Categories
कथा

प्रेस पत्रकारिता

वार्षिकांक – २०१४

एक गाव होतं. गावात हवेली होती. सुनसान आणि एकटी. हवेली गावाच्या टोकास होती. त्यात कधीतरी जमीनदाराचं कुटुंब रहात होतं. जमीनदार मरून गेला. त्याची मुलं हवेली विकायच्या गोष्टी करत. भावाभावात वाटणीवरून झालेला वाद कोर्टात पोहोचला आणि मग हवेलीकडे कुणी फिरकेनासं झालं. म्हातारा चौकीदार कोपर्‍यात पडून राहायचा. गावातील तरूण मुलं आयुष्यातील पहिल्या चुंबनाचा अनुभव त्या हवेलीत घेत. हवेलीचा परिसर खूप मोठा होता. तिथे आंब्याची, चिंचेची झाडं होती. मुलं कधीतरी चौकीदाराची नजर चुकवून आंबे पाडण्यासाठी आत घुसत…. हळूहळू हवेलीच्या भोवतीच्या भिंती पडू लागल्या. त्यावर गवत उगवलं. मग मुलं तिथे जायला घाबरू लागली. कधीतरी कुणास कीडा चावत असे, तर कधी साप फुत्कारत असे. हवेलीवर वटवाघळाचा कब्जा होता.

पण तरीही हवेली इतकी भीतीदायक झालेली नव्हती. एके दिवशी चौकीदार मेला. आता हवेलीत घुसणं जास्तच सोपं झालं. लोक जगाची नजर चुकवून हवेलीत घुसत. जे हातास लागेल ते घेऊन येत. नेहमी चोर्‍या होऊ लागल्यावर पोेलीस चौकीतील पोलीस दिवसातून एक दोन चकरा मारून जाऊ लागला. आता चोर रात्री येऊ लागले. रात्री चोर येत, वटवाघळं उडत, झाडावर झोपलेले पक्षी कलकलाट करीत. गावातील कुत्री भुंकू लागत. गावास जाग येई. विशेषत: म्हातारी माणसं जागी होत. हवेलीबाबत गावात चर्चा होऊ लागली. कुणी म्हणे जमीनदारांच्या मुलांशी बोलायला हवं. गावातील लोकच हवेलीची साफसफाई करून तिथे शाळा सुरू करतील. हवेलीही वाचेल आणि शाळाही सुरू होईल. कुणी म्हणे कोर्टाचा निकाल लवकर आला पाहिजे, म्हणजे हवेली विकता येईल. जो कुणी हवेली खरेदी करेल त्याच्या इच्छेप्रमाणे हवेलीचा वापर करता येईल. कमीत कमी रात्रीची दहशत तरी कमी होईल. दहशत तर होतीच. पण तरीही हवेली इतकी भीतीदायक नव्हती. गावातील मास्टर रामलाल यांचा मुलगा रतन दिल्लीच्या एका मोठ्या टी.व्ही.न्यूज चॅनेलवर नोकरीस लागला नव्हता तोपर्यंत तरी हवेली भीतीदायक नव्हती.

रतन हिंदी साहित्याचा विद्यार्थी होती. लहानपणी तो हवेलीत कितीतरी वेळा गेलेला होता. तिथेचं त्याचं प्रेमप्रकरण रंगलं होतं. तिथेच त्याने पहिली प्रेमकविताही लिहिली होती. तो शहरातून जेव्हा जेव्हा गावी येई तेव्हा तेव्हा हवेलीचे बदलणारे रंग त्यांने पाहिले होते. किंवा असं म्हणता येईल की, हवेलीची दिवसेंदिवस होणारी दुर्दशा त्याने पाहिली होती त्याच्या प्रेयसीचं लग्न दुसरीकडेच कुठेतरी झालं आणि तो हवेलीच्या कोपर्‍यातील वडाच्या एकाकी झाडावर कोरलेली दोघांची नावं शोधण्याचा प्रयत्न करीत राहिला. मग त्याचं शिक्षण पूर्ण झालं, नोकरीसाठी त्याच्यावर दबाव वाढला. रतन जे.एन.यु.मधून अज्ञेयच्या ‘शेखर : एक जीवनी’ वर संशोधन करू इच्छित होता. पण त्यास नोकरी करावी लागली. तीही एका न्यूज चॅनलवरच्या अपराध ब्युरोमध्ये. पहिल्याच दिवशी ब्युरोचा प्रमुख रतनवर नाराज झाला. रतनने ‘मनोहर कहानियाँ’ किंवा ‘सत्यकथा’ ही नियतकालिकं कधीही वाचलेली नव्हती. त्याचं हिंदी चांगलं होतं. पण हत्या-बलात्कार, भूत-पिशाच्च, चोर-अंडरवर्ल्ड, सुपारी-अपहरण अशा शब्दांमध्ये त्याचं मन रमणं शक्य नव्हतं पण करणार काय? नोकरी करायचीच होती. निवृत्त होणार्‍या वडिलांचा तरूण मुलगा खूप असहाय्य असतो.

