30 जुलै 2011 टाळ्यांच्या गजरात, 82 वर्षांच्या जादुगाराने आपला जादुचा प्रयोग सोलापूरच्या ‘सिनियर सिटीझन’ मेळाव्यात सादर केला…. आणि तो त्यांचा शेवटचा प्रयोग ठरला. 31 जुलैला दुपारी अतिशय शांतपणे, बाजूला बसलेल्या व्यक्तींना अजिबात थांगपत्ता लागू न देता जादूगार इंद्रजीत काळाच्या पडद्याआड गेले.
र.धों.कर्वेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार्या इंद्रजीतनी 1962 साली पैसे देऊन संतती नियमनाचे ऑपरेशन करून घेतले होते. तसेच 40 वर्षांपूर्वी आपला देहदानाचा अर्ज भरून ठेवला होता. ते कट्टर नास्तिक, बुद्धीप्रामाण्यवादी, प्रतिभाशाली कलावंत होते.
1958 साली त्यांच्या हाती एक छोटेसे जादूचे पुस्तक लाभले व त्यातील प्रयोग शाळां-शाळांतून सादर करायला त्यांनी सुरवात केली. नंतर मोठमोठ्या संस्था व थिएटरमध्ये त्यांचे प्रयोग गाजले.
2009 मध्ये ठाणे महानगरपालिकेने ‘ठाणे रत्न पुरस्काराने’ त्यांना सन्मानित केले. तसेच 2010 मध्ये दुबई येथे ‘मॅजिक खलिफा अॅवार्ड’ने व जबलपूर येथे ‘जादूगर शिरोमणी’ अलंकारांनी सन्मानित केले. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवला. कोणतेही धार्मिक विधी न करता, 13 व्याला त्यांनी 108 भिकार्यांना अन्न व कपडे दान केले. हीच त्यांची इच्छा होती. कॅन्सरसारख्या रोगावर मात करून ते खंबीरपणे उभे राहिले. जेणेकरून एका सच्चा कलावंतासारखे मरण यावे. आणि तेच घडले…
सोलापूरला जादूचा प्रयोग करताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते जगाच्या स्टेजवरून अदृश्य झाले. पण ती जादू नव्हती तर ते कठोर वास्तव होते. जादूगार इंद्रजीत यांना अंनिस परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली.