नुकत्याच जिल्हा परिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकीत आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख यांची सांगली जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. आटपाडी तालुक्यातील करगणी गटातून खुल्या जागेसाठी राष्ट्रवादी पक्षातून त्यांनी अर्ज भरला. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 23 जानेवारी 2012 या दिवशी सोमवती मौनी अमावस्या होती. अनेक कार्यकर्त्यांनी अमावस्येचा अर्ज भरू नये असा सल्ला दिला होता. परंतु अमरसिंह देशमुख यांनी मोठ्या आत्मविश्वासाने त्या अमावास्येला व आपल्या निवडणुकीचा काहीही संबंध नाही असे कार्यकर्त्यांना पटवून अर्ज भरला. करगणी गटातून अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले. 21 मार्चला सांगली जिल्हा परिषदेचे बिनविरोध अध्यक्षही झाले.
मा.अमरसिंह देशमुख यांनी गेल्या सहा वर्षांत आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या 30 विद्यालयातून व चार महाविद्यालयातून अंनिसचे अनेक उपक्रम राबविले. यामध्ये 1)विज्ञान बोध वाहिनी, 2) फिरते नभांगण-2500 विद्यार्थी व 200 शिक्षक यांचा सहभाग 3)अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र सर्व शाखांची तीन वर्षांची वर्गणी, 4) आटपाडी कॉलेजमध्ये विवेकवाहिनीचे उध्घाटन, व्याख्यान 5) ‘तिमिरातून तेजाकडे’ या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा अशा उपक्रमांचा समावेश होता. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना डॉ.नरेंद्र जाधव यांच्याहस्ते व डॉ.श्रीराम लागू यांच्या उपस्थितीत ‘अंनिस वार्तापत्र शतकवीर’ पुरस्कार पुणे येथे देण्यात आला होता. वरील सर्व उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करण्याचे बहुमोल कार्य केले आहे.
ग्रामीण व दुष्काळी भागातील अंधश्रद्धांच्या दुष्परिणामांची त्यांना परिपूर्ण कल्पना आहे. भावी पिढ्यांच्या जीवनात विवेकवाद वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी बालकुमार साधना दिवाळी अंक 7 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे विशेष कार्य त्यांनी केले आहे. त्यांचा हा आत्मविश्वास वाढविण्यास त्यांचे गुरू मा.आर.एस.कुलकर्णी यांच्या विचाराचा विशेष प्रभाव आहे. तसेच वार्तापत्र संपादक प.रा.आर्डे व डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि महाराष्ट्र अंनिस परिवाराशी त्यांचे स्नेहपूर्ण नाते आहे.
वाळवंटी भूप्रदेश इस्त्रायल समृद्ध बनला कारण तेथे घडले पाण्याचे व शेतीचे नियोजन. इस्त्राइलमधून सबंध युरोपात भाजीपाल्याची निर्यात होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाने उजाड वाळवंट समृद्ध भूमी बनली. मा.अमरसिंह देशमुख आटपाडी व परिसरातील शेती फुलवून व्यंकटेश माडगुळकरांनी वर्णन केलेला बकाल माणदेश समृद्ध करतील यांची खात्री वाटते.
अंनिस परिवारातर्फे त्यांच्या कार्यास हार्दिक सदिच्छा!
–सुनिल भिंगे, आटपाडी