रतन डेस्कवर होता. म्हणजे अपराध-ब्युरोच्या रिपोर्टरकडून ज्या बातम्या येत त्यांना टी.व्ही.स्क्रिप्टचं रूप देत असे. देशभरातून रिपोर्टर जे व्हुजुअल्स पाठवित, जे इंटरव्ह्यु पाठवित त्यांचं संपादन करून तो त्यातून एक चांगली अपराधकथा तयार करीत असे. एके दिवशी दिल्लीच्या जवळच्या गावातून एक कथा आली. सावत्र बापाने मुलीवर बलात्कार केला होता. ब्युरोप्रमुखाने रतनला म्हटलं, ‘सावत्र’ शब्द काढून टाक. त्यामुळे या स्टोरीची धार कमी होईल. रतनला हे पटत नव्हतं. पण त्यास तो शब्द एडिट करावाच लागला.

ब्युरोमधील लोक दिवसभर हसत खिदळत असत. ज्युनिअर लोकांना क्राईमस्टोरी कशी करावी हे शिकवत आणि त्याचवेळी त्यांना छेडण्याचा अपराधही करीत. दुपारनंतर ऑफिसच्या बाहेर शर्माजींच्या चहाच्या दुकानावर जात. परत आल्यानंतर रतनला दाऊद इब्राहिमच्या टेप्स काढायला सांगत आणि मग सनसनी खोज… एक्सक्लुसिव्ह स्टोरी लावत. ‘डॉन का नया धमाका’

रतनही शर्माजींच्या चहाच्या ठेल्यावर जाई. तो एक नाही तर दोन चहा पीत असे पण त्यास डॉन कधीच दिसत नसे. वरिष्ठांना विचारलं तर उत्तर मिळे- “तू साहित्याचा विद्यार्थी कसा? जरा देखील कल्पनाशक्ती नाहिये…. अपराध ही एक फॅक्ट आहे आणि अपराध कथा ही फॅन्टसी… एक कथा….”

रतनच्या हे पचनी पडत नसे. बरोबरचे लोक शर्माजींच्या चहाची आणि बरोबरीच्या मुलींच्या ओठाची चव घ्यायला शिकले. रतन मात्र जिथल्या तिथेच राहिला. दुसर्‍यांनी पाठवलेल्या रिपोर्टस्ना अपराध कथेचं रूप देत राहिला.

पण असं नेहमीसाठी उपयोगाचं नव्हतं आणि रतनने ठरवलं की, आपण डेस्कवरून उठलं पाहिजे. रिपोर्टर बनलं पाहिजे. एक क्राईम रिपोर्टर. एके दिवशी तो रिकाम्या वेळी इतर रिपोर्टर बरोबर जाऊ लागला. एके दिवशी रतन हरिशबरोबर लुटालुटीच्या एका घटनेची स्टोरी कव्हर करण्यासाठी गेला. एस.पी.चा बाईट घेतला जात होता. तेव्हाच ब्युरोप्रमुखाचा फोन आला – “मुंबईत मोठा सट्टा पकडला गेलाय. संध्याकाळी सात वाजता बातमी द्यायचीय. एक पॅकेज तु ही कर.” भारत ऑस्ट्रेलिया मॅच संबंधी सट्टा होता. रतन घाबरला. “चार वाजताहेत. इतक्या घाईने कसं होणार?” हरीशने शर्माजींच्या चहाचा स्वाद घेतलेला होता. त्याने एस.पी.चा सट्ट्यासंबंधीचा एक सर्वसाधारण बाईट घेतला. मग ड्रायव्हरच्या तोंडावर कपडा बांधला. त्याला सटोरिया बनवून सट्ट्याचे भाव विचारले. एस.पी.ने मदत केली. सट्ट्याचे रेट सांगितल्यावर हरीश एस.पी.ना म्हणाला, “तात्काळ एक लाईव्ह रेड मारा. मजा येईल.” एस.पी.ने सी.ओ.ला सांगितले. सी.ओ.ने ठाणेदाराला. पूर्वीच्या सटोरियांकडे रेड टाकण्यात आली. स्टोरी तयार. अपराध ब्युरोचा प्रमुख खुश झाला. बॉस मंडळी खुष झांली. पुढच्या आठवड्यात ती बातमी टी.आर.पी.मध्येही पहिल्या दहामध्ये आली. अजून काय पाहिजे? रतन शिकत होता. आता त्याला ‘शेखर : एक जीवनी’ पेक्षाही ‘दाऊद : एक जीवनी’ मध्ये खूप आनंद मिळत होता. कारण ‘दाऊद’नेच त्यास रिपोर्टर बनवलं होतं. पगार वाढला होता आणि त्याबरोबरच त्याचं वजनही वाढलं होतं.

सगळ्या चॅनलवरच असे रतन येत होते. क्राईम शो वाढत होते. पत्रकारीतेकडून प्रेसपत्रकारितेकडे. कारण आता प्रेसपत्रकारितेचंच युग होतं. प्रत्येक आठवड्यास एक प्रेतकथा द्यायची होती. अचानक उजाड झालेल्या हवेल्यांचे दिवस फिरले. प्रत्येक हवेलीत एक भूत होतं. प्रत्येक बंगल्यात जित्र होता. प्रत्येक महालात एक चुडैल राहू लागली होती. दुरवरच्या स्ट्रिंगर्सना आदेश दिला गेेला. भूत, प्रेत, चुडैल, जित्र शोधायला सांगितलं गेलं. त्याचवेळी रतनला आपल्या गावातील हवेली आठवली. त्याच हवेलीत त्याचं पहिलं प्रेम झालं होतं. त्याच हवेलीत त्याला आता ‘भय’ शोधायचं होतं. रतनच्या मनावरून प्रेमाचं भूत केव्हा उतरलं आणि चॅनलचं भूत केव्हा स्वार झालं हे त्याचं त्यालाही कळलं नाही.

रतन ही कल्पना घेऊन अपराध ब्युरो प्रमुखाच्या केबीनमध्ये गेला. ते एका स्ट्रिंगरला फोनवरून रागवत होते. रतनने कारण विचारलं तर ते स्ट्रिंगरला शिव्या देऊ लागले. असं झालं होतं की, स्ट्रिंगरने एका जिमच्या मालकाच्या हत्येची बातमी पाठवली होती. त्याचं चार जणांचं कुटुंब त्या जिमच्या कमाईवरच चाललं होतं. एके दिवशी त्याची हत्या झाली. स्क्रिप्ट फॅक्सने आलं होतं आणि गेले तीन दिवस तो फॅक्स तसाच पडून होता. एके दिवशी बातम्यांचा दुष्काळ पडला. तेव्हा त्या फॅक्सची आठवण झाली. त्यावरची अक्षरं पुसट होती. ब्युरोप्रमुखाने ‘जिम’च्या जागी ‘जीप’ वाचलं. (स्ट्रिंगरने देखील ‘जिम’ हा शब्द ‘जीम’ असाच लिहिला होता.) मग काय जीपचे शॉट काढण्यात आले. खूप दु:खी स्टोरी तयार झाली. …. तो जीप चालवत होता. त्याच्या कुटुंबाचा आधार जीपच होता. एके दिवशी त्याची हत्या आली… वगैरे. स्ट्रिंगरने बातमी पाहून फोन केला. त्यामुळे क्राईम ब्युरो चिफ भडकले- “जीप असो किंवा जिम त्याने काय फरक पडतोय…. हत्या तर झालेलीच आहे नां? रोजी रोटीचा आधार तर गेला आहेच ना? ये साले स्ट्रिंगर बाल की खाल निकालते है!”

रतनला अशा गोष्टींची आता सवय झाली होती. तोही एकदा भुताच्या महालाची स्टोरी करायला गेला होता…. त्याला आठवलं तेव्हा तिथे मेळा लागलेला होता. भुतं कुठे नव्हती. हे जेव्हा रतनने प्रमुखांना सांगितलं तेव्हा त्याला अशीच बोलणी खावी लागली हेती. रतनने ती स्टोरी कशी केली होती हे तोच जाणून होता. त्याला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की, कंपनीचे पैसे खर्च करून तो इतक्या दूर गेलाय. जर रिकाम्या हाताने आला तर त्यास पुन्हा डेस्कवर बसावे लागेल. त्याच्या नशिबाने त्या महालाच्या बाहेरही कुण्या शर्माजीच्या चहाचा ठेला होताच. रतनने चहाचे दोन कप ढोसले. चहावाल्याला महालाच्या सुनसान भागात नेऊन त्याचा हवा तसा बाईट घेतला. एडिटिंगमध्ये कुठल्यातरी जुन्या हवेलीचे शॉट टाकले. त्या मेळ्यालाही भुतांच्या जयंतीशी जोडून दिले.

रतन आपल्या गावी पोहचला तेव्हा संध्याकाळची वेळ होती. उन्हाचा इफेक्ट अतिशय सुरेख मिळत हेता. त्यामुळे त्याने तिथे पोहचताच हवेलीचं शुटींग सुरू केलं. इतके चांगले शॉटस् पुढे मिळतील न मिळतील… कुणी रिस्क घ्यावी. बघता बघता ही बातमी गावात पसरली. हळूहळू हवेलीच्या बाहेर सगळा गाव जमू लागला. गाववाल्यांना वाटलं की, आपल्यागावातील मास्टर रामलाल यांचा मुलगा रत्न आलाय. आता हवेलीचं नशीब जरूर उघडेल. हवेली टी.व्ही.वर झळकेल. जज्ज साहेबही पहातील आणि संपत्तीच्या खटल्याचा लवकर निकाल देतील. कदाचित सरकार ही हवेली ताब्यात घेईल आणि हवेलीची साफसफाई करून तिथं शाळा किंवा हॉस्पिटल सुरू करेल.

