तासगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या कुटुंब मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील वसंतदादा मंगल कार्यालयात हा मेळावा झाला. परिसरातील 40 कुटुंबातील सुमारे 100 लोक उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय कराडे, प्रा.डॉ.बाबूराव गुरव, प्रताप घाटगे, फारूक गवंडी उपस्थित होते.
कुटुंब मेळाव्याची भूमिका स्पष्ट करताना प्रमुख पाहुण्यांनी सांगितले की, एकाच विचाराने ध्येयाने प्रेरीत झालेली, शोषणमुक्त, समतावादी अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार-कृती करणारी आपली कुटुंबे आहेत. म्हणूनच आमचे वैचारिक नातेसंबंध आहेत. महामानवाचा सत्यशोधकी वारसा पुढे चालवणारी आपली कुटुंबे आहेत.
यावेळी प्रत्येकाने आपली ओळख आपल्या कुटुंबासोबत करून दिली. अनेकांनी हुंडा न घेता-देता विवाह केलेले होते. कोणी आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्ने केलेली होती. तर देहदान-नेत्रदानही कित्येकांनी केलेले होते. ‘बुवाला भाळली आणि चांगलीच पोळली’ ही नाटिका आणि अंधश्रद्धेविरूद्धचे भास्कर सदाकळे यांचे रंजक किस्से यामुळे सर्वांचे मनोरंजनातून प्रबोधन झाले.
समीर कोळी यांनी आभार मानले. नियोजन पांडुरंग जाधव, अशोक पाटील, लक्ष्मण रणवरे, अशोक मस्के, सुहासिनी कराडे, बाबूराव जाधव, सुधीर नलवडे, शरद शेळके, महेश जोतराव, कुमार माळी, विश्वनाथ पाटील, छाया खरमाटे, हेमलता बागवडे यांनी केले.