प्रिय, जयंत देशपांडे,
फेबु्रवारी 2012 च्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या आमच्या लेखावरची प्रतिक्रिया वाचली. कोणतेही आचार्य, बाबा, गुरू, बुवा हे ‘योगासने’ शिकवित असतील तर तो ’व्यायाम’ प्रकार प्रत्येकाने अवश्य आचरणांत आणावा आणि ‘आयुष्यभर’ रोज करावा. आपली प्रकृती उत्तम ठेवण्याकरीता तो उपयोगी आहे.
त्याचबरोबर हृदयरोग, डायबेटीस वगैरे टाळण्याकरिता किमान अर्धा तास नाडी वाढेल (Increase Pulse rate) असा कोणताही(अरोबिक) व्यायाम, पळणे, भरभर चालणे, सायकलिंग, पोहणे आवश्यक असते.
गेली 50 वर्षे दररोज 1 तास मी नियमित व्यायाम करीत आहे. त्यातील अर्धा तास निरनिराळी योगासने(शिर्षासन सोडून) आणि त्यांना जोडून मानेचे, पाठीचे आणि गुडघ्याचे व्यायाम रोज करतो. मला असलेल्या (सर्व्हायकल) स्पॉडिलोसिस, सायटिका, गुडघेदुखी यावर अनेक ‘फिजीओथेरपिस्टने’ सुचविलेले सर्व व्यायाम प्रकार ‘योगासनां’बरोबरच करतो आणि अर्धा तास ट्रेडमिलवर भरभर चालतो आणि म्हणून आज वयाच्या 73 व्या वर्षी सुद्धा 10-11 तास हॉस्पिटलमध्ये काम करतो आहे. शस्त्रक्रिया करीत आहे.
त्यामुळे रामदेवबाबांची योगासने आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये शिकविले जाणारे व्यायामाचे प्रकार याबाबत आम्हा कोणाचाच विरोध नाही.
आमचा विरोध आहे तो ही सर्व मंडळी त्यांनी शिकविलेल्या मार्गाने म्हणजे-
(1) ध्यान-धारणा, प्राणायामाचे अनेक प्रकार-भसरिका, कपालभाती(रामदेवबाबा-पातंजली), सुदर्शन क्रिया (श्री.रविशंकर, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग) ज्यात दीर्घ व खोल श्वास बराच वेळ घ्यावा लागतो (Hyperventilation) असा प्रकार किंवा
(2) सिद्ध समाधी योग, ओशो-रजनीशांच्या आश्रमांतील शिबीरे, गोयंका गुरूजींची विपश्यना, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातील ‘राजयोग’, निर्मला मातेची कुंडलिनी जागृती, स्वामी समर्थ मंदिरांतील आणि इतर मंदिरांतील अखंड ‘नामस्मरण’, ओंकार पठण, चर्चमधील येशूच्या प्रार्थनेत किंवा पाद्रीच्या व्याख्यानास बसणे, तासन्तास नमाज पढणे अशा प्रकारच्या साधना, ज्यात बराच वेळ केलेल्या एकाच प्रकारच्या कृतीने मानसिक आणि शारीरिक ‘दमछाक’ होते (Catharsis) आणि मेंदू शिणतो. त्यानंतर मेंदूत निर्माण होणार्या ‘एन्डॉर्फिन’ या रासायनिक द्रव्यांच्या निर्मितीमुळे झालेल्या तात्पुरत्या, क्षणिक आणि ‘आभासी’ सुखाचा फायदा घेऊन ही सर्व मंडळी जे दावे करतात- त्यांना आमचा विरोध आहे.
त्यातही प्रामुख्याने “आमच्या साधनेमुळे आपणास कायमची सुखशांती लाभेल, आपल्या जीवनातील ‘सर्वप्रश्न’ कायमचे सुटतील. एवढेच नव्हे तर ‘कॅन्सर’ डायबेटिस, हर्निया(जो शस्त्रक्रियेशिवाय बराच होऊ शकत नाही) असे ‘असाध्य’ रोगसुद्धा बरे होतील असे जेव्हा हे गुरू, बाबा, गुरूमहाराज प्रतिपादन करून आमजनतेची दिशाभूल करतात, याला आमचा विरोध आहे.
यातील अनेक ‘साधना’ मी स्वत: अत्यंत ‘मनोभावे’ आणि प्रामाणिकपणे केल्या आहेत आणि माझ्या स्वानुभावानंतरच या सर्व साधनांतून मिळणारे ‘स्वर्गीय सुख’ हे तात्कालिक आणि ‘आभासी’ आहे हे मला पटले आहे. आणि अशा प्रकारच्या ‘सुखांचा’ उद्गम होण्यामागची शास्त्रीय कारणे शोधून आणि ती माझ्या वैज्ञानिक बुद्धीला पटल्यानंतरच मी फेबु्रवारी 2012 च्या अं.नि.वा.च्या अंकातील विधाने केली आहेत.
