Categories
व्यक्तिविशेष

भारताचा प्रथम क्रमांकाचा सेवक – पं. जवाहरलाल नेहरू

वार्षिकांक – २०१४

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची 125वी जयंती 14नोव्हेंबर 2014ला साजरी होत आहे. त्यानिमित्ताने पंडीत नेहरूंच्या चारित्र्याचे विविध पैलू त्यांच्या विज्ञाननिष्ठेलामध्यवर्ती ठेवत उमेश सूर्यवंशी यांनी सांगितले आहेत.

“देश बांधव हो. भारताची आणि भारतीय स्वातंत्र्याची अनेक वर्षेसेवा करण्याचे माझे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. आज भारतीय जनतेच्या सेवा आणि कल्याणासाठी वचनबद्ध असलेला मी ‘पहिल्या क्रमांकाचा सेवक’ आहे.”

15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्ली आकाशवाणीवर भाषण देताना पंडीत जवाहरलाल नेहरूंनी वरील उद्गार काढले होते. आपण भारतीय आणि सारे जगसुद्धा पंडितजींना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटीशशाही उलथून टाकू पाहणारे थोर देशभक्त, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ सारखा अजरामर ग्रंथ लिहिणारे प्रख्यात इतिहासकार, इंदिरेशी मैत्रभाव जपणारा प्रेमळ पिता, लहान मुलांसाठी लाडके चाचा नेहरू, धर्मातील कालबाह्य प्रथा परंपरांना झुगारून देणारा सच्चा विज्ञानवादी, महान विचारवंत व त्याचबरोबर कृतीशील आचारवंत असणारा खरा समाजवादी अशा विविध रूपांनी पंडीतजींचे वापरलेले ‘पहिल्या क्रमांकाचा सेवक’ हे विशेषण सर्वार्थाने सार्थ आहे.

पंडीतजींच्या संपूर्ण जीवनात अगदी लहानपणीसुद्धा चौकसपणा. स्वतंत्र व निर्भीड वृत्ती, एखाद्या घटनेकडे पाहण्याची खोलवर दृष्टी आणि अविरत एकसारखे कार्य करण्याची कष्टाळू वृत्ती या गुणांचा सुरेख संगम दिसून येतो. 17 वर्षे भारतासारख्या विशाल आणि विविधतेने बहरलेल्या देशाचे नेतृत्व करताना पंडितजींचे हे सारे गुण नुसते उजळलेच नाहीत तर स्वत:बरोबर त्यांनी या देशालाही अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी असामान्य कामगिरी केली. पंडीतजींना उभ्या आयुष्यात प्रेमळ व वत्सली आई-वडील, सुखदु:खात समभागी होणारी उत्तम सहचारिणी, आपल्या उच्चपदस्थ वडिलांमधील मायेचा हुंकार खुलवणारी लाडकी प्रियदर्शनी, जीवनाला कायमस्वरूपी आदर्शवत ठेवणारे महात्मा गांधींसारखे मार्गदर्शक, सरदार पटेल, डॉ.आंबेडकर, राधाकृष्णन, राजगोपालाचारी यासारखे असंख्य साथीदार यामुळे पंडीतजींचे जसे प्रेमाचे, लोभाचे संबंध होते तसेच काही बाबतीत मतभेदही होते. पंडीतजींनी राष्ट्रहित प्रथम ध्यानात घेऊनच संपूर्ण आयुष्य घडवले. याचा आपसूक फायदा भारतीय जनमानसाला मिळत गेला.

विज्ञान तंत्रज्ञान, शेतीविषयक धोरणे, औद्योगिक उद्योगधंद्याची उभारणी, अलिप्तवादी परराष्ट्र धोरण, सामाजिक कायदे करून पुरोगामी विचारांना दिलेली बळकटी, लोकशाहीवर निष्ठा ठेवून संसदेमध्ये पाडलेल्या विधायक परंपरा, मिश्र अर्थव्यवस्थेचा अंगीकार करून देश उभारणीला दिलेली चालना अशा अनेक गोष्टी पंडीतजींच्या दूरदृष्टीच्या व उत्तम प्रशासनाच्या द्योतक आहेत.

आजदेखील नेहरू विचारधारेची गरज प्रस्तुत आहे. म्हणूनच जाता जाता थोडक्यात या विचारांचा परिचय नेहरू जीवनधारेतून करून घेण्यासाठी केलेला हा अल्प प्रयत्न.

मोतीलाल आणि जवाहरलाल

जवाहरलाल(म्हणजे सुंदर अलंकार) यांचा जन्म अलाहाबादेत 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला. आई स्वरूपराणी व वडील मोतीलाल यांनी बालवयातच उत्तम संस्कार मुलांवर केले. जवाहरलालच्या एकूणच घडणुकीत त्यांच्या वडिलांचा विशेष वाटा होता. जवाहरलाल समजून घेणेसाठी मोतीलाल समजून घेणे म्हणूनच क्रमप्राप्त आहे.

अत्यंत श्रीमंत, खानदानी अशा नेहरू कुटुंबावर मोतीलालजींचा विशेष प्रभाव होता. विचारात आधुनिकपणा व मुलांवर विशेषत: जवाहरवर अतुल्य प्रेम हे त्यांचे वैशिष्ट्य होते. कालबाह्य धर्मविधी व देवभोळे वातावरण त्यांना आवडत नसे. विज्ञानावर विशेष जोर देऊन अत्याधुनिक जीवनपद्धती त्यांना आवडे. 1899 ला विलायतेतून परतल्यानंतर मोतीलालजी तत्कालीन रूढीनुसार प्रायश्चित्त विधीला नकार दिला होता. ब्राम्हण जातीमध्ये संतापाचे काहूर उमटून काही मित्रांनी कायमची पाठ फिरवली. पण मोतीलाल ठाम राहिले. कायदा आणि विज्ञान यांचेसमोर मस्तक झुकवणारे मोतीलाल जीर्ण रूढीपरंपरेच्या विरोधात होते.

मुबारक अली नावाच्या जुन्या विचारसरणीच्या मुस्लिम गृहस्थाला नेहरूंच्या काश्मिरी ब्राम्हण घरात कारकुनीचे काम मिळाले होते तरी सबंध कुटुंब त्यांना घरचा एक घटक मानत असे. आपल्या मुलाच्या शिक्षणाविषयी मोतीलाल विशेष जागरूक होते. बु्रक्स नावाचे शिक्षक जवाहरला महान आत्मा, देवाच्या ज्ञानाबद्दल माहिती देताना मोतीलालजी “माझ्या मुलानं आयुष्यात भावनांपेक्षा तर्काला धरून वागावं म्हणजे वास्तवाला पाहताना त्याच्या कल्पनाशक्तीने आड येऊ नये” असं बजावलं होतं.

आपला मुलगा चिकित्सक व विचारी बनणेसाठी आपल्या मुलाला स्वत:चा जीवन मार्ग ठरवण्यात मोतीलालनी पूर्ण मुभा दिली. आपल्या मुलाच्या दृष्टीने आपण चांगले ठरावे, सैद्धांतिकदृष्ट्या नेहमी त्याचेशी सहमत असावे, समान उद्दीष्टासाठी सारखेच वैचारिक जीवन जगावे यासाठी मोतीलाल आयुष्यभर धडपडत राहिले. राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात यांचे अधिकाधिक गुंतणे हे मुलावरील प्रेमापोटीच होते. सुप्रसिद्ध मीरत खटल्यातील कामगारांच्या पुढार्‍यांसाठी नेहरूंनी ‘बचाव समिती’ स्थापन केली तेव्हा सर्वात जास्त अनुभवी वकील असणारे मोतीलाल त्या समितीचे अध्यक्ष बनले. बचाव समितीसाठी पैसे गोळा केले व वकिलीसाठी कोणतीही फी आकारली नाही. 1930 साली किसान परिषदेत भाषण करून खंड व जमीनसारा भरू नका असे आवाहन जवाहरने केले तेव्हा इंग्रज सरकारने जवाहरला अटक केली. आजारी असणारे मोतीलाल पेटून उठले आणि जवाहरच्या वाढदिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला प्रचंड सार्वत्रिक निदर्शने घडवून आणली. सविनय कायदेभंगाच्या मोहिमेवेळी जवाहरशी व गांधीजींशी विचार विनिमय करून अलाहाबादेतील आपले घर ‘आनंदभवन’ राष्ट्रीय काँग्रेसला देणगी देऊन टाकले.

मोतीलाल यांच्या मृत्यूनंतर कलकत्त्याचे सुप्रसिद्ध काँग्रेस सदस्य डॉ.बी.सी.रॉय यांनी मोतीलालांच्या व्यक्तीमत्वातले सर्वात ठळक वैशिष्ट्य कोणते असे गांधीजींना विचारले. गांधी म्हणाले, “त्यांचे जवाहरलावरील अमर्याद प्रेम” उत्तर ऐकून रॉय यांनी प्रतिप्रश्न केला, “हिंदुस्थानबद्दलचे त्यांचे प्रेम नव्हे?” गांधींजी तात्काळ उत्तरले, “नाही. जवाहरबद्दलच्या प्रेमातून त्यांना हिंदुस्थानबद्दलच्या प्रेमाचा उगम झाला. जवाहरला जन्म देणारी भूमी म्हणून त्यांना हिंदुस्थानचा अभिमान वाटत होता.”

आंतरजातीय विवाहासंबंधी…..

नेहरू जातीव्यवस्थेच्या विरूद्ध होते. त्यांना मनातून आंतरजातीय विवाहच करायचा होता. इंग्लंडमध्ये शिकत असताना या आशयाचे पत्र 7 मे 1909 रोजी वडिलांना पाठवले होते. आईवडिलांनी थेटपणे विरोध न करता हिंदू कायद्यात अडचण असल्याचे सांगितले. नेहरूंनी आई वडिलांना न दुखावता आपल्याच जातीच्या मुलीशी(कमला) लग्न केले. परंतु कायद्याची अडचण नेहरूंच्या लक्षात राहिली. 1954 चा ‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट’ म्हणूनच त्यांनी संमत करून घेतला असे अरूणा असफअलींचे मत आहे.