रतनने गावातल्या लोकांना हवेलीच्या इतिहासाबद्दल विचारायला सुरवात केली. म्हातार्‍या माणसांनी रतन या गावाचाच आहे, तो ह्या हवेलीत अनेक वेळा गेला आहे, या गोेष्टीची त्याला आठवण करून दिली. हवेली अशी उजाड का झालीय हेही त्याला माहितीय. रतनने चौकीदाराच्या अचानक झालेल्या मृत्यूसंबंधी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी त्याला अडवलं. पण रतन हिंमत हरला नाही. त्याने नाग-नागिणीचा विषय काढला. पण गावकर्‍यांना तोही खूप स्वाभाविक वाटला. रतनला अचानक आठवलं की, काही वर्षांपूर्वी गावातील एका मुलीने हवेलीवरच्या विहिरीत उडी मारून जीव दिला होता. तिथे हजर असलेल्या गावातल्या पोलिसाने सांगितलं की, त्या मुलीला गावातल्या कैलास नावाच्या तरूणानेच विहिरीत ढकललं होतं आणि नंतर त्याने आपला अपराध कबुलही केला होता. दहा वर्षांची शिक्षा भोगून आलेला कैलास आजकाल जवळच्याच विटांच्या भट्टीवर मजुरी करतो. रतनला वाटलं की, ती मुलगी प्रत्येक अमावास्येला रात्री त्या हवेलीत फिरत असे. त्यावर सगळा गाव हसला. “अरे बेटा, ती तर वाटवाघळं असतात. ती रात्री फडफडत असतात.”

प्रश्नोत्तराच्या भानगडीत रात्र उतरून आली आणि गावातील लोकांची गर्दी कमी होऊ लागली. रतनदेखील आपल्या कॅमेरा टीमजवळ पोचहला. घरच्यांना सांगितलं की, खूप काम आहे. रात्रभर शुटींग चालेल. त्यामुळे तो घरी येऊ शकणार नाही. आता हवेलीच्या मागच्या बाजूला कार उभी केली गेली. कार-ओ-बारमध्ये राष्ट्रीय कार्यक्रम सुरू झाला. पिण्याचा, पाजण्याचा. दिवसा शर्माजींचा चहा आणि रात्री दारू. दोन पेग नंतर वातावरण तयार होऊ लागलं.

…. एक हवेली होती. भुतंखेतं असलेली. कधीतरी इथे जमीनदार ठाकूर जशवंतसिंह आणि ठाकूर अर्जुनसिंह रहात होते. दोघांही भावांचा स्वभाव मौजमस्ती करणार्‍यातला होता. रात्री मैफली सजत. सगळी रात्र नर्तिकांच्या सान्निध्यात जाई. एक दिवस तारा नावाची नर्तिका आली. अतिशय सुंदर. दोन्ही ठाकुरांमध्ये ताराला पहिल्यांदा भोगण्यावरून वाद झाला. तलवारी बाहेर आल्या. रात्री हवेलीत सन्नाटा पसरला होता. तेव्हा एका कोपर्‍यातून किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. त्या सगळ्या हवेलीत घुसल्या. ताराने आत्महत्या केली होती. आणि तिचा आत्मा हवेलीत फिरू लागला. त्या आत्म्याने दोन्ही ठाकूरांचा बदला घेतला. दोघेही हवेलीच्या विहिरीत रहस्यमय पद्धतीने मेलेले सापडले. त्याच विहिरीत अमावास्येच्या रात्री ताराने जीव दिला होता. दोन्ही ठाकूरांच्या पत्नी पतीव्रता होत्या. काही लोक म्हणतात की, त्या सती गेल्या. तर काहींचं म्हणणं आहे की, त्यांनीही विहिरीत जीव दिला. त्यानंतर काय….

दारू डोक्यात जाऊ लागली होती. चंद्रही आकाशात वर आलेला होता. अचानक कॅमेरामनला एक कल्पना सुचली. तो अलिकडेच नाग-नागिणीची स्टोरी शुट करायला गेला होता. गारूडी, त्याची पुंगी, नागिणीचं गाणं आणि नागिणीने घेतलेला बदला. दोन दिवस त्याने हेच सगळं शूट केलं होतं आणि चार दिवस नागनागिण त्याच्या स्वप्नात येत होते. कॅमेरामन म्हणाला की, ठाकूर आणि ठाकूरांच्या पत्नी यांचं रूपांतर नाग-नागिणीत करू यात.

