Categories
चळवळ पुरस्कार

के.डी. खुर्द आणि टी. आर. शिंदे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ऑगस्ट - २०११

            महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते के.डी.खुर्द (कोल्हापूर) व टी.आर.शिंदे (इचलकरंजी) यांना 2011 चा कार्यकर्ता जीवन गौरव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पुरस्कार प्रदान व गौरव समारंभ संपन्न झाला.

            प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या हस्ते के.डी.खुर्द यांचा तर कॉ.गोविंद पानसरे यांच्या हस्ते टी.आर.शिंदे यांचा गौरव करण्यात आला. सौ.सरोजिनी पाटील यांच्या हस्ते सौ.इंदुमती खुर्द व सौ.कमल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येकी रोख अकरा हजार रूपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. मानपत्राचे वाचन प्रा.एकनाथ पाटील यांनी केले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.एन.डी.पाटील होते. कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष गिरीश फोंडे यांनी स्वागत केले. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अविनाश पाटील म्हणाले, “चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करणे ही आनंदाची बाब आहे, चळवळीतील मित्रांच्याबद्दल आणि त्यांच्या पाठीशी राहणार्‍या त्यांच्या कुटुंबियांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. के.डी.खुर्द व टी.आर.शिंदे यांनी समाजबदलासाठी मोठे योगदान दिले आहे. अं.नि.स.चा विचार मान्य करून या दोघांनी पूर्ण क्षमतेने अं.नि.स.चे कार्य केले, हा विचार परिवर्तनाचा सोहळा आहे.”

            अं.नि.स.चे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर आपल्या भाषणात म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या नि:स्वार्थी, समर्पित कामाने संघटना उभी राहते. समितीसाठी असंख्य कार्यकर्त्यांनी आपले सामर्थ्य, सर्वस्वच संघटनेसाठी दिले आहे. कोल्हापूरने पर्यावरणाचा आदर्श उभा केला आहे. ‘विसर्जित गणपती दान करा’, होळी लहान करा. होळीची पोळी गरजूंना द्या हे पर्यावरणाला उपयुक्त ठरणारे उपक्रम प्रथम राबविले. पर्यावरण सुसंगत उपक्रम राबविण्याचा आदर्श संपूर्ण राज्याला घालून दिला. परिवर्तनाची स्थिती फारशी चांगली नसताना समाजात मात्र निकराने झुंजणारे कार्यकर्ते आहेत हा मोठा दिलासा आहे.”

            “के.डी.खुर्द आणि टी.आर.शिंदे यांचे कार्य पथदर्शक आहे. त्यांच्या जीवनातील सर्व कार्याचा गौरव यानिमित्ताने होत आहे. या दोघांनीही सेवानिवृत्तीनंतर मोठ्या उमेदीने अं.नि.स.चे कार्य केले त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून त्यांचा गौरव करण्यात आम्हाला आनंद होत आहे. समाजपरिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा मानवी संस्कृतीचा भाग आहे.”

            कॉ.गोविंद पानसरे म्हणाले, “समाजासाठी काम करणार्‍यांचा गौरव झाला पाहिजे. गरीबीची परिस्थिती असतानाही काम करणारे कार्यकर्ते शेवटपर्यंत काम करतात. खुर्द आणि शिंदे हे दोघेही माणूसप्रेमी आहेत. समाजासाठी सातत्याने काम करणार्‍याबद्दल समाज नेहमीच कृतज्ञ असतो, कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कोल्हापूरने पुरोगामित्व जपण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. कोल्हापुरात सुरू झालेले उपक्रम हे चळवळीतील मैलाचे दगड बनले आहेत. सामान्य माणसांनी चळवळी पुढे नेल्या आहेत. देशात परिवर्तनाच्या चळवळीची घसरण थांबलेली आहे. कार्यकर्त्यांच्या जाणीवेतून चळवळ वाढत आहे, परिवर्तनाला वेग येत आहे, खुर्द आणि शिंदे यांचा गौरव म्हणजे अजून सारे दीप मंदावलेले नाहीत याचे उत्तम प्रतिक आहे. कार्यकर्त्यांनी अविरतपणे लढले पाहिजे. अं.नि.स.चे कार्यकर्ते चिवट असून सातत्याने संघर्ष करत आहेत, विवेकी विचारांचा प्रचार व प्रसार करत आहेत. राजकारण्यांच्या उदासिनतेमुळे जादूटोणा विरोधी कायदा होत नाही. कोणताही संघर्ष विवेकावाचून होत नाही आणि विवेकाला संघर्षाची जोड हवी. अं.नि.स.ची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. ही उपक्रमशील, कृतीशील आणि विवेकशील चळवळ आहे. या व्यापक परिवर्तनाच्या चळवळीचे नेतृत्व करणार्‍यांना सलाम!”

            अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.एन.डी.पाटील म्हणाले, “आयुष्यभर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेणार्‍या के.डी.खुर्द आणि टी.आर.शिंदे या अं.नि.सच्या बलदंड कार्यकर्त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली आहे.”