मी मुंबई येथील योगविद्याधाम येथे 7 दिवसांचे शिबीर, इगतपुरी येथील 10 दिवसांचे विपश्यना शिबीर, जैनांचे प्रेक्षाध्यान शिबीर, आर्ट ऑफ लिव्हींग, रेकीचे प्राथमिक शिबीर अशी अनेक छोटी मोठी शिबिरे केली आहेत. त्याचबरोबर वैकल्पिक वैद्यकीय विज्ञानशास्त्राच्या (World Congress of Alternative Medicine) च्या 2 जागतिक परिषदांत सहभाग घेतला होता. त्यात रेकी, अॅक्युपंक्चर, सायकोथेरपी(सायको सर्जरी). आरोमा थेरपी वगैरे अनेक गोष्टींत भाग घेतला होता.
विपश्यनेच्या 10 दिवसांच्या शिबिरात 6 व्या दिवशी मी रात्री हवेत चालत होतो. 9 व्या दिवशी तर पहाटे साडेचार वाजलेपासून साडेसात वाजेपर्यंत 3 तास ‘समाधीत’ गेलो होतो आणि समाधीतून बाहेर आल्यानंतर ‘मी बुद्ध झालो’, मला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे. यापुढे टोणगावकर हॉस्पिटल व त्यात होणार्या शस्त्रक्रिया बंद करून ‘धम्मचिकित्सालय’ काढणे, श्री.गोएंका गुरूजींच्या हस्ते त्याचे उद्घाटन करणे आणि यापुढे सर्व रोगांवर विपश्यनेचाच उपचार करणे असे ठरवून त्याच तंद्रीत इगतपुरीतून बाहेर पडलो होतो. पण येतायेता नाशिकला डॉ.सुळे या मानसिग रोग तज्ञाचा(सायकिएट्रिस्ट) सल्ला घेतला असता त्यांनी सांगितले, “यापुढे घरी जाऊन रोज विपश्यना करण्याचा धोका पत्करू नका” ते तुमच्यादृष्टीने आगीशी खेळणे होईल. आणि धम्मचिकित्सालय काढून टोणगावकर हॉस्पिटल बंद करणे म्हणजे शुद्ध वेडेपणाच होईल. तुम्ही स्वत:चे, तुमच्या कुटुंबाचे आणि तुमच्या पंचक्रोशीतील जनतेचे अपरिमीत नुकसान कराल. त्यांनी विपश्यनेनंतर ठार वेडे झालेल्यांची अनेक उदाहरणे मला दिलीत.
अशा प्रकारे अशा सर्व प्रकारातून मिळणार्या ‘आभासी’ सुखांचा मी स्वानुभव घेऊनच माझी आजची मते तयार केली आहेत. आज जरी या सर्वांनी शिकविलेली सर्व योगासने मी रोज करीत असलो तरी कोणत्याही प्रकारचा प्राणायाम, कपालभाती, भसरिका, सुदर्शनक्रिया किंवा अन्य कोणत्याही प्रकाराची ‘ध्यानधारणा’, प्रेक्षाध्यान, विपश्यना, राजयोग, रेकी काहीही करीत नाही.
अशा प्रकारच्या साधनांतून ‘मला बरे का वाटते’ अनेकांना (Feel Good) हे आभासी सुख कसे मिळते याबद्दल थोडा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करू या. श्री.मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी लिहिलेल्या ‘मला बरं का वाटतं?’ या अं.नि.स.च्या छोट्याशा पुस्तिकेचे वाचन आपण अवश्य करावे. त्याबरोबरच थोडे अधिक स्पष्टीकरण पुढे देत आहे.
प्रथमत: ज्या जैवरासायनिक द्रव्यामुळे हे ‘आभासी’ सुख मिळते त्या ‘एन्डॉर्फिन याबद्दल थोडी माहिती घेऊ या.