कथा पुढे सुरूझाली. लोक म्हणतात की, ठाकुरांच्या पत्नी आपल्या तप साधनेने नागिणी बनल्या. ठाकूर नाग नागिणींच्या दोन जोड्या हवेलीचं रक्षण करू लागल्या. ताराचा आत्माही नाग नागिणींना घाबरत होता. गावातील मुलं कैर्‍या, चिंचा तोडायला येत तेव्हा नागनागिणींची जोडी दिसे. ते ताराच्या आत्म्याचं रूप बदलून आलाय असं समजत असत. त्या जोड्या मुलांच्या मागे लागत. एका अमावास्येला रात्री ताराचा आत्मा भटकत होता तेव्हा नागनागिणीची जोडीही तिथे आली. मग आत्मा आणि नागनागिणींची लढाई. अजब आयडिया! टेलिव्हिजन इतिहासात पहिल्यांदाच हे दृश्य म्हातार्‍या चौकीदाराने पाहिलं आणि नागनागिणीच्या जोडीने त्याला डंख मारला. ताराचा आत्मा चौकीदाराच्या आत्म्याला घेऊन निघून गेला. कैलास देखील आपल्या प्रेयसीला भेटायला रात्री हवेलीत गेला होता. नागनागिणीने तिला ताराचा आत्मा समजलं होतं. दोघंही तिच्या मागे लागले. त्यात त्या मुलीला आपला जीव गमवावा लागला.

पाच पाच पेग झाले होते आणि डोक्यात अर्ध्या तासाच्या एपिसोडसाठी पाच तासाचं मॅटर तयार झालं होतं. आता केवळ शुटींग करणं बाकी होतं. रतनने मान वर करून हवेलीकडे पाहिलं. जिथे त्याचं प्रेम फुललं होतं त्या हवेलीकडे. हवेलीत त्याला कुठेही आपली प्रेयसी दिसली नाही. पण त्याला कधी झरोक्यातून ताराचा आत्मा दिसे, तर कधी नागनागिणीची जोडी दिसे. रतनने सिगरेट पेटवली आणि तो मोठ्याने हसला. त्या आवाजाने झाडावर बसलेले पक्षी फडफडले. सगळं युनिट घाबरलं. मग सगळेच हसू लागले.

क्राईम ब्युरोचा चीफ ऑफीसात चालला होता. आपल्या नव्या होंडासिटी कारमधून. त्याची गाडी बहादुरशहा जफर मार्गावर पोहचली तेव्हा त्याला आपलं जुनं ऑफीस आठवलं. बी.ए.मध्ये नापास झाल्यावर तो पत्रकारितेत आला होता. त्याच्याकडे क्राईम बीट देण्यात आलं. पण तरीही त्याची नोकरी पक्की नव्हती. त्याला स्ट्रिंगर बनवण्यात आलं. इकडेतिकडे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो हातापाया पडून बातम्या आणत असे. आणि संपादकाचा पी.ए. महिन्याच्या शेवटी सगळ्या बातम्या पट्टीने मोजून पैसे देत असे. एक रूपया प्रति सेंटीमीटर. संघर्षाचा काळ होता तो. त्याची नोकरी पक्की झाली आणि त्याला क्राईम बीटचं प्रमुख बनवण्यात आलं. टी.व्ही.चॅनल सुरू झालं. चॅनलवर क्राईम संबंधीत कार्यक्रमही सुरू झाले. टी.व्ही.चॅनलवरचे रिपोर्टर त्याला बातम्या विचारू लागले. तोही सांगत राहिला. एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की, मग टी.व्ही.चॅनलवरच नोकरी करायला काय हरकत आहे?…. त्याला अनुभव तर होताच. चेहरा मोहराही ठीक होता. नोकरी मिळून गेली.

नवी होंडासिटी बहादुरशहा जफर मार्ग ओलांडून कधीच पुढे आली होती. ऑफीस जवळच होतं. आणि क्राईम ब्युरोच्या प्रमुखाच्या लक्षात आलं की, मागील एका महिन्यापासून ‘क्राईम’ मधला एकही कार्यक्रम टी.आर.पी.मध्ये आलेला नाही. तो नवा-नवा आला होता तेव्हा पहिल्या दहा कार्यक्रमातले दोन कार्यक्रम ‘क्राईम’चे असत. आत्तापर्यंत त्याच्या भात्यातले सगळे बाण कदाचित वापरून झाले असावेत. किंवा त्याची कल्पनाशक्तीच खुंटली असावी. त्याने दोन वर्षात काही चांगले असिस्टंटस्ही तयार केले होते. त्यातले काही जण दुसर्‍या चॅनलवरही निघून गेले होते. ते तिथे त्याने शिकवल्याप्रमाणेच काम करीत होते. एडिटरला दर आठवड्याला काहीतरी नवीन, धमाकेदार हवं होतं. आणि टी.आर.पी.चं संकट दर आठवड्याला वाढत चाललं होतं. या मध्यंतरीच्या काळात त्याने ‘क्राईम’वर काही चांगले कार्यक्रमही तयार केले होते. पण ते कार्यक्रम टी.आर.पी.मिळवण्यात यशस्वी झाले नव्हते. जे विकलं जातं ते दाखवलं जातं, की जे दाखवलं जातं तेच विकलं जातं… या गोंधळात तो गुरफटला होता.

