Categories
प्रेरणा

अभिनंदनीय अनुकरणीय – दोन वेगळ्या नोंदीसाठी हे लेखन

मार्च - २०१२

चाळीसगाव येथील डॉ.श्याम महाजन यांचा मुलगा कुणाल याचा विवाह अलिकडेच संपन्न झाला. त्या प्रसंगी त्यांनी विवाह निमंत्रण पत्रिकेत पुढील उल्लेख केला होता.

‘अशा आनंद सोहळ्यात आहेर द्यावासा वाटणे अगदी स्वाभाविक असते, पण आपली उपस्थिती आणि शुभाशिर्वाद इतकंच आम्हाला हक्कानं हवं आहे. आहेरावर जो खर्च आपण करणार होता ती रक्कम आपली इच्छा असल्यास सोबत नमूद केलेल्या सामाजिक काम करणार्‍या संस्थांना दिल्यास, आम्हा सगळ्यांना आवडेल.’

यानंतर ज्ञानप्रबोधिनी पुणे, लोकबिरादरी प्रकल्प(हेमलकसा), अंधश्रद्धा निर्मूलन समिती या तीन संस्थांची नावे होती. या आवाहनातून जमा झालेल्या रकमेत डॉ.श्याम महाजन यांनी काही भर घालून रू.11000/- महाराष्ट्र अंनिसला दिले. स्वत:च्या मुलीच्या विवाहाच्या वेळीही ही हार्दिकता त्यांनी दाखविली होती. स्वत:च्या कुटुंबातील आनंद सोहळ्यात आपल्या संघटनेचे सक्रीय भान राखणे हे नक्कीच समितीसाठी आश्वासक व आनंददायी आहे.


            सत्यशोधक गो.पु.देशपांडे लिखीत अतुल पेठे दिग्दर्शित सत्यशोधकी जलशाच्या फॉर्ममधील नाटकाचा प्रयोग सातारला राज्यकार्यकारणीच्या सर्व उपस्थितांनी पाहिला. प्रयोग चांगला होता. गो.पु.देशपांडे यांच्यासारखा साक्षेपी अभ्यासू लेखक, नाट्यसंहितेला सादर करताना प्रा.हरी नरके, प्रा.सदानंद मोरे यांच्यासारख्या अभ्यासकाबरोबर झालेला विचारविनिमय यामुळे नाट्यसंहितेची बांधणी आशय व तपशील याबाबत चोख असणे स्वाभाविक होते. तरीही उमेश सूर्यवंशी या आपल्या कोल्हापुरच्या तरूण कार्यकर्त्याला त्यात काही त्रुटी आढळल्या. त्याबाबत त्यांनी अतुल पेठेंना कळविले. इतक्या तरूण वयात म.फुले यांच्या विचाराचा, समकालीन संदर्भाचा, आजच्या वास्तवाचा त्यांनी घेतलेला चिकित्सक वेध हा त्याच्या व्यासंगाचा दर्शन घडवणारा आहे. असे अभ्यासू तरूण कार्यकर्ते समितीत आहेत ही अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे हे पेठे यांना कळविताना त्यांनी ‘आपण समविचारी आहोत एकाच ध्येयाने काम करणारे आहोत’ हे आवर्जून कळवले. त्यांनी केलेल्या चार सूचना पेठे यांनी स्वीकारल्याही. आता नाटकात फातीमाबाईचा उल्लेख येईल, रामदास स्वामींचे फुले यांच्या तोंडातील काव्य जावून तेथे म.फुले यांचेच अखंड येतील. समितीच्या कार्यकर्त्यांनी डोळस चिकित्सक अभ्यासाबाबत आदर्श घ्यावा असे मला या घटनेचे मोल वाटते.

-डॉ.नरेंद्र दाभोलकर