दुसरी घटना इंदिरेच्या लग्नावेळी. इंदिरा आणि फिरोज गांधी यांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम होते. यातूनच लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. पंडीतजी फिरोजला खूप काळापासून ओळखत होते आणि विवाहाला त्यांचे कोणतेही आक्षेप नव्हते. परंतु वाङ्निश्चयाच्या घोेषणेने सनातनी हिंदूकडून आक्षेपांचे, निषेधाचे आणि धमक्यांचे काहूर उठले. कारण वधू व वर यांचे धर्म भिन्न होते. फिरोज पारसी तर इंदिरा हिंदू धर्मीय होती. दर दिवशी नेहरूंच्या घरी संतापलेल्या सनातनी हिंदूचे शेेकडो निरोप येत होते. नेहरूंची अडचण महात्मा गांधींना समजताच गांधींनी वर्तमानपत्रातून एक निवेदन प्रसूत केले आणि आंतरधर्मीय विवाहाला पाठींबा घोषित केला. गांधीजींच्या या विधायक व अचूक वृत्तीमुळे धमक्या थांबल्या आणि 26 मार्च 1942 रोजी आनंदभवनमध्ये फिरोज इंदिरेचा विवाह झाला.

शेतकर्‍यांविषयी अमूल्य कार्य

“शेतकर्‍यांना समजून घेणं म्हणजेच भारताला समजून घेणं” अशी एक जुनी म्हण आहे. जवाहरना मायभूमी शेतकर्‍यांच्या मनातून आकलन करून घ्यायची होती. अलाहाबादेत शहराजवळ शेतकर्‍यांची छावणी पडली होती. अयोध्या प्रांतातील प्रतापगढ जिल्ह्यातून कित्येक किलोमीटर चालत येऊन आपली गार्‍हाणी त्यांच्या कानावर घालावीत या हेतूने हे शेतकरी आले होते. जवाहरने छावणीवर जाऊन भेट घेतली. शेतकर्‍यांच्या हृदयद्रावक कथा ऐकून जवाहरनी “दु:खाची अखंड कहाणी” असे वर्णन केले होते. जमीनदारांच्या जुलुमशाही व जबरी व्याज घेणारे लोभी सावकार यांच्या हकिकती ऐकून जवाहरलाल हेलावून गेले. त्यांनी लिहले, “त्यांच्याकडे आणि त्यांच्या दैन्याकडे पाहून मी शरमेने व दु:खाने चूर झालो. मला माझ्या स्वत:च्या चैनीच्या आयुष्याची आणि आमच्या दुबळ्या राजकारणाची शरम वाटली.” शेतकर्‍यांची आणि भारतभरची दयनीय अवस्था पाहून नेहरूंनी जमीनदारी संपवण्याचा निश्चय केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जमीनदारी संपवणे, शेतकर्‍यांची पिळवणूक थांबवणे या गोष्टी होत्या. बिहार शासनाने ‘बिहारभुमी कायदा 1950’ बिहार विधीमंडळाकडून संमत केला. डॉ.राजेंद्रप्रसाद व सरदार पटेल या विधेयकाच्या विरोधात होते. अशा विधेयकांना केंद्राने संमती देऊ नये असे त्यांचे मत होते. प्रसादांनी हे विधेयक रोखून ठेवल्यावर नेहरूंनी “मी व माझे सहकारी मंत्रीपदाचा राजीनामा देऊ” अशी धमकी देऊन पटेलांच्या गैरहजेरीत हे विधेयक संमत केले. जमीनदारांच्या मोबदल्याचा प्रश्न न्यायालयाच्या अधिकारातून काढून विधीमंडळाच्या अखत्यारित आणला. कायद्याने प्रयत्न करून सामंतशाही व्यवस्थेला तडा देण्याचे अमूल्य कार्य शेतकरी हितातून नेहरूंनी केले.

रशियाच्या भेटीत मॉस्कोमधील सामुदायिक शेतकरी सदनाला जाणीवपूर्वक भेट देऊन अशा संस्था भारतात लवकर उभाराव्यात यासाठी ते जागरूक झाले.

विज्ञानाचा सच्चा पुरस्कर्ता

“मी स्वत: विज्ञानाचा पुरस्कर्ता आहे आणि वैज्ञानिक पद्धतीने आणि दृष्टिकोनाद्वारेच जग वाचणार आहे असा माझा विश्वास आहे.” अलाहाबाद विश्वविद्यालयाच्या पदवी समारंभ प्रसंगी पंडीतजींनी वरील उद्गार काढले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. 1944 मध्येच ‘टाटा अनुसंधान संस्था’ स्थापन झाली होती. 1947 नंतर नेहरूंनी या संस्थेस अनुदान दिले. भारतीय विज्ञान परिषदेच्या संमेलनात पंतप्रधानांनी अध्यक्षीय भाषण करण्याची परंपरा नेहरूंनी चालू केली. त्याचबरोबर तंत्रविज्ञाननिकेतन अर्थात टी.आय.टी. या अणुऊर्जा महामंडळाची त्यांनी स्थापना केली.

