साधारण दोन वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे. अंनिसच्या एका ज्येेष्ठ कार्यकर्त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला विचारलेला प्रश्न मला यापूर्वी कुणीच विचारला नव्हता. तो प्रश्न असा होता की, ‘माझ्या मुलीचा पहिला घटस्फोट झालेला आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेमधून जाताना आम्हाला खूप मन:स्ताप झाला. आता माझी मुलगी परत लग्न करण्याचा विचार करीत आहे. तर नवरा आणि बायको यांचा स्वभाव तपासून त्यांचे जुळू शकेल का नाही, हे सांगणारी एखादी शास्त्रीय चाचणी असेल तर तुम्ही मला सांगू शकाल का ?’
चिकित्सक बुद्धीने विचार करता त्यांचा प्रश्न एकदम थेट आणि रास्त होता. अडचणीची गोष्ट अशी की, आज तरी मानसशास्त्राच्याकडे अशी कोणतीही चाचणी सहज उपलब्ध नाही.आजचे मानस शास्त्र अजून इतके प्रगत झाले नाही की ज्यामध्ये अशा स्वरुपाची चाचणी करता येईल आणि योग्य जोडीदार शोधता येईल. जोपर्यंत अशी चाचणी कोणी शोधून काढू शकत नाही, तोपर्यंत तरी हा विषय आपल्याला समजून घेण्याशिवाय पर्याय नाही.
मानसिक आरोग्य आणि जोडीदाराची विवेकी निवड हा विषय समजून घेताना स्वाभाविकच पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो, तो मानसिक आजारांचा. त्यामध्ये देखील सगळ्यात वरचा क्रमांक लागतो तो व्यसनाचा. आपल्या जोडीदाराची निवड करताना त्याला अथवा तिला कोणतेही व्यसन नाही, याची खात्री करून घेणे हे लग्नाच्या आधी एचआयव्ही चाचणी करण्याइतकेच किंवा त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या समाजातील व्यसनांचे प्रमाण पाहता व्यसन हे जोडीदाराच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात प्रवेश करू शकण्याची खूप मोठी शक्यता असते आणि एकदा का व्यसनाने संसारात चोरपावलाने प्रवेश केला की, सुखी संसाराची स्वप्ने धूळधाण व्हायला फार वेळ लागत नाही. व्यसनाने संसार उद्ध्वस्त झालेली अनेक जोडपी आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. त्या पार्श्वभूमीवर याविषयी भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या होऊ घातलेल्या जोडीदाराला तो किंवा ती कुठलेही व्यसन करते का हा प्रश्न कोणताही आडपडदा न ठेवता आपल्याला विचारता आला पाहिजे. हा प्रश्न विचारण्यात केलेली कुचराई ही पुढे अनेक त्रासांचे कारण ठरू शकते.
तीव्र मानसिक आजार हा जोडीदाराच्या निवडीच्या मधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. व्यसनाच्या तुलनेने तीव्र मानसिक आजारांचे समाजातील प्रमाण हे खूपच कमी असले तरी त्याचा आयुष्यावर होणारा परिणाम खोलवर असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तीव्र मानसिक आजार हे सहसा 16 ते 25 या वयोगटात सुरू होतात. जोडीदाराची निवड देखील बर्याच वेळा याच कालखंडात केली जाते. त्यामुळे त्या बाबतीत खास काळजी घेणे आवश्यक असते. जर आपल्याला असा आजार असेल तर आपल्या भावी जोडीदाराला त्याविषयी माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा मानसिक आजाराविषयी कळले तर लग्न जमायला अडचण येईल म्हणून अशा आजाराच्या विषयीची माहिती लपवली जाते. त्यामधून प्रश्न सुटण्याच्या ऐवजी वाढतात. विश्वासघातावर सुरू झालेले नाते पुढे टिकायला आणि फुलायला असंख्य अडचणी येतात. तीच बाब फिट्सच्या आजाराची. तीव्र मानसिक आजार आणि फिट्सचा आजार फार काळ लपून राहू शकत नाहीत आणि लग्नाच्या नंतर ते उघड झाले, तर त्या मधून दोन्ही कुटुंबांच्या साठी ताणाची परीस्थिती निर्माण होऊ शकते. ती टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लग्नाच्या आधी आपल्या संभाव्य जोडीदाराला त्या विषयी माहिती देणे. अशा स्वरुपाचे आजार असलेल्या व्यक्तींना देखील चांगला जोडीदार मिळू शकतो. पण त्यामध्ये जर पारदर्शीपणा आणि आजाराचा स्वीकार असेल तर असे नाते दीर्घकाळ टिकू शकते. जॉन न्याश या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाला स्किझोफ्रेनिया हा आजार असल्याची कल्पना असून देखील त्याच्या मैत्रिणीने त्याच्याशी विवाह केला आणि अतिशय समर्थपणे तो विवाह पेलून देखील नेला.
