सातपुड्याच्या कुशीत वसलेलं नंदूरबार परिसर हा आदिवासी बहुल भागात मोडतो. जिल्ह्यात डाकीणीच्या प्रश्नाची धग कायम असतांनाच आणखीच नवीन असणार्या अंधश्रद्धांच्या प्रकाराचा पेव आल्याने चीड आहे. सातपुडा पर्वताच्या पंचक्रोशीत विराजमान तळोदा तालुक्यातील धानोरा ते आमलाड या दोन गावांदरम्यान असणार्या दर्ग्यात सध्या जो प्रकार पहायला मिळतो, तो ही यापैकीच एक.
‘पीर सैय्यद गुमानअली चिश्ती’ असे ह्या दर्ग्यावर नाव लिहिलेले आहे. मागील पाच-सात वर्षांपूर्वीच ह्या दर्ग्याच्या जिर्णोद्धाराचे काम करण्यात आले आहे. तत्पूर्वी मुघलकालीन असणारा हा दर्गा भग्नावस्थेत होता. एका दलित कुटुंबातील व ठिकठिकाणच्या दर्ग्यात वाढलेला आणि इस्लाम धर्माचा प्रभाव असणार्या ‘लक्ष्मण बाबा’ नामक युवकाने पुढाकार घेत, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या लोकवर्गणीतून हा दर्गा उभारला गेल्याचे परिसरातील नागरिकांकडून समजले. लक्ष्मणबाबाच्या अनुपस्थित आता ह्या दर्ग्यात दर गुरूवारी असाध्य रोगांवर उपचार तसेच अंगात भूत-प्रेत असणार्या लोकांवर उपचार करून त्यांना बरे करण्याचे प्रकार सध्या जोरात सुरू आहेत.
नंदूरबार हा मध्यप्रदेश व गुजरात राज्यांच्या सीमेलगत असणारा जिल्हा असून दर्ग्याची ख्याती महाराष्ट्रासह परराज्यातही सर्वदूर पोहचू लागली आहे. त्यामुळे परराज्यातून व महाराष्ट्रातून लांब अंतरावर लोक येथे उपचार करून घेण्यासाठी येऊ लागले आहेत. शारीरिक व्याधींवर उपचार करून घेणार्यांपैकी अंगात भूत-प्रेत काढून घेण्यासाठी येतात किंवा आणली जातात. दर गुरूवारी दर्ग्यात साधारणत: चार वाजेनंतर दर्ग्यातील इमाम आपला दरबार भरवतो. दर्ग्यात भूत-प्रेताची बाधा असणारी व्यक्ती मानसिक रूग्णच असते. अशा रूग्णांना आणण्याच्या अगोदर त्यांचे नातेवाईक रूग्णास कोणत्या गुरूवारी आणायचे, याची ‘स्पेशल अपॉईंटमेंटच’ ईमामकडून घेतात. ठरलेल्या गुरूवारी अशा रूग्णास दर्ग्यात आणले जाते व दर्ग्याच्या गाभार्यात त्याला सोडून देण्यात येते. दर्ग्यात ईमामच्या मदतीला असणारी एक स्त्री अशा रूग्णांच्या एका हाताला अंदाजे दीड ते दोन किलोग्रॅम वजनाची लोखंडी साखळी कुलूपासमवेत बांधून देते व दुसरा हात रिकामाच ठेवते. प्रथमदर्शनी असे वाटते की, हाताला बांधलेली साखळी कुठेतरी अडकवलेली असेल पण ती फक्त हाताला पूर्णपणे वेढलेली असते. हाताला साखळी बांधण्याचा उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांकडून असे कळाले की, उपचार करत असताना भूत-प्रेताची बाधा झालेल्या व्यक्तीच्या अंगातील ते भूत, ती अदृश्य शक्ती बाबाच्या धाकाने पळून जाते. ती तिच्या अंगातच बंदीस्त रहावी म्हणून अशा व्यक्तीच्या एका हाताला साखळी बांधून त्या भूत-प्रेताला बंदी करण्यात येते. साखळी हाताला बांधल्यानंतर अशा व्यक्ती दर्ग्याच्या गाभार्यातच सात-आठ पावलांच्या अंतरावर फेर्या भारतात. सुमारे दीड ते दोन तास त्याच्या ह्या फेर्या सुरूच असतात. त्यांनी जर बसण्याचा प्रयत्न केला तर ईमामची ‘मदतनीस’ स्त्री अशा रूग्णांना काठीने झोडपून काढते. रूग्ण जर स्त्री असेल तर तिचे केस पिळते व फेर्या सुरूच ठेवण्याचे फर्मान त्या व्यक्तीच्या अंगात असणार्या ‘सैताना’स सोडते.
ईमामच्याही अंगात वारे आल्यावर तो आपला दरबार सुरू करतो आणि एकाएका रूग्णाच्या मुलाखती सुरू होतात. मुलाखतीत ईमाम त्या बाधीत व्यक्तीच्या अंगातील भूताशी, त्या अदृश्य व्यक्तींशी संवाद साधत असतो. एखाद्या पत्रकाराने मुलाखत देणार्या व्यक्तीवर प्रश्नांचा भडीमार करावा तसा तो ईमाम त्या रूग्णाला प्रश्न विचारतो, तू कोण? तुझे नाव काय? तू कसा मेला होतास? ह्या व्यक्तीच्या अंगात का प्रवेश केला? कसा प्रवेश केला? याला सोडण्यास तू तयार आहेस का? त्यासाठी तुला काय अपेक्षित आहे? अशा प्रश्नांचा त्यात समावेश असतो. ईमामने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जर अशा व्यक्तींनी निमूटपणे दिली नाहीत, उत्तरे देण्यास टाळाटाळ केली तर ईमामची ‘मदतनीस’ उत्तरे न देणार्या रूग्णांची काठीने धुलाई सुरू करते. स्त्रियांचे केस ओढण्याचे, पिळण्याचे, त्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरू करते. एवढ्या अमानुष प्रकारे आपल्या कुटुंबातील सदस्यांचा शारीरिक छळ होत असतांना त्यांच्या नातेवाईकांना, त्यांना तेथे आणणार्याला मोठा आनंद होतो. कारण त्यांची अशी धारणा झालेली दिसून आली की, हा मार आपल्या व्यक्तीला लागत नसून त्यांच्या अंगात असणार्या त्या भूताला, सैतानाला लागत आहे. त्यामुळे अनेकदा तर अशा व्यक्तींचे नातेवाईकच ह्या मारझोडीला प्रोत्साहन देताना दिसून येतात. आज 21 व्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाच्या बळावर चंद्रावर घरे बांधण्याची स्वप्ने पहात असतांना दुसरीकडे भूत, प्रेत, सैतान अशा भ्रामक व खुळ्या कल्पनांना बळी पडून मानवानेच मानवाचा अमानुष छळ सुरू ठेवलाय. याचेच फार वाईट वाटते.
अशा प्रकारचे उपचार झाल्यानंतर ह्या रूग्णांना पाच ते सात गुरूवार दर्ग्यात हजेरी लावावी लागते. दर गुरूवारी येतांना लिंबू, अगरबत्ती, फुले, साखर, अत्तर अशी सामग्री आणावी लागते. पाच ते सात गुरूवार उपचार केल्यानंतर बाबा अशा रूग्णांतील भूत-प्रेतांना आपल्या काबूत करतात. व पुन्हा कुणाच्या अंगात शिरणार नाही, इतरांना त्रास देणार नाही, असे वचन बांधून घेतात. त्याचप्रमाणे भुताने पछाडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना भुताने केलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे आदेश देतात.
दर्ग्यात ईमामच्या मदतीला असणार्या ‘त्या’ मदतनीस स्त्रीच्या बाबतीत एक मजेशीर बाब माहिती झाली. ती स्त्रीही अन्य रूग्णांप्रमाणे उपचारांसाठी दर्ग्यात आली होती. तिच्याही अंगात ‘चुडेल’ नावाचा प्रकार होता. तिची चुडेल(सैतान) काढण्यासाठी नातेवाईकांनी तिला दर्ग्यात आणले होते. तिच्या अंगातील असणार्या चुडैल व सैतानाकडून बाबा जरा जास्तच प्रभावित झाले व त्या चुडैल-सैतानाला बाबांनी आपल्या वचनात बांधून घेतले की, मी जेव्हा तुला बोलावेन तेव्हा तुला हजर व्हावे लागेल. यानुसार दर गुरूवारी ती स्त्री दर्ग्यात हजर असते व तिच्या अंगातील त्या चुडेल-सैतानासह ती ईमामच्या मदतनीसाची भूमिका पार पाडते. हातात साखळी गुंडाळणे, साखळी बांधलेल्या व्यक्तीने जर बसण्याचा प्रयत्न केला तर काठीने झोडपणे, स्त्रियांचे केस पिळणे, त्यांना मारहाण करून त्यांच्यातील त्या सैतानी शक्तीला त्रास देणे, बाबा व बाधीत व्यक्तीच्या मुलाखतीच्यावेळी बाधीत व्यक्तीच्या अंगातील भूत, प्रेत, सैतान, चुडेल जे असतील त्यांना बोलाविणे, हजर करणे, अशा प्रकारे कामे ती मदतनीस स्त्री करत असते. मोठ-मोठाले काळेभोर डोळे, त्यात काजळ भरलेले, ते फिरविण्याची लकब, मोठे लांब काळेभोर मोकळे केस व परिधान केलेला काळाभोर बुरखा यामुळे एखाद्या ‘हॉरर’ हिंदी चित्रपटातील ते पात्र असावे असे वाटते. तिच्या ह्या ‘लूक’मध्ये तेथे उपस्थितही अनेकदा तिला घाबरून जातात. या सर्व परिस्थितीमुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या ह्या दर्ग्याकडे परिसरातील नागरिकांची पाऊले वळू लागली आहेत. काहींची श्रद्धेपोटी, काहींची अंधश्रद्धेपोटी तर काहींची निव्वळ मनोरंजनासाठी.
दर्ग्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की, हा दर्गा हिंदू व मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतिक राहिला आहे. दर्ग्यात उपचार घेणारे फक्त मुस्लिम धर्मातील लोक नसतात तर हिंदू धर्मियांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. दर गुरूवारी येथे मोठ्या प्रमाणावर हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडत असते. हेच ऐक्य जर राष्ट्रीय प्रश्नांच्या सोडविण्यासंदर्भात दिसून आले असते, तर कदाचित ह्या भारत देशातील चित्र वेगळे पहावयास मिळाले असते.
– हंसराज महाले