आईच्या पोटातील बाळाला…. म्हणजे अर्भकाला… जर संगीत ऐकवले तर ते मूल हुशार निपजते….
ही समजूत गेली अनेक वर्षे पद्धतशीरपणे पसरली आहे. आणि या समजुतीच्या आधारे अनेकांनी प्रचंड पैकाही कमविलेला आहे. या समजुतींची गर्भसंस्कार या नावाखाली दुकानेही थाटली गेली आहेत. आणि ‘संगीत गर्भसंस्कारा’ची नाटके जिकडे तिकडे हाऊसफुल्ल होत आहेत!
कारण प्रत्येक डॅडी-मम्मींना आपला सन हा इंटेलिजंटच हवा आहे. त्यांचा आय.क्यू. सुपिरियरच हवा आहे. समाजात ‘माय सन इज इंटेलिजंट’ असे मिरवायचे आहे.
-आणि चिंताही आहे. आजच्या प्रचंड वाढणार्या स्पर्धेत टिकायचे असेल तर हुशार असण्याशिवाय गत्यंतर नाही. मग ही हुशारी तयार करणे, वाढविणे आणि वाढवतच राहणे ही अतिशय मोठ्ठी गरज बनली आहे. नाहीतर आपले पोर स्पर्धेतून बाद होईल ही भीती प्रत्येक आई-बापास वाटते.
मग जर कोणी मार्केटमध्ये असे प्रॉडक्ट आणले की, “तुमच्या मुलाची हुशारी आम्ही वाढवून देतो” की लगेच आई-बाबांचे गिर्हाईक तिकडे धावत पळत सुटते. वाट्टेल ती किंमत मोजते. पण थांबा….
ही सगळी वार्यावरची वरात आहे.
गर्भसंस्कारवाले असाही ढोल बडवितात की, ‘संगीत ऐकवल्यावर हुशारी वाढते हे वैज्ञानिक सत्य आहे’. त्यांचा हा ढोल उभा असतो काही वैज्ञानिक संदर्भांवर. या वैज्ञानिक संदर्भांचीच आपण अगोदर तपासणी करू यात.
जगातील प्रतिष्ठित असे एक वैज्ञानिक मासिक आहे. ज्याचे नाव आहे ‘नेचर’. 1993 मध्ये या मासिकात एक प्रबंध प्रकाशित झाला. तो लेख युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी दिला होता. त्यात त्यांनी थोडक्यात असे म्हटले होते-
जर दहा मिनिटे मोझार्ट पियानोचे संगीत आपण कॉलेज विद्यार्थ्यांना ऐकवले तर त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ होते. ही वाढ बुद्धिमत्ता चाचणीने तपासली तेव्हा सुमारे 8-9 गुणांकांची वाढ दिसली.
वरील म्हणणे पुन्हा एकदा नीट वाचा. यात कुठेही गर्भसंस्काराचा उल्लेख नाही असे दिसेल. वरील म्हणणे खरे की खोटे आहे ते नंतर बघू. पण वरील ‘शोध’ लगेचच एका आल्फ्रेड टोमॅटिस या वैद्याने उचलला. आणि त्याला त्याने नाव दिले, ‘मोझार्ट इफेक्ट.’ मोझार्ट संगीता प्रभाव. आणि या मोझार्ट संगीताच्या प्रभावाचा प्रचार सुरू केला डॉन कॅम्पबेल नावाच्या संगीतकाराने. या संगीतकाराने मग संगीतोपचाराचा पुरस्कार सुरू केला. खरे तर हा प्रकार सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखा होता. म्हणजे सुतही नसते आणि स्वर्गही अस्तित्वात नसते. त्यामुळे संगीतोपचाराचा पुरस्कार म्हणजे ‘जोमाने नाळे फुंकले, इकडून तिकडे वारे गेले!’
कारण त्या प्रबंधातील म्हणणे हे बुद्धिमत्ता कायमची वाढविते या विषयी नव्हते. संगीत ऐकवल्यावर काही काळ वाढला एवढेच होते. त्यातही संपूर्ण बुद्धिमत्ता वाढली असे नव्हते. संपूर्ण बुद्धिमत्तेचे अनेक घटक आहेत. उदा.गणिती क्षमता, अमूर्त संकल्पनेची क्षमता, अवकाशीय क्षमता अशा अनेक क्षमता बुद्धिमत्ता चाचणीत येतात. या सर्व क्षमतांच्या स्वतंत्र चाचण्या असतात. या सर्व चाचण्यांपैकी फक्त अवकाशीय क्षमतेतच फक्त वाढ झाली असे ‘नेचर’ मध्ये सांगितले होते. याचा अर्थ संपूर्ण बुद्धीमत्ता वाढली असा होत नाही.
