Categories
भानामती

अंगावर गोटे पडणारी भानामती अंनिसच्या प्रबोधनाने पडली बंद

एप्रिल - २०१९

वर्धा येथे शिक्षण घेण्यासाठी महादेव तोटे (नाव बदलले संपूर्ण कुटुंबाचे) यांची लहान मुलगी वर्ग 6 मध्ये शिकत असलेली, छोटा मुलगा जो बालवाडीत शिकतो व भावाची मुलगी जी बी.एस्सी.च्या प्रथम वर्षाला; गेल्या दोन वर्षांपासून वर्ध्यात वास्तव्याला आहे. अचानक सहा महिने आधी वर्ग 6 मध्ये शिकत असलेल्या मुलीच्या अंगावर गोटे पडण्याचे प्रकार घडू लागले, तर कधी-कधी घरावर गोटे येऊ लागले.

आधी-आधी याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नंतर प्रकार वाढीस लागला. घरचे व आजूबाजूचे लोक घाबरले. घरमालकाने पण घर खाली करण्यास सांगितले. पुन्हा घर बदलले. एक-दोन दिवस प्रकार थांबून पुन्हा अंगावर गोटे पडण्यास सुरुवात झाली. अशातच मित्राकडे ही गोष्ट सांगून महादेव तोटे यांनी मदत मागितली. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांना संपर्क करून भेटावयास यायचे, असे सुचविले. ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी घरी मित्र व या मुलीचे वडील भेटण्यास आले. तीन ते चार मित्रपण त्यांच्या समवेत आले. त्यांना पाहून मुलीचे वडील व त्यांचा एक मित्र यांनाच थांबवून बाकीच्यांना जाण्यास सांगितले. घरी त्यांना बसवून इतर चर्चा करून आधी त्यांचा विश्वास संपादन केला व भानामती बंद होईल; पण त्या व्यक्तीचे नाव सांगण्यात येणार नाही, हे सांगून संपूर्ण प्रकरण, घरातील प्रत्येक व्यक्तीची माहिती घेण्यात आली. यातून ही 6 व्या वर्गात शिकणारी मुलगी व बी.एस्सी. प्रथम वर्गात शिकत असलेली मुलगी यापैकी कोणीतरी एक असावी, असा निष्कर्ष काढला व अधिक सखोल चौकशी केली असता 6 व्या वर्गात शिकत असलेल्या मुलीवर संशय पक्का झाला. त्यांना दोन दिवसांनी चौकशीसाठी येतो, असे म्हटल्यावर ते म्हणाले, ‘आम्ही नवीन घरी जात आहोत, नंतर कळवितो. नवीन घर मालकाला हा प्रकार माहीत व्हायला नको.’ यावर मी सांगितले ‘घर वरच्या मजल्यावर असलेले घ्या. आजूबाजूला दगड, विटा, गिट्टी यांचे ढीग नसेल असे पाहा. कोणालाही न सांगता तिघांचेही शाळेचे दप्तर रोज तपासा व आल्यानंतर पण तपासा. कोणाच्या दप्तरात गोटे सापडतात ते पाहा. अंगावर गोटे पडल्यास ते जपून ठेवा. कारण याआधी पडलेले गोटे उचलून सांभाळून ठेवलेले हेच गोटे पुन्हा अंगावर पडलेले मिळाले. हे त्यांच्या मुलाखतीतून माहीत झाले होते, असे सर्व समजावून सांगून, जर गोटे पडलेच, तर त्वरित कळवा, असे सांगितले आणि काय आश्चर्य, अंगावर गोटे पडणे आपोआपच बंद झाले.

गजेंद्र सुरकार, वर्धा