Categories
व्यक्तिविशेष

… आणि माझा विरोध मावळला!

ऑगस्ट २०१९

गोरगरीब, दीनदुबळ्यांची, रंजल्या-गांजल्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी डॉक्टर आयुष्यभर झटले. कुणी कितीही कठोर शब्दांत बोलले, तरी डॉक्टरांचा आवाज कधी वाढला नाही. म्हणून ‘मृदू सबाह्य नवनीत। तैसे सज्जनाचे चित्त॥’ हे वचन त्यांच्यासाठी लागू होते.

ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर

मृदू सबाह्य नवनीत।

तैसे सज्जनाचे चित्त॥

तुकाराम महाराज यांनी सज्जनाचे केलेले वर्णन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना लागू होते, असा ‘साक्षात्कार’ त्या दिवशी मला झाला. खरे तर त्यापूर्वी डॉक्टरांच्या बद्दल माझ्या मनात खूप मोठ्या प्रमाणात अढी होतीच. आजही अनेक वारकर्‍यांच्या मनात तशीच अढी कायम आहे. अर्थात, माझ्या मनातील अढी दूर झाल्यानंतर मी अनेक वारकर्‍यांच्या मनातील डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल असलेला पूर्वग्रह दूर केला आहे, करीत आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि वारकरी संप्रदाय करीत असलेले कार्य परस्परपूरक आहे; परंतु हे दोन्ही घटक एकमेकांच्या जवळ आले नाहीत. हे जवळ आले, तर देवाच्या आणि धर्माच्या नावावर आपल्या पोळ्या भाजून घेणार्‍यांचे पितळ नक्कीच उघडे पडेल, हे अशा पोळ्या भाजून घेणार्‍यांनाही माहीत आहे. त्यामुळेच वारकरी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यात जास्तीत जास्त दरी कशी निर्माण होईल, ती वाढत कशी जाईल, असा सतत प्रयत्न काही मंडळी करीत असतात; मात्र आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते स्वत:हून ही दरी दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, ही खूप सकारात्मक घटना आहे, असे म्हणावे लागेल.

वारकरी संतांनी ज्या अंधश्रद्धांच्या विरोधात सातशे वर्षे जागर केला, तेच काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे; मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही आपल्या धर्माच्या विरोधात आहे, असे वातावरण निर्माण केले जाते. जादूटोणाविरोधी कायद्याची लढाई जेव्हा सुरू होती, तेव्हा तर खूपच गैरसमज पसरविण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला तसा सामान्य वारकर्‍यांचा कोणताही विरोध नव्हता; पण ज्या संस्थांना देवा-धर्माच्या नावाने आपली वर्चस्ववादी व्यवस्था लादायची आहे. त्या संस्था वारकर्‍यांचे नाव घेऊन कायद्याला विरोध करीत होत्या. ज्या वारकर्‍यांना कायद्याबद्दल फार माहिती नाही; अशा वारकर्‍यांची दिशाभूल केली जात होती. कायद्याला विरोध करणारे पत्रक त्या संस्थाच वारकर्‍यांच्या नावाने काढत होत्या. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असले की, मग कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन व्हायचे. अधिवेशन मुंबईत असले, तर आझाद मैदानावर आंदोलन होत असे. या कायद्याला प्रामुख्याने सनातन संस्थेचा विरोध होता. ते आझाद मैदानावर आंदोलन करीत. त्यात वारकर्‍यांचा सहभाग असे दाखविण्यासाठी काही वारकर्‍यांना तिथे काही वेळासाठी आणले जायचे. मी विधानभवनातच पत्रकारिता करीत असल्याने मलाही अनेकदा या आंदोलनाला पाठिंबा द्यायला घेऊन जायचे. तिथे चार-दोन वारकरी सुद्धा नसत. मात्र संध्याकाळी प्रेस नोट निघायची आणि त्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला वारकर्‍याचा तीव्र विरोध’, ‘वारकर्‍यांचा आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा’ असा मजकूर प्रसार माध्यमांकडे पाठविला जायचा. त्यात प्रेसनोटमध्ये माझे नाव प्रामुख्याने ट्रेनमध्ये घेतले जायचे.

मी दैनिक ‘प्रहार’साठी राजकीय पत्रकार म्हणून काम करीत होतो. प्रमोद चुुंचूवार हेही माझ्यासोबत राजकीय बातमीदार म्हणून ‘प्रहार’मध्ये काम करीत होते. त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला पाठिंबा होता. त्यांचे मित्र (आता ते माझेही मित्र आहेत) पुरुषोत्तम आवारे-पाटील हे दोघे मला हा कायदा कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या कसा विरोधात नाही, हे समजून सांगण्याचा प्रयत्न करीत; पण माझ्या मनातील अढी काही कमी होत नव्हती. ज्यावेळी अधिवेशन असेल, त्यावेळी चर्चा मोठ्या प्रमाणात होत असे. हिवाळी अधिवेशन नागपूरला असताना आम्ही मुंबईचे पत्रकार एकत्र राहत असू. मी आणि प्रमोद चुंचूवार एकाच खोलीत राहायचो. त्यांनीच सुचविले की, तुम्ही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी एकदा या विषयावर बोला. अधिवेशन असले की, डॉक्टर हमखास विधान भवनात येऊन कायदा व्हावा, यासाठी पाठपुरावा करायचे, ते एकदा विधान भवनात आले, तेव्हा प्रमोद चुंचूवार यांनी माझी त्यांच्याशी भेट घालून दिली. मी जरा त्वेषात प्रश्न विचारत होतो. तुम्ही फक्त हिंदूंच्याच परंपरांना कसा विरोध करता? तुमच्या या कायद्यामुळे आमची पंढरीची वारी धोक्यात येईल, जाणीवपूर्वक तुम्ही आमच्याच श्रद्धा स्थानांवर घाला घालता, असे मी तावातावाने बोलत होतो.