पण हे ऐकेल तर भ्रम निर्माण करणार कोण? हे सगळे नीट समजावून न घेता डॉन कॅम्पबेल नावाच्या संगीतकाराने आपले डोके सुसाट सोडले. त्याने डोके लढवून असेही बिनबुडाचे म्हणायला सुरवात केली की, ‘संगीत जर गर्भास ऐकवले तर गर्भ हुशार निपजेल.’
झाले. डॉन कॅम्पबेलच्या या म्हणण्यास वृत्तपत्रांनीही उचलून धरले. सनसनाटी बातमी ना! ‘मोझार्ट इफेक्ट’ या नावाखाली त्याच्या कॅसेटस्, खेळणी आणि सीडींची धुमधडाक्यात विक्री सुरू झाली. 2003 सालात डॉन कॅम्पबेलच्या सुमारे दोन लक्ष सीडी विकल्या गेल्या. आपल्याकडे याची महाराष्ट्रीय आवृत्ती ‘गर्भसंस्कार’ नावाखाली छापली-विकली जात आहे. 2005 मध्ये ‘अॅमेझॉन डॉट कॉम’ या ऑनलाईन दुकानाने बाळे व अर्भकांसाठी 40 प्रॉडक्टस् बाजारात आणली. प्रत्येक वस्तूवर बाळ-अर्भकांची चित्रे छापली गेली!
एखादा झंझावात यावा तसा हा भ्रम जगभर पसरू लागला. प्रत्येक जग डॉन कॅम्पबेलच्या म्हणण्यास प्रमाण मानू लागला. असे का घडले?
जेव्हा दोन गोष्टींमध्ये कोणतातरी संबंध असतो तेव्हा त्या तेवढ्याशा संबंधावरून दुसरी गोष्ट पहिलीमुळेच घडली असा अर्थ काढला जातो. वास्तवात असे नसताना किंवा प्रयोगांती असे सिद्ध झालेले नसताना आपणास असे म्हणण्याची सवय असते. यास ‘इनफरींग कॉझेशन फ्रॉम कोरिलेशन’ तत्व म्हणतात.
उदाहरणार्थ. काही संशोधने असे सांगतात की, ज्यांच्याकडे संगीताचे कौशल्य आहे व संगीतात गती आहे त्यांचा त्यांच्या बुद्धीमत्तेशी संबंध असू शकतो. यावरून असा अर्थ जर कुणी काढला की, संगीत हे बुद्धिमत्ता वाढवते तर तो अर्थ चुकीचा आहे.
गणपती दूध प्यायला हा संदेश जसा समाजात फैलावला तसेच ‘मोझार्ट इफेक्ट’चेही झाले. चीनमध्येही हे वारे पोचले. 2000 साली ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ मध्ये एक बातमी झळकली. ‘परदेशात झालेल्या संशोधनानुसार गर्भवतींच्या पोटातील बाळाने जर संगीत ऐकले तर ते जन्माला येते तेव्हा ते इतर बाळांपेक्षा हुशार व स्मार्ट असते!’
खरे तर परदेशात कुठे असा अभ्यासदेखील झालेला नसताना संशोधनापर्यंत मजल एखाद्या वृत्तपत्रानेच मारली तर लोक काय म्हणतील? एका मासिकात यापुढे जाऊन छापले गेले. ‘मिलवुकी जर्नल सेंटीनल’ या मासिकात ‘मोझार्ट इफेक्ट’ वरील अनेक संशोधने प्रसिद्ध झाली असून त्यामुळे शाळेतील मुले, माध्यमिक व प्राथमिक शाळेतील मुले व नुकत्याच जन्मलेल्या बाळांमध्येही आश्चर्यकारकरित्या मानसिक कौशल्यांमध्ये वाढ झाली.
इथे तुम्ही पाहिले की, असा प्रयोगच कोणता झालेला नव्हता. म्हणजे ‘मिडिया’ने या भ्रमांच्या आगीत तेल ओतणे चालू ठेवले. जे आजतागायत चालू आहे. ज्यामुळे सुमारे 80% लोकांना ‘संगीतोपचार’ खराच आहे असे वाटू लागले आहे. एवढेच काय, सायकॉलॉजी शिकणार्या विद्यार्थ्यांपैकी 73% विद्यार्थ्यांना ही गोष्ट खरी वाटते!