इंधन संशोधन विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ‘शोध घेणे हे विज्ञानाचे क्रियाशील तत्व आहे’ असं सांगून याच भाषणात शास्त्रज्ञांच्या अवैज्ञानिक जीवनपद्धतीवर खरपूस टीकाही त्यांनी केली. नेहरू व्यक्तीगत आयुष्यात वैज्ञानिक मनोवृत्तीद्वारेच जगले. स्वतंत्र भारताची इमारत विज्ञानाच्या पायावर झाली पाहिजे असे त्यांचे मत होते. पंडीतजी एकदा संसदेच्या पायर्‍यावरून पाय घसरून पडले. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांचा ग्रह, ज्योतिष, खड्याच्या अंगठ्या यावर अतिशय विश्वास होता. पंतप्रधानांचे पाय घसरून पडणे हे अनिष्ट व अशुभ दर्शवणारे आहे असे त्यांचे मत होते. काही लोकांनी ‘मोत्याची अंगठी’ घालण्याचे पंडीतजींना आवाहन केले. राजेंद्रप्रसादांनी मोत्याची अंगठी तयार करून सचिवाकरवी नेहरूंकडे पाठवून दिली. नेहरूंनी सचिवाला खडसावले, “तुम्ही मला कधी दागिने घातलेले पाहिलेत का? राष्ट्रपतींबद्दल मला जिव्हाळा आहे परंतु ही अंगठी परत करा.” सचिवाने ही अंगठी परत नेण्यास असमर्थता दर्शविली तेव्हा अनिच्छेने ती अंगठी नेहरूंनी स्वीकारली. परंतु ती बोटात न घालता कोटात ठेवून तरातरा निघून गेले.

“वैज्ञानिक विज्ञानाची स्तुती करतात. प्रयोगशाळेत विज्ञानविषयक कार्य करतात पण जीवनाच्या इतर क्षेत्रात विज्ञानपद्धती व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा त्याग करतात. संपूर्णपणे अशास्त्रीय बनतात हे चूक आहे.” पंतप्रधान नेहरूंनी वैज्ञानिकांना अशा भाषेत सरळसरळ खडसावले.

सिलोन विश्वविद्यालयाच्या पदवीदान समारंभप्रसंगी नेहरूंनी विज्ञानाविषयी आपली भूमिका व्यापकपणे स्पष्ट केली. भाषणात नेहरू म्हणाले, “माझी विज्ञानावर खूपच निष्ठा आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने जग संपूर्ण बदलले आहे. जगाला जर त्याच्या समस्या सोडवायच्या असतील तर त्या अपरिहार्यपणे विज्ञानाच्या सहाय्याने सोडवाव्या लागतील. त्याचा त्याग करून नव्हे.”

पंडीत नेहरू आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार घेऊन जीवनभर वावरले. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला विज्ञानाच्या पायर्‍यांवरून चालण्यासाठी नेहरू कायमस्वरूपी प्रयत्नशील होते.

रशिया, समाजवाद आणि नेहरू

“मी समाजवादी आहे” असे जाहीरपणे जवाहरलाल बोलूून दाखवत. कृतीही तशीच करत. समाजवादी बनण्याच्या व पुढे नेण्याच्या प्रक्रियेमध्ये रशियन क्रांती व त्यानंतर नेहरूंनी रशियाला दिलेल्या भेटी. दोन्ही राष्ट्रांदरम्यान घडवून आणलेला सामंजस्याचा वारसा यांचा महत्वाचा वाटा आहे. “सोविएत क्रांतीने मानवी समाजाची प्रचंड झेपेने प्रगती घडवली आहे. विझवून टाकता येणार नाही अशी तेजस्वी ज्योत प्रज्वलित केली आहे आणि जग जिच्या दिशेने पुढे जाऊ शकेल अशा नव्या संस्कृतीचा पाया तिने घातला आहे.” नेहरूंनी आपल्या पुस्तकात वरील उद्गार काढले आहेत.

