सदरासंबंधी... पुस्तक परिचय या सदरातून आपण अलिकडील प्रकाशित पुस्तकांचा परिचय करून घेत असतोच. परंतु चळवळीत नव्याने आलेल्या अगर येऊ घातलेल्या अनेकांना 50-60 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या अनेक महत्वांच्या पुस्तकांबद्दल माहिती असते असे नाही. ही पुस्तके परिवर्तनवादी चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांच्या आणि परिवर्तनाच्या चळवळीबद्दल आस्था असणार्यांच्या दृष्टीने महत्वाची असतात. अशा काही महत्वांच्या जुन्या पुस्तकांची ओळख अंनिवाच्या वाचकांसाठी व्हावी या हेतुने हे सदर चालू करण्यात आले आहे. यापूर्वी मार्च 2012 च्या अंकात थोर विचारवंत आणि संत चळवळीचे अभ्यासक प्रा.गं.बा.सरदार यांच्या ‘संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती’ तसेच जून 2012 च्या अंकात थोर विदुषी प्रा.नलिनी पंडित यांच्या ‘आंबेडकर’ या पुस्तकाचा परिचय करून दिलेला आहे. या अंकात एस.जी.सरदेसाई यांच्या ‘भारतीय तत्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष’ यांच्या लोकवाङ्मय गृह, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा परिचय करून देत आहोत..... संपादक
तत्वज्ञान ही काही आकाशातून पडणारी गोष्ट नाही. बर्याच वेळा तत्वज्ञानाची मांडणी करताना त्याचे सामाजिक, आर्थिक संदर्भ बाजूला ठेवून चर्चा केली जाते. त्यामुळे त्या तत्वज्ञानाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक घटकांची चर्चा केली जात नाही. परंतु याला एस.जी.सरदेसाई यांचे ‘भारतीय तत्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष’ हे पुस्तक अपवाद आहे. त्यांनी या पुस्तकात भारतीय तत्वज्ञानाची सुबोध, सोप्या भाषेत रूपरेषा मांडली आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात तत्वज्ञानाचा केवळ ‘तात्विक काथ्याकूट’ नाही. तर या तत्वज्ञानावर आधारलेल्या सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक वास्तवाचा त्यांनी नेमकेपणाने घेतलेला ‘वेध’ आहे.
सरदेसाई यांनी त्यांच्या या पुस्तकात तत्वज्ञानाचे सामाजिक, आर्थिक, राजकीय घटक उलगडून तत्वज्ञानाचा आणि परिस्थितीचा जैव संबंध कसा आहे हे या पुस्तकात अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. समाजपरिवर्तनाचे राजकारण करताना तत्वज्ञानीय दृष्टी स्पष्ट असणे आवश्यक आहे. तरच आपण या कार्यात कुठपर्यंत मजल मारली आहे याची कल्पना येते. म्हणूनच ‘तत्वज्ञानाशिवाय व्यवहार आंधळा असतो तर व्यवहाराशिवाय तत्वज्ञान वांझ असते’ असे म्हटले जाते. भारतीय समाजात परिवर्तनाचे राजकारण करणार्या कार्यकर्त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचा सर्वसाधारण का होईना अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याशिवाय आजच्या समाजव्यवस्थेचे मर्म त्यांना उलगडणे अशक्य आहे. त्याच हेतूने सरदेसाई यांनी या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. आपल्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, “विचार ही समाजजीवनातील एक अत्यंत प्रभावी शक्ती आहे. पुरोगामी आणि क्रांतीकारी विचारांनी कष्टकरी समाजाची एकजूट भक्कम होते. क्रांतीकारी चळवळीला मार्गदर्शन होते. प्रतिगामी विचारधारांनी चळवळीची दिशाभूल होते. जनतेत फूट पडते. ज्यांनी एकवटून अन्याय आणि शोषणविरोधात लढले पाहिजे त्यांच्यातच तंटेबखेडे निर्माण होतात. अशा रितीने जनतेची दिशाभूल करून तिच्यात फूट पाडण्याची जी अनेक वैचारिक साधने आहेत त्यातील धर्मांधता हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. आज हिंदू, इस्लाम, शीख, ख्रिश्चन या सर्व धर्मांचा दुरूपयोग याच हेतूने प्रचंड प्रमाणावर केला जात आहे.”
