Categories
व्यक्तिविशेष

निर्मळ आणि निर्भीड!

ऑगस्ट २०१९

मला डॉक्टर आवडतात. कारण त्यांनी कुठल्या व्यक्तीवर, धर्मावर किंवा संस्थेवर राग म्हणून काम केलं नाही. सदैव सामान्य माणसाच्या कल्याणाची कास धरली. हजारो कार्यकर्त्यांना लढण्याचं बळ दिलं. अशा फार कमी संघटना आहेत, ज्या आपल्या संस्थापकाच्या निधनानंतरही त्याच जोमाने काम करताना दिसतात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यातली महत्त्वाची. कारण डॉक्टरांनी सच्ची आणि तळमळ असलेली माणसं निवडली. वैचारिक बैठक पक्की असलेली माणसं आपला मार्ग सहसा सोडत नाहीत. आपण सगळे डॉक्टरांच्या विचाराने, त्यांच्यावरच्या प्रेमाने एकमेकांच्या संपर्कात असलेली माणसं आहोत.

अरविंद जगताप

डॉ. नरेंद्र दाभोलकर. त्यांना भेटायच्या आधी फक्त हे नाव डोक्यात यायचं आणि सोबत असंख्य विचार. का हा माणूस असा एकटा अंधश्रद्धेच्या विरोधात लढतोय? खाजगी गप्पांमध्ये लोक दाभोलकरांना फक्त हिंदू धर्म दिसतो का, असं विचारायचे. त्यांनी इतर धर्माबद्दल बोलायला पाहिजे, आंदोलन करायला पाहिजे असं म्हणायचे; पण त्यांच्याबद्दल खूप राग आहे, असं कधीच वाटलं नाही. खरंतर आधीच्या सत्ताधारी लोकांनी त्यांच्या चळवळीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं. ज्यांनी त्यांच्या कामात आस्था दाखवली ते शांतपणे डॉक्टरांसोबत काम करत राहिले किंवा त्यांचा विचार आपल्या भागात, आपल्या गावात पुढे नेत राहिले; पण ज्या दिवशी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यादिवशी जाणवलं की, काही लोकांना राग होता. नक्कीच होता; पण तो एवढ्या टोकाचा आणि भ्याड होता हे जाणवलं नव्हतं. नंतर लोक जाहीरपणे विरोधात लिहू लागले, बोलू लागले. बारकाईने बघितलं तर दाभोलकरांना विरोध त्यांच्या हत्येनंतर जास्त होऊ लागला. तोही सोशल मीडियावर आणि तो प्रचाराचा भाग असल्यासारखा होता. खरं तर अपराध भावनेतून लोक जसा कणाहीन निरर्थक बचाव करू लागतात, तसाच प्रकार होता तो. गांधीजींच्या हत्येचं ज्याप्रकारे आजकाल उघड समर्थन करायची हिंमत वाढलीय, तसा प्रकार. खरं तर गांधीजींच्या हत्येचं समर्थन केल्यावर कुणी हिंसक उत्तर दिलेलं नव्हतं. तरीही ते धाडस कुणात नव्हतं. हळूहळू ते धाडस यायला लागलं आणि मग बंदूक हातात घेऊन पुन्हा गांधीजींच्या चित्रावर गोळ्या घालण्याएवढी विकृती आली. खरं तर दोनच मेंदू असतात. एक छोटा आणि एक मोठा; पण काही लोकांच्या डोक्यात एक सडका मेंदूपण असतो. अशी माणसं उजेडात येऊ लागली. मीडिया त्यांना प्रसिद्धी देऊ लागला. हे सगळं सांगायचं कारण आपण दाभोलकरांना गमावल्याने आणखी काय काय गमावलंय हे समजून घेतलं पाहिजे.