1928 च्या डिसेंबर महिन्यात ‘सोविएत रशिया’ या नावाचे जवाहरलालांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. आपल्या पत्ररूप निबंधातून 1917 च्या रशियन क्रांतीचे वर्णन करताना ‘रशियातील झारशाही नष्ट झाल्याचे वर्णन जागतिक इतिहासातील महाप्रचंड अभूतपूर्व घटना’ असे कौतुकोद्गार नेहरूंनी काढले होते. एक विचारी, व्यवहारी कार्यकर्ता म्हणून नेहरूंनी सोविएत संघाच्या इतिहासाचा अभ्यास केला. अनेक निबंधातून त्याचे तपशीलवार वर्णन त्यांनी लिहिले आहे. दुसर्‍या महायुxद्धाच्या स्टालिगग्राड आणि कुर्स्क येथे सोविएत सेनेने प्रचंड विजय मिळवल्याच्या वार्तेने 1943 ला तुरूंगात असताना नेहरूंनी आनंद व्यक्त केला होता. फॅसिझमचा नाश करणेसाठी उचललेल्या या पावलाचे पुढील आयुष्यातही त्यांनी नेहमीच स्वागत केले. भारताच्या अत्यंत महत्वाच्या हितसंबंधासाठी सोविएतशी सहकार्य आवश्यक आहे याची पूर्ण जाणीव ठेवून नेहरूंनी आपल्या भगिनीला, विजयालक्ष्मी पंडीत यांना सोविएत संघामध्ये राजदूत म्हणून पाठवले. याचाच योग्य परिणाम म्हणजे 1955 ला सोविएतच्या मदतीने भिलाई येथे मोठ्या प्रमाणावरील धातू कारखान्याची उभारणी झाली. अमेरिका व ब्रिटन यांनी सहकार्याचा नाकारलेला हात सोविएतने पुढे केला. इतकेच नव्हे तर भांडवलदारी कंपन्यांनी सांगितलेल्या दराच्या निम्म्याने कर्ज दिले. त्याचबरोबर कारखान्याच्या नियंत्रणात कोणतीही अपेक्षा वा स्वार्थ ठेवला नाही. नेहरूंच्या याच परराष्ट्रीय धोरणाचा अनुकूल पुरावा म्हणून सोविएत भेटीवेळी सोविएत विज्ञान प्रबोधिनीच्या पहिल्या अणुशक्ती केंद्राला भेट देण्याची नेहरूंची इच्छा पूर्ण विश्वासाने सोविएतने पूर्ण केली. सर्वात कडी म्हणजे मॉस्को सरकारी विद्यापीठाच्या वैज्ञानिक मंडळाने नेहरूंना मॉस्को विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही सन्मान्य पदवी अर्पण केली. नेहरूंच्या या सोविएत सहकार्याची सुरवात स्वातंत्र्यपूर्व काळातच सुरू होती. याचीच दखल घेऊन लंडनला व्हाईसरॉयनी अहवाल पाठवून ‘जनसमुहाना कम्युनिझमची लस टोचायची हे जवाहरलालचे मुख्य उद्दिष्ट आहे असे कळवून नेहरू म्हणजे ‘छुपे कम्युनिस्ट’ असे म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. सोविएत रशिया हा सर्व दलित राष्ट्रजमातीचा मित्र आहे अशा निष्कर्षापर्यंत नेहरू आले होते.

समाजवादी बनण्याच्या प्रक्रियेचा पुढचा टप्पा नेहरूंनी पंतप्रधानपदी बसल्यावर आपल्या वृत्तीनेच पूर्ण केला. 6 एप्रिल 1948 ला उद्योगधंद्याबाबत सरकारी धोरण जाहीर झाले. पूर्वी वासाहतिक सत्ताधार्‍यांच्या मालकीचे सर्व कारखाने सार्वजनिक मालमत्ता बनणार होते. देशातील सर्वात मोठ्या बँकेचे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण, रेल वाहतूक व शस्त्रोत्पादन सरकारी मालमत्ता बनणार होते. धातू उद्योग, इंधन, रसायने, यंत्र उभारणी वाहतूक व खाण उद्योग ही अर्थ व्यवस्थेतील सर्व महत्वाची क्षेत्रे नवमुक्त राज्याच्या नियंत्रणाखाली आणावीत व पंचवार्षिक योजनेच्या आधारावर त्याचा विकास घडवावा असा आग्रह नेहरूंनी धरला.

1929 च्या काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणात नेहरूंनी आपण समाजवादी असण्याचे जाहीर केले. 1936 मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदावरून पुन्हा समाजवादाचा पुरस्कार केला. ‘समाजवादाला फक्त आर्थिक आधार नाही तर ते जीवनाचे तत्वज्ञान आहे’ असे मत मांडले. भारताची गरीबी, बेकारी व लाचारी समाजवादाद्वारेच नाहीशी होऊ शकते असे नेहरूंनी ठाम मत मांडले. 1936 मध्ये काँग्रेस कार्यकारी समितीमध्ये समाजवाद्यांना घेतले.

नेहरूंनी समाजवादी विचारांचा पुरस्कार म्हणून जमीनदारी उन्मूलन विधेयक मंजूर करताना जमिनीच्या बदल्यात जमीनदारांना मोबदला देण्यास नकार दर्शवला होता. ज्यावेळी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शासन मालमत्ता ताब्यात होते तेव्हा त्या व्यक्तीस रास्त मोबदला दिला नाही तरी काही बिघडत नाही. समाजपरिर्वतनाच्या दृष्टीने व्यक्ती हितापेक्षा समाजहिताला अधिक प्राधान्य द्यावे असे नेहरूंना वाटे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संघामध्ये संस्थानिकांना सामील करून घेताना पटेलांनी त्यांना विशेष हक्क म्हणून तनखा देण्याचे कबूल केले होते. कायमस्वरूपी तनखाच्या स्वरूपाला समाजवादी नेहरूंनी संस्थानिकांनी देशउभारणीसाठी काही भाग स्वेच्छेने सोडावा यासाठी नेहरूंनी संस्थानिकांना पत्रेही लिहिली. परंतु संस्थानिक आणि पटेलांपुढे नेहरूंचा समाजवाद चालला नाही. पुढे 1968 साली नेहरू कन्या इंदिरा गांधींनी संस्थानिकांचे तनखे पूर्णपणे संपवले.

भारताच्या भावी राज्यघटनेत लोकशाहीवादी प्रजासत्ताक घोषित करावे असा प्रस्ताव 1928 दरम्यान मोतीलाल नेहरू नेतृत्वाखालील संयुक्त समितीकडे जवाहरलालनी धरला होता. “महाप्रचंड निम सरंजामदारी इस्टेटींमधील मालमत्तेचा हक्क हा राज्यघटनेचा एक अबाधित पाया असावा हा मला गुन्हा वाटतो.” असं मत त्यांनी मांडले. मोतीलाल समितीने त्यांची मागणी पुरी करण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर तरूण जवाहरने काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता.