त्यात वारकरी आणि पत्रकार असल्याचाही तोरा होता. मी जितक्या त्वेषाने बोलत होतो. डॉक्टर चेहर्‍यावरील स्मित हास्य अधिक ठळक करीत माझे बोलणे ऐकत होते. मी जरा थांबलो, तेव्हा म्हणाले, ‘तुमचं झालं असेल, तर मी थोडं बोलू का?’

… आणि मग त्यांनी कायद्याचे स्वरूप मला समजून सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला ते म्हणाले की, ‘ज्या गोष्टींना संतांनी विरोध केला आहे. त्याच गोष्टीला कायद्याने प्रतिबंध येणार आहे. समाजामध्ये काही लोक मीच देव आहे किंवा माझ्याकडे दैवी शक्ती आहे, असे सांगून स्त्रियांचे शोषण करतात. त्याला वारकरी संतांनी विरोध केला आहे की काही?’

मी म्हणालो, ‘हो, स्वत: तुकाराम महाराज यांनी असे ढोंग करून स्त्रियांचे शोषण करणार्‍यांना भोंदू म्हटले आहे.’ ‘ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू’ हा अभंग मीच म्हणून दाखविला. मग ते म्हणाले कायद्यात यालाच विरोध केला आहे.

‘देवाला नवस करून नरबळी अथवा पशुबळी देण्याला संतांनी विरोध केला आहे की, नाही? तुम्ही कधी नवस करता का?’ डॉक्टरांनी अत्यंत शांतपणे मला विचारले. आता माझा पारा बराच खाली आलेला होता. मी म्हणालो, मीच काय कोणताच वारकरी नवस करीत नाहीत, असे म्हणून मीच मग अभंग सांगितला, ‘नवसे कन्या पुत्र होती। तरी करणे लागे पती॥’

मग हेच कायद्यात म्हटलं आहे. तर मंत्राने रोग बरा होतो, यावर तुमचा विश्वास आहे का? असे डॉक्टरांनी अधिक शांतपणे आणि चेहर्‍यावरील स्मित रेषा अधिक ठळक करीत विचारले. मी म्हणालो, ‘अजिबात नाही’. मग मीच ज्ञानेश्वरीतील ओवी सांगितली,

का मंत्रेची वैरी मरे। तरी का वायाची बांधावी कट्यारे।

रोग जाय दूध साखरे। तरी निंब का पियावा॥”

डॉक्टर म्हणाले, ‘बघा, संतांनी जे सांगितले आहे, तेच आम्ही कायद्यात बसवलं आहे. मग आम्ही संतांचेच काम पुढे नेत नाही काय?’ त्यांच्या प्रश्नावर मला फार बोलता आले नाही. मग चर्चा होत गेल्या भेटीगाठी वाढल्या. कायद्याचे महत्त्व मलाही पटले. मग मी तरुण वारकर्‍यांचा व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप करून त्यांच्याशी चर्चा वाढविली. काही ज्येष्ठ वारकर्‍यांशी प्रत्यक्ष चर्चा केली; पण त्याच वेळी सनातन संस्थेचे लोकही आक्रमक झाले होते. ते वारकरी, फडकरी यांच्या भेटीगाठी घेऊन कायद्याला विरोध करण्यासाठी मोठा मोर्चा काढण्याच्या तयारीत होते. तेव्हा मीही अशा मोर्चात आपण सहभागी होऊ नये, असे या ज्येष्ठ वारकर्‍यांना समजून सांगत होतो. मी पुढे माझ्या ‘वारकरी सेवा प्रतिष्ठान’ या संस्थेचा या कायद्याला पाठिंबा असल्याचेही जाहीर केले. वारकर्‍यांसोबत सरकारच्या झालेल्या अनेक बैठकांना मी उपस्थित राहिलो. त्यात सर्व वारकर्‍यांचा कायद्याला विरोध नाही हे ठासून सांगितले. या कायद्याला सर्वच वारकर्‍यांचा विरोध असल्याची सरकारच्या मनातील धास्ती कमी झाली. आता वारकर्‍यांचा विरोध कमी झाला आहे, अशी सरकारला खात्री पटली. पुढच्या अधिवेशनात कायद्याचे विधेयक सभागृहात मांडण्याची सरकारकडून पूर्ण तयारी झाली होती. मात्र दुर्दैवाने हे विधेयक सभागृहात येण्यापूर्वीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. मला खूप मोठा धक्का बसला. आपण डॉक्टरांना समजून घेण्यास उशीर केला. ते थोडे अगोदर झाले असते, तर वारकर्‍यांचा कायद्याला फार मोठा विरोध आहे, हा सरकारच्या मनातील समज जरा अगोदर दूर करता आला असता. एक अधिवेशन अगोदर कायदा झाला असता, तर कदाचित डॉक्टरांची हत्या टळली असती, अशी खंत मला बोचत राहिली आहे.

गोरगरीब दीनदुबळ्यांची, रंजल्या-गांजल्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी डॉक्टर आयुष्यभर झटले. कुणी कितीही कठोर शब्दांत बोलले, तरी डॉक्टरांचा आवाज कधी वाढला नाही. म्हणून ‘मृदू सबाह्य नवनीत। तैसे सज्जनाचे चित्त॥’ हे वचन त्यांच्यासाठी लागू होते. त्यांचे राहिलेले काम करण्यासाठी जी मंडळी धडपडत आहेत, त्यांच्या सोबत राहण्याचा मी आता निर्धार केला आहे. तीच माझ्याकडून डॉक्टरांना श्रद्धांजली असेल.