नांदेड जिल्ह्यातील देगलूर या तालुक्याच्या ठिकाणी सुरेश जाधव यांची जी प्लस टू (G + 2) बंगला टाईप बिल्डिंग आहे. बिल्डिंगमध्ये त्यांची स्वत:ची अक्षरधाम नावाची शाळा आहे. शाळेत जवळपास 150 विद्यार्थी संख्या आहे. तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर शाळेचे वर्ग आहेत. तसेच पहिल्या व तळमजल्यावर त्यांचे जवळचे नातेवाईक सहकुटुंब राहतात. तळमजल्यावर एक जोडपं व त्यांचा 23 वर्षीय मुलगा सिद्धार्थ हा विज्ञान शाखेचा पदवीधर असून व्यवसाय देखील करतो. पहिल्या मजल्यावर राहणार्या कुटुंबात आई आपल्या दोन मुलांसह राहते. ती शिक्षिका म्हणून त्याच शाळेत कार्यरत आहे, तर मोठा मुलगा नवव्या वर्गात; तर लहान मुलगा दुसर्या वर्गात आहे. सुरेश जाधव यांच्या कुटुंबात ते स्वत:, आई, पत्नी, दोन मुले व दोन भाच्या असून ते दुसर्या मजल्यावर राहतात. पत्नीसुद्धा त्याच शाळेत शिक्षिका आहे.
तळमजल्यापासून ते दुसर्या मजल्यापर्यंत जाधव परिवारातील 14 सदस्यांचा वावर असतो. शाळेच्या वेळेत शिक्षकांची व विद्यार्थ्यांची वर्दळ असतेच. अशा या परिस्थितीत कधी पहिल्या मजल्यावर, कधी दुसर्या मजल्यावर कधी ऑफीसमध्ये; तर कधी घरात आग लागण्यास सुरुवात झाली. ती 5 फेबु्रवारी 2019 पासून त्याचा घटनाक्रम असा-
5 फेबु्रवारी रोजी शाळेच्या ऑफीसमध्ये पुस्तकांना आग लागल्याचे जाधव सरांच्या आईला दिसले. तीन-चार पुस्तके अर्धवट जळाली होती, त्यावर पाणी टाकून आग विझवण्यात आली. बाजूला काडीपेटी व काड्या विखुरल्या होत्या. 7 फेबु्रवारी रोजी ऑफीसमध्ये जाण्यासाठी जाधव सरांनी दार ढकललं तर ऑफीसमध्ये पूर्ण धूर दिसला. त्यांनी बघितलं टेबलाखाली 8-10 पुस्तकांनी पेट घेतला होता. लगेच पाणी आणून आग विझविण्यात आली. आजूबाजूला निरीक्षण केलं, तर तिथेही काडीपेटी व विझलेल्या, अर्धवट जळलेल्या काड्या विखुरलेल्या होत्या. 8 फेबु्रवारी रोजी एक वेगळीच घटना घडली. जाधव सरांचा नवव्या वर्गात शिकणारा भाचा अशोक दुपारी दुसर्या मजल्यावर आला असता, तिथे त्याला एक अज्ञात व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीने तोंडाला रूमाल बांधला होता व हातात हातमोजे घातले होते. कोण आहे, असं विचारल्यानंतर ती व्यक्ती पळायला लागली. अशोकने त्याला बॅट भिरकावून मारली असता, त्याच्या हाताला लागली व त्याच्या हातातील काडीपेटी खाली पडली. त्या व्यक्तीने दुसर्या मजल्यावरून (पहिल्या मजल्याच्या छताच्या पॅराफिट वॉलवरून) शेजारच्या घराच्या छतावर उडी मारली आणि पसार झाली. 9 फेबु्रवारी रोजी अशोक शाळेच्या (तो शिकत असलेल्या) समोर उभा असता तीन मुले त्याच्याजवळ आली, त्यापैकी एकाच्या हातावर खच्चून असं लिहिलेलं होतं, “अभी जो हो रहा है, वो ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है, असं तुझ्या मामा-मामीला सांग,” असं तो म्हणाला. ही बाब अशोकने जाधव सरांना सांगितली. 