Categories
कथा

आदर्श गाव….

वार्षिकांक – २०११

            डुंगाईच्या डोंगरातल्या बामनाच्या शेताच्या कडेवर असलेल्या देवीच्या मांडावर बसून परश्या बोललं, ते शाळा बुडवून शेळ्यांच्या मागं गेलेल्या चोथ्याच्या राम्यानं ऐकून गावभर केलं आणि गावानं पंचक्रोशित पोचवलं. मग घरात-घरात, चौकात, पाणोठ्यावर सगळ्यांचा चर्चेचा एकच विषय. ‘अड्याळच्या देवीला म्हनं गावात यायचे वेध लागलेत.’ म्हणजे त्याचं असं झालं, अड्याळ गाव हे सगळ्या गावच्या गावासारखंच एक गावढं गाव. अडीच-तीन हजार डोक्यांचं, बामणापासून महारांपर्यंत अठरा पगड जातीजमातीचं गाव. जमीन असलेली आणि नसलेलीही मातीतच राबायची. जमीन असलेले सुगीकडं पहात कढ काढायचे, नसलेले जमीन असलेल्यांच्या जीवावर त्यांनी सुगीत साठवल्या पैशावर दिवस ओढायचे. पाऊस जमिनीला आवश्यक म्हणून कधीकधी पडायचा. विहिरी उन्हाळ्यात जमिनीला पाडलेलं भोक म्हणून उरायच्या. बरीचशी माणसं नोकरीनिमित्त शहराकडं निघून गेलेली. शिकलेली माणसं पांढरपेशी झाली. बिन शिकलेली किंवा अर्धवट शाळा झालेली रोजगारी झाली. गावात उरलेल्यांनी काहीबाकी करत गावाला ‘आदर्श गाव’ म्हणून किताब मिळवायपर्यंत काम केलेलं. मग त्यात कळकळीनं राबवणारा वाकुजी गुरव होता. तसा पैशांसाठी कळकळणारा धोंडू गुरवही होता. पहिल्याचा परमार्थ तर दुसर्‍याचा स्वार्थ याची व्यावहारिक जोड घालत नोकरीत सन्मान वाढवत चाललेला ग्रामसेवक नुल्लेही त्यात महत्त्वाचा भागीदार होता. किताबाचं टोक गाठल्यावर आता पुढं काय या भावनेनं गाव पुन्हा गोंधळला. निव्यर्सनी झालेला वाकूबा पुन्हा व्यसनाकडे वळला, तर गावात कलागती लावून स्वतःच्या तुमड्या भरण्याच्या आपल्या मुळ पेशाकडं सरपंच धोंडबा वळला. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आदर्श गावचं प्रमाणपत्र लटकावून ग्रामसेवक नुल्ले झाल्या कामावर आता बढतीसाठी प्रयत्न करू लागला.

            आदर्श गाव प्रकरण लौकर संपल्याचं वाकूबाच्या बायकोला भारी दुःख झालं.

            हे प्रकरण लांबतंय की काय असं वाटून हैराण झालेल्या धोंडबाच्या बायकोला हायसं वाटलं.

            वाणी आळीतली शंकरव्वा म्हणाली, “लष्करच्या भाकर्‍या भाजायचा फुकट ताप संपला.”

            महार वाडयातली डोळ्यांत फुल पडून फुटावरचं देखील दिसेनासं झालेली ऐंशी वर्षांची हौशाबाई विव्हळली, “ गाव  पुन्यांदा मुळ वळणावर आलं.”

