सावळज(ता.तासगाव) येथे राहणार्या आणि भोंदूपणा करून लोकांची फसवणूक व लुबाडणूक करणार्या नयना उमाजी जाधव या महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला. तिने पोलिसांसमोर लोटांगण घेऊन गाव सोडून जाण्याची तयारी दर्शविली.
परगावाहून येऊन कुटुंबासह वास्तव्यास आलेल्या नयना जाधव (मूळ गाव कुटवाड, ता.माण, जि.सातारा) हिने काही दिवसांपासून सावळज येथे भोंदूगिरी करीत आपले बस्तान बसविले होते. तिच्याकडे अनेक पीडित महिला व पुरूष येत होते.
तिने अनेकांना करणी व भूतबाधा झाली असल्याचे भासवून लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली होती. यासंबंधीच्या तक्रारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यकर्ते अशोक म्हस्के यांच्याकडे आल्या होत्या. तक्रारी आल्यानंतर स्वत: म्हस्के त्यांचा भाऊ शहाजी म्हस्के यांना घेऊन नयना जाधव यांच्याकडे गेले. अशोक म्हस्के यांनी ‘माझा भाऊ शहाजी खूप दिवसांपासून आजारी आहे, त्याला दवाखान्यात अनेकवेळा दाखवूनसुद्धा गुण येत नाही म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो आहे’ असे सांगितले. त्यावर नयना जाधव हिने ‘तुमच्यावर करणी केली आहे, त्यासाठी प्रथम आमच्या देवासमोर 500 रूपये ठेवावे लागतील करणी काढण्यासाठी उदगीर(कोकण भागात) जावे लागेल, व त्यासाठी 5000 रूपये खर्च येईल’ असे सांगितले.
दरम्यान, हे संभाषण म्हस्के यांनी मोबाईलमध्ये टेप केले होते. यानंतर म्हस्के यांचे शहाजी व प्रदीप फासे यांनी तासगाव पोलिसात पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्याकडे तक्रार दाखल करून मोबाईलवरील संभाषण ऐकविले. तातडीने हालचाली करून पोलिसांनी नयना जाधव व तिच्या कुटुंबाला पोलीस ठाण्यात हजर केले असता तिने भोंदूगिरी करीत असल्याचे मान्य केले. पोलिसांच्या समोर लोटांगण घेतले. आठ दिवसांत कुटुंबासह गाव सोडून जाण्याचे लिहून दिले. यापुढे अशी फसवणूक व लुबाडणूक करणार नाही, अशी लेखी ग्वाही देऊन सुटका करून घेतली. अशाप्रकारच्या भोंदू महिला व बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन अंनिसचे जिल्हा कार्यकर्ते अशोक म्हस्के यांनी केले.
–विठ्ठल चव्हाण, तासगाव, जि.सांगली.