“हिंदू धर्माभिमानाचा नावाखाली गूढवाद, देवभोळेपणा, दैववाद, तर्कशुद्ध दृष्टीला विरोध यांना चालना दिली जात आहे. इतकेच नव्हे तर जातीभेद आणि जातीयवादाला खतपाणी घातले जात आहे. यासाठी भारतीय परंपरेचाही उपयोग केला जात आहे. त्या परंपरेला विकृत स्वरूप दिले जात आहे. या परंपरेत ज्या परंपरा पुरोगामी आणि जनताभिमुख होत्या त्यांची बदनामी केली जात आहे आणि ज्या परंपरा जनताविरोधी आणि प्रतिगामी आहेत त्यांचा उदोउदो केला जात आहे. या सर्व प्रश्नांवर थोडक्यात आणि सोप्या भाषेत प्रकाश टाकणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.”
या पुस्तकाच्या आत्तापर्यंत सहा आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. पहिली आवृत्ती 1977 च्या नोव्हेंबरमध्ये प्रकाशित झाली. नुकतीच त्याची सहावी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. यावरूनच या पुस्तकाचे महत्व लक्षात येते.
पुस्तकाच्या सुरवातीलाच सरदेसाई यांनी तत्वज्ञानाच्या संदर्भातील रूढ समजुती आणि भारतीय तत्वज्ञान म्हणजे वेदांत हे समीकरण खोडून काढले आहे. “आज आपली अशी समजूत करून दिली जाते ती म्हणजे भारतीय तत्वज्ञान म्हणजे वेदांत. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या वेळेस राष्ट्रवादाची भावना जागवण्यासाठी त्या वेळेच्या क्रांतीकारकांनी, नेत्यांनी आपल्या परंपरातून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला. तर जे धार्मिक विचारांचे होते, धर्मांध होते त्यांनी हिंदू म्हणून वेदांताचे तत्वज्ञान जवळ केले आणि तेच जणू खरे भारतीय तत्वज्ञान अशी मांडणी सुरू केली व तीच मांडणी आजवर होत आली आहे. वेदांताला विरोध करणार्या भौतिकवादी असणार्या तत्वज्ञानाना दुय्यम लेखण्याचे धोरण राहिलेले आहे.” ते खोडून खरे भारतीय तत्वज्ञान भौतिकवादीच होते आणि ते अत्यंत पुढारलेले होते याची तर्कशुद्ध मांडणी सरदेसाई यांनी केलेली आहे.
तसेच तत्वज्ञान म्हणजे काय याची व्याख्या करून त्या अंतर्गत त्यांनी भारतीय समाजविकासाचा आजपर्यंतचा आढावा घेतला आहे. तत्वज्ञानाची व्याख्या त्यांनी पुढीलप्रमाणे केली आहे, “विश्वाची प्राथमिक अवस्था चैतन्यरूप की जडरूप? निर्गुण की सगुण? चैतन्यातून जडाचा उगम की जडातून चैतन्याचा? सत्य आणि आभास याचा निकष काय? खर्या ज्ञानाचे साधन कोणते? भौतिक परिस्थिती ही विचारांची आणि सामाजिक परिस्थितीची जननी की विचार ही माणसाची मूलभूत प्रेरक शक्ती? हे प्रश्न हा तत्वज्ञानाचा मूलभूत विषय आहे.” ते पुढे म्हणतात, “जे तत्ववेत्ते चैतन्याला प्राधान्य देतात, चैतन्यातून जड वास्तवता निर्माण झाली असे मानतात ते चैतन्यवादी आणि जे जडाला प्राधान्य देतात, हे जग जडातून चैतन्य निर्माण झाले असे मानतात ते जडवादी.”
