Categories
भांडाफोड

भक्ताशी समलिंगी संबंध ठेवणार्‍या बाबावर गुन्हा

जून - २०१९

टिटवाळा येथील भोंदू बाबाच्या विरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा व भारतीय दंड संहितेअंतर्गत तक्रार दाखल

टिटवाळा येथील प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरातील मुख्य पुजारी, भोंदू बाबा ललजितसिंग जोशन उर्फ ‘मंजू माताजी’(पुरुष असूनही ‘माताजी’ असे म्हणवितो.) याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करायची आहे, म्हणून नितिन म्हात्रे नावाचा तरुण अंनिसच्या कायदा विभागाच्या सहकार्यवाह अ‍ॅड. तृप्ती पाटील यांना गेल्या वर्षी एका पत्रकाराच्या मार्फत भेटला. त्यांनी नितिनचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचा सारांश असा :

आपल्या अंगात साक्षात वैष्णोदेवी येते असे सांगून, जादूटोणा, करणी करण्याची भीती दाखवून व आपण केलेली करणी भारतात कोणीही तोडू शकत नाही, त्यामुळे कुटुंबीयांचे जीवन बरबाद करण्याची धमकी हा बाबा तरुण मुलांना (होय मुलांना) देत असे व त्यांचे आर्थिक व लैंगिक शोषण करीत असे. अर्थात, इथे प्रकरण वेगळेच होते. हा बाबा या तरुण मुलांना आपल्याशी अनैसर्गिक संभोग करायला भाग पाडायचा. त्या बाबाचे न ऐकणार्‍यांना, प्रतिप्रश्न करणार्‍या मुलांना तो अंगात देवी आल्याचा बहाणा करून झोडपून काढत असे व आपल्या सेवेदार भक्तांकडूनसुद्धा भरपूर चोप देत असे. त्याच्या तडाख्यात नितीन म्हात्रे हा तरणाबांड मुलगा सापडला. अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने वैष्णोदेवी मंदिरात जाणारा नितीन, मुख्य पुजार्‍याने, ज्याच्या अंगात साक्षात देवी येते- त्याने बोलावले म्हणून आनंदात होता; पण आपल्या सुसज्ज शयनकक्षात नितीनला बोलावून या बाबाने नितीन सोबत लैंगिक चाळे करायला सुरुवात केली व आपल्याशी अनैसर्गिक संभोग करावा, अशी गळ घालायला सुरुवात केली. नितीनला जबरदस्त धक्का बसलाच व त्याला हे काही पटेना. एवढ्या पवित्र ठिकाणी असे काही असू शकते, यावर त्याचा विश्वास बसेना. प्रथमच असे झाल्याने नितीन संकोचला असेल, असे समजून बाबाने त्याला त्या दिवशी सोडून दिले; तेही याची वाच्यता कुठेही न करण्याचा दम देऊन; पण काही दिवसांनी त्याने नितीनला परत बोलावून घेतले व आधीचीच पुनरावृत्ती झाली. नितीनने आता मात्र विरोध केला. त्यानंतर अत्यंत कडक दम देऊन व अंगात देवी आल्याचा बहाणा करून नितीनला बाबाने चांगलीच मारहाण केली व मंदिराचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद केले. कुठेही वाच्यता केल्यास त्याच्या एका ‘बाहुबली’ साथीदारामार्फत मारण्याची धमकी दिली. आपल्या अंगात असलेल्या वैष्णोदेवी व भद्रकाली देवीच्या शक्तीने; तसेच करणी करून संपूर्ण खानदान बरबाद करू, सगळे कुटुंबीय सडून सडून मारतील, अशी भीती घातली. सहा-सात वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेने नितीन हबकून गेला होता; पण आपल्याशी झालेला प्रकार त्याला गप्प बसू देत नव्हता. त्याच वेळेस बाबाने दिलेली धमकी त्याला तक्रार करण्यापासून मागे ओढत होती. शेवटी त्याने या बाबतीत त्याच्या जवळच्या मित्राला हे सांगितले. त्या मित्राने एका पत्रकाराशी संपर्क साधला. हे पत्रकार डोंबिवलीच्या ठोंबरे या भोंदू बाबाच्या केसमधील कामामुळे तृप्ती पाटील यांना ओळखत होते. ते नितीन यास तृप्ती पाटील यांच्याकडे घेऊन आले.