दाभोलकरांना मी एकदाच भेटलो. ‘खुपते तिथे गुप्ते’ मालिका लिहीत होतो. म्हणजे त्यात प्रश्न वगैरे काढायची जबाबदारी असायची. त्या निमित्ताने त्यांच्याशी बोलण झालं. भेट झाली. मला ते खूप गंभीर असतील, असं वाटलं होतं; पण अतिशय आपुलकीने बोलणारे डॉक्टर मन जिंकून गेले. त्या दिवशीपण त्यांनी आपण देवाला विरोध करतो, ही कशी पद्धतशीर अफवा आहे, हे सविस्तर सांगितलं; पण दाभोलकर ज्यांना समजले त्यांनी प्रत्यक्ष काम केलं. ज्यांना समजले नाही त्यांनी त्यांच्या बदनामीचं काम केलं. दाभोलकर यांनी लोकांना कामाला लावलं. खूप लोकांचं पटलं नाही की, लोक दुर्लक्ष करतात; पण डॉक्टर दुर्लक्ष करण्यासारखे नव्हते. ते सामान्य माणसाच्या खूप जवळच्या प्रश्नावर काम करत होते. अंधश्रद्धेपोटी एकेकाळी देवीची लस टोचून घ्यायला नकार देणार्‍या लोकांचा इतिहास आहे देशात. पोलिओ, नसबंदीसारख्या गोष्टीला पण विरोध झालाय. साप, विंचू चावल्यावर दवाखान्यात जायचं असतं, हे सांगायला खूप कष्ट घ्यावे लागले लोकांना. असं म्हणतात की, स्वातंत्र्याची तारीख पण अशुभ आहे, असा काही ज्योतिषांनी दावा केला होता. दुसर्‍या दिवशी स्वातंत्र्य घ्या, अशी मागणी केली होती. अशा वातावरणात अंधश्रद्धेला विरोध करणे ही किती मोठी कामगिरी होती, हे लक्षात येतं; पण डॉक्टरांशी बोलताना त्यांना आपण काहीतरी विशेष केलंय किंवा करतोय याचा कुठलाच आविर्भाव जाणवला नाही. माणसाने किती साधं असावं, तर त्यांच्यासारखं. आपल्या कामाविषयी किती तळमळ असावी तर त्यांच्यासारखी. डॉक्टरांनी महाराष्ट्रात अक्षरशः एकहाती जाळे उभे केले कार्यकर्त्यांचे. कुठल्याही एका माणसाने एवढी मोठी संघटना उभारणे ही साधी गोष्ट नाही. एकतर असे प्रयोग फसतात किंवा अशी माणसं स्वतःला देव समजायला लागतात; पण डॉक्टरांच्या बाबतीत असं काही झालं नाही; पण मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की, त्यांच्या या संघटन कौशल्याचं आपण म्हणावं तेवढ कौतुक केलं नाही. त्याची नीट नोंद घेतली नाही. एका माणसाने एवढी मोठी संघटना बांधणे ही अभूतपूर्व गोष्ट आहे. या गोष्टीवर स्वतंत्रपणे लिहायला पाहिजे.

आपल्याकडे स्त्रियांच्या बाबतीत तळमळीने काम करणार्‍या लोकांना स्त्रियांनी फार डोक्यावर घेतलेलं नाही. म्हणजे सावित्रीबाई फुले, जोतिबा, महर्षी कर्वे यांच्या कामाची दखल मुलींच्या नवीन पिढीने वारंवार घ्यायला हवी; पण हे प्रमाण तुलनेने खूप कमी आहे. याचं कारण वाचन, शिक्षणपद्धती असं नाही फक्त. आपल्या आदर्शांबद्दल आपण नव्या पिढीला सांगण्यात कमी पडलोय. आपण आपल्या माणसांच्या मोठेपणाच्या गोष्टी लिहिण्यात, बोलण्यात खूप काटकसर करतो. डॉक्टरांनी सुरू केलेल्या चळवळीमुळे महाराष्ट्रातल्या लाखो स्त्रियांना खूप दिलासा मिळालाय. त्यांच्या जगण्यात बदल झालाय. भोंदूगिरी आणि बुवाबाजीचा सगळ्यात जास्त तोटा होतो तो स्त्रियांना. या बाजूने दाभोलकरांचं महत्त्व अजून आपण नीटपणे मांडू शकलो नाही. चळवळीत काम करताना एक सगळ्यात मोठा धोका हा असतो की, आपण जी भूमिका घेतलीय, आपण जे विचार मांडतोय, ते सगळ्यांना माहीत झाले आहेत, असं आपण गृहीत धरू लागतो; पण तसं नसतं. उलट नवीन पिढी जास्तीत जास्त आपल्या स्वतःच्या समस्येपासून दूर जातेय. गुगल आणि इतर गोष्टींमुळे अमेरिकेत आणि युरोपात काय चालू आहे हे सहज कळतंय; पण गावोगाव काय चालू आहे, ते मात्र लक्षात येत नाही. कारण ते सहजासहजी मीडियात येत नाही. गुगलवर सापडत नाही. म्हणून आजही बहिष्कार आणि भोंदूबाबा सारख्या घटना घडतात. या काळातही कुठेतरी मूर्ती सापडल्याची अफवा पसरते आणि गावंच्या गावं तिथे गर्दी करू लागतात. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी यज्ञ करणे म्हणजे खेळाडूंवरचं प्रेम आहे की खेळाडूंवरचा अविश्वास? साध्या सध्या गोष्टी आजही अस्वस्थ करतात. क्रिकेटचा सामना चालू असताना षटकार गेल्यावर आपण ज्या जागेवर बसलोय त्या जागेवरून लोक उठतच नाहीत. काय तर ती जागा लकी आहे, हे भयंकर आहे. अशी मानसिकताच आपल्याला कमकुवत बनवत जाते. या अशा आधुनिक अंधश्रद्धा आणि नव्या पिढीमधली जागरूकता यावर चळवळीला लक्ष द्यावं लागणार आहे. नाहीतर नवी पिढी आपली कायम ‘टच वूड’ करत राहील. माझ्या ओळखीचा एकजण लाकूड नाही भेटलं तर कुणाच्या तरी डोक्यावर हात ठेवून ‘टच वूड’ म्हणतो. एक जण श्ररिीेिं ला अगरबत्ती लावतो. अशा हास्यास्पद गोष्टी तंत्रज्ञानाचा पण अपमान करणार्‍या आहेत. यावर उपाय काय आहे?

डॉक्टर आपला संयम न गमावता बोलायचे, विचलित न होता आपले मुद्दे मांडायचे. त्यांची मतं अभ्यासातून आलेली असायची. त्यांनी विरोधासाठी विरोध केला नाही. मला डॉक्टर आवडतात. कारण त्यांनी कुठल्या व्यक्तीवर, धर्मावर किंवा संस्थेवर राग म्हणून काम केलं नाही. सदैव सामान्य माणसाच्या कल्याणाची कास धरली. हजारो कार्यकर्त्यांना लढण्याचं बळ दिलं. अशा फार कमी संघटना आहेत, ज्या आपल्या संस्थापकाच्या निधनानंतरही त्याच जोमाने काम करताना दिसतात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यातली महत्त्वाची. कारण डॉक्टरांनी सच्ची आणि तळमळ असलेली माणसं निवडली. वैचारिक बैठक पक्की असलेली माणसं आपला मार्ग सहसा सोडत नाहीत. आपण सगळे डॉक्टरांच्या विचाराने, त्यांच्या वरच्या प्रेमाने एकमेकांच्या संपर्कात असलेली माणसं आहोत. आपले डॉक्टर चांगले असणं हे आपल्या उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. कारण योग्य डॉक्टरच्या सहवासात नसलं की, काय होऊ शकतं, हे आपण बघतोच आहोत. आपल्या विवेकाच्या लढाईला यश मिळो.

खूप इच्छा असूनही डॉक्टरांच्या भेटीबद्दल लिहिलं नाही. त्यांचा साधेपणा आणि सच्चेपणा एवढा भावला की, त्या एका भेटीत त्यांचा चाहता झालो. मोठ्या माणसावर लिहिता-लिहिता आपलंच पाल्हाळ लावायला कधी सुरुवात होते कळत नाही. आणखी एक. त्यांच्यासारखं प्रसन्न हसता यायला हवं, त्यासाठी आतून खूप निर्मळ आणि निर्भीड असायला लागतं आणि असं असण्याचा बाजारात कुठला कोर्स पण नाही. तसं जगायलाच लागतं. त्या भेटीत डॉक्टर म्हणाले होते, मी वेगळं काही केलं नाही. मला आजार दिसला. मी डॉक्टर आहे. लक्षणं सांगितली. उपाय सांगायचं काम केलंय. आता बाकी कामं नव्या पिढीने करायची. त्यातलं महत्त्वाचं काम आहे जागरूकता. ते आपण करत राहूया. हाच खरा विचारांचा जागर.