1931 च्या कराची काँग्रेस अधिवेशनातही मांडण्यात आलेला दुसरा ठराव खुद्द जवाहरलालनीच तयार केला होता. इतर महत्वाच्या मुद्यांबरोबर मुख्य उद्योगधंदे आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचे नियंत्रण राज्याच्या हाती असावे अशी मागणी त्यात होती. थोडक्यात म्हणजे त्यांच्या राष्ट्रीयकरणाची ती मागणी हेाती. या ठरावाला जवाहरलालनी ‘समाजवादाच्या दिशेने एक छोटे पाऊल’ असे नम्रतेने म्हटले होते. वर उल्लेखल्याप्रमाणे पंतप्रधान बनल्यावर 1948 च्या सरकारी धोरणात कराची ठरावाची योजना कार्यान्वित केली.

समाजवादाला जीवनाचे तत्वज्ञान मानून जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्यभर व्यवहार केला.

शांतीदूत नेहरू….

सुरवातीच्या काळात तरूण जवाहरलालला जहाल विचारांचे आकर्षण निर्माण झाले होते. टिळक विचारांकडे आकृष्टपणा वाढत होता. मोतीलाल नेहरूंच्या बरोबर झालेल्या पत्रव्यवहारातून याचे रूप आढळते. पुढे 1916 मध्ये लखनौमध्ये मोहनदास करमचंद गांधी नावाच्या एका वादळाशी जवाहरलालची गाठ पडली आणि या वादळाच्या सततच्या मार्गदर्शनाने व व्यक्तीगत अभ्यासू वृत्तीने जवाहरची नौका योग्य किनार्‍याला लागली.

युद्ध म्हणजे सत्य आणि मानवता नाकारणे, युद्ध मानवाचा दृष्टिकोन संकुचित बनवते असे पंडीतजींचे मत होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परराष्ट्र संबंधाविषयी नेहरू अधिक उत्साही असत. परंतु त्यांची शांततेच्या दिशेने पावले स्वातंत्र्यपूर्व काळातही पडत होती. 1935 मध्ये इटलीने अ‍ॅबसिनियावर विजय मिळवला तेव्हा नेहरूंनी त्याचा विरोध केला होता. त्यावेळी मुसोलिनीने नेहरूंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा युरोपमध्येच असूनही नेहरू मुसोलिनीला भेटले नाहीत. पॅलेस्टाईन प्रश्नात त्यांची भूमिका व सहानुभूती अरब राष्ट्रांकडेच होती. 1938 ला नेहरूंनी चेकोस्लोव्हाकियाला जाताना म्युनिखमधील वास्तव्यात हिटलरच्या अधिकार्‍याला भेटण्यास नकार दिला होता. 1936 च्या स्पेनच्या गृहयुद्धात नेहरूंनी उदारमतवादी गटास पाठींबा दिला होता. 1937 मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा भारताने चीनला पाठींबा जाहीर करून जपानी वस्तूंवर बहिष्कार टाकला. नेहरूंच्या भूमिकेला साम्यवादी माओने पत्र पाठवून आभार मानले होते. (भविष्यात चीनने बदललेली भूमिका नेहरूंना जबर धक्का देणारी ठरली 1962 चे भारत-चीन युद्ध हे नेहरूंना फारच मनस्ताप देऊन गेले.) 1946 मध्ये आंग्ल-अमेरिकन राजकीय लष्करी गट स्थापन करण्याच्या साम्राज्यवादी धोरणास नेहरूंनी स्पष्ट शब्दात अमेरिका-ब्रिटन यांना जाहीर नकार देऊन ‘असंलग्नतेचे धोरण’ स्वीकारून या लष्करी गटात सामिलीकरणास विरोध केला. पुढेही 1954 साली स्वतंत्र काश्मीर निर्माण करण्याच्या अमेरिकन योजनेला म्हणजेच प्रत्यक्षात काश्मीरला अमेरिकन लष्करी तळ बनवण्याच्या योजनेला नेहरूंनी ठामपणे नकार दिला. 1956 साली सुएझ कालव्याप्रकरणी इजिप्तच्या नासेरला नेहरूंनी नैतिक पाठींबा दिलाच शिवाय पश्चिमी सत्तांनी इजिप्तवर आर्थिक बहिष्कार टाकला तेव्हा भारताने इजिप्तला कर्जेमंजूर केली. पुढे इस्त्रायल-ब्रिटन-फ्रेंच सैन्याने इजिप्तवर आक्रमण करताच ‘निंदास्पद कृती’ अशी तार संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी पाठवली. 1940 साली राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सार्वत्रिक निशस्त्रीकरणाला पाठींबा जाहीर करणारा ठराव झाला होता. नेहरूंनी आयुष्यभर अत्यंत प्रामाणिकपणे, कृतीशीलपणे या ठरावाचे पातळीवर पालन केले.

