Categories
जात पंचायत

अंनिसच्या प्रयत्नाने रमेश धुमाळ यांच्यावरील गोंधळी जातपंचायतीचा बहिष्कार मागे

एप्रिल - २०१९

देवळी (जि. वर्धा) येथील रहिवासी असलेले गोंधळी जोशी समाजातील रमेश धुमाळ यांच्यावर बहिष्कृत कुटुंबातील मुलगी केल्याचा ठपका ठेवून 9 वर्षांआधी रायपूर, छत्तीसगड येथे भरलेल्या जातपंचायतीने 5 हजार रुपये दंड व संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकलेला होता. दि. 13 मार्चला कळमेश्वर (जि. नागपूर) येथे भरविलेल्या महाजातपंचायतीने रमेश धुमाळ व इतरही कुटुंबांवर एकमताने घातलेला बहिष्कार मागे घेत यापुढे लग्न व इतर धार्मिक कार्यात कुंकवाचा टिळा लावणारी मानाची पद्धत बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेऊन सुधारणेचे एक पाऊल पुढे टाकले. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांच्या पुढाकाराने व मध्यस्थीने जातपंचायतीने हा निर्णय घेतला.

याबाबत अधिकृत माहिती अशी की, रमेश धुमाळ यांच्यावर जातपंचायतीने 9 वर्षांपासून बहिष्कार टाकला असून न्यायासाठी ते लढा देत आहेत. अशा आशयाची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी रमेश धुमाळ यांची भेट घेऊन न्यायासाठी व्यक्तिगत व समितीतर्फे अखेरपर्यंत पाठिंबा देण्याचा शब्द दिला. लगेचच संपर्क साधून नागपूर येथे येत असलेल्या जातपंचायतीच्या पंचांसोबत फोनवर बोलून महाराष्ट्र अंनिसने याबाबत करवून घेतलेला महाराष्ट्र शासनाचा सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा व सामाजिक बांधिलकी याबाबत सविस्तर चर्चा करून बैठक घेण्याची विनंती केली. दरम्यान, 22 फेबु्रवारीला नागपूर येथे लग्नानिमित्ताने येत असलेल्या पंचांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, आपण या, असे निमंत्रण पंचांनी गजेंद्र सुरकार यांना दिले. त्याप्रमाणे रमेश धुमाळ, कार्यकर्ते सचिन मेश्रामसह नागपूरला जाऊन गणेशपेठ पोलिसांच्या उपस्थितीत जातपंचायत भरवून न्यायनिवाडा करण्यात येऊन टीका लावण्याचा मान सर्वानुमते रमेश धुमाळ यांना देण्यात आला. यावेळी नागपूर येथील पत्रकार प्रमोद काळबांडे, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर धंदरे, प्रधान सचिव आळणे, संघर्षवाहिनीचे मुकुंद अडेवार, सुशीला मेश्राम यांच्या उपस्थितीत पुढे दि. 13 मार्चला कळमेश्वर येथे जातपंचायत भरवून न्याय देऊ असा शब्द दिला.

ठरलेल्या दिनांकानुसार कळमेश्वर येथील देविदास ओगले या पंचाच्या देशमुख ले आऊट मधील घरी जातपंचायत भरवून अनेक वाद-विवादाअंती सर्वांना समान न्याय, अशी मागणी पुढे येऊन रमेश धुमाळ यांच्यासह गेल्या 40 वर्षांपासून पार्वती प्रकाश ओगले (चंद्रपूर) व सुरेश ओगले (बालाघाट, मध्य प्रदेश) यांच्यासह अनेक कुटुंबांवरील बहिष्कार मागे घेतल्याचे सर्व पंचांनी जाहीर केले व तसे लिहून दिले. यावेळी चर्चेत ज्या-ज्या घरात पोटजातीची अथवा इतर जातीची मुलगी किंवा मुलगा यांचे विवाह झाले असतील, अशा बहुतांश कुटुंबांना बहिष्कृत करण्यात आलेले आहे, ही बाब समोर आली. यामुळे अनेक कुटुंबांत मुलींचे लग्न झाले नाही, हे विदारक सत्य समोर येऊन जातपंचायतीची तीव्रता लक्षात आली; मात्र या विरोधात कोणी उभे राहत नव्हते. रमेश धुमाळच्या रुपाने विरोधात एल्गार पुकारण्यात येऊन महाराष्ट्र अंनिसच्या वर्धा शाखेने या प्रकरणाचा पाठपुरावा केला.

यावेळी घटनेचे गांभीर्य व जातपंचायतीचे वास्तव पाहता पोलीस स्टेशन, कळमेश्वर येथे पोलीस संरक्षण मागण्यात आले; मात्र एक तास झुलवत ठेवून अखेर संरक्षण नाकारण्यात आले. तेव्हा स्वसंरक्षणाचा धाडसी निर्णय गजेंद्र सुरकार यांनी घेऊन महाराष्ट्र अंनिसचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष मा. चंद्रकांत श्रीखंडे, पत्रकार प्रमोद काळबांडे, संघर्ष वाहिनीचे देविदास वाघमारे, डॉ. वासुदेव व रमेश धुमाळ यांना घेऊन जातपंचायत भरविलेल्या स्थळी जाण्याचा निर्णय घेतला. या जातपंचायतीला विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, कळमेश्वर (जि. नागपूर), रायपूर, बिलासपूर (छत्तीसगड), बालाघाट (मध्य प्रदेश) या जिल्ह्यांतून पंच उपस्थित होते. यात रमेश इंगळे, कैलाश महाजन वैराळकर, विनोद विजळकर, सुरेश गंगावणे, राजेश भोवरे, देविदास ओगले या पंचांनी बहिष्कार मागे घेऊन सुधारणावादी निर्णय घेऊन यापुढे कोणाच्याही लग्नात, धर्मकार्यात मानाचा असणारा कुंकवाचा टिळा लावणारी वाटीची पद्धत बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी महाराष्ट्र शासनाने केलेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याविषयी नाराजीही व्यक्त केली. मात्र कायद्याच्या धाकामुळे आणि गजेंद्र सुरकार यांनी केलेल्या प्रबोधनामुळे वरील निर्णय घेऊन एक पाऊल पुढे टाकले. विदर्भातील या प्रकाराची ही पहिलीच केस ठरली. यात वर्ध्यातील पत्रकारांनी पत्रकार परिषदेत रमेश धुमाळ यांना बोलते करून ही बातमी राज्यभर लावून धरून न्यायाची मागणी केली होती, हे विशेष.