लग्नाच्या आधी चालू असलेल्या औषधांचा भावी संततीवर काही परिणाम तर होणार नाही ना, या विषयी देखील अनेक शंका लोकांच्या मनात असतात. मानसिक आजारांच्या बाबतीत तरी असे परिणाम सहसा दिसून येत नाहीत. पण गरोदरपणात मुलीला औषधे चालू असतील, तर त्याचा परिणाम जन्मणार्या बाळाच्या वर होण्याची शक्यता असते म्हणून त्याविषयी तज्ज्ञांशी बोलून निर्णय घेणे आवश्यक असते.
बाकीच्या मानसिक आजारांप्रमाणे स्वभावदोष ही देखील जोडीदाराच्या निवडी मधील एक मोठी अडचण ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात काहीतरी उणे अधिक असते. पण जर एखाद्या व्यक्तीला अनेक नात्यांच्या मध्ये जुळवून घेण्यात अडचण येत असेल, तर त्या व्यक्तीला स्वभावदोष असण्याची शक्यता असते. अशा स्वभावदोष असलेल्या जोडीदाराशी जुळवून घेण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. स्वभावाचा कल आणि स्वभावदोष हे सहवासातूनच समजून येऊ शकतात म्हणून एकमेकांचे स्वभाव समजण्यासाठी जोडीदाराची निवड करू इच्छिणार्या तरुण-तरुणींनी एकमेकांच्या स्वभावातील गुण-दोषांचा अंदाज घ्यायला शिकणे देखील महत्त्वाचे आहे.
या सगळ्यांच्या बरोबरीने लैंगिकतेविषयी असलेले गैरसमज हे देखील अनेक वेळा जोडीदाराची निवड न जुळून येण्याचे कारण ठरू शकतात. लैंगिकतेविषयी आपल्या समाजात अजिबात मोकळेपणाने बोलले जात नाही. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्तीने याविषयी आपले समज-गैरसमज तज्ज्ञांशी बोलून समजून घेणे आवश्यक आहे. जोडीदाराची निवड करणे हे मूलत: मानसिक पातळीवर घडणारी प्रक्रिया आहे. आपण स्वत:चे; तसेच दुसर्याचे मानसिक आरोग्य आणि कल याविषयी सजग राहायला शिकलो तर त्यामधून जोडीदार निवडीमधील अनेक अडचणी आपण टाळू शकू, असा विश्वास वाटतो. मानसमित्र आणि मानसमैत्रिणी जोडीदाराच्या विवेकी निवडीच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पडू शकतात. त्याची सुरुवात अगदी प्रेम आणि आकर्षण यांच्या मधील फरक समजून घेणे आणि आपल्या मित्र-मैत्रिणींशी त्याविषयी बोलणे यांपासून सुरू होऊ शकते. प्रेमात पडलेल्या मुला-मुलींना आई-वडिलांचा किंवा नातेवाईकांचा सल्ला हा बहुतांश वेळा पटत नाही. अशा वेळी मानसमित्र किंवा मैत्रीण त्यांना अधिक चांगले समजून घेऊ शकतात. आपल्या संभाव्य जोडीदाराच्या मधील स्वभावदोष किंवा आणखी कोणत्याही दोषाच्या विषयी देखील सल्ला-मसलत करण्यासाठी देखील मानसमित्र/मैत्रीण मदत करू शकते. अंनिस आणि ‘विवेक वाहिनी’चे अनेक तरुण कार्यकर्ते ही भूमिका आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी खुबीने निभावताना आपल्याला दिसतात. युवा मानसमित्र आणि मैत्रिणीसाठी जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसमैत्री यांची सांधेजोड करणे महत्त्वाची गोष्ट आहे.
कुटुंबातील हिंसाचार किंवा प्रेमातील अपयशातून आत्महत्या करणे असे अनेक पातळ्यांवरचे मानसिक प्रश्न हे जोडीदाराच्या विवेकी निवडीशी जवळून संबंधित आहेत म्हणून युवा मानसमित्र/मैत्रिणीने जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य याविषयी सजग राहिले पाहिजे.