Categories
डाकिण प्रथा

डाकीण हत्यामध्ये बळी पडलेल्या महिलांच्या सन्मानार्थ ओडिशा पोलिसांनी उभे केले अनोखे स्मारक

एप्रिल - २०१९

भुबनेश्वर/केओंझर : आपली आई नथी मुंडा हिच्यावर सप्टेंबर 2017 रोजी केओंझर क्षेत्रातील ऊरुमुंडा येथे झालेल्या भयानक हल्ल्याची माहिती सांगताना दुखीनी मुंडा अजूनही थरथर कापतात, त्यांचा आवाज मधूनच तुटतो. माझी आई स्वयंपाक करत होती. मी परसदारी नांगरणी करीत होतो, त्यावेळी मी गलका ऐकला. मी धावत आत आलो आणि पाहतो, तर शेजारच्या खेड्यातील तीन माणसे माझ्या आईला घराबाहेर फरफटत घेऊन जात होती. त्यांच्या हातात लाकडी दंडुके होते आणि ‘दहणी’ (चेटकीण) म्हणत तिच्यावर ओरडत होते. त्यांनी माझ्या आईचे डोके आपटून फोडले. ती जागीच मरण पावली, मुंडा म्हणाले.

एका चारवर्षीय बालकाच्या हत्येचा आरोप हल्लेखोरांनी त्या वृद्ध महिलेवर लावला होता. ते बालक कित्येक आठवडे तापाने आजारी पडले होते. नंतर पोलीस सूत्रांनी सांगितले की, ज्या माणसांनी नथी हिची हत्या केली, त्यांनी स्थानिक बाजारात असे ऐकले होते की, ती जादूटोणा करते आणि तिच्या दुष्कृत्याने त्या बालकाचा अंत झाला. मुंडा म्हणाले, मला हे कळत नाही की, माझ्या आईवर डाकीण असल्याचा संशय घ्यायला ते कसे प्रवृत्त झाले? आम्ही त्या मुलाच्या कुटुंबाला ओळखत सुद्धा नव्हतो. सगळ्या आरोपींना दोन दिवसांत अटक केली गेली. ते अजून कैदेतच आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत, केओंझर जिल्ह्यातील कुमुदिनी बारीक यांना असे माहिती होते की, स्मारके सामान्यत: महामानवांच्या सन्मानार्थ त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल बांधली जातात. बारीक, ज्यांच्यावर नुकताच डाकीण असल्याचे लेबल लावून हल्ला झाला होता, यांनी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती की, एक दिवस डाकीण (त्यांना काहीजण ‘गुनिया’ असेही म्हणतात) असल्याच्या संशयावरून मारल्या गेलेल्या लोकांच्या स्मृतीनिमित्त असे स्मारक उभे राहू शकेल.

परंतु अगदी तेच ओडिशा सरकारने केले आहे. आतापर्यंतच्या अशा या पहिल्याच कृतीने आणि कदाचित अपराधीपणा मान्य केल्याच्या भावनेने – 7 फुटी ग्रॅनाइट पुतळा, 27 फेब्रुवारी रोजी बांधून केओंझर जिल्हा पोलीस कार्यालयाच्या परिसरात उभारला गेला आहे, जो समाजात खोलवर रुतून बसलेल्या सामाजिक दुष्कर्माची साक्ष देत उभा आहे, जे या दिवसात आणि युगात अजूनही राज्यातील मोठ्या भागात अस्तित्वात आहे. लोकांना या जीवघेण्या अंधश्रद्धेबाबत संवेदनशील बनविण्याचा जिल्हा पोलिसांचा हा एक प्रयत्नसुद्धा आहे. भारतातील अशा प्रकारचे हे एकमेव स्मारक आहे.

ज्यांनी या स्मारकाची संकल्पना मांडली, ते केओंझर जिल्हा पोलीस अधीक्षक जय नारायण पंकज म्हणाले, डाकीण हत्या थांबली पाहिजे. ते पुढे म्हणाले, आपण लोकांची अंध आणि गैरवाजवी श्रद्धांकडे बघण्याची दृष्टी बदलणे आवश्यक आहे; तसेच बळींना व त्यांच्या कुटुंबीयांना सन्मान देणे आवश्यक आहे, ज्यांना समाजाकडून अनेकदा कमी लेखले जाते व बहिष्कृत केले जाते.

