मनाचा फ्लू : ‘स्वाईन फ्लू’च्या साथीमुळे सध्या फ्लूचा आजार सर्वत्र चर्चेमध्ये आहे. फ्लू हा बहुतांश वेळा स्वत:च स्वत: बरा होणारा आजार आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोळ्यांतून पाणी येणे अशी त्याची लक्षणे आपण सर्वांनी अनेक वेळा अनुभवली आहेत. आपल्यातील बहुतांश लोकांना वर्षातून एकदा तरी फ्लू होतो, मग त्या योगाने दोन-तीन दिवसांची सक्तीची विश्रांती मिळते. जे आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेतात, त्यांना वर्षांनुवर्षेदेखील बदलत्या ऋतुमानात फ्लू होत नाही; परंतु काही वेळा हा आजार ‘स्वाईन फ्लू’सारखा जीवघेणादेखील होऊ शकतो. शरीराच्या फ्लूला लागू पडणारी ही सर्व लक्षणे मनाच्या फ्लूलादेखील लागू पडतात. आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये या मनाच्या फ्लूला निराशा, औदासिन्य, डिप्रेशन अशा अनेक नावांनी संबोधले जाते.
शरीराच्या फ्लूप्रमाणेच मनाचा फ्लूदेखील वर्ष-दोन वर्षांतून तरी आपल्यातील अनेकांना गाठतो. बहुतांश वेळा आपल्या मनाची ही निराश अवस्था कुठल्या तरी तणावदायक परिस्थितीला प्रतिक्रिया म्हणून झालेली असते. शरीराच्या फ्लूप्रमाणेच ती काही दिवसांत कमीपण होते; परंतु काही वेळा हा निराशेचा आजार इतकी तीव्रता गाठतो की, सामान्यपणे स्वत:वर अतिशय प्रेम करणारी व्यक्तीदेखील स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेते. त्यामुळे या मनाच्या फ्लूविषयी जरा सविस्तर समजून घेऊया.
आपणा सर्वांच्या आयुष्यात अनेक दु:खदायक व ताणाचे प्रसंग येत असतात. परीक्षेमध्ये नापास होणे, धंद्यामध्ये अपयश, नोकरी न मिळणे, नातेसंबंधांमधील ताणतणाव, जवळच्या व्यक्तींची आजारपणे, आर्थिक ओढाताण असे अनेक ताणतणाव आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनुभवत असतो. या सर्व तणावपूर्ण प्रसंगांना प्रतिक्रिया म्हणून आपले मन नाराज होते, उत्साह कमी होतो. हे सगळे माझ्याच बाबतीत का घडते, असे विचार मनात येऊ लागतात. तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जाताना असे विचार मनात येणे, ही मानवी मनाची एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे; पण आपल्या सर्वांमध्ये परिस्थितीशी लढाई करण्याची एक शक्तीदेखील असते. प्रसंग तणावपूर्ण असला, तरी आपण स्वत:ला सावरतो, निराशेच्या भावनेतून बाहेर पडतो. ही प्रक्रिया आपण सर्वजण दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक वेळा अनुभवतो.
दैनंदिन आयुष्यातील निराशेच्या भावनेला आजार म्हणत नाहीत; पण ही निराशेची भावना जर दोन आठवड्यांपेक्षा जास्त टिकली किंवा त्या भावनेची तीव्रता जर खूपच जास्त असेल, तर मात्र आपण त्याला निराशेचा किंवा डिप्रेशनचा आजार असे म्हणतो.
डिप्रेशनची सामाजिक व्याप्ती : एखाद्या आजाराचा जगभरात होणारा परिणाम मोजताना त्यामुळे झालेले मृत्यूच फक्त न मोजता, आजारपणामुळे आयुष्याच्या गुणवत्तेवर होणारा परिणामदेखील अभ्यासला जातो. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने दिलेल्या इशार्यानुसार इ.स. 2020 साली माणसाच्या आयुष्यावर परिणाम करणार्या आजारांच्या यादीमध्ये ‘डिप्रेशन’ हा आजार दुसर्या क्रमांकावर असेल. समाजामध्ये कोणत्याही वेळी तपासणी केल्यास 10 ते 15 टक्के व्यक्तींमध्ये डिप्रेशनचा आजार दिसून येतो. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा या आजाराचे प्रमाण अधिक असते.
डिप्रेशनच्या आजारामुळे व्यक्तीची काम करण्याची शक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होते. या आजारामुळे कमी होणार्या कार्यक्षमतेच्या दिवसांची बेरीज केल्यास संपूर्ण आयुष्यात ती 6 ते 7 वर्षे भरते. डिप्रेशनचा हा आजार बरा झाला, तरी परत येऊ शकणारा आहे; परंतु योग्य काळजी घेतल्यास तो आवाक्यात ठेवता येतो.