            आदर्श गाव होण्याआधी, आदर्श गाव झाल्यावर आणि आदर्श गाव होऊन संपल्यावर गावकर्‍यांवर बरेच परिणाम झालेले दिसत होते. त्यानुसार त्यांची मतं, विचार, दृष्टीकोन वगैरे यांत फेरफार होत होते; फक्त परिणाम झाला नव्हता तो परश्यावर आणि परश्यावर कमालीचा भाव असलेल्या गावाच्या श्रद्धेवर. कारण परशा थेट देवाचाच माणूस होता. आता आधुनिक वैद्यक शास्त्र त्याला मतिमंद किंवा वेडा ठरवेल. पण त्याच्याशी गावाला काही सोयरसुतक नाही. कारण परंपरेनं देव ही ‘गुढ’ गोष्ट आहे ; याची गावकर्‍यांना श्रद्धापूर्ण जाणीव आहे आणि सहजपणे न कळणारं काहीही हे देवाचंच असतं याबद्दल ठाम मतं. त्यामुळे परशा एखाद दुसरं वाक्य बोलायचा. त्याचा आपापल्या मगदूराप्रमाणे गावकरी अर्थ लावायचे आणि तो अर्थ प्रत्यक्षात आलेलाही पहायचे म्हणजे परशा जर अचानक ‘पाऊस’ म्हणून ओरडला आणि जर त्या दिवशी तो पडलाच तर गावकरी भक्तीभावाने म्हणायचे, ‘बघा, पाऊस आला. परश्याच्या वाचंत सिद्धी आहे.’ नाही पडला तर भक्तीपूर्ण खेदाने म्हणायचं, ‘ बघा, पाऊस गेला. परशाच्या तोंडानं देव बोलतो.’ यातला  ‘आला’ आणि ‘गेला’ हे शब्द परशानं उच्चारले नसले तरी लोक परिस्थितीजन्य पुराव्यासारखे वापरून परशाच्या मुखातला देवाचा ‘संदेश’ पूर्ण करायचे.

            डुंगाईच्या डोंगतरातल्या बामणाच्या शेताच्या कडेला असलेल्या देवीच्या मांडावर बसून परशा ते बोललं. आता हे बामणाच्या शेताचं सांगायचं राहूनच गेलं. गावातल्या मोजून दोन ब्राह्मण घरातल्या आप्पा कुलकर्णीचा हा भलामोठा साठ एकराचा डाग. पण वर गावाशेजारच्या डुंगाई नावाच्या – जरी गावकरी त्याला डोंगर म्हणत असले तरी- टेकाडावर सगळा खडकमाळ आणि तिथपर्यंत जायला धड रस्ताही नाही. दुसर्‍यांची वावरं तुडवत जायला लागायचं. परंपरेनं आप्पा कुलकर्णीच्या पिढीपर्यंत त्यांच्या घराण्यानं गावात सावकारकी केली. कुळकर्णीकी सांभाळली. परंपरेनं बामणांच्या घरात लिहिणं-आप्पांची पोरं शिकली. नोकरीसाठी शहरात गेली. पाठोपाठ आई-बापालाही घेऊन गेली. रिवाजाप्रमाणे त्यांनी गावातली घर, डोंगरातलं शेत विकून टाकून त्याचा पैसा करायचा प्रयत्न केला. घर गावातल्या पैसेवाल्या पाटलानं घेतलं. पण शेताची किंमत काही पोरांच्या मताप्रमाणे जुळेना. घेणार्‍याला वाटेतले जमिनमालक हेतूतः वाटही देईनात. आणि बामणाचं शेत आपल्या उद्धारकर्त्यांच्या वाट पाहत तिथं वर्षानुवर्षे पडून होतं. त्याच्याच वरच्या बाजूला एक शेंदूर लावलेला उंच गोटा होता. गावकर्‍यांचा असा समज होता की सौंदतीची यल्लमा गावच्या एका देवदासीबरोबर अड्याळला यायला निघाली. अट होती, देवदासीनं आपलं चौंडकं अखंड वाजवत राहायचं. इथं बामणाच्या शेताजवळ आल्यावर चौंडक्याची तार तुटली आणि आवाज थांबला. तशी देवीही थांबली. देवदासीनं विनवण्या करून प्राण सोडला. पण देवी रूसून तिथं थांबली ती थांबलीच. मग गावकरीच सर्व पौर्णिमांना तिला लिंबू-नारळ द्यायला काट्याकुट्यातनं दगड तुडवत जायचे. त्या देवीला म्हणे आता गावात यावसं वाटायला लागलंय, असं परश्याच्या तोंडातनं तिच बोलली होती. राम्यानं ते ऐकलं आणि अवघं गाव दुश्चीत झालं.

            सरपंचकीच्या अधिकारात धोंडबा गुरवानं रात्री महादेवाच्या देवळात गावसभा जमवली. थेट देवीचा विषय असल्यानं सगळी विनातक्रार जमून आपापल्या पायरीप्रमाणं गाभार्‍यात, व्हरांड्यात आणि अंगणात बसली, उभी राहिली. वाकोबा नेहमीप्रमाणं थोडी सरकारी लावूनच आला. निदान देवळात तरी कोरं जावा असं बायको कोकलत होती. तर देवादिक देखील हे अमृत पिऊनच राहयचे आणि हा तर महादेव- असं काहीसं बरळत वाकोबा सरकारी दुकानात जाऊन एक क्वार्टर ढोसूनच देवळाकडं वळला. गाभार्‍यातल्या पिंडीला डोकं टेकून धोंडबाला म्हणाला, “हा आता होऊ दे तुझी सुरुवात.”        