2005 च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी असलेले पंकज पुढे असे म्हणतात, एप्रिल 2018 मध्ये जेव्हा मी केओंझरचा एसपी म्हणून रुजू झालो, तेव्हा डाकीण हत्यांचे भयावह अपराध पाहून मला धक्काच बसला. केओंझर हे खनिजे आणि नैसर्गिक स्रोत यांनी समृद्ध असले, तरी अनेक आदिवासीबहुल आणि मागास खेडी अजूनही काळ्या जादूच्या विळख्यात अडकलेली आहेत. मी पुस्तके वाचून व इंटरनेटवरील माहिती गोळा करून आसाम, झारखंड व पश्चिम बंगाल इथेही आढळून येणार्‍या डाकीण हत्येच्या कार्यपद्धतीविषयी संशोधन केले. मग मी स्मारकाविषयी; तसेच या सामाजिक संकटाला रोखण्यासाठी चालू असलेली जागृती मोहीम यावर विचार केला. त्या पुतळ्याभोवती एक भिंत आहे आणि त्यावर हल्ल्यात बळी पडलेल्या अनेक लोकांची नावे आहेत. पोलीस तपासात आढळून आले आहे की, बळी पडलेले लोक ‘डाकीण’ कधीच नव्हते. त्यांनी कधीही काळी जादू केली नाही, हे सांगत असतानाच पंकज पुढे म्हणतात, विचित्र आणि रहस्यमय कारणांसाठी, स्थानिक लोक काही वेळा वयोवृद्ध महिलांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर डाकीण असल्याचा संशय घेतात व त्यांच्यावर हल्ला करून, त्यांना विकलांग करतात आणि मारतात. काही प्रकरणांमध्ये, वयस्कर पुरुषांनासुद्धा डाकीण/चेटक्या असल्याचे लेबल लावून लक्ष्य केले गेले होते. काही प्रकरणांत तरुण वयाच्या लोकांनाही सोडले नव्हते. केओंझर जिल्ह्यातील सनसनाटी डाकीण हत्या प्रकरणात दिनांक 13 जुलै, 2015 रोजी लहांडा या खेड्यातील स्थानिक रहिवाशांकडून एका कुटुंबातील सहा सदस्य कापून ठार मारले गेले होते, ज्यात चार मुलांचा समावेश होता.

2018 साली 73 डाकीण संबंधित प्रकरणे ओडिशामध्ये नोंदली गेली होती, त्यापैकी 18 खून होते. 2017 मध्ये अजून 99 प्रकरणे नोंदली गेली, ज्यात 18 खून होते. त्या आधीच्या वर्षात सुमारे 25 लोक डाकीण हत्या प्रकरणात मारले गेले होते. सर्व जिल्ह्यांतील पोलिसांना निक्षून सांगण्यात आले आहे की, या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी प्राधान्य द्यावे. विशेष महत्त्वाचे म्हणजे, राज्य सरकारने ओडिशा डाकीण हत्या प्रतिबंधक कायदा 2013 मध्ये अमलात आणला आहे.

जे या विरुद्ध संघर्ष करीत आहेत, ते म्हणतात की, आदिवासींमधील शिक्षणाच्या अभावाचा या जीवघेण्या छळामध्ये खूप मोठा वाटा आहे. ग्रामीण भागात महिलांवर डाकीण म्हणून शिक्का मारून त्यांना अपमानित करणे व पाशवी छळ करणे हे सर्वसामान्य प्रकार आहेत. सरकारच्या जागृती मोहिमांना फळे लाभणे अजून बाकीच आहे. राज्यात डाकीण हत्येच्या निर्मूलनाचे कार्य करणारी संस्था असल्याचे ओडिशा रॅशनलिस्ट सोसायटीचे सचिव देबेंद्र सुतार म्हणतात.

‘केआयआरडीटीआय’ या अजून एका स्वयंसेवी संस्थेचे सचिव दुस्कर बारीक म्हणतात, आम्ही या प्रथेविरुद्ध आदिवासींमध्ये प्रसार करून लोकांमध्ये जागृती निर्माण करीत आहोत. गेल्या काही वर्षांत बर्‍याच प्रमाणात या सामाजिक कुप्रथेवर नियंत्रण आले आहे. या आधी, बळींना अर्धनग्न करून त्यांची धिंड काढली जात असे व त्यांना मानवी मलमूत्र खायची जबरदस्ती केली जात असे. ते फार भयानक दिवस होते. एक सामाजिक कार्यकर्ता कार्तिक साहू म्हणतात, “पहाडी क्षेत्रात अनेक भागांमध्ये अंधश्रद्धा अजूनही अस्तित्वात आहेत, जिथे लोक आजार बरे करण्यासाठी जादूटोणा करणार्‍यांवर अवलंबून राहतात. जागृती मोहिमेतून काही भाग अजूनही सुटलेले आहेत.”

झुमपुरा येथे काही अंतरावर अमिना नाईक (वय 67) यांना पोलिसांचे या स्मारकानिमित्त किती आभार मानावेत असे झाले आहे. मला डाकीण ठरवून 2017 साली काही समाजकंटकांनी माझ्यावर हल्ला केला, तेव्हापासून गेली कित्येक वर्षे मी सामाजिक कलंक घेऊन आयुष्य जगत आहे. स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ अधिकार्‍यांनी मला त्यांच्यासोबत जेवण करण्यासाठी बसविले, तेव्हा माझे डोळे अश्रूंनी भरून आले, त्या म्हणाल्या-

माझी आई काइन्था नाईक, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात काही स्थानिकांनी तिच्यावर डाकीण असल्याच्या संशय घेऊन केलेल्या हल्ल्यात जखमी झाली होती. केओंझरमधील चाम्पुआ गटातील सुरेश नाईक म्हणाले, आम्ही ज्या दुःखातून व अवहेलनेतून गेलो आहोत, ते आम्ही आमच्या मनातून कधीच पुसून टाकू शकत नाही; परंतु हे स्मारक आमचे थोडेफार सांत्वन करते. कदाचित येणार्‍या काळात महिलांसाठी ते चांगले असेल.

साभार ः टाईम्स ऑफ इंडिया, 15 मार्च 2019

(देबब्रत मोहापात्रा आणि नरेशचंद्र पटनायक)

मराठी अनुवाद : उत्तम जोगदंड