वसई येथील प्रसिद्ध कायदेतज्ञ व समाजसुधारक अॅड. अतुल अल्मेडा यांना ‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप 11000 रूपये रोख, शाल व सन्मानपत्र असे आहे.
हा पुरस्कार दि. 8 फेब्रुवारी 2014 शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजता चेतना महाविद्यालय, वांद्रे येथील सभागृहात विशेष समारंभपूर्वक देण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध विज्ञानलेखक अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे तर ज्येष्ठ समाजवादी अर्थतज्ञ गजानन खातू हे अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक प्रा.प.रा.आर्डे, शैला दाभोलकर व महाराष्ट्रातील अंनिसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात विचार व कृतीने विशेष कार्य करणार्या व्यक्तींना हा पुरस्कार महाराष्ट्र अंनिसतर्फे देण्यात येतो. आतापर्यंत हा मानाचा पुरस्कार डॉ. श्रीराम लागू, उत्तम कांबळे(माजी संपादक, दै.सकाळ), दि.य. देशपांडे नागपूर(माजी संपादक ‘सुधारक’), डी.डी. बंदिष्टे इंदूर(तत्वज्ञ), मा.भुरासिंग(अध्यक्ष, तर्कशील सोसायटी, पंजाब) आदि मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.
अॅड.अतुल अल्मेडा हे मानवता हाच धर्म मानणारे विचारवंत आहेत. वसई परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी सहभाग दिला आहे. येशू ख्रिस्तांचे मानवता प्रेम व विवेकवाद यांचा प्रसार धर्मनिरपेक्ष राहून ते करीत आहेत. महाराष्ट्र अंनिसचा सनातनी प्रवृत्तीशी जो संघर्ष चालू आहे त्याबाबतच्या कायदेशीर लढाईत त्यांनी अंनिसला मोलाचे सहकार्य केले आहे. या सर्व कार्याची दाद घेऊन महाराष्ट्र अंनिसने त्यांचा यथोचित गौरव करण्याचे योजले.
महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद केली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अनंतराव साठे यांच्या उदार देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. ‘इष्ट ते बोलेन व शक्य ते करेन जोपर्यंत उच्चारण्याची ताकद आहे.’ या आगरकरांच्या उक्तीचा उल्लेख करून विचार स्वातंत्र्य व कृतीशीलता याबाबत न घाबरता कार्य करणार्या व्यक्तींचा पुरस्कार आपणा सर्वांना प्रेरणा देतो असे ते म्हणाले. अतुल अल्मेडा यांच्या कार्यांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
अच्युत गोडबोले व गजानन खातू यांच्या हस्ते अॅड. अल्मेडा यांना शाल, गुलाबपुष्प, 11000 रू. व सन्मानपत्र अर्पण करण्यात आले.
सत्काराला उत्तर देतांना अॅड. अतुल अल्मेडा यांनी साने गुरूजी ही माझी प्रेरणा आहे मी जे थोडे फार कार्य केले हा त्यांच्या मानवतावादी विचारांवरील माझ्या श्रद्धेचा भाग आहे असे नम्रतापूर्वक नमूद केले. ख्रिस्त, ज्ञानेश्वर, तुकाराम आदि धर्म प्रेषीत व संतांचा तसेच आगरकरांचा विवेकाचा मानवतावादी वारसा अंनिस चालवीत आहे.
माणसाचे माणूसपण त्यांच्या विवेकशक्तीत सामावले आहे असे सांगणार्या आगरकरांवर माझी श्रद्धा आहे. या संघटनेचे संस्थापक कालवश डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल मला अतीव आदर आहे. डॉ. दाभोलकर व अंनिस संघटना यांचेशी असलेली बांधीलकी जपण्यासाठीच हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारीत आहे असे सांगून अॅड. अल्मेडा यांनी मिळालेल्या पुरस्काराची रक्कम महाराष्ट्र अंनिसला उदारपणे परत केली.
या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे अच्युत गोडबोले यांनी आजचा सत्कार हा योग्य माणसाचा सत्कार आहे असे सांगून अॅड. अल्मेडा यांचे अभिनंदन केले. अंनिसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, अल्मेडा प्रमाणेच तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना दाभोलकरांनी मानसिक बळ देण्याचे जे प्रेरक कार्य केले त्यामुळेच ही संघटना त्यांच्या मृत्यूनंतर कोलमडली नाही तर अधिक जोमाने वाटचाल करीत आहे. मंगळावर यान पाठविले म्हणून मंगळ कोपेल या भीतीने त्याची पूजा करणारे व देवाला नारळ फोडणारे लोक जोपर्यंत या देशात आहेत तोपर्यंत अंनिसला संघर्ष करावा लागेल अशा उपरोधिक शैलीत त्यांनी अंधश्रद्धा पसरविणार्यांवर टीका केली.
अॅड. अल्मेडा यांचा सन्मान हा समस्त वसईकरांचा सन्मान आहे असे सत्कार समारंभाचे अध्यक्ष गजानन खातू यांनी त्यांचे कौतुक केले. भारतीय स्वातंत्र्याची लढाई ही काळा कोटवाल्यांनी केली. आजची विवेकाची लढाई करण्यासाठी अशीच वकील मंडळी पुढे येत आहेत हे सुचिन्ह आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
–राहुल थोरात
अॅड. अतुल अल्मेडा यांचे मनोगत
ज्या पुरस्काराने आज आपण सर्व माझा सन्मान करत आहात त्या सन्मानाला मी पात्र आहे असे मला मुळीच वाटत नाही. माझे अगदी प्रामाणिक व प्रांजळ मत आहे की पुरस्काराच्या योग्यतेचे कार्य माझ्याकडून झाले आहे असे मला बिलकूल वाटत नाही.
