महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दि.28 फेबु्रवारी 2012 रोजी आयुकाच्या पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे विज्ञान दिन साजरा झाला. सदर कार्यक्रमामध्ये विज्ञानाचा प्रसार करणार्या अनेक संघटनाबरोबरच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. समितीचे राज्यप्रधान सचिव मिलिंद देशमुख, कुणाल शिरसाटे, घनश्याम एनगे यांनी बुकस्टॉल बरोबरच चमत्कार सादरीकरणाचे अर्ध्या अर्ध्या तासाचे कार्यक्रम दाखवले. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. बुक स्टॉल समितीचे कार्यकर्ते विश्वास पेंडसे यांनी लावला होता. मुलां-मुलींचे पुस्तके घेण्याकडे खूप चांगला प्रतिसाद होता. पालकांनी व शिक्षकांनी सुद्धा पुस्तके घेण्यास प्राधान्य दिले. विज्ञानाची प्राण्यांच्या संदर्भातील आणि चरित्रात्मक पुस्तकांना विशेष मागणी होती. समितीने बनवलेल्या साप व अंधश्रद्धा व इतर भाषणाच्या डी.व्ही.डी.ज् यांना खूपच मागणी होती. आपण नेहमी म्हणतो की, सध्याच्या मुलांना पुस्तके वाचण्यात रस नाही ही समजूत चुकीची आहे. याची प्रचिती आली.
चमत्काराच्या कार्यक्रमात पाण्याचा दिवा पेटवणे, गडव्यात भूत बंद करणे, लंगर सोडवणे, वस्तू गोड करणे असे विविध चमत्कार व त्यामागील स्पष्टीकरण मुलांना देण्यात आले. आयुकाच्या सर्व टीमने खूपच चांगले नियोजन केले होते. बहुसंख्य शिक्षकांनी अंनिसचा कार्यक्रम त्याच्या शाळा/कॉलेजमध्ये ठेवण्यासाठी समितीचे माहितीपत्र सोबत घेतले. अंनिसतर्फे नियोजनात संजय बारी, श्रीराम नलावडे आदींचा समावेश होता.
-विश्वास पेंडसे, पुणे