Categories
जो.वि.नि

जोडीदार निवडण्यासाठी माझ्या मुलींना स्वातंत्र्य दिले

फेब्रुवारी - २०१९

मला दोन मुली आहेत- ‘आम्ही दोन, आमच्या मुली दोन.’ दोन्ही मुली डॉक्टर आहेत. मोठ्या मुलीचा स्वतःचा चिंचवड येथे डोळ्यांचा दवाखाना आहे. 15 वर्षांपूर्वी तिचा अहमदनगर येथील आमच्याच पोटजातीतील मुलाशी प्रेमविवाह झाला. जावई इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. कॉलेजमध्ये असतानाच ते एकमेकांना आवडू लागले व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला याविषयी आधी माहीत नव्हते. मुलगी शेवटच्या वर्षात असल्याने जातीतील डॉक्टर असलेली मुले मागणी घालत होती. आम्ही ते मुलीला सांगितले; परंतु अचानक मुलीचा एके दिवशी फोन आला की, तिने तिच्यासाठी जोडीदार शोधला आहे व तिला त्याच्याशीच लग्न करायचं असल्याचे सांगितले. मी त्याच्याविषयी जुजबी माहिती विचारून घेतली. पत्नीला मात्र याचा धक्काच बसला. ती आधी परंपरावादी, रुढीवादी होती. ती चिडली आणि रडायला लागली. मी मात्र ठामपणे लग्नाला होकार दिला. मुलीला म्हटलं, ‘तुला पसंत आहे ना मुलगा, मग करून टाक लग्न.’ ती म्हणाली, ‘तुम्ही एकदा मुलाला आणि त्याच्या आई- वडिलांना भेटून तर घ्या.’ त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या गावी गेलो. मुलाच्या घरची चांगली वाटली. त्यांची संमती होती, आम्हीही होकार दिला. पत्नीने मुहूर्त व वेळ काढून आणली होती. मी ना जात पाहिली होती ना पत्रिका, त्यामुळे मुहुर्ताचाही प्रश्नच नव्हता. बरं, तो मुहूर्तही सकाळी 9.32 चा होता. एवढ्या सकाळी लग्न लावणे शक्यच नव्हते. मी ती पत्रिकेवरची वेळ खोडून सोयीस्कर अशी 12 वाजून 45 मिनिटांची केली व लग्नही त्याच वेळेत लावले. लग्न सुरळीत पार पडले आणि आज दोघेही आनंदाने सहजीवन जगत आहेत.

लहान मुलीचाही पहिला विवाह प्रेमविवाहच झाला. दोघेही मेडिकलला असताना प्रेम जुळले. मुलगा वेगळ्या समाजाचा होता. मुलाचे आई-वडीलही डॉक्टर, चांगली सुसंस्कृत मंडळी होती; परंतु पती- पत्नीचे न पटल्याने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला व आम्हाला कळवले. आम्ही दोन्हीकडच्या मंडळींनी लग्न तुटू नये म्हणून प्रयत्न केले; परंतु दोन वर्षांनी सामोपचाराने घटस्फोट झाला. मुलगी दोन-तीन महिने दुःखात होती; परंतु नंतर सावरली. पुनर्विवाहाला तयार झाली.

दरम्यान, आमचे नातेवाईक, मित्रमंडळी म्हणू लागली की, ‘एकदा दुसर्‍या जातीत लग्न करून फसलात, आता तरी जातीतलाच मुलगा बघा. जातीत काय चांगली मुलं नाहीत काय?’ मी त्यांना सांगायचो, ‘माझी मुलगी सज्ञान आहे. तिचा निर्णय ती घेईल, मी तिला जबरदस्ती करणार नाही. संसार तिला करायचा आहे.’ मुलीलाही तिच्या पसंतीने कोणत्याही जाती-धर्माचा मुलगा शोधायला सांगितलं. माझी पत्नी म्हणाली, ‘एवढा मोठा निर्णय घेताना तुम्ही कुणाशी विचारविनिमय, सल्लामसलत करीत नाही. कुणाचे काही ऐकत नाही. एकदा फसलात, परत तसेच करून फसणार काय?’ तिची आई म्हणून असणारी काळजी समजत होती. मी तिला सांगितलं, ‘एकदा परीक्षेत नापास झालोय म्हणून परत परीक्षा देणार नाही काय? पुन्हा जरी तिची निवड चुकली तरीही आपण तिच्या पाठीशी उभं राहायला हवं आणि तिचा निर्णय तिलाच घेऊ द्यायला हवा.’

मुलीने इंटरनेटवर शोध सुरू केला. चॅटिंगमधून मुलाची मिळणारी माहिती ती आम्हालाही देत होती. तिने तीन मुलं निवडली, त्यांची चौकशी केली. वेगवेगळ्या जातींची मुलं होती. त्यांच्या घरांपर्यंत गेलो; पण घरातील मंडळी आम्हाला आणि तिलाही आवडले नाहीत. शेवटी तिला एक मुलगा पसंत पडला. आंतरजातीयच होता. मुलगा व त्याच्या घरचेही आम्हाला आवडली. पत्रिका वगैरे पाहायची नाही, त्यांना पाहायची असेल, तर त्यांनी पाहावी, असे ठरले. लग्न ठरवताना मुलीला एक अट टाकली की, ‘तुम्ही दोघांनी Psychometric Test करून घ्यायची. Psychologist स्वभावगुण शोधतील. Psychology शास्त्र हल्ली इतके प्रगत झाले आहे की, त्यावरून तुमचे स्वभावगुण, आवडी-नावडी शोधता येतात. ते जुळत असल्यास लग्न करावे. याउपर ते जुळत नसतील व तरीसुद्धा तुम्हाला लग्न करायचे असल्यास तुम्ही लग्न करू शकता. माझी काही हरकत नाही. त्या परिस्थितीतही मी तुमच्या पाठी उभा राहीन.’

मुलाकडच्यांना या टेस्टविषयी काही माहिती नव्हती, तरीही ते तयार झाले. पुण्यात टेस्ट झाली 92 टक्के स्वभावगुण जुळतात, लग्न करायला काही हरकत नाही,’ असे डॉक्टरांनी सांगितले. 8 टक्के अडचणी पण त्यांनी सांगितल्या व त्याप्रसंगी एकमेकांनी कसे वागावे, हे पण सांगितले. लग्न झाले. याही वेळी पूजापाठ व इतर गोष्टीत सहभाग घेतला नाही. कन्यादानालाही नकार दिला.

आता मुलीच्या लग्नाला 5 वर्षे झालीत. दोघेही अटलांटा (अमेरिका) ला राहतात. दोघांचे सहजीवन मैत्रीपूर्ण आहे. आम्ही खूप समाधानी व आनंदी आहोत. आपण मुलांना शिकवतो, स्वतःच्या पायावर उभे करतो; मग त्यांना त्यांच्या आयुष्याचे निर्णयही घेऊ द्यायला हवेत. आपण आपल्या मुलांना एवढे सक्षम केलेत, यावर आपला विश्वास हवा. म्हणूनच मी माझ्या दोन्ही मुलींच्या निर्णयांना पाठिंबा दिला. जसा मोठ्या मुलीच्या बरोबर ठरलेल्या निर्णयाचा मला आनंद होता, तसाच छोट्या मुलीच्या चुकलेल्या निर्णयासोबत राहणं, हे माझं कर्तव्य होतं. निर्णय चुकणं हा गुन्हा नाही. ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा महाराष्ट्र अंनिसतर्फे राबवला जाणारा उपक्रम सध्या समाजमान्य होत आहे. 12 जानेवारी ते 14 फेब्रुवारीदरम्यान ‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान’ राबवलं जात आहे. या अभियानाच्या निमित्ताने युवांबरोबरच पालकांसाठीही माझ्या या अनुभवाचा उपयोग झाला, तर मला आनंदच वाटेल.

चंद्रकांत श्रीखंडे

उपाध्यक्ष, महा. अंनिस, जिल्हा नागपूर