            डॉ.पाटील पुढे म्हणाले, “कार्यकर्ते संघटनेचे सामर्थ्य आणि शान असतात. त्यांच्या शिवाय संघटना पुढे जाऊ शकत नाही. झोकून देऊन काम करणार्‍या समर्पित कार्यकर्त्यांचा गौरव हा सर्वांचा सामुदायिक गौरव आहे. चळवळी निष्क्रीय झाल्या, त्यांची ताकद कमी झाली असा गैरसमज पसरविला जातो आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नसून अजूनही वेगवेगळ्या चळवळी समर्थपणे, जिद्दीने काम करत आहेत. राज्यकर्ते जेव्हा समाजाची किमान अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत, तेव्हा अतयंत प्रतिकूल परिस्थितीत पुरोगामी विचार पुढे नेणार्‍या कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे  आवश्यक ठरते. समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम अं.नि.स. करत आहे. सध्या समाजाच्या जाणिवा आणि जागृती वाढल्या  आहेत. समाजाला मागे खेचणार्‍या अंधश्रद्धांना विरोध केलाच पाहिजे. समाजाला फसविणार्‍यांना, बुवाबाजी करणार्‍यांना कार्यकर्ते रोखत आहेत. चळवळीचा वारसा सांगणार्‍यांनी उत्तरदायित्व जपले पाहिजे. या लढ्यामध्ये सामाजिक चळवळीच जिंकणार आहेत. हा विश्वास बाळगला पाहिजे. शिंदे व खुर्द यांचा गौरव हा आपल्या सर्वांचाच गौरव आहे. चळवळी करणार्‍या योद्धाच्यामागे ताकद लावू या. आयुष्यभर लढाई लढण्याची शपथ प्रत्येकाने घ्यायला हवी.

कोल्हापूर जिल्हा अं.नि.स.कार्य गौरविका, सावित्रीबाई फुले चरित्र, के.डी.खुर्द यांचा पत्रसंग्रह या तीन पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमास अं.नि.स.राज्य कार्यवाह मिलिंद देशमुख, प्राचार्य टी.एस.पाटील, डॉ.सुनिलकुमार लवटे, अं.नि.वार्तापत्राचे संपादक प्रा.पी.आर.आर्डे, व्यवस्थापक राहुल थोरात, कॉ.दिलीप पवार, मुख्याध्यापक राज्य संघाचे अध्यक्ष डी.बी.पाटील, शिवाजीराव परूळेकर, प्रकाश आवाडे(माजी आमदार) बाबूराव कदम(शे.का.प.) आदी मान्यवर उपस्थित होते.

            न्यू.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘बोला आज मिळून सारे’ हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भालकर यांनी केले. शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.

क्षणचित्रे :

* राजर्षी शाहू स्मारक भवनमधील सर्व खुर्च्या कार्यक्रमाच्या वेळेपूर्वीच लोकांनी भरलेल्या होत्या. सभागृह तुडुंब भरलेले होते. सभागृहाच्या कडेला, मध्यभागी कार्यकर्ते उभे होते. कार्यक्रम सुरू झाला त्यावेळी जेवढी गर्दी होती तेवढीच आभार मानताना गर्दी होती.

* गौरवपूर्तीसाठी आकर्षक मानपत्र बनविले होते. मानपत्राचे लेखन प्रा.एकनाथ पाटीलसर, सजावट संजय बनसोडे, एस.के.शिंदे यांनी खूप मेहनत घेऊन केली होती.

* पुरस्कार प्रदान करताना संपूर्ण सभागृह भारावून गेलेले होते. पुरस्कार प्रदानाच्यावेळी स्टेजवरून पुष्पवृष्टी करण्यात आली.

* रंगमंचावरील सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कलात्मकतेला वैचारिक आशय देऊन रंगमंच सजविण्यात आला होता.  विशेषत: मिलिंद यादव यांचे मोठे योगदान आहे.

* के.डी.खुर्द यांनी पुरस्काराची सर्व रक्कम कोल्हापूर जिल्हा अं.नि.स.ला दिली. कोल्हापूर जिल्हा अं.नि.स.चे अध्यक्ष प्रा.डॉ.सुनिलकुमार लवटे यांनी ती स्वीकारली. मात्र त्या अकरा हजार रकमेमध्ये आपण अकरा हजार रू.मिळवून एकूण 22 हजार रूपये कोल्हापूर जिल्हा अं.नि.स.साठी देत असल्याची घोषणा केली. टी.आर.शिंदे यांनीही आपल्या पुरस्काराची रक्कम इचलकरंजी शाखेला दिली.

* मुख्य कार्यक्रम झाल्यावर खुर्द व शिंदे यांचा त्यांच्या मित्रमंडळी, नातेवाईकांनी मोठ्या उत्साहात सत्कार केला. स्टेजवर हार, बुफे, शाली यांचा ढिग लागलेला होता. यातून या दोन्ही कार्यकर्त्यांचा लोकसंग्रह किती मोठा आहे हे दिसले.

* अं.नि.स.च्या पुस्तक विक्री स्टॉलवर पुस्तकांची चांगली विक्री झाली.

संजय बनसोडे