10 फेबु्रवारी रोजी ऑफीसमधील टेबलचे ड्रॉवर उघडले असता आग लागल्याचे जाधव सरांच्या 11 वर्षांच्या मुलाला दिसले. ती आग विझवली आणि घरातील सर्वजण तात्काळ दुसर्या मजल्यावर गेले असता, ती अज्ञात व्यक्ती शेजारच्या घरावर उडी मारून पसार झाली, हे आजूबाजूच्या मंडळींनी बघितलं, असं जाधव सरांचं म्हणणं आहे. ती अज्ञात व्यक्ती तेथे आग लावते, यासाठी शेजारच्या घराच्या छताचा वापर होतो. याच पद्धतीची पोलिसांत तक्रार जाधव सरांनी दिली आहे. नेहमीप्रमाणे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आणि पाहणी केली, काळजी घ्यावयास सांगितले व पुन्हा काही घडल्यास कळविण्यास सांगितले. हा प्रकार सतत चालूच होता. 17 फेबु्रवारीला जाधव सरांचा फोन आला, वरील घटना त्यांनी कथन केली. त्यावेळी त्यांना मी लगेच चारी बाजूंनी आग लागते त्या ठिकाणी आणि जिन्यात सी.सी.टी.व्ही. बसविण्यास सांगितले. त्यानंतर 20 फेबु्रवारी रोजी संध्याकाळपर्यंत हा प्रकार घडला नाही. सी.सी.टी.व्ही.च्या टप्प्यात न येणार्या ठिकाणी 20 फेबु्रवारी रोजी रात्री हा प्रकार घडला.
दि. 21 फेबु्रवारी रोजी तुळशीदास शिंदे, अर्चना जमदाडे, कमलाकार जमदाडे व मी जाधव सरांकडे पोचलो. सुरुवातीला त्यांचे निवास व परिसराचा नकाशा काढून घेतला. घटनाक्रम व कुटुंबीयांची माहिती घेतली. घटनाक्रमात काही विसंगती दिसून आल्या. काही बाबींच्या तपशिलात जावं लागलं.
वरील सर्व बाबी गृहीत धरून जाधव परिवारातील लहान-थोर अशा सर्व 14 व्यक्तींच्या अनेक अंगांनी मुलाखती घेतल्या. मुलाखतीअगोदरच्या चर्चेतच आम्हाला काही क्ल्यू मिळाले होते. शंकेला बळकटी मिळत होती. आम्ही निष्कर्षावर आलो; परंतु ती व्यक्ती मुलाखतीदरम्यान अस्वस्थ झाली. नजर मिळवत नव्हती, उत्तरे देत नव्हती, काहीच बोलत नव्हती व कबूलही होत नव्हती. आम्ही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करत आहोत आणि ही बाब बाहेर कोणाला सांगू, याबाबत तिला शंका वाटत होती. आम्ही कोणाला सांगणार नाही, याची खात्री दिली; पण त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी त्या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितले. पुढील दुसर्या व्यक्तीला बोलावून आम्ही आमची मुलाखत चालूच ठेवली. इतरांना शंका येऊ नये म्हणून.
सर्व मुलाखती संपल्यावर सर्वांना बोलावून मी वस्तू ओळखण्याचा चमत्कार त्यांना दाखविला. ‘आता हा प्रकार थांबेल व थांबला नाही, तर थांबविण्यासाठी मी सांगेन. त्या व्यक्तीला बाहेर गावी पाहुण्याकडे नेऊन ठेवावं लागेल,’ अशी अट जाधव सरांना घातली. त्यांनी ती मान्य केली. ती व्यक्ती पुन्हा हा प्रकार करणार नाही, याची खात्री वाटत होती, तसंच झालं आणि भानामती कायमची बंद झाली.
– सम्राट हाटकर, नांदेड