मानवाच्या उत्क्रांतीच्या काळात जेव्हा मनुष्य प्राणी वन्य जीवन जगत होता आणि उपजीविकेकरता अनेक जंगली प्राण्यांची हत्या करीत होता तेव्हा त्याला अनेकदा तो प्राणी मारण्याकरीता मैलोन्मैल पळून त्याचा पाठलाग करावा लागत होता. हे करीत असतांना त्याच्या पायांत अनेकदा पेटके(क्रॅम्स) येत असत. त्याला काटे बोचत असत, ठेचा लागत असत, बारीक सारिक जखमा होत असत, काही हाडेही मोडत असत यावेळी अशा वेदनांमुळे त्याचा प्रवास(पळणे) खुंटून त्याची ‘शिकार’ हातची जाऊ नये म्हणून त्याच्या या वेदनेपासून तात्पुरती का होईना सुटका होण्याकरिता मेंदूतील एखाद्या जैवरासायनिक द्रव्याची जरूरी भासू लागली. जेणेकरून जरी जखमा असल्या, हाड मोडले असले तरी त्या दु:खाचा तात्पुरता विसर पडून त्याला पळता यावे. याचकरिता त्याच्या मेंदूत ‘एन्डॉर्फिन’ नावाचे अफूच्या जातीतील द्रव्य तयार होण्यास सुरवात झाली आणि त्यामुळे तो प्रतिकूल परिस्थितीतही आपले खाद्य मिळवू शकला. तीच गोष्ट एखादा हिंस्त्र प्राणी त्याच्या मागे लागला तर त्याच्यापासून आपला जीव वाचविण्याकरीताही एन्डॉर्फिन त्याला मदत करू लागले. आणि मानव प्राणी Survival of fittest या न्यायाने कोणत्याही परिस्थितीवर मात करून जगू लागला. पण यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल या पळापळींत झालेल्या जखमा, पायांत मोडलेले काटे किंवा मोडलेले हाड यावर माणसाला नंतर (शिकार मिळाल्यानंतर किंवा हिंस्त्र प्राण्यापासून जीव वाचविल्यानंतर) उपाय करणे जरूरीचे होते.
एन्डॉर्फिनने त्याच्या दुखण्याचा त्याला तात्पुरताच विसर पाडला होता. त्याच्या जखमा आणि मूळ दुखणे तसेच होते. यालाच आपण ‘एन्डॉर्फिनने फक्त आभासी सुख’ मिळते असे म्हणतो. त्यातून मिळणारे सुख हे मूळ दुखण्यावर, आजारावर, मूळ प्रश्नांवर कोणताच उपचार करू शकत नाही.
ध्यानधारणा, योगाभ्यास (योगासने नव्हेत) आर्ट ऑफ लिव्हिंग, विपश्यना इत्यादी साधनांतून मिळणार्या ‘सुखांबाबत’ विचार करू या. त्यातील प्रथम क्रिया-जलद आणि दीर्घ श्वसन, निरनिराळ्या प्रकारचे प्राणायाम यात येतात. उदा.भसरिका, कपालभाती, सुदर्शनक्रिया, ओंकार, जोरात मंत्रपठण, नामस्मरण इत्यादी क्रिया. या क्रियांना शास्त्रीय भाषेत ‘हायपरव्हेंटिलेशन’ (Hyperventilation) म्हणतात.
आदिमानव जेव्हा शिकारीच्या मागे किंवा हिंस्त्र प्राण्यापासून जीवन वाचविण्याकरिता पळत असे तेव्हा त्यालाही धाप लागून तो ‘हायपरव्हेंटिलेशन’ करीत असे.
अशाप्रकारे श्वास घेण्यामुळे शरीरात काय काय क्रिया घडतात हे पाहू या.
(1) रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होते.
(2) त्यामुळे रक्तातील अल्कलीचे प्रमाण वाढते. या सर्वाचा परिणाम म्हणून मेंदूला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात. त्याचप्रमाणे रक्तातील कॅल्शियमही कमी होते. रक्तातील कार्बन डायऑक्साईड कमी झाल्यामुळे रक्तातील ऑक्सिजन हा हिमोग्लोबीनमध्येच अडकून पडतो आणि तो पेशीपर्यंत पोहोचू शकत नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे मेंदूला आणि इतर अवयवांना ऑक्सिजन आणि इतर द्रव्यांचा पुरवठा कमी होतो. हातापायांना आणि ओठांना मुंग्या येतात. मेंदू हलका आणि बधीर होऊन घेरी आल्यासारखे होते. चक्कर येतात. डोळे दुखणे, छाती दुखणे, उगाचच हसणे अशा गोष्टी होतात आणि शेवटी मूर्च्छा यावयास लागते. आणि मुर्च्छा आल्यावर आपोआप श्वास ठिकाणावर येतो आणि माणूस पूर्ववत स्थितीत येतो.
अशा प्रकारच्या जलद श्वसनामुळे शरीरास आणि मेंदूस अधिक रक्तपुरवठा होतो आणि प्राणायामामुळे मेंदू तल्लख होतो हा गैरसमज आहे. परिस्थिती या उलट होते.