आपली हकिकत सांगताना नितीन खचलेला दिसला; तसेच ही बाब गुप्त ठेवा नाही तर तो बाबा काहीही करू शकेल, हेही बजावून सांगितले. मग तृप्ती पाटील, तत्कालीन ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा सुरेखा भापकर व कल्याण शाखेचे सचिव उत्तम जोगदंड यांनी हे प्रकरण हाती घेतले व या प्रकरणाची गुप्तता अगदी शेवटपर्यंत पाळली. कार्याध्यक्ष अविनाश पाटील व प्रधान सचिव सुशीला मुंडे यांना मात्र या प्रकरणाची कल्पना देऊन ठेवली होती.

नितीनच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता तृप्ती पाटील यांनी नितीन यास साक्षी-पुरावे गोळा करण्यास सांगितले. कारण केवळ त्याच्या तोंडी सांगण्याने तक्रार दाखल करता येत नव्हती. पुरावे पुढे आल्याशिवाय यात महाराष्ट्र अंनिस हात घालणार नाही, हे त्याला स्पष्टपणे सांगण्यात आले. एकीकडे त्या बुवाच्या गुंडांकडून मारले जाण्याची भीती, तर दुसरीकडे समाजात बदनामीची भीती, अशा कैचीत सापडल्याने मुले पुढे येत नव्हती, तरीही त्यानंतर नितीनने त्याच्यासारखेच बळी पडलेले तरुण शोधून त्यांच्याशी संपर्क साधायला, त्यांना विश्वासात घ्यायला सुरुवात केली. वर्षभरात असे तीन तरुण (सौरभ तिवारी, राहुल शामदासानी, वेंकटेश राव) त्याच्या संपर्कात आले व ते या प्रकरणी तक्रार दाखल करायला तयार झाले. चांगल्या घरातील सरळमार्गी असलेले हे तरुण त्या बाबाच्या ‘कर्तृत्वा’मुळे निराश, दुःखी झाले होते. अ‍ॅड तृप्ती पाटील यांनी त्यांची तक्रार दाखल करायची खरोखरच मानसिक तयारी आहे की नाही, याची खात्री करून घेतली. त्यानंतर सुरू झाले त्यांचे निवेदन/जबाब घेणे. उत्तम जोगदंड यांच्या घरी त्या पीडितांना अनेक वेळा बोलावून घेऊन तृप्ती पाटील व उत्तम जोगदंड यांनी त्यांचे जबाब व्यवस्थित टाईप करून घेतले. ते जबाब लिहून घेताना अंगावर काटे येत होतेच, त्याचबरोबर किळस सुद्धा वाटत होती. वेंकटेश या मुलाचा जबाब तर भयानक होता. जादूटोण्याची, करणीची भीती घालून; तसेच आपल्या सामर्थ्याने त्याच्या पत्नीला बरे करण्याचे आश्वासन देऊन या बाबाने आपल्या विकृत इच्छा त्याच्याकडून पूर्ण करून घेतल्या होत्या. या मंदिरात केवळ मुलांनाच लक्ष्य केले जाते असे नाही, तर कित्येक महिला सुद्धा त्या बाबाच्या मुख्य हस्तकाच्या वासनेला बळी पडल्या आहेत, हेही या पीडितांनी सांगितले. समाजात बदनामी होईल म्हणून महिला तक्रार करायला पुढे येत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

दिनांक 22 एप्रिल 2019 रोजी या चौघा पीडितांचे तक्रार अर्ज घेऊन अ‍ॅड. तृप्ती पाटील, सुरेखा भापकर व उत्तम जोगदंड यांनी मा. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे जिल्हा (ग्रामीण) यांची ठाणे येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेतली व प्रकरणाचे गांभीर्य समजावून सांगितले. महाराष्ट्र अंनिसचे निवेदन व सोबत या पीडितांचे अर्ज जोडून तिथे जमा केले. त्यांनी त्याची दखल घेतली व प्रकरण टिटवाळा पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आले. दिनांक 6 मे रोजी टिटवाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खोपकर यांचा फोन जोगदंड यांना आला. त्यांनी अ‍ॅड. तृप्ती पाटील, सुरेखा भापकर व उत्तम जोगदंड यांना दुसर्‍याच दिवशी पोलीस ठाण्यात यायला सांगितले. त्यानुसार तिघांनी तिथे जाऊन आपले जबाब नोंदवले. खोपकर यांनी या प्रकरणी योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पोलीस ठाण्याचे प्रमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे साहेब यांची सुद्धा तिघांनी भेट घेतली. त्यांनीही आश्वासन दिले की, या प्रकरणात गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. त्यानंतर, म्हणजे दिनांक 8 मे रोजी चारही फिर्यादींना बोलावून घेण्यात आले. दोन दिवस त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम चालू होते. त्याचवेळी या बाबाच्या गुन्ह्याला कोणती कलमे लावायची यावर खलबते चालू होती. जादूटोणाविरोधी कायदा तर इथे लागू होत होताच; परंतु लैंगिक शोषणविषयक कलमे लावताना पंचाईत होत होती. कारण या प्रकरणांमध्ये या बाबाने मुलांशी अनैसर्गिक संभोग केला नव्हता, उलट त्याने या मुलांना आपल्याशी अनैसर्गिक संभोग करण्यास भाग पाडले होते. बरीच खलबते झाल्यावर, पोलिसांनी वकिलांचा सल्ला घेतल्यानंतर, शेवटी दिनांक 10 मे 2019 रोजी या प्रकरणात एफआयआर दाखल झाली. ही तक्रार भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 504, 506, 508 आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 3(2)अंतर्गत दाखल झालेली आहे. नंतर पूर्ण विचारानंतर भारतीय दंड संहितेचे 377 कलाम देखील लावण्यात आले. दिनांक 11 मे रोजी मंदिरातील या बाबाच्या निवासस्थानी पोलिसांनी धाड टाकली, तेव्हा तो बाबा पसार झाला होता, हे दिसून आले. पोलिसांनी तेथील सामान जप्त केले.

