Categories
भानामती

अंगावर गोटे उठणारी भानामती!

जून – २०१३

            रात्रभर प्रवास करून पहाटे पहाटेच मुंबईहून आलो होतो. एक छोटीशी डुलकी घेऊन आळसावत लोळत पडलो होतो. तेवढ्यात अरूणाने चहा पिण्यासाठी हाक मारली. गरमागरम चहाच्या ओढीने पटकन उठलो अन् तोंड धुतले व चहा पिता पिता जादूटोणाविरोधी कायदा या अधिवेशनातही विधीमंडळात न मांडल्याने सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ संघटनेने केलेल्या कालच्या मुंबईतील जेलभरो आंदोलनाचा वृत्तांत अरूणाला सांगू लागलो. दरवाजावर वाजलेल्या बेलने आमची ही बराच वेळ रंगलेली चर्चा थांबवली. सकाळी सकाळी कोण आला असेल असा विचार करीत मीच घराचा दरवाजा उघडला. दरवाज्यात लाल रंगाच्या चेक्सचा शर्ट काळ्या पँटीत व्यवस्थित खोचलेला, पॉलीश केलेले चकचकीत बूट घातलेला अंदाजे 50 वर्षेवयाचा एक सडपातळ पुरूष व त्याच्यासोबत अंदाजे 40-45 वर्षेवयाची उंची साडी व्यवस्थित नेसलेली स्मार्ट चेहर्‍याची एक महिला उभी होती. मी काही त्या दोघांनाही ओळखत नव्हतो. ‘कोण असेल बरे ही जोडी?’ मी असा विचार मनात आणत असतानाच “नमस्कार सर, मी चंद्रकांत बोरसे आणि या माझ्या पत्नी ज्योती बोरसे” असे म्हणत त्या व्यक्तीनेच आपली ओळख सांगितली.

            दोघांचाही एकूण चेहरा-पेहराव, हालचाली मनात साठवत “नमस्कार. या ना, आत या.” असे म्हणत मी दरवाजातून बाजूला झालो व त्यांना घरात येण्यास सांगितले. दोघेही आत येऊन सोफ्यावर बसले. मी समोरील खुर्चीत बसत म्हणालो, “बोला बोरसे साहेब. कुठे रहाता तुम्ही?” “आम्ही येथेच सिडकोच्या एन-1 मध्ये राहतो.” बोरसे उत्तरले. औरंगाबादमधील हा भाग उच्च मध्यमवर्गीय वस्तीचा होता. “या अगोदर आपण कुठे भेटलोय का?” मी विचारले. “सर, तुम्ही आम्हाला ओळखत नसाल पण आम्ही दोघेही तुम्हाला ओळखतो. एक महिन्यापूर्वी विवेकानंद महाविद्यालयात तुमचा जो चमत्काराच्या प्रयोगाचा कार्यक्रम झाला होता ना, तो कार्यक्रम आम्ही दोघांनीही बघितला होता. कार्यक्रमानंतर तुमचं व्हिजीटिंग कार्डदेखील मी घेतले होते.” शर्टाच्या खिशातून व्हिजीटिंग कार्ड काढून दाखवत बोरसे म्हणाले. “अच्छा अच्छा. म्हणजे त्या कार्यक्रमाला तुम्ही होता तर. बर मग आता काय काम काढलंय माझ्याकडे?” तेवढ्यात अरूणा बाहेर आली. मी तिची दोघांना ओळख करून दिली. चहाचा कप देताना अरूणाने माझा लहान टेपरेकॉर्डर माझ्या हातात दिला. अरूणाने आणलेला चहा आम्ही चौघांनीही घेतला आणि अरूणा आत गेली.

            “कामऽऽऽऽऽ तसेऽऽऽऽऽ” चंद्रकांत बोरसेंनी जरा बिचकतच चाचरत बोलायला सुरवात केली तेव्हा, ‘’तुम्ही थोडं थांबता का? मीच सगळे सविस्तर सांगते” बोरसे यांची पत्नी बोरसेंना मध्येच थांबवीत म्हणाल्या. त्यांच्या स्वरातून व्यक्त झालेला ‘अधिकार’ मानत नोंदवत मी म्हणालो, “बरं ताई, तुम्ही बोला.” मी टेपरेकॉर्डर चालू केला.

            “साहेब, कसं सांगावं हेच कळत नाही हो. हे गेल्या एक महिन्यापासून तुम्हाला फोन करायचा म्हणतात. पण यांची(पतीकडे हात दाखवत) हिंमतच होत नव्हती. अखेर मीच आज मनावर घेतलं व तुम्हाला फोन न करता तुमची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी यांना सकाळी सकाळी बळजबरीने गाडी काढायला लावली.” ज्योतीताई म्हणाल्या.

            “एवढे घाबरण्यासारखं काय होते! ठीक आहे काही हरकत नाही, तुमची काय समस्या आहे? ती बिनधास्त सांगा. माझ्याच्याने जेवढी शक्य आहे तेवढी मी तुम्हाला मदत करेल. मात्र नि:संकोचपणे बोला.” मी म्हणालो.

            “सर, माझा छोटा कारखाना चांगला चालतो आहे. आज माझे समाजात बर्‍यापैकी नाव आहे. घरची परिस्थिती चांगली आहे. घरातील सर्वजण सुशिक्षित आहेत. मात्र घरातील प्रॉब्लेम परक्यांना कसा सांगावा या द्विधा मानसिकतेत मी होतो. पण तुमचा कार्यक्रम बघितला अन् मला एक आशेचा किरण सापडला. तरीही तुम्हाला कसं भेटावे हा प्रश्न मला भेडसावत होता.” बोरसे म्हणाले. पण अजूनही बोरसे तेवढे खुले होत नव्हते.

            “अहो, बोरसे साहेब, तुम्ही बिनधास्त राहा. मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहे असे समजा. आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सविस्तर व निर्भयपणे सांगा.” त्यांना आपुलकीची भावना दाखवत मी म्हणालो.

            “सर, आम्हाला एकुलता एक ‘दिनेश’ नावाचा मुलगा आहे. शहरातील नामवंत हॉस्पिटलजवळ त्याचं मेडिकल स्टोअर आहे. बर्‍यापैकी चालते. दिनेशचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले अन् घराला साडेसातीच लागली बघा!” कपाळाला हात लावत बोरसे म्हणाले.

            “बरं, मग पुढं काय झालं?” मी म्हणालो.

            “त्याचं असं झालं. आमची सून ‘मनिषा’ चांगली सुंदर रूपवान आहे. चांगलं बी.एस्सी. केलंय तिने. पण काय त्यांचं लग्न झालं अन् घरात विचित्र घटना घडायला लागल्या हो!” बोरसे म्हणाले.

            “काय घडतंय? जरा सविस्तर सांगा म्हणजे माझ्याच्याने शक्य असल्यास मी जरूर मदत करेन.” मी म्हणालो.

            “थांबा, मीच सांगते.” ज्योतीताई बोरसेंना थांबवत म्हणाल्या, “हे बघा साहेब, तुम्हाला तर माहीतच असणार की सिडकोतील एन-1 ही उच्चभ्रू लोकांची वसाहत आहे. त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या बंगल्यात आम्ही चौघेच राहतो. दिनेशचे थाटामाटात लग्न झालं. मनिषाचे घरही आमच्या तोलामोलाचेच आहे. आणि लग्नानंतर महिनाभरातच घरातील वस्तू गायब व्हायला लागल्यात. या गायब झालेल्या वस्तूत सुनेच्या लग्नाच्या शालूसह चार पाच भारी-भारी साड्या, कपाटातील एक लाख रूपयाच्या बंडलातून अठरा हजार रूपये व नऊ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा डबा अशा वस्तू आहेत. तर कधी घरातील भांडी, डबे आपोआपच जमिनीवर खाली पडतात. एकदा तर मी बाथरूममध्ये आंघोळीला गेले. टबमधील पाणी अंगावर घेतले अन् अंग लाल झाले हो. टबमधील पाणी तर मीच काढले होते ते पूर्ण लाल झाल्याची भानामती झाली हो. अगदी माझ्या डोळ्यादेखत घडलंय हे सारे.” हे सांगत असताना ज्योतीताईंचे डोळे पाणावले होते.

            “अहो, साहेब, हे तर सोडा. आता तर मनिषाच्या अंगावर गोटे(मराठवाड्यात असा समज आहे कोणी भानामती करणार्‍या तांत्रिकाने एखाद्या काळ्या कापडापासून तयार केलेल्या बाहुलीवर रेषा काढल्या किंवा फुल्या मारल्या तर त्या जशाच्या तशा ज्याला भानामती करायची त्याच्या अंगावर उमटतात.) यायला लागलेत. ते देखील लाल रंगाचे. आम्ही तर फार भयभीत झालो हो. “ही भीती ज्योतीताईंच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत होती.

            “मग आजवर कोणी डॉक्टर किंवा दुसरीकडे कोठे दाखवलं का?” मी त्यांना प्रश्न केला.

            “सर, याला डॉक्टर काय करणार. मांत्रिक, तांत्रिकाचेच काम अशी आमची खात्रीच होती. कुणीतरी सांगितले म्हणून त्र्यंबकेश्वरला जाऊन चांगली एकवीस हजार रूपये देऊन महापूजा केली. काय काय नाही केलं. सगळंच गुपचूप. साठ सत्तर हजार रूपये नक्कीच पाण्यात घातले. पण कशाचं काय, जवळच्याच कोणीतरी ही करणी केली असावी असेच वाटत होते. पण कोणी दिसत नाही हो करताना. अन् अवघड दुखणे होऊन बसलं, कोणाला सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही. मात्र तुमचा कार्यक्रम आम्ही दोघांनीही बघितला. त्यावरून तुम्ही आम्हाला मदत करू शकाल याची खात्री पटली. पण पेपरबाजी झाली तर इज्जत जाईल हो. म्हणून आम्ही टाळत होतो.” बोरसे आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले. ज्योतीताईंनीही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी मान हालविली. “घरात नोकरचाकर, ड्रायव्हर?” मी विचारले. “ड्रायव्हर नाहीच. सकाळी धुण्याभांड्याची बाई येते. तीच घर झाडून जाते. पण तिला याची काहीच कल्पना नाही. ती नसतानाच या घटना घडतात.” ज्योतीताईंनी पुरविलेली माहिती मी मनात पक्की नोंदवत विचारले, “आणखी कोणाबरोबर याबाबतीत बोलणे झाले आहे? इतर नातेवाईक, मनिषाच्या घरचे वगैरे.” कुणाशीच नाही हो, अगदी सख्ख्या भावाशीही बोललेलो नाही.” बोरसे बोलले.

            दोघेही खूपच अस्वस्थ झाले होते. साहजिकच होते ते; कारण भानामतीचे प्रकार एकदा का घरात चालू झाले की, भानामती करणारा सोडून बाकी सर्व फारच त्रस्त होऊन जातात.. मी दोघांनाही शांत केले. बोरसे यांनी मला भानामतीमागील सत्य शोधण्यासाठी विनंती अर्ज लिहून दिला. अर्जावर मी दोघांच्याही सह्या घेतल्या. त्यांनी माझ्या काम करण्याच्या पद्धतीचे नियम व अटी मान्य केल्या व रजा घेतली.

            संध्याकाळी आमच्या शाखेची बैठक होती. शाखेत सर्वचजण उत्साहात होते कारण औरंगाबाद शाखेतून प्रथमच जवळजवळ आठ जण जेलभरोसाठी मुंबईला गेले होते. त्याचीच चर्चा चालू होती. मी बैठकीत आमच्या सकाळच्या भेटीचा वृत्तांत नावे गाळून कथन केला व चर्चा सुरू केली. या भानामतीचा शोध लावण्यासाठी ‘आशा गोरे’ या तरूण कार्यकर्तीने माझ्यासोबत येण्याचे मान्य केले. मी भानामती शोधताना काय काय काळजी घ्यायची याबाबतचे एक छोटेसे व्याख्यानच दिले. त्यात मी भानामतीच्या शोधप्रकरणात ऐकीव गोष्टीवर अजिबात विश्वास न ठेवता प्रत्यक्ष परिस्थितीला भिडायला पाहिजे त्यामुळे प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची तपशीलवार माहिती मिळते म्हणजे मग त्या घटनातील सुसंगती व विसंगती नजरेत भरते व मग आपल्याला आपला अंदाज बांधता येतो, असे विचार मांडले.

            दुसरे दिवशी सकाळी लवकरच आम्ही दोघे, मी आणि आशा, चंद्रकांत बोरसे यांच्या ‘भागिरथी’ या बंगल्यावर पोहोचलो. त्याआधी आशाला मी बोरसेची संपूर्ण टेप ऐकायला लावली होती व बंगल्यातील प्रत्येक बारीक सारीक हालचाल टिपायला सांगितली. बोरसे कुटुंबातील चौघे घरीच होते. त्यांच्या पूर्ण बंगल्याची पाहणी केली. बंगला दोन मजली होता. वरच्या मजल्यावरील दोन खोल्यात मनीषा आणि दिनेश यांचा वावर होता तर तळमजल्यावर चंद्रकांत आणि ज्योतीताई यांच्या खोल्या होत्या, किचनही तळमजल्यावर होते. बंगल्याभोवतीची बाग आणि बंगल्यातील आतील सजावट फारच सुरेख, प्रसन्न होती. बोरसेंनी आमची ओळख मनीषा आणि दिनेशशी करून दिली. दिनेश तसा साधासुधा थोडाचा बावळटच दिसत होता. मात्र मनिषा चंद्रकांत बोरसेंनी म्हटल्याप्रमाणे सुंदर आणि स्मार्ट दिसत होती. तिचा आमच्या समोरचा वावरही एकदम अनौपचारिक, थोडासा बेफिकीरीचा वाटत होता. माझ्या मनाने याची नोंद घेतली.

            आम्ही सुरवातीला बोरसे यांचा मुलगा दिनेश याची मुलाखत घेण्याचे ठरवले. मी बोरसे यांची सून मनिषा हिच्या बेडरूममध्ये मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आणि “आपण मनिषा वर तुझ्याच खोलीत मुलाखती घेऊ, चालेल तुला?” असे तिलाच विचारले. खांदे उडवत बेदरकारपणे मनिषा म्हणाली, “माझी काय हरकत?” मुलाखत घेत असताना दुसरे कोणीही त्या रूमकडे फिरकू नये अशी ताकीद देऊन मी व आशा त्या रूममध्ये गेलो. मी माझ्याजवळील रेकॉर्डर चालू केला व खिशात ठेवला आणि दिनेशची मुलाखत घेण्यास सुरवात केली.

            “दिनेश, काय वाटतं तुम्हाला घडणार्‍या या घटनांबाबत? आणि तुम्ही काय अनुभवलंय? जरा सविस्तर सांगता का?” मी विचारले.

            “सर, मी सकाळी नऊ वाजताच घर सोडतो. दुपारी जेवायला येतो पुन्हा चार वाजता जातो ते एकदम रात्रीच येतो. वडील सकाळीच घर सोडतात ते रात्रीच परत येतात. दिवसभर घरी फक्त या दोन बायकाच असतात. आणि आम्ही घरी आल्यावर आज भांडी पडली, पैसे गेले, शालू गेले, दागिने गेले हे ऐकतो. आमचे लग्न झाल्यानंतर दोन तीन महिन्याने हे सर्व चालू झाले. आईच आम्हाला हे सर्व सांगायची.” “मनिषाने तुम्हाला काहीच सांगितले नाही?” मी थोडे आश्चर्य दाखवत विचारले. “ती याबाबत काहीच बोलत नाही. आईच सतत बोलत असते. सुरवातीला मी त्यात फारसे लक्ष घातले नाही. पण मनिषाच्या हातावर जेव्हा गोटे उठलेले प्रत्यक्ष पाहिले तेव्हा मात्र मी हादरलो.”

            “थोडासा व्यक्तीगत प्रश्न विचारतो. तुमचे आणि मनिषाचे लग्न सर्वसंमतीनेच झाले होते ना?”’ हे “हो! माझ्या माहितीप्रमाणे तरी.” आणि मग आवाजात थोडीशी खजीलताा आणत दिनेश बोलला, “अहो सर, आमचं लग्न होऊन सहा महिने झाले. पण अजून आमची सुहागरात झालेली नाही. माझ्याशी वागताना ती जरा घुश्यातच असते. लग्नापासून माझा तिचा तसा फारसा संवादही नाही. आई बाबांना काय सांगणार? त्यात या गोष्टी सुरू झाल्या. घरातले सगळे वातावरणच बिघडून गेले. आता तर तिच्या हातापायावर गोटे आलेत. स्वत: मी येताना पाहिले. आता मलाच भीती वाटू लागली आहे. त्यामुळे यामागे नक्कीच दुष्ट शक्तीच असावी असा माझा विश्वास बसायला लागला आहे.” दिनेश सांगत होता. “तुम्ही गोटे येताना प्रत्यक्ष पाहिले की आल्यानंतर?” मी मध्येच त्याला विचारले. दिनेश थोडा गडबडला. “अगदी उमटताना नव्हे पण मनिषानेच ते मला दाखवले.” आशा महत्वाचे मुद्दे नोंद करत होती.

            त्यानंतर मनिषाला तिच्याच बेडरूममध्ये बोलावण्यात आले. मनिषाच्या चेहर्‍यावर काहीच तणाव दिसत नव्हता. तिच्या हालचालीतला बिनधास्तपणा मला मात्र कुठेतरी खुपत होता. “बोल मनिषा! काय होतंय? आणि तुमच्या घरात ज्या घटना घडतात त्या कोण घडवून आणत असेल? का घडवत असेल? असे तुला वाटते” मी मनिषाला प्रश्न केला. “सर, तुम्ही शहाजी भोसले ना. मी ओळखतेय तुम्हाला. मी तुमचा कार्यक्रम बघितलाय. त्यामुळे तुम्ही अशा घटना कशा शोधतात हे मला माहीत आहे.” मनिषा म्हणाली. “माझ्या प्रश्नाचे उत्तर ‘हे’ नाही मनिषा” मी तिला म्हणालो. “सर, कोण करतंय आणि का करतंय हे तुम्हीच शोधा. त्रास तर मला होतोय ना. हे बघा माझ्या हातावर गोटे आलेत. त्याचं काय?” हात दाखवत मनिषानेच मला प्रतिप्रश्न केला. मनिषाचे हात आम्ही बघितले तर खरोखरच तिच्या दोन्ही हात व पायांवर लाल रंगाच्या फुल्या व रेषा असल्याचे जाणवले. मला त्या हातावरच्या फुल्या आणि रेषा नीट निरखून पहावयाच्या होत्या. पण मनिषाने त्रास होत असल्याने त्या जागेला तिने हात मात्र लावू दिला नाही. शेवटी दिनेशला व्यक्तीगत म्हणून विचारलेला प्रश्न मी तिलाही विचारला. तिने ‘अर्थातच’ असे उत्तर दिले. पण त्या उत्तरातला फोलपणा मात्र माझ्या मनाला स्पर्श करून गेला.

            मग मी ज्योतीताईंना बोलावले. त्या खुपच अधीर झाल्याचे मला दिसत होते. काही विचारण्याआधीच त्या सांगू लागल्या. “साहेब मी तुम्हाला कसं सांगू हो. स्वत: मी घेतलेले आंघोळीचे पाणी माझ्या डोळ्यादेखत लाल झाले. रॅकमधील डबे, पातेले आपोआप जमिनीवर खाली पडताना मी पाहिले.” “प्रत्यक्ष पडताना?” मी त्यांना थांबवत विचारले. ज्योतीताई थोड्याशा बावचळल्या. “अं… हं….हं.. खाली पडल्यावर.” मी जे समजायचे ते समजलो. “अहो, कपाटाची चावी माझ्याजवळ असताना त्यातील अठरा हजार रूपये व दागिन्याचा डबा गायब झाला. ही भानामतीच आहे. त्यामुळे तुम्हीच आता आम्हाला यातून वाचवा हो.” मदतीच्या आशेने त्या माझ्याकडे बघत होत्या. “डबे, पातेली पडताना तेथे कोण कोण असायचे?” मी विचारले. “बहुतेकवेळास मी आणि मनिषा दोघीच. नाहीतरी घरात असतेच कोण?” ज्योतीताईंनी उत्तर दिले. “तुमचे आणि मनिषाचे संबंध कसे आहेत?” मी थेटच प्रश्न केला. “ती बोलतेच कुठे? एवढे रामायण घडतंय पण ही आपली ढिम्मच! पातेली पडली, पैसे गेले, पाणी लाल झाले माझीच धावाधाव. फक्त गोटे दिसल्यावर मात्र चेहरा घाबरल्यासारखा वाटत होता.” ज्योतीताईंचे “वाटत होता” ह्या शब्दाने मला थोडे आश्चर्यच वाटले. पण मी त्यावर काहीच विचारले नाही. मुलाखत संपल्यावर मी त्यांना बाहेर पाठवले व चंद्रकांतना बोलवले. “मनिषाचे लग्न सर्व संमत्तीने झाले?” “मला तर कोणतीच शंका नाही.” चंद्रकांत बोलले. “घरातले पैसे गेले, दागिने गेले तुम्ही पोलिसात तक्रार केली की नाही?” यांनी तक्रार केली नसणार ह्याची मला खात्री होती तरी मी त्यांना हा प्रश्न विचारला. “बाहेर फार गाजावाजा होऊ नये म्हणून पोलिसात न जाता तुमच्याकडे आलो आम्ही.” चंद्रकांतनी उत्तर दिले. घरात भानामतीच्या घटना ज्या ज्या वेळेस घडल्या होत्या तेव्हा तेव्हा चंद्रकांत घराबाहेरच असल्याचे त्यांनी सांगितले.

            मुलाखती घेण्याचे आम्ही थांबवले. पण आम्ही अजूनही ठोस निर्णयापासून कोसो दूर होतो. माझ्या आणि आशाच्या चर्चेतून चंद्रकांतना आम्ही बाहेर काढले. ज्योतीताईंवर संशय घेण्यायोग्य निश्चित कारण दिसत नव्हते. दिनेश आणि मनिषा यांच्या संबंधाबाबत प्रश्नचिन्ह होते आणि येथेच काहीतरी गोम आहे असे मन मला सांगत होते. मी माझे मत आशाला सांगितले. आशालाही मनिषाचे वावरणे कृत्रिम वाटत होते. काहीतरी दडविण्यासाठी ती मुद्दामच आपण बिनधास्त असल्याचे भासवते आहे असे आशाला वाटत होते. आमच्या प्रश्नांनाही तिने सविस्तर उत्तरे दिली नव्हती. आम्ही दोघेही रूमच्या बाहेर आलो. सर्वांना हॉलमध्ये बोलावले. “शोध अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. थोडा वेळ लागेल पण तुमच्या घरातील घडणार्‍या घटना पूर्णत: बंद होतील. पण आता घरात चोरी झाली तर बेशक पोलिसात तक्रार मात्र करा.” जणू काही ते कृत्य करणारा व्यक्ती मी शोधलीय असे भासवत मनिषाच्या नजरेला नजर लावत मी बोललो. मनिषाने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आम्ही निरोप घेतला.

            त्या दिवशी रात्री मी स्वस्थपणे संपूर्ण टेप ऐकली. बोरसे पतीपत्नी भेटायला आल्यापासून थेट त्यांच्या घरातून बाहेर पडेपर्यंतच्या सर्व घटना शांतपणे नजरेसमोर आणल्या. सगळ्यात एकच गोष्ट मला विसंगत वाटत होती ती म्हणजे मनिषा-दिनेशचे संबंध. मनिषाचे आक्रमक व्यक्तिमत्व आणि दिनेशचे नमते घेणे. या विचारातच मी केव्हा झोपी गेलो हे मलाही समजले नाही.

            पुढे चार दिवस मी औरंगाबादेत नव्हतो. परतलो. रात्रीचे आठ वाजले होते. जेवणाच्या तयारीत होतो. चार दिवसातील कार्यक्रमाचा अहवाल अरूणाला सांगत होतो. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. कॉल चंद्रकांत बोरसे यांचाच होता.

            “बोला बोरसे साहेब.” मी म्हणालो.

            “सर, जरा आमच्या घरी अर्जंट येता का? घरात भांडी पडायला लागलीत. तुम्हाला प्रत्यक्ष बघता येईल” बोरसे म्हणाले.

            “आलोच, दहा मिनिटात येतोच” असे म्हणत मी कॉल डिस्कनेक्ट केला व लागलीच आशाला कॉल केला. आशाही लगेच तयार झाली.

            बोरसे कुटुंब आमची वाट पाहतच होते. कदाचित बाहेरून कोणी असा खोडसाळपणा करू शकतो म्हणून मी सर्वप्रथम बंगल्याच्या सर्व खिडक्या व दरवाजे आतून बंद करायला सांगितले. आम्ही सर्वजण किचनमध्ये जमा झालो. जवळपास 15 मिनिटे थांबलो. एकही वस्तू जमिनीवर पडली नाही. ती 15 मिनिटे बरीच तणावपूर्ण शांततेत गेली. त्या शांततेचा भंग करीत “आता भांडी का पडत नाहीत. बहुधा शहाजींना भानामती घाबरली वाटते.” चंद्रकांत बोरसे मिस्किलपणे म्हणाले. त्याही तणावाच्या स्थितीत सर्वांच्याच चेहर्‍यावर सौम्यसे हसू आले. वातावरणात थोडासा सैलपणा आला. त्यातूनही माझी नजर पटकन मनिषाकडे गेली. तिच्या चेहर्‍यावरची रेषा जराही हलली नव्हती. तिची थंडगार नजर माझ्यावरच रोखलेली मला जाणवली. अखेर मी अगोदर चंद्रकांत बोरसे त्यानंतर त्यांची पत्नी ज्योतीताई व मागोमाग दिनेश आणि आशालाही हॉलमध्ये जाण्यास सांगितले. त्यांच्या मागे आता किचनमध्ये मी व मनिषा आम्ही दोघेच होतो. मी  लगेचच हॉलमध्ये जाण्यासाठी निघालो. मनिषा मला ओलांडून हॉलकडे निघाली अन् काय…. मागे धा….डकन आवाज झाला. मी पट्कन मागे वळून बघितले. किचनमध्ये कोणीही नव्हते. रॅकमध्ये ठेवलेला रिकामा स्टीलचा डबा मात्र जमिनीवर पडलेला दिसला. तोवर सगळे किचनमध्ये धावतच आले.

            “आता हे घडलं कसं? बोला. सांगा तुम्ही?” ज्योतीताई जवळ जवळ ओरडतच मला विचारत होत्या याचं उत्तर कुणाकडेच नव्हते. पण माझा तपास योग्य दिशेने चालला याचा मनोमनी मला आनंद झाला होता.

            पण तेवढ्यात मनिषा मोठ्याने “आऽऽऽई गंऽऽऽ” असं किंचाळली. तिने आपला उजवा हात आपल्या गालाकडे नेला अन् बघता बघता तिच्या गालावर रेष उमटली. तोच हात डाव्या हाताच्या दंडाकडे नेला आणि त्याच प्रकारची रेष दंडावर उमटली. आता मात्र सर्वजण भयभीत झाले होते. मनिषाच्या हातात तर काहीही नव्हते लाल रंगाचे गोटे तिच्या अंगावर मात्र सर्व समक्ष येऊ लागले होते. ती जमिनीवर कोसळली. तिला पकडर्‍याचा बहाणा करत आशाने आणि मी तिच्या दंडावर उमटलेल्या रेषेला स्पर्श केला. माझे बोटदेखील लाल झाले. बोट रक्ताने माखलेले नसून तो वेगळाच काहीतरी चिकट पदार्थ असल्याचे मला जाणवले. ज्योतीताईने मनिषाला पाणी प्यायला दिले. आता ती सावरली होती.

            वातावरण खूपच तणावपूर्ण झाले होते. वेळ रात्रीची असल्या कारणाने अशावेळी मी काही सांगणे उचित नव्हते. मी आणि आशा तिथून निघालो पण जायच्या आधी मी सर्वांना उद्देशून म्हणालो, “हे बघा. आता रात्र झाली आहे. त्यामुळे आम्ही उद्या येतो व ही भानामती कायमची बंद करू या. फक्त मला हे समजत नाही की भानामती करणारी व्यक्ती एवढी सोज्वळ कशी आहे. ती तिकडे बाहुलीवर लिपस्टिकच्या रेषा मारते की त्या रेषा मनिषाच्या अंगावर उमटतात. ती व्यक्ती ब्लेड का मारत नाही?” मी भानामतीच्या नावाने असे कृत्य करणार्‍या व्यक्तीला उचकावण्याच्या उद्देशाने म्हणालो. थोड्या वेळातच आम्ही घरी परतलो.

            दुसर्‍या दिवशी सकाळीच मोबाईलची रिंग वाजली. मी कॉल रिसिव्ह केला. समोरून दिनेश बोरसे बोलत होता. त्याने मनिषाच्या हातावर ब्लेड आले असून हात रक्तबंबाळ झालेल्या मनिषाला उपचारासाठी जोशी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचे कळवले. डॉक्टरांचा उपचार होण्याअगोदर मनिषाचे हात बघण्यासाठी मी क्षणाचाही विलंब न करता जोशी हॉस्पिटल गाठले.

            “सर, बघा माझ्या हातावर ब्लेड आले हो.” मनिषा रडक्या आवाजात मला सांगत होती. मी त्या रक्तबंबाळ हातांचे फोटो काढले आणि तेथूनच आशाला कॉल केला. थोड्याच वेळात आशा दवाखान्यात आली. तोवर डॉक्टर जोशींनी मनिषाच्या हातावर मलमपट्टी केली. अर्ध्या तासानंतर आम्ही सर्वजण चंद्रकांत बोरसे यांच्या बंगल्यावर गेलो.

            “साहेब, असे आम्ही काय कोणाचे वाईट केले. आता का ही भानामती कोणाचा जीव घेते कुणास ठाऊक?” ज्योतीताई रडत रडत म्हणाल्या. आशाने त्यांना शांत केलं. मनिषा तिच्या बेडरूममध्ये गेली होती. मी बोरसे कुटुंबियांना मनिषाला एकांतात बोलण्याची परवानगी मागितली. त्यानुसार मी व आशा मनिषाच्या रूममध्ये गेलो. आत आम्ही तिघेच होतो. बाकी सर्वजण हॉलमध्ये होते.

            “हे बघ मनिषा, मी तुला जे सांगतोय ते शांतपणे ऐकून घे. तू हे सारे कृत्य करत आहेस हे मला माहीत आहे. खरं तर माझी शंका तुझ्यावर होतीच. पण पुरावा नव्हता. काल मी आल्यानंतर भांडे जमिनीवर पाडणे थांबले. म्हणूनच प्रत्यक्ष बघण्यासाठी मी बाकीच्यांना हॉलमध्ये पाठवले पण मुद्दामहून तुला माझ्या मागे ठेवले. तू मला ओलांडून पुढे गेलीस मात्र माझ्यामागे रॅकमधील डबा जमीनीवर पडला. तो पडला नाही तर तू पाडलास. कारण तुझ्या हातात जी लग्नपत्रिका होती, ती तर त्या रिकाम्या डब्याखाली असल्याचे मी आधीच पाहिले होते. तर ती डब्याखालची लग्नपत्रिका तुझ्या हातात आली कशी? याचाच अर्थ असा की, तू लग्नपत्रिका ओढलीस अन् डबा जमिनीवर पडल्याचा आवाज नंतर आला. तोवर तू मला ओलांडून हॉलकडे निघाली होतीस. तुझ्या हातात असणारी लग्नपत्रिका हाच महत्वाचा पुरावा होता. त्याचबरोबर हातावर आलेल्या लाल रेषा लिपस्टिकच्या होत्या म्हणूनच मी तुला हात कापण्यास प्रवृत्त केले होते आणि तू ही माझ्या गळाला लागलीस. त्यामुळे तू आता सविस्तरपणे असे का करतेस? काय प्रॉब्लेम आहे तुझा? हे आम्हाला सांग. विश्वास ठेव याबाबतची वाच्यता आम्ही कुणाजवळही करणार नाही.” माझ्या या बोलण्याने मनिषाला सत्य बोलण्याशिवाय पर्यायच नव्हता.

            “हो सर, मीच करतेय. साडीच्या निरीमध्ये लिपस्टिक लपवून ठेवायची. सर्वांच्या नजरा चुकवून ते नखात घ्यायची. त्रास होण्याचा बहाणा करताना शरीरावर जेथे जेथे हात लावायची तेथे तेथे नखातील लिपस्टिक लावायची. हे केवळ सतीशसाठी. कारण माझे त्याच्यावर प्रेम आहे. आणि तोही माझ्यावर तेवढंच प्रेम करतो….” मनिषा म्हणाली.

            “आता हा सतीश कोण? अन् काय करतो तो?” मी विचारले.

            “सतीश रिक्षा चालवतो. दोन वर्षांपूर्वी आम्ही एकत्र आलो. एकमेकावर जीवापाड प्रेम करतो. केवळ तो मातंग समाजाचा व मी मराठा आणि वडिलांची समाजातील प्रतिष्ठा. यामुळे माझी त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करण्याची हिंमत झाली नाही. पण त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि म्हणूनच….” मनिषा रडवेली होत सांगत होती.

            “मग ते पैसे, दागिने” आशा म्हणाली.

            “हो. मीच चोरले आणि सतीशला दिले.” मनिषाने खाली मान घालून अपराध कबूल केला.

            “हे बघ… ज्यावेळेस हिम्मत दाखवायची होती तेव्हा ती हिम्मत तुला आणि सतीशला दाखवता आलेली नाही आणि अजूनही जर तुमचे एकमेकावर प्रेम असेल तर तू सरळ हिम्मतीने दिनेशला सर्व खरेखुरे सांग आणि सतीशकडे जा. आहेस तयार? त्यासाठीही आम्ही तुला मदत करू.” मनिषाने हताशपणे नकारार्थी मान हालविली. “मग असे हे चोरीमारीचे उद्योग करीत ज्यांचा काहीच दोष नाही त्यांना तू का त्रास देते आहेस? आपले आयुष्यही वाया घालवत आहेस आणि बोरसे कुटुंबावरही अन्याय करीत आहेस. आता तुला मागे फिरता येत नसेल तर मागचे सर्व विसरून आनंदाने रहा आणि इतरांनाही आनंद दे.” माझ्या या बोलण्याने मनिषा विचारात पडली. खर्‍या अर्थाने तिचे डोळे उघडले गेले होते. तिने यानंतर असे काही एक कृत्य न करण्याचे व दिनेशसोबत आनंदाने राहण्याचे मान्य केले. त्यानंतर आम्ही तिघेही हॉलमध्ये गेलो.

            “हे बघा बोरसेसाहेब तुमच्या घरात होणारी भानामती आता कधीच होणार नाही. भानामती करणारी व्यक्ती कोण आहे व ती का करते हे जरी मला माहीत असले तरी माझ्या अटीनुसार मी त्या व्यक्तीचे नाव सांगणार नाही. पण पुन्हा यातला कोणताही प्रकार घडला तर त्या व्यक्तीला पुराव्यानिशी तुमच्या सर्वांसमोर आणण्याची जबाबदारी माझी.” मी हे सांगत असताना सर्वांच्या मागे बसलेल्या मनिषाने मान डोलवून माझी शर्त मान्य केली आणि बोरसे कुटुंबात होणारी भानामती कायमचीच थांबली.

-शहाजी भोसले