“शांतता हे सदैव पाठपुरावा करावा असे उद्दिष्ट आहे. मग याबातीत तुम्हाला कितीही शीण आला तरी बेहत्तर!” संसदेत शांततेविषयी आपली भूमिका या वाक्यातून सांगितली होती. दिल्ली आकाशवाणीवर भाषण देताना भारतीय स्वातंत्र्याच्या प्रथम वर्धापनदिनी नेहरू म्हणाले, “लोकशाही म्हणजे सहिष्णुता, आपल्याशी एकमत आहे त्यांच्या बाबतीत नव्हे, तर ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याशीही सहिष्णूतेने वागणे अत्यावश्यक आहे.” नेहरूंची अलिप्तवादी परराष्ट्रनीती यातून स्पष्ट होते. त्याचबरोबर ‘शांतीदूत नेहरू’ हे रूपसुद्धा प्रकर्षाने पुढे येते.

नेहरू विचारांकडे वळून पाहताना……

पंडीत नेहरूंसारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाचे संपूर्ण जीवन छोट्याशा लेखात देणे शक्य नसते. तसेच भारतासारख्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाचे नेतृत्व करताना काही धोरणे, काही पावले चुकीची उमटण्याची शक्यता अधिक असते. त्या त्या वेळी घेतलेल्या निर्णयांकडे काही काळाने वळून पाहिल्यानंतर त्यातील त्रुटी, उणिवा अधिक सामोर्‍या येतात इतकेच नव्हे तर हे निर्णय देशाशी संबंधित असल्याने झालेले नुकसान अधिक गंभीर असते. इतिहासातील अपयशाकडे पाहताना भविष्यात कमीत कमी चुका व्हाव्यात यासाठी इतिहासाकडे, इतिहासतील व्यक्तीरेखांकडे वस्तूनिष्ठपणे, तटस्थपणे पाहणे आवश्यक असते. अफाट व उत्तुंग कार्य करूनही पंडीत नेहरू या गोष्टींना अपवाद कसे ठरणार? त्यांच्या हातून काही चुकलेली धोरणे नजरेखालून जायला हवीत. जेणेकरून वर्तमानात जगताना अधिक वास्तवात निर्णय होणे शक्य होईल.

पहिली पंचवार्षिक योजना यशस्वी ठरली, परंतु दुसर्‍या पंचवार्षिक योजनेत ठरलेल्या गोष्टी वेळेत होऊ न शकल्याने देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली. शेतीकडील दुर्लक्षामुळे अन्नधान्याची समस्या निर्माण झाली. साठेबाजी व काळाबाजार वाढला. अर्थव्यवस्था मोडकळीस आल्याने आंतरराष्ट्रीय कर्जेउभारावी लागली. भाषावार प्रांतरचनेला नेहरू नेहमी विरोध करत. आंध्रप्रदेशच्या मागणीसाठी पट्टाभी रामलू यांचे उपोषणादरम्यान निधन झाले. नेहरूंना आंध्रप्रदेश निर्मिती करावी लागली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला विरोध केल्यामुळे नेहरूंना महाराष्ट्रात विरोधाला सामोरे जावे लागले. नेहरूंच्या अनिच्छेने का होईना परंतु महाराष्ट्र राज्य झालेच. इतिहासाच्या अयोग्य आकलन झाल्याने नेेहरूंनी शिवाजी महाराजांप्रती अनुद्गार काढले. परिणामी प्रबोधनकार ठाकरे यांनी इतिहासाचे दाखले देऊन नेहरूंचे शिवाजी महाराजांबद्दलचे मत खोडून काढले. प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी नेहरूंना रोषाला सामोरे जावे लागले. तिसर्‍या जगाचे नेतृत्व करताना भारताचे चीनमधील राजदूत पण्णीकर यांच्यांवर विश्वास ठेवून नेहरूंनी चीनशी संबंध जोडले. चीनचा अंतस्थ हेतू ओळखू न शकल्याने 1962 साली चीन आक्रमणाला भारताला तोंड द्यावे लागले. डॉ.आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ संमत करण्यात पंतप्रधान म्हणून पंडीतजी अपयशी ठरले. परिणामी आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला. केरळमधील साम्यवादी सरकार काँग्रेस नेत्यांच्या आग्रहाखातर जून 1959 रोजी घटनेच्या 356 कलमाद्वारे बरखास्त केले गेले. राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांचा याला विरोध होता. नेहरूही अनुकुल नव्हते. तरीही सहकार्‍यांच्या आग्रहाला बळी पडून साम्यवादी सरकारचा नेहरूंनी बळी घेतला.

असो. देशाचा कारभार चालवण्यासाठी नेहरूंनी आतोनात कष्ट प्रामाणिकपणे घेतले याबद्दल दुxमत नाही. नेहरूंच्या मृत्यूनंतर साम्यवादी नेते ए.के.गोपालन म्हणाले की, संसदेला जवाहरलालविना विचार करणे कठीण आहे…. त्यांनी सभागृहाला उंचीवर नेले आणि उच्च परंपरा स्थापन केल्या. एका विरोधी पक्षाच्या नेत्याने नेहरूंचे असे केलेले कौतुक म्हणजे नेहरूंची संसदीय लोकशाहीवर असणारी आस्था व पट्टीचे संसदपटू म्हणून मान्यता देणेच आहे.

नेहरूंच्या मृत्यूनंतर ब्रेश्नेव यांनी समर्पक शब्दात त्यांची उंची मोजली होती. ते म्हणाले, “भारतीय जनतेची बुद्धी, तिचे थोर अंत:करण व महान आत्मा ज्याच्यामध्ये सामावला होता, भारतीय जनतेची स्वातंत्र्याची आणि प्रगतीची अविरत धडपड व प्रेरणा ज्याच्यामध्ये सामावली होती, असा तो थोर पुरूष होता.”

भारताच्या या प्रथम क्रमांकाच्या सेवकाला विनम्र अभिवादन!

उमेश सूर्यवंशी

संपर्क: मोबा.9922784065

नेहरू विचारधारा

1) धर्म म्हणजे बदल आणि प्रगती यांना विरोध करणारी प्रतिगामी शक्ती आहे. स्वत:चे आणि जगाचे आकलन करून घेण्याच्या आड येणार्‍या त्या संकुचित, धार्मिक दृष्टिकोनापासून, अतिंद्रिय आणि अध्यात्मवादी तर्कांच्या वेडापासून, धार्मिक उपचार व गूढ विकारवशता यांच्यात मनाची शिस्त ढिली करण्यापासून स्वत:ची मुक्तता करून घ्या.

2) ज्या लोकांना भूतकाळात संधी नाकारण्यात आल्या अशा सर्व लोकांचे जीवनमान वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला सतत विचार केला पाहिजे. राजकीय दृष्टीने त्यांना राखीव जागा देणे हाच ते कर्तव्य पार पाडण्याचा सर्वोत्तम मार्ग मला व्यक्तीश: वाटत नाही. आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात या वर्गाची झपाट्याने प्रगती घडवून आणणे हा या बाबतीत सर्वोत्तम व मूलभूत मार्ग आहे.

3) आपले गुण आणि दोष काही असोत, त्याची भली मोठी यादी करता येईल. पण जीवनाला साहसी वृत्तीने सामोरे जाण्यावर माझा विश्वास आहे. गाजावाजा न करता आणि आरोळ्या न ठोकता जीवनाला अर्ध्या वाटेवर गाठावे असा माझा विचार आहे. गतीशील आणि सृजनशील राहणे हे व्यावहारिक धोरण आहे आणि उच्च सांस्कृतिक दृष्टिकोन आहे.

4) “मी समाजवादी आणि प्रजासत्ताकवादी आहे. राजा-महाराजांवर व उद्योगधंद्यामध्ये आधुनिक राजे निर्माण करणार्‍या व्यवस्थेवर माझा विश्वास नाही. कारण पुरातन काळच्या राजांपेक्षा त्यांची लोकांच्या आयुष्यावर आणि भवितव्यावर अधिक सत्ता चालते आणि जुन्या सरंजामी उमराववर्गासारख्याच त्यांच्या लुटारू पद्धती आहेत.

5) ‘विज्ञान अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे देते, जीवनाला समजून घेण्यास आपणास मदत करते आणि त्याचा जर आपण फायदा घेऊ शकलो तर अधिक चांगले जीवन जगण्यास, लायक हेतूपूर्ण जीवन आपल्याला समर्थ बनवते. जीवनाच्या अंधार्‍या कोपर्‍यांना ते प्रकाशाने उजळून काढते आणि तर्कविहीनतेच्या संदिग्ध गोंधळाऐवजी वास्तवतेला सामोरे जाण्यास आपल्याला शिकवते.”

6) आपल्या मालकीच्या ह्या सुंदर जगाबद्दल त्यातील फुले, झाडे, पक्षी, प्राणी, तारे, पर्वत, हिमनद्या यांचेबद्दल तुमच्याशी बोलायला मला आवडते. प्राचीन काळातील खूप खूप परिकथा आणि गोष्टी तुम्ही वाचा. पण खुद्द जग म्हणजेच एक सुंदर साहसकथा आहे. फक्त आपणाला पहायला डोळे, ऐकायला कान आणि जगातील जीवनाची व सौंदर्याची आपल्याला जाणीव घडली पाहिजे.(लहान मुलांना पत्र)

7) मी राजकारणी असल्यामुळे दोषारोप न करता सांगू शकतो की, आधुनिक लोकशाहीच्या प्रौढ मतदानाच्या पद्धतीनुसार निवडून येणार्‍या व्यक्तींची गुणवत्ता हळूहळू घसरत जाणार आहे. या पद्धतीनुसार नामवंत व्यक्ती निवडून येतील यात शंकाच नाही पण विचार कमी झाल्याने आणि प्रचाराच्या आधुनिक पद्धतीमुळे त्यांची गुणवत्ता निश्चितच घसरते, प्रचाराचा सगळा गोंगाट आणि प्रचार यंत्रणेमुळे माणसांना विचार करण्यास प्रतिबंध होतो. या प्रचाराच्या गोंगाटापुढे ज्याचा निभाव लागत नाही. असा प्रतिस्पर्धी निवडणुकीत पडतो आणि लोक एखाद्या हुकुमशहाला अथवा संवेदनाशून्य पण या गोंगाटाला न जुमानता दोन पायावर उभ्या राहणार्‍या राजकीय नेत्याला निवडून देऊन या गोंगाटाबद्दलची त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतात.