अंनिसचे नवे विद्यापीठ अंनिसला जगाशी जोडणारा एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाधारीत प्रयोग परिवार असेल. काय आहे ही प्रणाली?
अंनिस दोन मार्गांनी समाजात परिवर्तन करू पहाणारी संघटना आहे. पहिला मार्ग आहे चळवळीचा म्हणजे Agitational way. दुसरा आहे शैक्षणिक जो मत परिवर्तन घडवू शकतो.
नव्या आभासी विद्यापीठाद्वारे(Virtual University) शिक्षणाच्या माध्यमातून माणूस बदलण्याचा प्रयत्न साकार करता येणे शक्य आहे. शांततामय सहकार्याद्वारे मूकपणे बदल करण्यासाठी ऑन लाईन प्लॅटफॉर्म कोर्सची आखणी करता येईल जी संपूर्ण समाजाला(Mass) कवेत घेऊ शकेल. या मार्गाला Massive open on-line course म्हणजेच MOOC असे नाव आहे. मूक(MOOC) चा इंडियन फॉर्म अंनिसच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वापरता येईल.
शिक्षणाची नवी संकल्पना यासाठी समजून घ्यावी लागेल. 21 व्या शतकात अंनिसप्रेमी व कार्यकर्ते यांचा एक विशाल समूह ‘मूक’ चा परिवार असेल व संपूर्ण जगातील विचारवंत व सामाजिक हितचिंतक यांच्यात द्विमार्गी वैचारिक देवाणघेवाण ‘मूक’द्वारे आकाराला येऊ शकेल. विधायक क्रांती घडवून नव्या मूल्यावर आधारीत वैज्ञानिक पद्धतीद्वारा समाजरचना आकाराला येणे हे तसे भव्य स्वप्न आहे. पण संगणक व इंटरनेट तंत्रज्ञानामुळे हे घडवून आणणे शक्य आहे. या क्रांतीकारक बदलासाठी शिक्षण पद्धतीत येत असलेला बदल प्रथम नीट समजून घ्यायला हवा. जुनी शिक्षण व्यवस्था अध्यापक केंद्रीत आहे. येथे ज्ञान देणारा महत्वाचा. ज्ञान घेणार्याने फक्त ऐकायचे(व सोडून द्यायचे?) शिक्षक अॅक्टीव तर शिकणारा पॅसीव्ह. काय शिकायचे ते अगोदरच ठरलेले. प्रश्नांची उत्तरे अगोदरच निश्चित झालेली. शिक्षकांनी फक्त त्या उत्तरांचे स्पष्टीकरण द्यायचे. विद्यार्थ्यांनी सहसा प्रश्न उपस्थित करायचे नाहीत. शिक्षकांनी दिलेले प्रवचन मुलांनी स्मरणात ठेवायचे व परीक्षा द्यायची. थोडक्यात ही शिक्षण पद्धती बंद स्वरूपाची म्हणजे क्लोज एण्डेड(Close ended) आहे. एका शिक्षणतज्ञाने या पद्धतीतील उणीवावर बोट ठेवताना छान उदाहरण दिलंय. माकडाला टाईप करायला लावलं तर एखादे वेळी त्याच्या हातून शेक्सपिअरचे सुनीत टाईप होऊ शकेल. याचा अर्थ त्या माकडाला शेक्सपिअर कळला असा होत नाही.
पण यापेक्षा शिक्षणात एक नवा विचार सर्वत्र मांडला जाऊ लागलाय. एक शिक्षकी व ठराविक विद्यार्थ्यांची खोली बंद शाळा ही कालबाह्य कल्पना मानली जाऊ लागलीय. आता शिक्षण परिवार ही संकल्पना वापरायला हवी. या व्यवस्थेत इंटरनेटद्वारे ज्ञानाची आस असणारे व स्वत:त बदल घडवू इच्छिणारे परस्परांना जोडले जातील. ही बिन भिंतीची शाळा असेल. हा प्रयोग परिवार असेल. या परिवारात लोकल पातळीवर प्रश्न निर्माण केले जातील. या प्रश्नांबद्दलची चर्चा व त्याची सोडवणूक यासाठी परस्पर संपर्क केला जाईल. आपण अनेकांशी जोडले जाऊ. जगातील विचारवंत आपल्या बरोबर असतील. प्रयोग परिवारात गरजेनुसार प्रश्नांची चर्चा घडेल. येथे प्रत्येकजण अॅक्टीव्ह असेल. प्रश्न सोडविण्याचा नवा मार्ग कुठूनही आपल्यापर्यंत पोचेल. त्याला अंतराची किंवा वेळेची सीमा असणार नाही.
प्रयोग-परिवारासाठी इंटरनेट व संगणकाद्वारे नेटवर्कींग केले जाईल व यामधून शिक्षण क्रियेचे आभासी म्हणजेच व्हर्च्युअल विद्यापीठ निर्माण होईल. ते आभासी का? तर त्याचे मध्यवर्ती कार्यालय असणार नाही. त्यात काम करणारे शिक्षक व विद्यार्थी समोरासमोर असणार नाहीत पण शिक्षण कृती मात्र घडत असेल.
अंनिस नवा विचार समाज मानसात रूजविण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा सध्या अवलंब करीत आहे. व्याख्याने, शिबीरे, ग्रंथप्रसार इ. हे प्रबोधन यश प्राप्ती करते पण त्याला मर्यादा पडतात कारण असे प्रबोधन हे एकमार्गी वरून लादलेल्या जुन्या शिक्षण प्रणाली सारखेच आहे. अंनिस चळवळ वेगाने वाढत नाही याचे हे प्रमुख कारण असावे. उलट लोकांनीच प्रश्न उपस्थित केले तर त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना चालना मिळेल व त्याच्याशी संबंधित जाळे आकार घेईल. यातून जो बदल घडेल तो आंतरीक व कायमस्वरूपी असेल.