साने गुरूजी म्हणाले, ‘माणसा, तू आज जिथं उभा आहेस तिथपर्यंत येण्यासाठी तुझ्या अगोदरच्या अनेक पिढ्यांनी आपले जीवन खर्ची घातले आहे. त्यांच्याशी कृतज्ञ राहा. एवढेच नव्हे तर तुझ्यापरीने मानवजातीचे जीवन सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न कर. आणि हे कार्य व्यक्ती म्हणून नव्हे तर समाजाचा घटक म्हणून कर.’ साने गुरूजींच्या या शिकवणुकीवर माझी श्रद्धा आहे, त्यामुळे जर काही असे कार्य माझ्यामुळे झाले असेल तर ते पुरस्काराकरीता नक्कीच नाही. तो माझ्या श्रद्धेचा भाग आहे.
ख्रिस्ताने व त्याच्या अगोदर सॉक्रेटिस व गौतम बुद्धाने माणसाने विवेकी जीवन जगावे म्हणून आपल्या शिकवणीने, वर्तणुकीने व आचरणाने धडे दिले आहेत. परंतु माणूस त्यांचे विचार व आदर्श स्वीकारण्याऐवजी त्यांच्याच नावाने कर्मकांडाचे गुलाम झाले आहेत. परिणामी माणसामध्ये भेदा-भेदीची संस्कृती उदयास आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून विषमतेची, असमानतेची कृती जोपासली गेली. रूजवली व वाढविली गेली. माणसाचे वेगवेगळे धर्म, पंथ, जाती, उच्च नीच भेद माणसाला शांततेने जगू देत नाहीत. तरी ते मोह सोडण्यास तयार नाहीत.
ख्रिस्ताने एक नवी आज्ञा त्यावेळी लोकांना-मानव समाजाला दिली होती, “तुम्ही स्वत:वरती प्रेम करता तसेच शेजार्यावर प्रेम करा.” व शेजारी कोण हे समजावून सांगतांंना गुड सॅमॅरीटनचा दाखला देऊन संकटग्रस्त व्यक्ती तुमचा शेजारी असू शकतो. ख्रिस्ताची हीच आज्ञा आपल्या भारतीय संस्कृतीत “सर्वांभूृती स्वत: पाहणे” म्हणून आहे.
किती ख्रिस्त लोक ख्रिस्ताला अपेक्षित असल्याप्रमाणे ख्रिस्ती आहेत? ख्रिस्ताच्या विवेकी विचाराला ख्रिस्त सभेने तिलांजली दिली म्हणून ख्रिस्त सभेची अनेक शकले झाली. एवढेच नव्हे तर समानतेची शिकवणूक देणार्या ख्रिस्ताची ख्रिस्त सभा रोमन साम्राज्यासारखी दिमाखदार असमानतेने उभी आहे.
ख्रिस्त सोडा आपले ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज किंबहुना आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, मदर तेरेसा त्याच्यासह गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर किंवा खलिल जिब्रान काय? सर्व एकच सूत्र सांगतात सर्व माणसं समान आहेत. मानवजात सुखी व्हायची असेल तर सगळे भेद नष्ट झाले पाहिजेत. पण ते होत नाही कारण माणसाला विवेकी बनायला वेळ नाही. पण माणसाला विचार करण्याला वेळच नाही. या सर्व महात्म्यांची माणूस पूजा करेल, पण त्यांचा विचार स्वीकारण्यासाठी विचार करणार नाही.
विवेकी विचारांची प्रगती युरोपात आपल्या अगोदर झाली. युरोपात झालेल्या प्रबोधन चळवळींतून प्रेरणा घेऊन आपल्याकडे 19 व्या, 20 व्या शतकांत जागृती निर्माण करणारे विचारवंत पुढे आले. यापैकी एक तेजस्वी दिपस्तंभ म्हणजे आगरकर. लोकमान्य टिळकांनाही विरोध करण्याची ताकद असलेले आगरकर सांगतात, “समाजातील व्यक्तीची विवेकशक्ती जागवली आणि क्रियाशील केली तर त्यांना माणूस म्हणून जगता येईल कारण माणसाचे माणुसपण त्याला निसर्गाने दिलेल्या विवेकशक्तीतच सामावलेले आहे.”
मा. आगरकरांच्या या विचारावर माझी श्रद्धा आहे. म्हणून हा त्यांच्या नावाने देण्यात येणारा सन्मान मी स्वीकारत आहे.
समाजात विविध भेद किंवा अनिष्ट रूढी किंवा परंपरा हे सर्व चुकीच्या समजुतीवर उभे आहे त्या कर्मकांडांच्या जंजाळातून माणसाला मुक्त केल्या शिवाय समाजात समता येणार नाही. हे ध्येय स्वीकारून, त्यासाठी संघटना बांधण्याचे कार्य ज्यांनी आपले उभे आयुष्य खर्ची घालून केले त्या डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या व्यक्तीमत्वाबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे. त्या अंनिसकडून हा पुरस्कार दिला जातोय म्हणून मी तो स्वीकारत आहे.
परंतु हा पुरस्कार व इथं हजर असलेल्या इथे हजर नसलेल्या पण डॉक्टरांच्या विचारांशी व संघटनेशी बांधिलकी मानणार्या सर्वांच्या वतीने मी स्वीकारला हे नमूद करतो.