अशा प्रकारे तत्वज्ञानाची सहज, सोपी, व्याख्या करून त्यांनी वेदांत, वेदांताची सामाजिक पार्श्वभूमी आणि तात्विक भूमिका, धार्मिक भूमिका आणि चातुर्वर्ण्याच्या संदर्भात भूमिका यांचा उहापोह केला आहे. वेदांताबद्दल त्यांनी म्हटले आहे, “वेदांत म्हणजे वैदिक वाङ्मयाचा अखेरचा भाग. या वाङ्मयाचे चार भाग आहेत. पहिला म्हणजे श्रमक, साम, यजुस आणि अर्थव हे चार भाग. ज्यांना संहिता असेही म्हणतात. ब्राम्हणे हा दुसरा भाग, तर आरण्यके हा तिसरा भाग आणि उपनिषिदे हा चौथा भाग. उपनिषिदे वैदिक वाङ्मयाच्या शेवटी येतात. म्हणून त्यांना वेदांत म्हणतात. वेदांत आणि उपनिषिदे यांचा अर्थ एकच आहे. जड जग आणि चैतन्य यांच्या परस्पर संबंधांची चर्चा उपनिषिदात आहे. पूर्ववैदिक वाङ्मयात नाही. म्हणून तत्वज्ञान या अर्थाने वेदांत या शब्दाचा उल्लेख होतो तेव्हा याचा अर्थ उपनिषिदातील प्रमुख तत्वज्ञान या अर्थाने वेदांत या शब्दाचा उल्लेख होतो तेव्हा त्याचा अर्थ उपनिषिदातील प्रमुख तत्वज्ञान असा होतो.” जगातील अनेक चैतन्यवादी दर्शनांपैकी वेदांत हे एक चैतन्यवादी दर्शन आहे अशी मांडणी करून सरदेसाई यांनी या तत्वज्ञानाचे मुख्य सार ‘ब्रम्हं सत्य जगन्मिथ्या, जीवो ब्रह्यैव नापट:’ या श्लोकात व्यक्त झाल्याचे म्हटले आहे. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या गीतारहस्यात या संदर्भात स्पष्टपणे वरील मत नोंदविलेले आहे. अशा प्रकारे वेदांतील तत्वज्ञानाची अनेक तपशिलासकट त्यांनी मांडणी करून हेच तत्वज्ञान पुढे जातीव्यवस्थेच्या आणि चातुवर्ण्याच्या समर्थनासाठी कसे उपयोगी पडले हे सांगितले आहे. थोडक्यात त्यावेळेच्या आणि आजच्याही शोषक वर्गाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्वाचे वेदांत हे वैचारिक हत्यार आहे.
‘स्मृतीकारांपासून शंकराचार्यांपर्यंत’ या प्रकरणात जवळ जवळ चौदाशे वर्षांचा तत्वज्ञानीय आढावा घेतला आहे. यात त्यांनी मनुस्मृतीबद्दल विस्ताराने लिहिले आहे. या प्रकरणाच्या अखेरीस या आढाव्याचे सार सांगताना ते लिहितात, “समाजव्यवस्थेच्या म्हणजेच चातुर्वणाच्या संदर्भात शंकराचार्यांना मनुस्मृती शिरोधार्य होती. मनुची वचने म्हणजे औषधे आहेत ही त्यांची उक्ती प्रसिद्धच आहे. शुद्रांच्या प्रश्नावर तर मनुस्मृतीचे एक एक वाक्य त्यांनी उचलून धरलेले आहे. इतकेच नव्हे तर मनुस्मृती वेदवाक्यावर आधारीत असल्यामुळे तिला यत्किंचितही विरोध म्हणजे वेदविरोध असे स्पष्ट मत त्यांनी नोंदवलेले आहे. शंकराचार्य वेदप्रामाण्याला निस्सीमपणे उचलून धरणारे होते. तेव्हा शंकराचार्यांच्या एकूण कार्याचे मूल्यमापन केल्यास त्यांनी हिंदू तत्वज्ञान आणि समाजव्यवस्था अधिक भक्कम केली हाच निवाडा घ्यावा लागतो. शंकराचार्यांची बौद्धिक शक्ती आणि कार्यक्षमता ही आपल्या देशाच्या इतिहासातील फार मोठी शोककथा आहे.”
‘जडवाद : प्राथमिक स्पष्टीकरण’ या आठव्या प्रकरणापासून लेखकांनी भारतातील भौतिकवादी परंपरांचा आढावा घेतलेला आहे. या तत्वज्ञानात सर्वात कडवे आणि प्रखर बुद्धिवादी होते, चार्वाक आणि लोकायतवादी. त्यांनी या वेदांत तत्वज्ञानावर कठोर हल्ला चढविला. त्यामुळेच चार्वांकाचे सारे लिखाण नष्ट केले गेले. त्याच्याबद्दल जे काही थोडेफार हाती लागते ते त्यांच्यावर झालेल्या टीकेवरून. उदा.चार्वाकांनी म्हटले आहे, ‘वेद हे बेरकी लोकांनी बनवले आहेत. वेदांचे कर्ते भोंदू, धूर्त आणि निशाचर आहेत.’ किंवा ‘पशूपालन, शेती, व्यापार हे व्यवसाय अभिमानास्पद आहेत पण जे लोक अंगाला राख फासून यज्ञकर्म करीत बसतात ते कुचकामी, पौरूषहीन आणि मूर्ख आहेत.’ किंवा ‘चार्वाक मत हे बहुजनांच्या हिताचे आहे त्यामुळे ते रमणीय आणि अनुकरणीय आहे.’
