‘गुरू’किल्ली
आपल्या मेंदूवरती आपलाच ताबा लागतो नाहीतर गुरू म्हणून एखादा भोंदू बाबा लागतो. गुरू असावा गुरूसारखाच एखादा भंपक बाबा नको! गिर्हाईकांची वाट बघत बगळ्यासारखा उभा नको!
गुप्तदानाचे रहस्य
भक्ताकडून देवांचाही चांगलाच कस पाहिला जातो. कधी कधी गुप्तदानाच्या नावाखाली ‘ब्लॅक मनी’ही वाहिला जातो. गुप्तदानाच्या माध्यमातून एकप्रकार मात्र वाईट होत असेल! पुण्य मिळेल तेव्हा मिळेल पण ब्लॅकचा व्हाईट होत असेल!!
चमत्कारांचे विज्ञान
चमत्कारांमागे चमत्कारांच्या वावड्यावर वावड्या उडतात. चमत्कारांचा फुगा फुटताच चमत्कारांच्या रेवड्या उडतात. चमत्कारांमागे विज्ञान नाहीतर बनवाबनवी असते! हातचलाखी मागे जी असते ती शक्ती तर मानवी असते!!
चमत्काराचा पंचनामा
कुठे मूर्तीतून रक्त येते कुठे मूर्ती रडू लागतात भक्तांच्या श्रद्धेचे पंचनामे जगजाहिरपणे घडू लागतात. चमत्कार दिसतो, वास्तव नाही ती नजर आंधळी असते! अंधश्रद्धाळू भक्तांची तर्हाच गोंधळी अन् वेंधळी असते!!
ज्योतिषाची शास्त्रीयता
ज्योतिषाच्या नावाने ओरडून काही फायदा नाही आता आमच्या पाठीमागे पाठीराखा कायदा नाही कायद्याला विरोध करण्याचे आमचे काय कारण? न्यायप्रियतेच्या ओझ्याखाली विवेकबुद्धी भाग तारण आहे!!
मंकी मॅन
माकड आणि माणसात फरक कुठे उरला जातो? राहून राहून कुठे तरी मंकी मॅन अवतरला जातो. पुन:पुन्हा सांगावे लागते मंकीमॅनची कथा भाकड असते! मात्र प्रत्येक माणसा-माणसात दडलेले एक माकड असते!!
जगबुडी
अनेक वेळा भविष्य सांगूनही अशुभ काहीघडले नाही, एवढ्या अफवा पसरूनही जग काही बुडले नाही. निसर्ग दाखवून देतो माणसाच्या बुद्धीची कुठपर्यंत उडी असते त्याचमुळे तर चर्चेत नेहमी जगबुडी असते.
भक्तांचा दानधर्म
भक्ताकडूनच परिक्षा पाहिली जाते देव भक्तीचा भुकेला तरी कधी उघड; कधी छुपी देवालाच संपत्ती वाहिली जाते देव तर श्रीमंतच मग पैसा श्रीमंतालाच दिला जातो! त्यालाच दानधर्म म्हणतात जो पैसा गरजवंताला दिला जातो!!
मंगळ मंगल हो!
पत्रिका बघणार्याची अधिकच चंगळ आहे आज पृथ्वीच्या जवळ ग्रहमालेतला मंगळ आहे आकाशातले सारे ग्रह पत्रिकेमध्ये आणले जातात पत्रिका बघणार्यांकडून ढगात गोळ्या हाणल्या जातात. सर्वांनाच कळून चुकले आहे त्यांचे काय हेतू असतात! अंगठी बहाद्दूरांच्या मागेच राहू आणि केतू असतात!!
साधूत्वांचे ऑखो देखा हाल
जिथे रामलीला रंगावी, तिथं कामलीला रंगू लागल्या भक्तांच्या भोळ्या-श्रद्धा, तिथे रंगेहात भंगू लागल्या धर्माचे दलाल आता, वेश्यांचे दलाल बनत आहेत! तन-मन-धन लुटून, संधी साधू मालामाल बनत आहेत.
–सूर्यकांत डोळसे, पाटोदा, बीड