव्यवस्थेने निर्माण केलेला हा हितसंबंधांचा झगडा वजा करून आपल्याला ना शाहूंचे मुल्यमापन करता येते ना टिळकांचे. उलट शाहू आपल्या जाती हितसंबंधांच्यावर उठून अगदी तळागाळात खितपत पडलेल्या अस्पृश्य जनतेच्या दु:खाला वाचा फोडताना दिसतात. बाबासाहेबांच्या राजकीय जडणघडणीत त्यांचा खारीचा वाटा आहेच. पहिल्या अस्पृश्य परिषदेत बाबासाहेबांच्याबद्दल “तुम्हाला तुमचा नेता मिळाला तो तुमची दु:खातून मुक्ती करील” हे त्यांचे उद्गार त्यांची काळाची जी जाण होती त्याचे द्योतक आहे. अंगावर राजवस्त्रे असलेला पण अंतरंगात पूर्णपणे आधुनिक असलेला हा राजा, राजा म्हणून नाही तर बहुजन समाजाच्या दु:खमुक्तीसाठी राज्यत्याग करून त्या शोधात निघालेल्या शाक्यराजा सिद्धार्थाने निर्माण केलेल्या विचार प्रवाहातील एक छोटा शिपाई नक्कीच आहे.

            शाहुंना ‘महारांचा राजा’ म्हणून संबोधले जाते यातच त्यांच्या जीवन कार्याची महती दिसून येते. यापेक्षा त्यांच्या क्रांतीकार्याला दुसर्‍या सर्टिफिकेटची गरज उरत नाही. शिक्षण, शेती, औद्योगिकीकरण या संदर्भातील त्यांचे कार्य आधुनिक भारताच्या उभारणीत योगदान देणारे आहे. त्यांनी उभारलेल्या शिक्षण संस्थांतून, वसतीगृहांतून शिकलेल्या मुलां-मुलींनी पुढे महाराष्ट्राच्या, भारताच्या राजकारणात, समाजकारणात बहुमोल कार्य केले तसेच कोल्हापूर आणि सांगली या परिसरातील स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी प्राणाची बाजी लावली त्यांची नि:संशयपणे प्रेरणा घेतल्या त्या शाहुंच्या जीवन कार्यातून, वैचारीक दृष्टिकोनातून.

            आज परिघावरील आणि परिघाबाहेरील अनेक समूह जागृत होताना दिसत आहेत. जागृत समुदायाला आपल्या इतिहासाचे भान गरजेचे ठरते. आपल्या आजच्या परिस्थितीला जबाबदार कोण आहेत याचे भान त्यांच्या पुढील वाटचालीसाठी महत्वपूर्ण ठरते. “अस्पृश्य कोण होते?” हे लिहिण्यामागचा बाबासाहेबांचा दृष्टिकोन हाच होता. त्यामुळे प्रत्येक समुदायाला आपल्या इतिहासाचे भान येण्यासाठी इतिहासात खोदकाम करणे गरजेचे आहे. कारण आजवरचा इतिहास, इतिहासकार शेजवळकर म्हणतात त्याप्रमाणे ब्राम्हणांनीच लिहिला आहे. ते म्हणतात, “संशोधक ब्राम्हण, इतिहासलेखक ब्राम्हण, संपादक ब्राम्हण, शिक्षक ब्राम्हण, चळवळी करणारे ब्राम्हण, त्यांचे अनुयायी ब्राम्हण यात चुकून एखादा ब्राम्हणेतर असेल. या सर्व बनावाचा दुष्परिणाम असा की, ब्राम्हणांची कर्तबगारी, अगदी गागाभट्ट-रामदासापासून आरंभ करून तो अप्रबुद्ध गोळवळकरांपर्यंत अशा तर्‍हेने फुगवण्यात, सोज्वळ करण्यात, चुकीची व म्हणूनच खोटी करून सांगण्यात शक्य तेवढी कोशिश केली गेली.” याचा अर्थ हा इतिहास निर्दोष नाही. आद्यक्रांतिकारक तेच असतात आणि प्रतिक्रांतिकारक तेच असतात. ब्राम्हणी जातीहीत संबंधाचा मोठा पगडा इतिहास लेखनावर आहे, आज बहुजनातून इतिहाकार पुढे येत आहेत पण तेही तीच चूक करताना दिसतात. उदा.मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड वगैरे संघटनांच्या माध्यमातून ‘मराठा’ अस्मिता पुढे ठेऊन जी इतिहास मांडणी होते ती जी मिथके पुढे आणते ती आधुनिक दृष्टीला छेद देणारी आहेत. ब्राम्हण-मराठा संघर्षाच्या जुन्या कढीला नव्याने उकळी आणण्याचे काम यातून पुढे येते. त्याचबरोबर मुलनिवासीवाले, अशाच इतिहास लेखनाला खतपाणी घालताना दिसतात. ज्यामध्ये सत्य अभावाने पुढे येते. एक कम्युनिस्ट इतिहासकार सोडले तर सत्याच्या जवळपास जाणारे इतिहास लेखन दुरापास्त आहे. आजच्या मराठा अस्मितेच्या राजकारणात जाणीवपूर्वक शाहूंना आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना स्थान नाही. कारण हे दोघेही आधुनिक जाणीवांचे प्रणेते आहेत. आपल्या जातीहितसंबंधांच्यावर उठून अवघ्या समाजाच्या सुख समृद्धीची स्वप्ने पाहणारे आहेत. आज त्यांनाच ‘आदर्श’ म्हणून पुढे आणण्याची गरज आहे.

            जातीव्यवस्थेविरूद्ध बुद्धापासून सुरू झालेल्या समतेच्या संघर्षाला दीर्घ अशा तत्वज्ञानीय संघर्षाची परंपरा आहे. आणि अजूनही तो दीर्घकाळ लढावा लागणार आहे. पुन्हा एकदा सामाजिक प्रतिक्रांतीची लाट आपल्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यासाठी जातीहितसंबंधाच्यावर उठून बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर आणि शाहू यांचा तेजस्वी वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज होणे काळाची गरज आहे.

-सुभाष थोरात