महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावतीच्या शाखेतर्फे नुकतेच मनोरंजन हॉल, अप्परवर्धा कॉलनी, अमरावती येथे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
ह्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मा.डॉ.बबनराव बेलसरे ह्यांनी केले. तर ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ देशमुख माजी प्राचार्य, रमेश अंधारे, अविनाश पाटील(राज्य कार्याध्यक्ष), डॉ.नरेंद्र दाभोलकर(संस्थापक कार्याध्यक्ष) हे प्रामुख्याने हजर होते.
अंधश्रद्धा निर्मूलनाची व्यापक वैचारिक भूमिका व संघटना बांधणी ह्या विषयावर अविनाश पाटील ह्यांनी मार्गदर्शन केले तर फलज्योतिषाचा फोलपणा ह्या विषयावर मिलिंद देशमुख(राज्य प्रधान सचिव) ह्यांनी मार्गदर्शन केले. भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन का रूजला नाही ह्यावर गटचर्चा घेण्यात आली ह्या गटाचे नेतृत्व प्रमोद कोळमकर(अंनिस कार्यकर्ते) ह्यांनी केले.
शहाजी भोसले(राज्य सरचिटणीस) ह्यांनी बुवाबाजी विरोधाची भूमिका व चमत्काराचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली व बाबा/बुवा आपणास कसे फसवितात हे सांगितले. डॉ.नरेंद्र दाभोलकर ह्यांनी मन व मनाचे आजार, देवी अंगात येणे, डाकीण प्रथा, वैज्ञानिक दृष्टिकोन ह्यावर यथोचित मार्गदर्शन केले. ह्यानंतर प्रत्येकाच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन शंकासमाधान केले.
ह्या दोन्ही दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे यशस्वीतेकरिता श्रीकृष्ण धोटे, मधुकर कोहळे, सुधाकर बुटले, प्रमोद कोळमकर, हिम्मतराव साखरे, अॅड.राजेश तायडे, सुधाकर मोंढे, दे.सु.बसवंत, प्रविण गुल्हाणे ह्यांनी परिश्रम घेतले.
–प्र. ना. कोळमकर, अमरावती