बाबाविरुद्ध तक्रार दाखल झाल्याची वार्ता वार्‍यासारखी सर्वत्र पसरली. वर्तमानपत्रे व विविध चॅनेल्सचे प्रतिनिधी अ‍ॅड. तृप्ती पाटील यांना भेटून गेले. बर्‍याच वर्तमानपत्रात व काही चॅनेल्सवर बातम्या झळकल्या. बाबा पसार होता आणि अ‍ॅड. तृप्ती पाटील यांचे लक्ष कोर्टात होणार्‍या विशिष्ट नोंदीकडे होते. कारण त्यांच्या अनुभवातून त्यांनी एक अंदाज केला होता की, तो बाबा अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज करू शकतो आणि तो अंदाज खरा ठरला होता. त्या बाबाचा अटकपूर्व जामीन अर्ज दिनांक 14 रोजी सुनावणीस आला. नियमित न्यायाधीश सुट्टीवर असल्याने बदली न्यायाधीशांसमोर अर्जाची सुनावणी झाली. त्याला अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी अत्यंत मुद्देसूदपणे विरोध केला. मा. न्यायाधीशांनी सदर अर्जावरील निर्णय नियमित न्यायाधीशांकडेच सोपवला. त्याची सुनावणी दिनांक 20 मे 2019 रोजी ठेवण्यात आली होती. यावेळी भोंदू बाबाचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज सुनावणीस आला. बाबाच्या वकील महोदया पूर्ण तयारीनिशी आल्या होत्या. त्यांनी विविध न्याय-निर्णय सांगून व विविध कलमे सांगून बाबाला जामीन मिळावा म्हणून भरपूर वेळ युक्तिवाद केला. या युक्तिवादाला टिटवाळा पोलीस ठाण्याचे प्रमुख, पोलिस निरीक्षक पांढरे साहेब यांनी मुद्देसूद उत्तर दिले. नंतर मा. न्यायाधीशांनी अ‍ॅड. तृप्ती पाटील यांना आपले मत मांडायला संधी दिली. अत्यंत मोजक्या शब्दात बाबाच्या वकीलांचा युक्तिवाद कायद्याची कलमे दाखवून खोडून काढला. या बाबाला जमीन मिळाल्यास लोकांचा न्यायसंस्था व पोलिसांवरील विश्वास उडेल, असा युक्तिवाद केला. न्यायाधीशांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले व नंतर ऑर्डर पास करू, असे सांगितले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा या बाबाचा अटकपूर्व जामीन अर्ज मा. न्यायालयाने फेटाळल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.

वरील तक्रार दाखल झाल्याचे कळल्यावर मध्यंतरी, दिनांक 14 मे रोजी अजून एक पीडित मुलगा पुढे आला व त्याने आपला जबाब नोंदवणे टिटवाळा पोलीस स्टेशन येथे चालू असल्याचे कळले आहे. असा प्रयत्न असेल तो अन्य पीडितांना नितीनच्या सहाय्याने पुढे आणून त्यांना तक्रार करण्यास प्रोत्साहित करण्याचा. नितीन व त्याचे सहकारी या बाबतीत अत्यंत सकारात्मक साथ आतापर्यंत तरी देत आहेत. या बाबाला शिक्षा व्हावी व त्यांच्या श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यांची इच्छा पूर्ण होईल किंवा कसे ते आता येणारा काळच ठरवेल.