डिप्रेशनची लक्षणे : दिवसाकाठी बहुतांश वेळा उदास वाटणे, हे उदासीचे प्राथमिक लक्षण असते. आपल्याला ज्या गोष्टी आवडीच्या वाटतात, त्यामधील रसदेखील कमी होणे व थोड्याशा कामाने थकवा येणे, ही देखील उदासीच्या आजाराची प्रमुख लक्षणे असतात. याशिवाय लगेच झोप न लागणे, लवकर जाग येणे, भूक कमी होणे, लैंगिक संबंधांची भावना कमी होणे, ही शारीरिक लक्षणेसुद्धा उदासीच्या आजारात दिसून येतात. डिप्रेशनच्या एका प्रकारामध्ये (ज्याला ‘अटिपिकल डिप्रेशन’ म्हणतात) झोप व भूक वाढणे, हे लक्षण दिसून येते.
आजाराची तीव्रता वाढली, तरी आत्महत्येचे विचार व्यक्तीच्या मनात येऊ लागतात. तशी कृती होण्याची शक्यता वाढते. सतत एकाकीपणाची जाणीव होणे व भविष्य अंध:कारमय भासणे, ही लक्षणे उदासीची तीव्रता दर्शवतात.
कारणे : बहुतांश मानसिक आजार हे जैविक, मानसिक व सामाजिक कारणांच्या संयोगातून उत्पन्न होतात. मेंदूतील जैविक बदलांमुळे वातावरणात फारसे ताण नसताना येणार्या उदासीनता जैविक उदासी (एण्डोजिनस डिप्रेशन) म्हणतात. मध्यमवयीन जैविक कारणांमध्ये अनुवंशिकता हा महत्त्वाचा भाग आहे. शरीराच्या आजारांमध्ये डायबिटीस, ब्रेन ट्यूमर, फीट, थायरॉईड ग्रंथींचा आजार अशा आजारांमध्येदेखील उदासी येते. याला शारीरिक कारणांमुळे येणारी उदासी (ऑरगॅनिक डिप्रेशन) म्हणतात व ती ताणामुळे होणार्या उदासीपेक्षा वेगळी असते.
उदासीनतेच्या भावनिक कारणांमुळे नातेसंबंधांतील भावनिक ताण, व्यक्तीमधील स्वभावदोष इत्यादींचा समावेश होतो. सामाजिक कारणांमुळे गरिबी, जीवनातील अपयश अशा गोष्टींचा समावेश होतो. ही सर्व कारणे कमी-अधिक प्रमाणात एकत्र येऊन उदासीचे रसायन तयार होते.
उपचार : उदासीच्या आजारावर आता अनेक प्रकारचे प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. उदासी कमी करण्याच्या औषधोपचारांबरोबरच आजाराचे स्वरूप समजून घेणे व स्वत:च्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणणार्या विवेकनिष्ठ उपचार पद्धतीसारख्या मानसिक उपचारांचा वापर करणे, असे पर्याय आपल्यापुढे उभे राहतात. मानसिक ताण नसताना जैविक कारणांमुळे येणारी जी उदासी असते (एण्डोजिनस डिप्रेशन) त्यामुळे प्रमुख भर हा उदासी कमी करणार्या औषधांवर (अँटिडिप्रेसंट) दिला जातो. ही औषधे मेंदूमधील ‘सिरेटोनिन’ व ‘नॉरइपिनोफ्रिन’ या द्रव्यांमधील असमतोल भरून काढण्याचे काम करतात. उदासी कमी करणारी अनेक प्रकारची औषधे उपलब्ध असल्याने एखाद्या औषधाला अपेक्षित गुण न आल्यास औषध बदलून देणे किंवा दोन वा अधिक औषधे एकत्र येणे असे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. व्यक्तिमत्त्वातील दोष अथवा कौटुंबिक ताणतणावातून निर्माण झालेल्या उदासीच्या आजारामध्ये औषधोपचाराबरोबरच समुपदेशन (कौन्सिलिंग) या विचारामध्ये बदल करण्यासाठी वापरल्या जाणार्या विवेकनिष्ठ उपचार पद्धतीचा वापर केला जातो.
आपण स्वत:च्या पातळीवर करत असलेल्या संगीत ऐकणे, योगासने करणे यासारख्या स्वमदत क्रियांचादेखील उदासीनता हटवण्यास फायदा होतो; परंतु साधारणपणे औषधांचा गुण येऊन काही प्रमाणात उदासीचा पडदा हटण्यास सुरुवात झाल्यावर या गोष्टींचा फायदा अधिक होतो. उदासीचा आजार एकदा झाला असल्यास 9 ते 12 महिने उपचार घ्यावा लागतो. पहिल्या 3 ते 4 महिन्यांमध्ये जरी पूर्ण लक्षणे कमी झाली, तरी उपचारांचा कालावधी पूर्ण करणे गरजेचे असते. कारण उदासीचा आजार हा परत-परत होऊ शकणारा आजार आहे. औषधोपचारांचा कालावधी पूर्ण केल्यास आजार परत येण्याची शक्यता कमी होते. सध्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ताणतणाव वाढत चालल्याने सर्वांनी या मनाच्या फ्लूबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे.
संपर्क : hamid.dabholkar@gmail.com