चामराजनगर हे कर्नाटकातले एक साधे सुधे गाव. पण या गावाचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रचंड धसका घेतला आहे. इतका की, गेली अनेक वर्षे कोणीही मुख्यमंत्री या गावाच्या जवळपासही फिरकलेला नाही. याचे कारण या गावाचा भयंकर इतिहास. भयंकर अर्थात मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने. आतापर्यंत या गावाला भेट दिलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्याला त्यानंतर थोड्याच काळात पायउतार व्हावे लागले आहे. जरा आढावा घेऊ.
हा इतिहास देवराज अर्स मुख्यमंत्री होते त्या 1980 सालापर्यंत जातो. त्यांनी या गावाला भेट दिल्यावर सहा महिन्यातच त्यांना सत्ता सोडावी लागली. त्यानंतर आले गुंडुराव. त्यांनी या गावात येऊन पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सात महिन्यात त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. त्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेस मुख्यमंत्री झाले रामकृष्ण हेगडे. त्यांनी जवळपास 5 वर्षे कारभार हाकला, पण या गावातील एका उद्यानाचे उद्घाटन करायला ते आले आणि त्याच वर्षी(1988) त्यांना फोन टॅपिंगच्या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला. त्यांचे पाठोपाठ आलेल्या बोम्मई यांनी 1989 मध्ये चामराजनगरला भेट दिली, त्यांना केंद्र सरकारने पदच्युत केले. त्यांचेनंतर आलेले वीरेंद्र पाटील ताकदवान नेते होते, पण त्यांचेही भाग्य उजळले नाही.
पाच मुख्यमंत्र्यांची या गावाने अशी वासलात लावल्यावर पुढे येणारे बंगारप्पा या गावाच्या जवळपासही फिरकले नाहीत. त्यांचाच कित्ता पुढे झालेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी गिरवला. त्यात उच्चविद्याविभूषित विरप्पा मोईली होते, अंधश्रद्धाळू देवेगौडा होते. बुद्धिप्रामाण्यवादी जे.एच.पटेल होते, आधुनिक राहणीचे एस.एम.कृष्णा होते, आणि शांत वृत्तीचे धर्मसिंग होते. पटेलांनी तर चामराजनगर हा वेगळा जिल्हा निर्माण केला पण उद्घाटनालाही ते आले नाहीत.(1997)
मे 2007 मध्ये हा अंधविश्वास धुडकावून लावून एच.डी.कुमारस्वामी यांनी या शहरास भेट दिली. त्यांना जावे लागणार हे लोक समजून चुकले होते, त्यामुळे त्यांच्या पदमुक्तीचा दोष अन्य कुणावर आला नाही.
2010 मध्ये भाजपच्या काही मंत्र्यांनी ही बाधा दूर होण्याकरता ज्योतिषी बोलावले होते आणि पूजा घातली होती. या भागातील आमदार वटल हे एक अफलातून व्यक्तिमत्व आहे. त्यांचे निषेधाचे मार्गही अनोखे असतात. त्यांनी या गावात ‘मंत्रीमंडळ’ म्हणून एक रेड्यांची सभा घेतली आणि त्यांना आपले निवेदन सादर केले. आता या अंधश्रद्धेविरूद्ध कोर्टात दावा दाखल करण्याचा त्यांचा विचार आहे.
न्यायालयात जाऊन वा पूजा घालून हा प्रश्न कसा सुटणार? त्या करता राजकारणी मंडळींनी आपल्या मनातील अंधश्रद्धा निर्भयपणे दूर केल्या पाहिजेत.
–डॉ.शरद अभ्यंकर