नवव्या प्रकरणात सरदेसाईनी जडवादी आणि चैतन्यवादी(वेदांती) यांच्यातील तत्वज्ञानीय संघर्षाची चर्चा केली आहे. दोन्ही बाजूचे युक्तीवाद मांडलेले आहेत. चार्वाकांनी प्रसवलेल्या स्वभाववादाचे सविस्तर निरूपण केलेले आहे. तसेच बुद्धाच्या तत्वज्ञानीय भूमिकेची विस्ताराने चर्चा केली आहे. गती संक्रमण आणि परिवर्तन या संदर्भातील बुद्धाचे तत्वज्ञान भौतिकवादी सिद्धांतांची ठोस मांडणी पुढे आणते.
’अप्रतिहत बदल आणि सतत परिवर्तन हे विश्वाचे आद्य सत्य आहे’ या मूलभूत सत्याला बुद्धाने वस्तुंचे अनित्यत्व असे नाव दिले आहे. सरदेसाईंनी म्हटले आहे, ‘हाच मुद्दा गौतम बुद्धाने आणखीही एका रितीने मांडला. कोणतीही गोष्ट एक तर आहे किंवा नाही अशा तुटक रितीने मांडण्याला त्याचा विरोध होता. त्याने असे प्रतिपादन केले आहे की, वस्तू सतत संक्रमणावस्थेत असल्यामुळे एकाच वेळी ती असते किंवा नसते ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे.’ सरदेसाईंनी पुढे म्हटले आहे, ‘बौद्धांनी या क्षेत्रात जो टप्पा गाठला आहे तो व कार्ल मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवाद यामध्ये फार मोठे अंतर आहे. तरीही पुरातन काळात भारतातील किंवा भारताच्या बाहेरचे कोणतेही दर्शन मार्क्सच्या इतक्या जवळ आलेले दिसत नाही.’ वरील परिस्थितीमुळे सरदेसाई यांनी पुस्तकाच्या अखेरीस पुढील निष्कर्ष काढला आहे. ‘बुद्धाच्या प्रतिसत्यसमुत्यापादाच्या कल्पनेची मार्क्सवाद ही आधुनिक, शास्त्रशुद्ध मांडणी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.’
या पुस्तकाचे अखेरचे प्रकरण धर्मासंबंधी आहे. एस.जी.सरदेसाई हे मार्क्सवादी असल्यामुळे त्यांनी त्या दृष्टिकोनातून धर्मासंबंधी मार्क्सवादी भूमिकेचे विवेचन केले आहे. धर्मासंबंधीच्या मार्क्सवादी भूमिकेबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत. त्यांना त्यांनी यथायोग्य उत्तरे दिलेली आहेत. पुस्तकाच्या अखेरीला त्यांनी म्हटले आहे, चैतन्यवाद, वेदांत, हिंदुधर्म यांचा भारतात उगम आणि विकास कसा झाला. ‘वैचारिक आणि सामाजिकदृष्ट्या त्यांची भूमिका काय होती त्यांच्यात आणि भारतीय जडवादी दर्शनात मतभेदाचे प्रश्न कोणते होते. या मतभेदात जडवाद्यांच्या विचारात उणीवा असल्या तरी तुलनात्मकदृष्ट्या त्यांची मते अधिक ग्राह्य कशी होती, ती शास्त्रीय आणि सामाजिक प्रगतीला अधिक पोषक कशी होती. या प्रश्नांचे मार्क्सवादी दृष्टिकोनातून स्पष्टीकरण करणे हा या पुस्तिकेचा उद्देश अवश्य आहे.’ कॉम्रेड सरदेसाईंनी अत्यंत अभ्यासूपणे अतिशय सोप्या शब्दात हा तत्वज्ञानीय संघर्ष उलगडला आहे. यात उणीव एकच आहे ती म्हणजे जातीव्यवस्थेच्या गुंतागुंतीच्या एकंदर परिवर्तनवादी तत्वज्ञानांवर-आंदोलनांवर काय परिणाम झाला या बाबतचा उहापोह होणे गरजेचे होते. भारतातील वर्गीय परिस्थिती आणि जातीव्यवस्था यांचा नेमका सांधा जुळवून वर्गीय शोषणाबरोबरच जातीय शोषणाची मांडणी पुढे येणे गरजेचे आहे. तरच भारतीय समाजातील तत्वज्ञानीय संघर्षातील सर्वच रूपे समग्रपणे प्रकट होऊ शकतील. तरीही भारतीय तत्वज्ञानाच्या इतिहासाची ही रूपरेषा परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रगल्भतेच्या दिशेने घेऊन जाणारी आहे यात शंका नाही. सबब सर्वांनी हे पुस्तक मुळातून वाचावयास हवे.
– सुभाष थोरात