Categories
पर्यावरण

पर्यावरणीय होळी

एप्रिल - २०१२

करमाळा शाखेतर्फे पर्यावरणीय होळी

            लोकसहभागातून पर्यावरणीय पद्धतीने सणांना पर्यायी रूप देण्याचा प्रयत्न करमाळा अं.नि.स.ने केला. शहरातील  कानाड गल्ली येथील नागरिकांनी कचरा गोळा करून नगराध्यक्षा पुष्पाताई फंड यांच्याहस्ते होळी पेटविली. तसेच दत्तपेठ येथे डॉ.कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गल्लीतील चि.सौरभ शिंगाडे व कु.रेखा शिंगाडे शहरातील विविध मान्यवरांना निमंत्रित करून गुटख्याची होळी केली. सर्व तरूणांनी व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली. कानाड गल्लीमध्ये नगरसेविका राजश्रीताई माने यांनी विविध महिला एकत्र करून भ्रष्टाचार रूपी राक्षसाची होळी केली. शिवाजीनरमधील अभिषेक पाटील, स्वपन्नील जायभाय, सोनू कारटकर, निखील शिंदे, चि.बिले, धीरज शिंदे आदी मुलांनी गल्लीतील कचरा गोळा करून होळी साजरी केली. यापैकी कुठल्याही होळीमध्ये पोळी जाळली गेली नाही. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाच्या अंनिसच्या आवाहनाला शहरवासीयांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत अंनिस परिवाराकडून त्यांचे जाहीर आभार.

व्ही.आर.गायकवाड, करमाळा


सुसंस्कार हायस्कूलच्या वतीने कचर्‍याची होळी

            कदमवाडी भोसलेवाडी सुसंस्कार हायस्कूलच्या स्काऊट गाईड पथकाने होळी लहान करा आणि पोळी दान करा या अंनिसने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पथकाने परिसरातील कचरा जमा करून त्याचे सुसंस्कार शिक्षण मंडळाच्या संचालिका सौ.रूबिना अन्सारी यांच्या हस्ते होळी करण्यात आली. या उपक्रमास संस्थापक एम.एच.मगदूम मुख्याध्यापक विजय भोगम यांचे प्रोत्साहन लाभले.

संजय कळके, कोल्हापूर


चन्नेकुप्पी येथे पर्यावरणपूरक होळी

            अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आवाहनास प्रतिसाद देऊन चन्नेकुप्पी(ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) येथील न्यू.इंग्लिश स्कूलमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. परिसरातील केरकचरा गोळा करून प्रतिकात्मक पुतळा तयार करण्यात आला. पुतळ्याला अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, बेरोजगारी, गरिबी, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा र्‍हास, महागाई आदी समस्या लावून त्यांची पंचायत समितीचे सदस्य अमर चव्हाण यांच्या हस्ते पेटविण्यात आली.

            मुख्याध्यापक देसाई, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. अं.नि.स.चे तानाजी कुरळे, प्रा.पी.एम.भोईटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

पी.एम.भोईटे, गडहिंग्लज


डोंबिवली व अंबरनाथ येथे पर्यावरणीय होळी

            होळीची पोळी दान करा… होळी लहान करा… उपक्रमांतर्गत अंनिस डोंबिवली शाखेतर्फे अंबरनाथ व डोंबिवली शहरातील अनेक शाळांना कार्यकर्त्यांनी भेटी देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणीय होळी साजरी करण्याचे आवाहन केले.

            या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला काही सार्वजनिक मंडळांनी पुरणपोळ्या घरपोच आणून दिल्या तर डोंबिवली येथील गावदेवी विद्यामंदिर, काळूनगर या शाळेतील मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी यांनी मोलाचे सहकार्य केले. शाळेच्या आवारातील सर्व कचरा एकत्र केला. मुलांनी कॉपी करणे, गुटखा व तंबाखू खाणे, खोटे बोलणे, शिक्षकांचा अवमान करणे, शाळेला दांड्या मारणे इ. दुर्गुण असलेले फलक बनविले व कचर्‍याच्या होळीत जाळले.

            सुशिला मुंडे यांनी जमलेल्या सर्व पालकांना नैवेद्याची पोळी होळीत न टाकता दान करण्याचे आवाहन केले. डोंबिवली शाखेतील सुशील खंदारे, निमा शिंगारे, शशिकांत भोळे, श्रीप्रसाद खुळे उपस्थित होते.


अंधश्रद्धा पसरवणार्‍या पत्रकांची होळी

            लोकांमधील श्रद्धेचा गैरफायदा घेऊन इचलकरंजीसह अनेक शहरांध्ये देव-देवता आणि संतांच्या नावाने दैववाद पसरवणारी पत्रके वाटण्यात येत आहेत. श्रम प्रतिष्ठेऐवजी चमत्कारावर आधारलेला दैववाद पसरविण्याचे, अंधश्रद्धा आणि दहशत पसरविण्याचे कारस्थान या पत्रकातून केले जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त म.अं.नि.स.च्या इचलकरंजी शाखेच्या वतीने अशा पत्रकांचे दहन करून दैववादाची होळी करण्यात आली. या कार्यक्रमास प्राचार्य सुनीलकुमार लवटे, विजय जगताप, टी.आर.शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संजय कोले, इचलकरंजी