ऑफीसमधल्या लिफ्टमध्ये पोहचताच रतनचा फोन आला- “बॉस एका हवेलीची जबरदस्त स्टोरी हातात आलीय. या हवेलीशी इतक्या कथा जोडलेल्या असतील, याची मला कल्पनाच नव्हती…. एक मुलगी आणि पाच कॅरेक्टर्स दुपारपर्यंत पोहचतील. रात्रभर ‘शुट’ करू. सकाळपर्यंत कार्यक्रम तयार होईल.” क्राईम ब्युरो प्रमुखाच्या चेहर्‍यावर हास्य पसरलं. साला रतनही पक्का रिपोर्टर बनलाय… तो संपादकाच्या केबीनमध्ये घुसला आणि त्याने संपादकांना ही कल्पना सांगितली. पण त्याचा संपादकावर काहीच परिणाम झाला नाही… ‘तीच हवेली… तोच ठाकूर… तोच आत्मा… काहीतरी नवं करा. नव्या पद्धतीने विचार करा. मागचा आठवडा सगळा वाया गेला. दुसर्‍या चॅनलने दोन नवे धमाके केले. टी.आर.पी.मध्येही खूप कमी फरक आहे. यावेळी आपण जर तोंडावर पडलो तर आपली अवस्था काय होईल? याचा विचार करा.”

क्राईम ब्युरो चीफ शर्माजीच्या चहाच्या ठेल्यावर चहाचे दोन घोट घशाखाली गेले. आणि त्याच्या डोक्यात रतनने सांगितलेली हवेली फिरू लागली. पहिल्या दोन भागात ठाकूर गुलछरे उडवताना दाखवायचा आणि तारा म्हणजे सेक्स! मग ब्रेक… ब्रेकनंतर ताराचा मृत्यू. ठाकूर आणि ठकुराईन ह्यांचं नागनागिण बनणं. चौकीदाराचा रहस्यमय मृत्यू… म्हणजे सस्पेन्स!…. पुन्हा ब्रेक… ब्रेक… नंतर सगळी कहाणीच खोटी ठरवायची. सांगायचं की, आमचा उद्देश अंधश्रद्धा कमी करणं हाच होता. आम्ही जबाबदार पत्रकार आहोता. मग ‘दी एंड!’ अजून काय पाहिजे संपादकाला. स्वत:च्या डोक्यात काही नवीन कल्पना येत नाहीत… फक्त नव्या मुलींच्या मागे लाळ घोटत फिरत असतो. आणि आमचं डोकं खातो… चहाचा शेवटचा घोट घेतला आणि डोक्यात अजून एक कल्पना आली.

हवेलीत रात्रीची शांतता पसरली होती. योगायोगाने आजही अमावास्येची रात्र होती. जनरेटर लावले गेले. तीन तीन कॅमेर्‍यांनी शुटींग करायचे ठयले. ऑफीसने ताराची भूमिका करण्यासाठी एक मस्त मुलगी पाठविली होती. पण सालीने प्रत्येक बाबतीत क्राईम ब्युरोच्या प्रमुखाचं नाव घेऊन रतनचं डोकं फिरवलं होतं. ठाकूरांच्या बायकांची काम करायला आलेल्या दोघींवरच काहीतरी जादू करायला हवी होती…. रतन विचारात पडला. रात्री बारापर्यंत ताराचे शॉटस् झाले. मैफल सजली. धुराच्यामध्ये मरण्याचे शॉटस् देखील झाले. रात्रीचे दोन वाजले. ठाकूर ठकुराईन आणि चौकीदारापर्यंतच शुटींग संपलं. नाग नागिणीचे शॉटस् तर ऑफीसमध्ये गेल्यावरच स्टॉक शॉटस्मधून घ्यायचे होते. स्पेशल इफेक्ट देऊन कार्यक्रम तयार करायचा होता. कॅमेरामन पेग बनवून घेऊन आला. त्यामुळे रतन त्याला नाही म्हणू शकला नाही. आता फक्त त्याचा पार्ट राहिला. होता. रतन हवेलीच्या आत गेला… तळघरात गेला… विहिरीजवळ उभा राहिला. त्याने त्या वडाच्या झाडाजवळ जाऊन देखील अँकरींग केलं. ज्या झाडाखाली बसून त्याने प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या, त्या झाडावर कोरलेलं आपल्या प्रेयसीचं नावही रतनने शोधायचा प्रयत्न केला… मग त्याने अँकरिंग सुरू केलं.

हवेली खरंच खूप मोठी होती. हवेलीचा व्हरांडाही खूप मोठा होता. एका कोपर्‍यात शुटींग करीत असताना दुसर्‍या कोपर्‍यातून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येई किंवा वटवाघळांची फडफड घाबरवून टाकीत असे. पण रतन इतक्या हवेल्यातून रात्रीच्या वेळी गेलेला होता की, भीतीचा लवलेशही त्याच्या मानत उरलेला नव्हता. हीच अवस्था युनिटमधल्या इतर सदस्यांची देखील होती. आता फक्त शेवटच्या भागातील अँकरिंग उरलेलं होतं. त्याला फक्त भूतप्रेत वगैरे काहीही नसतं एवढंच म्हणायचं होतं आणि असलंच तर ती केवळ कल्पना असते. कॅमेरामन त्याच्याजवळ आलेले होते. …. झाडाखाली….. विहिरीजवळ. एक एक छोटा पेग घशाखाली उतरला आणि शेवटच्या कॉम्बेरिंगची तयारी सुरू झाली. एक कॅमेरामन हवेलीच्या छतावर होता. तो शॉटस् कमी पडले तर वापरता यावेत म्हणून काही शॉटस् घेऊन ठेवत होता. रतन विहिरीच्या काठावर होता. दुसरा कॅमेरामन हवेलीच्या पडक्या भिंतीवर होता. तिसर्‍याने वेगळ्याच अँगलने रतनवर कॅमेरा रोखलेला होता. रतनने बोलायला सुरवात केली आणि हवेलीच्या दुसर्‍या कोपर्‍यातून काही आवाज ऐकू येऊ लागले. लाईटही अचानक चमकला. अचानक कुत्रीही भुंकु लागली. छतावर असलेला कॅमेरामन म्हणाला – “तुला चढलीय की काय? तारा तर कधीचीच निघून गेलीय.” छतावरून आवाज आला- “मग गुरू सफेद साडीमध्ये ते दुरून कोण येतंय?” आता रतन आणि दुसरा कॅमेरामन यांनी आश्चर्यचकीत होण्याची वेळ होती. अचानक दुरवरच्या अंधार्‍या कोपर्‍यात गडबड सुरू झाली. वाटलं की, ढोल वाजवत कुणीतरी लोक येताहेत. संगीत वाजू लागलं… वाटलं की, ठाकूरांची मैफल सजलीय. आणि ताराच्या घुंगरांचा आवाज येतोय. छतावरून काहीतरी पडल्याचा आवाज आला. इकडे रतनच्या चेहर्‍यावर तीव्र लाईट चमकला. रतन घाबरून मागे सरकला आणि समोर क्राईम ब्युरोचा प्रमुख उभा होता.

चॅनलच्या ऑफीसात टेप बघितली जात होती. छतावरच्या कॅमेरामनच्या कॅमेर्‍यात तारा येतानाचे शॉटस् होते. कॅमेरामनचा आवाज होता ‘बॉस ताराचे शॉटस् शिल्लक आहेत का?’… मग त्यानंतर कॅमेरा स्टँडवर असूनही हलू लागला.

टेप बदलली गेली. ताराच्या मागे असलेल्या कॅमेर्‍यात ताराला शुट करणार्‍या कॅमेरामनचा चेहरा होता. पहिल्यांदा हसू, नंतर भीती… घाम आणि थरथरणारे हात. मग त्यानंतर कॅमेर्‍यासहीत त्याचं अंधारात गायब होणं आणि हवेत उठलेली एक किंकाळी… पुन्हा टेप बदलली गेली. रतनचं कॉम्पेरिंग वेगळ्याच अँगलने शुट करीत होता कॅमेरामन. चेहर्‍यावर भीतीचे भाव आणि कॅमेरा सोडून त्याचं पळणं. टेप बदलली गेली. रतनवर लख्ख प्रकाश पडल्यानंतरचे शॉटस् होते. रतनच्या चेहर्‍यावर जबरदस्त भय. जणू तो म्हणतोय की, त्या कोपर्‍यात कोण आहे?…. सगळं शुटींग फ्रेम बाय फ्रेम बघितलं गेलं. संपादकाने क्राईम ब्युरो प्रमुखाच्या कल्पनाशक्तीला दाद दिली आणि प्रोमो तयार झाला. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅमेर्‍यात कैद झालेला आत्मा. पहिल्यांदा कॅमेर्‍यासमोर भुतांचा बंगलाच…. फक्त आमच्या चॅनलवर.

कार्यक्रमाचं प्रसारण झालं. शेवटचा भाग बदलण्यात आला. सांगितलं गेलं की, शुटींग होताना ताराचा आत्मा हवेलीच्या कोपर्‍यातून सगळं पहात होता… दोन्ही ठाकूर आणि त्यांच्या बायकाही हजर होत्या. स्पेशल इफेक्ट टाकून असं सांगितलं गेलं की, जेव्हा तारा नृत्याने दोन्ही ठाकूरांना घायाळ करीत होती, तेव्हा जी ‘तारा’ होती ती अ‍ॅक्टींगसाठी आणलेली तारा नव्हतीच. तर खर्‍या ताराच्या आत्म्याने त्या कलाकार ताराच्या शरीरात प्रवेश केलेला होता. त्यानंतर ‘मधुमती’ चित्रपटातले क्लायमॅक्सचे शॉटस् दाखवण्यात आले. हवेलीच्या छतावरील कॅमेरामनच्या आवाजांचा प्रतिध्वनी वारंवार ऐकवण्यात आला…. ‘बॉस, ताराचे काही शॉटस् बाकी आहेत का?… मग ही कोणती तारा समोरून येतेय?”