यातून मग अनेक खुळं जन्माला आली. न्यूयॉर्क मधील जेटस् फुटबॉल टीमने ग्राऊंडवर मोझॉर्ट संगीत लावूनच खेळण्याचा सपाटा लावला. का तर म्हणे ह्यामुळे खेळ उंचावेल. 1998 मध्ये जॉर्जियाचे गव्हर्नर झेल मिलर यांनी 105,000 डॉलर्सची तरतूद बजेटमध्ये यासाठी केली की, मोझार्टचे संगीत जॉर्जियातील प्रत्येक जन्मणार्या बाळाने ऐकावे. त्यासाठी फ्री सीडी व कॅसेटस्चे वाटप करण्यात आले. झेल टेलर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी वैज्ञानिक असल्याच्या थाटात काही विधाने उधळली. ते म्हणाले, ‘यात काही शंका नाही की, संगीत ऐकल्याने बालवयात मेंदूची अवकाशीय व उर्ध्वखंडाची क्षमतेची वाढ होते. ज्यामुळे गणिती व अभियांत्रिकी क्षमता वाढते!’
याचीच री ओढली फ्लोरिडा राज्याने. तेथील गव्हर्नर डॉन संडक्वीस्ट यांनी ‘डे केअर सेंटर’ म्हणजे दिवसभर बाळांची काळजी घेणारी व त्यांना संगीत ऐकवणारी केंद्रे राज्यभर चालू केली आणि त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली.
या सगळ्या गोष्टी घडल्यामुळेच ‘नेचर’ मधील संशोधन तरी योग्य होते का हे शोधणे गरजेचे बनले.
म्हणूनच मग अनेक संशोधकांनी ‘ते’ संशोधन घेऊन तसेच प्रयोग केले. पण काही जणांना संशोधनाचे निष्कर्ष मिळालेच नाहीत. तर काही जणांना अगदी क्षुल्लक रिझल्ट मिळाला. म्हणजे बुद्धिमत्तेत वाढ झाली ती 2 गुणांकापेक्षा कमीच झाली. आणि एवढी वाढ ही ‘वाढ’ म्हणता येत नाही.
जेव्हा इतर संशोधकांना हे सत्य आढळले तेव्ह मोझार्टवाले म्हणू लागले की, मोझार्ट संगीतातील काही भाग घेतल्यावरच बुद्धिमत्ता वाढते. मग तसेही प्रयोग करण्यात आले. तेथेही काही दिसून आले नाही.
मुख्य गोष्ट ही होती की, हे सारे प्रयोग ज्यांनी मोझार्टला पाठिंबा दिला ते अर्भकांवर झालेच नव्हते.’
या नंतर जॉर्जियाचे गव्हर्नर झेल मिलर खूपच अस्वस्थ झाले आणि बचावाच्या पवित्र्यात गेले. त्यांनी उलटे आरोप सुरू केले. ते म्हणू लागले, ‘काही तथाकथित संशोधक आमच्या संशोधकांची दिशाभूल करीत आहेत…’
पण इथे विज्ञानाने सांगितले होते की, मोझार्ट इफेक्टने काहीही घडत नाही. संशोधकांनी नव्हे.
मोझार्ट इफेक्टच्या ऐवजी संशोधकांनी वेगवेगळे प्रयोग करून दुसरे संगीत वापरून मोझार्ट एवढाच फरक पडतो हे दाखवून दिले. एवढेच नव्हे तर, नॅनटेस-शेलेनबर्ग या जोडीने एक भयानक कथा ऐकवली. जी डॉक्टर कथा लेखक स्टीफन किंगने लिहली होती. ती ऐकवून मोझार्ट एवढाच परिणाम होतो हे दाखवून दिले!!
या सगळ्यातून हे निष्पन्न झाले की, जे काही तुम्ही ऐकवाल त्या ऐकण्याने तेवढ्यापुरता तुमचा मेंदू उत्तेजित होतो. त्याचा संबंध संगीताशीच असतो असे नाही. काहीही आवडते ऐकवा! आणि हेही सिद्ध झाले की, त्यामुळे बुद्धिमत्तेत वाढ वगैरे होत नाही.
जेव्हा हे सत्य बाहेर आले तेव्हा तर ज्यांनी या सगळ्याचा ‘धंदा’ चालू केला होता त्यांचे धाबे दणाणले. त्यांनी उलटा प्रचार चालू केला. काही धंदेवाल्यांनी तर नवीन शोध आणले.
‘लहान बाळांच्या वाढीतील पहिले तीन महिने फार महत्वाचे असतात’ असे नवेच खोटे भ्रम त्यांनी पसरविण्यास सुरवात केली.
1980 मध्ये हजारो पालकांनी त्यांच्या नवजात बालकास मोझार्ट इफेक्टचे डोस दिले होते. काहींनी परकीय भाषा व गणिताचेही डोस ऐकवले होते. आज 2013 पर्यंत त्यातील एकही जण ‘सुपरमॅन’ झालेला किंवा सुपरवुमन झालेली नाही.
आजही हे खूळ चालूच आहे. ‘बेबी आईन्स्टाईन’ नावाची खेळणी व व्हिडीओचा आजचा धंदा सुमारे 100 लक्ष डॉलर्सचा आहे. पालकांना हे कळत नाही की, व्हिडीओ व अशा खेळण्यांपेक्षा नैसर्गिक नियमित खेळाने मुले जास्त कुशल बनतात.
मुलांच्या बुद्धिमत्तेमागील वैज्ञानिक सत्य काय आहे हा शेवटचा मुद्दा आपण नीट बघू या. लेव व्यागोटस्की हा रशियन मानसतज्ञ आहे. 1978 मध्येच त्याने मुलांच्या वाढीविषयी लिहून ठेवले होते. तो म्हणतो,
‘3 वर्षाच्या मुलाचा मेंदू हा नुकताच वाढीसाठी सज्ज झालेला असतो. त्या तेवढ्या मेंदूकडून स्वतंत्रपणे कोणतेच कार्य होत नाही. म्हणजे अशा मुलांना दुसर्यांचा आधार घेऊनच पुढे जावे लागते. त्यांच्या मेंदूची क्षमता अजून तेवढी विकसित झालेली नसते. जी गणित वा अन्य बुद्धिमत्ता स्वीकारेल.’ जर मेंदूतच अजून ती क्षमता नसेल तर ती बुद्धिमत्ता कशी वाढेल?’
याचा अर्थ उघड आहे. जर ‘सॉफ्टवेअर’च नसेल तर प्रोग्रॅम ‘रन’ कसा होणार?
संगीत ऐकवून ‘गर्भसंस्कार’ करणार्यांनी इथे भारतातही ‘शक्तीमान’ बाळे तयार करण्याची फॅक्टरी खोलली आहेच.
या फॅक्टर्यांमध्ये आपली बाळे पाठवायची की नाही हे आता तुम्हीच ठरवा….
काही भ्रम :-
- मातेची मानसिकता बिघडली तर गर्भपात होतो.
- बाळ जन्मल्या जन्मल्या जी पुढची काही मिनिटे असतात त्या काळातच बाळाचे आणि त्याच्या आई-वडिलांचे घट्ट नाते तयार होते.
- बाळ जेव्हा चालत नसते तेव्हा त्यास जर चालावे म्हणून उत्तेजन दिले तर चालण्याच्या काळाअगोदरच ते चालू लागते.
- नुकत्याच जन्मलेल्या बाळांना काहीही दिसत नसते व ऐकूही येत नसते.
- नव बालके ही आईशी जास्त जवळीक साधतात.
- बाळांबरोबर बोबडे बोल बोलू नयेत किंवा त्यांच्यासारखे बोलण्याच्या प्रयत्न करू नये.
- लहान मुले कधीच खोटे बोलत नाहीत.
आणि सत्य…
- माता दु:खी वा ताणाखाली असेल तर गर्भपात होतो याला काहीही पुरावा नाही.
- या म्हणण्यास काहीच आधार नाही.
- बाळांचे चालणे हे त्यांच्या शरीरवाढीनुसारच घडते. आई-बाबांनी ‘शिकविल्याने’ ते लवकर चालते हे खरे नाही.
- यात तथ्य नाही.
- नवजात बालके ही आई, बाबा, आजी, आजोबा, काका अशा सर्व कौटुंबिक व्यक्तींशी जवळीक साधत असतात.
- बाळांच्या भाषेतच जर आपण त्यांच्याशी संवाद साधला तर त्यांचे भाषाकौशल्य नीट विकसित होते.
- लहान मुलेही खोटे बोलतात.
– डॉ. प्रदीप पाटील