            धोंडबानं निवडणुकीत भाषण केल्यासारखं सगळं बयाजवार सांगितलं. देवीचा इतिहास, देवीचा कोप, आणि आशीर्वाद, गावाचं भलंबुरं अगदी सगळं आडवं-तिडवं. देवीच्या गृहित कोपाला गावकर्‍यांचं हृदय कापत होतं, तर देवी गावात येणं म्हणजे गावाला, पर्यायानं आपल्यालाही बरकत येणं. या भावनेनं त्याचं मन भरूनही येत होतं. मग गावची कुंडली मांडून गुजराण करणार्‍या, ब्राह्मणांच्या दोन घरांपैकी आता एकुलत्या उरलेल्या जोशीबुवांनीही थेट देवीची कुंडली मांडून जाहीर केलं की, गावात देवी आणली तर दरवर्षी तिची यात्रा करावी लागेल. तिचं मंदिर बांधावं लागेल आणि दर पौर्णिमेला तिची मांडापर्यंत पालखी न्यावी लागेल आणि जर आपण हे केलं नाही तर एक दिवस सगळं गाव बामणाच्या शेतासारखं ओसाड झालेलं आपल्याला पाहावं लागेल.

            देवीच्या इच्छेपुढं मानवी मताचा काय पाड? देवीला गावात आणायच्या निर्णयाला विरोध करायचा तर स्वतःच नरक मागून घेणं. येत्या पौर्णिमेला गावात देवीला बसवायचं. सद्या छोटंसं, आणि लवकरच मोठंसं देऊळ बांधायचे. तिची पूजाअर्चा एकुलत्या एक जोशीबुवांनी वंशपरंपरेने करायची. एक कायमस्वरूपी पंचमंडळ, ज्याचा वाकोबा गुरव तहहयात अध्यक्ष तर धोंडबा गुरव खजिनदार. गावकर्‍यांनी दरडोई पट्टी काढून, मुंबईकर ग्रामस्थांना साद घालून वर्गणी गोळा करायची. पंचक्रोशीतून भाविकांची भक्ती वर्गणीतून जमवायची. मांडापासून मंदिरापर्यंत श्रमदानाने रस्ता करायचा. त्यासाठी मधल्या शेतकर्‍यांनी आपल्या शेतातून वाट द्यायची. वगैरे ठराव होऊन गावकरी अस्वस्थ मनाने तर धोंडबा स्वस्थ मनाने घराकडे परतले.

            ठरल्याप्रमाणे सांगितलेली वर्गणी विनातक्रार धोंडबाकडे जमा होऊ लागली.

            लोकांनी श्रमदानाने बामणाच्या शेतापासून गावाच्या मध्यवर्ती देवी बसवलेल्या चौकापर्यंत ट्रक जावू शकेल असा भलामोठा रस्ता तयार केला.

            पौर्णिमेला मोठ्या उत्साहात मांडावरनं देवीला गावात आणलं. गावच काय? अख्खी पंचक्रोशी देवीचा महाप्रसाद पोटभर जेवली. एकट्या धोंडबानं स्वखर्चाने दहा हजार बुंदीचे लाडू वाटले.

            गावावरची देवीची अवकृपा टळली म्हणून गाव निश्चिंत झालं.

            आणखीही काही घडलं,

            राम्याच्या अंगावर नवी शर्ट-चड्डी आली.

            वाकोबा देशीवरून इंग्रजीकडे वळला.

            धोंडबाच्या बायकोच्या गळ्यात आठ तोळ्यांचं ठसठशीत गंठण चमकू लागलं.

            बामणाचं शेत उद्योगपती शेखावतनं वीस कोटी रुपयांना घेतलं. त्याला तिथं भलं दांडगं शैक्षणिक संकुल उभं करायचयं.

            शिवाय जोशीबुवा आता आपला फाटका जाडाभरडा पंचा सोडून रेशमी लालेलाल कद नेसू लागले.

            अखेर ते आदर्शच गाव आहे ना !…..

राजा शिरगुप्पे