मेंदूला ऑक्सिजन कमी झाल्यामुळे खूप पळल्यानंतर जशी स्थिती होते तशी बिकट परिस्थिती, संकट किंवा स्ट्रेस Stress शरीरात निर्माण होते आणि त्याला प्रतिसाद म्हणून मेंदूतील पिट्युटरी Pitutary ग्रंथीत साठून ठेवलेले एन्डॉर्फिन मुक्त होऊन त्यामुळे त्या व्यक्तीस बरे वाटते, आनंद मिळतो.
याचा सरळ अर्थ असा की, कपालभाती, भसरिका, सुदर्शन क्रिया यासारखे प्राणायाम करून आधी मेंदूतील रक्तपुरवठा कमी करून ‘कृत्रिम संकट’ Stress निर्माण करावयाचे आणि या संकटांमुळे मेंदूत निर्माण झालेल्या एन्डॉर्फिनमुळे मिळणारा तात्पुरता स्वर्गीय आनंद अनुभवावयाचा! आणि असा ‘आभासी आनंद’ परत परत मिळण्याकरिता या क्रिया आयुष्यभर रोज करत राहावयाचे. यापेक्षा त्या न केलेल्या बर्या!
हीच गोष्ट मेंदूला थकविणार्या, दमछाक करणार्या, विपश्यना, सिद्ध समाधी योग, राजयोग आणि इतर ध्यान धारणांची असते. या क्रियांमध्ये सुद्धा मेंदूतील एका ठराविक भागाचा रक्तपुरवठा कमी होतो हे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे. असा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे डोळ्यांपुढे निरनिराळी दृश्ये दिसणे, कानांत निरनिराळे आवाज ऐकू येणे, कोणीतरी-‘ईश्वर’ आपल्या पाठीशी उभा आहे. त्याचा स्पर्श आपल्याला होत आहे, आपण विश्वाशी-ईश्वराशी एकरूप झालो आहोत असे भास होऊ लागतात आणि वर सांगितल्याप्रमाणेच मेंदूस रक्त कमी होण्याचे संकट निर्माण झाल्यामुळे, एन्डॉर्फिन मुक्त होऊन या सर्व क्रियांमुळे(ध्यानधारणेमुळे) तात्पुरत्या, आभासी स्वर्गसुखाचा आनंद मिळतो.
आज असे अनुभव, ध्यान(मेडिटेशन)न करिता प्रयोगशाळेत निरनिराळ्या तारा(वायर्स) जोडलेले हेल्मट घालून त्यातून विजेचे प्रवाह सोडूनही अनुभवता येतात.
शेवटचा मुद्दा आम्ही डॉक्टर लोक देत असलेल्या औषधी गोळ्यांबाबत : ध्यानधारणा केल्यानंतर रक्तदाब, कमी होतो असा दावा केला जातो. या करिता रोज मेडिटेशन करावे लागते. ही गोष्ट सत्य आहे. त्यामागील शास्त्रीय कारण मात्र असे की, या सर्व क्रिया केल्यामुळे मेंदूत एन्डॉर्फिन मुक्त होते आणि त्याचा परिणाम म्हणून रक्तदाब कमी होतो. एन्डॉर्फिनचाच तो एक गुणधर्म आहे.
आमचे यावर मत असे आहे की, रोज अर्धा एक तास ध्यानधारणा करून किंवा अर्धा तास कपालभाती, सुदर्शन क्रिया करून, कृत्रिम संकट निर्माण करून त्यातून निर्माण होणार्या एन्डॉर्फिनमुळे रक्तदाब कमी करण्याच्याऐवजी आमची एखादी गोळी तोंडात टाकून तोच परिणाम क्षणात साधता येतो. दोन्हीही गोष्टी आयुष्यभर कराव्या लागतात.
ज्या व्यक्तींना मोकळावेळ भरपूर आहे त्यांनीसुद्धा हा वेळ थोडी समाजसेवा किंवा तत्सम सामाजिक कार्यात घालविला तर अशी कामे करताना जो मानसिक व शारीरिक ताणतणाव Stress निर्माण होतो, त्यामुळे मेंदूत निर्माण झालेल्या एन्डॉर्फिनमुळे त्यांनाही आभासी का होईना ‘स्वर्गीय सुखाचा’ आनंद मिळेल पण याबरोबरच इतर अनेक व्यक्तींना त्याचा लाभ होईल आणि स्वामी विवेकानंद म्हणतात तसे ‘आत्मनो मोक्षार्थम् जगद् हितायच’ असा स्वार्थ आणि परमार्थही साधता येईल.
–डॉ. र. रं. टोणगावकर, दोंडाईचा, जि.धुळे