हा कार्यक्रम चार तास चालवला गेला. प्राईम टाईममध्ये स्टुडिओमध्ये काही वैज्ञानिक, काही पंडित, काही ज्योतिषी बोलावले गेले. सगळेजण ते बघून चक्रावले होते. प्रेक्षकांना प्रश्न विचारायला सांगितलं गेलं. अँकर वारंवार सांगत होता की, ज्यांचं हृदय कमजोर असेल त्यांनी हा कार्यक्रम बघू नये. प्रेक्षकांचे इतके फोन आले की, चॅनलवरच्या टेलिफोन लाईन्स जाम झाल्या. काही लोक तर ताराचं रहस्य जाणून बेशुद्ध पहले. पहिल्यांदा टी.व्ही.चॅनलवर भुतांचा खराखुरा वावर दाखवण्यात आला होता. संध्याकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंत तो कार्यक्रम चालला. ‘हे तर काहीच नाही’ असं वारंवार सांगितलं जात होतं. 11 वाजल्यानंतर आम्ही यापेक्षाही काहीतरी अघटीत दाखवणार आहोत असंही सांगितलं जात होतं. प्रेक्षक आपल्या मुलाबाळांना झोपवून पुन्हा कार्यक्रम पहायला बसले.

शेवटी टी.व्ही.चॅनेलची सामाजिक जबाबदारी होती, म्हणून सत्य सांगावच लागलं. मोठ्या गर्वाने सांगितलं गेलं की, एक युनिट शुट करीत होतं. त्यांना न सांगता हवेलीच्या दुसर्‍या टोकास दुसरं युनिट ठेवलं गेलं. त्या युनिटने ताराला छतावर पाठवलं. ढोल वाजले. गोंधळ झाला. तीक्ष्ण प्रकाश पहिल्या युनिटवर टाकत गेला. चॅनलने सांगितलं की, भूत, प्रेत, हडळी यांच्या नावावर भोळ्या जनतेला लुटलं जातं, सामान्य माणूस अशा गोष्टींनी कसा घाबरून जातो हे दाखवणं हाच चॅनलचा उद्देश होता.

कार्यक्रम जबरदस्त लोकप्रिय झाला. टी.आर.पी.इतका मिळाला की, विचारायची सोयच नाही. क्राईम ब्युरोच्या प्रमुखाचे वेतन दुप्पट करण्यात आले. शानदार पार्टी झाली. दुसरे चॅनलवाले डोकं ठोकून घेत राहिले. आता यापेक्षा जास्त काय घडणार? पण टी.व्ही.चॅनलनं. एक सत्य सांगितलंच नाही.

या सत्याचा खळबळजनक खुलासा कार्यक्रम प्रसारणानंतर तीन महिन्यांनी झाला. अचानक क्राईम ब्युरोच्या प्रमुखाने राजीनामा दिला. असं कळलं की, त्या रात्री छतावरून पडलेला कॅमेरामन आणि घाबरून विहिरीत पडलेला रतन गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. दोघेही कोमात गेले होते आणि तीन महिन्यानंतर त्यातच त्यांचा अंत झाला होता. त्या दिवशी क्राईम ब्युरोच्या प्रमुखाने राजीनामा दिला.

आता ती हवेली खरचंच भुतांची हवेली झालेली आहे. गावातले लोक त्या हवेलीत जायला घाबरतात. प्रेमीजन देखील दुसरीकडे भेटतात. अमावास्येच्या रात्री त्या हवेलीत घुंगरांचा आवाज येतो असं गाववालेच सांगू लागलेले आहेत. लाईटस् चमकतात. असं वाटतं की, कोणत्या तरी कार्यक्रमाचं शुटींग चाललेलं आहे. गाववाल्यांना हातात माईक घेतलेला रतनही कधी कधी दिसतो. कधी हवेलीच्या छतावर, कधी वडाच्या झाडापाशी, तर कधी विहिरीच्या काठावर. एक म्हातारा हवेलीतून फिरताना दिसतो. तो जोरजोराने ‘रतन! रतन!!’ असं ओरडत असतो. मग तो रडू लागतो. तो म्हातारा म्हणजे रतनचा बाप आहे. मास्टर रामलाल…. तो वारंवार आव्हान देतो की,… रतनच्या मरणावर कार्यक्रम करायची हिंमत आहे कोणत्या चॅनलमध्ये? जबरदस्त टी.आर.पी. मिळण्याची शंभर टक्के गॅरंटी….

आत्तापर्यंत रतनच्या मृत्यूवर कार्यक्रम करायचं धाडस कोणत्याही चॅनेलने दाखवलेलं नाही. सगळे चॅनल्स तशी योजना आखताहेत, असं अधिकृत सुत्रांकडून कळत असतं.

–चंद्रकांत भोंजाळ

लेखक संपर्क: bhonjalck@gmail.com