Categories
बुवाबाजी

भोंदूबाबाने पैशाचा पाऊस पाडण्याच्याअमिषाखाली शिक्षकाला लाखोस गंडवले!

सप्टेंबर - २०११

            पैशाचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देतो असे म्हणणार्‍यांवर विश्वास ठेवून पैसे देणारे नागरिक बहुतांशी अशिक्षित असल्याचे आढळत असले, तरी चक्क एका शिक्षकालाच एक भोंदूबाबा जेव्हा तब्बल साडेतेवीस लाखांना गंडवतो तेव्हा त्या शिक्षकाची कीव करावी का त्याचा उपहास करावा? होय, अशीच घटना घडली जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात!

            जामनेर तालुक्यातील गोंडखेडा गावी सुरेश कडू गोसावी उर्फ गोसावी बाबा हा गेल्या 15 वर्षांपासून पैशाचा पाऊस पाडतो व पैसे दुप्पट करून देतो असे सांगून लोकांकडून पैसे उकळत असे. हा अशिक्षित बाबा जडीबुटीची औषधी वनस्पती देऊनही रोग बरा करतो अशीही त्याची प्रसिद्धी आहे. बोदवड तालुक्यातील मानमोडी गावचे शिक्षक संजय सखाराम पाटील गेल्या चार महिन्यांपासून या बाबाकडे पैशाच्या आमिषाने ये-जा करीत असत. या दरम्यान हा बाबा त्यांना भोंदुगिरीचे चिरीमीरी दाखले देऊन भुरळ घालत असे. नंतर तर त्याने पैशाचा पाऊस पाडून देतो, त्यासोबत तुझ्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. मी अनेकांना करोडपती बनवले आहे. असे सांगून शिक्षकाकडून पैसे उकळण्याची सुरवातच केली. सुरवातीला लाख, दोन लाख, तीन लाख अशा वेगवेगळ्या रकमा देऊन ती रक्कम तब्बल 23 लाख पन्नास हजारापर्यंत पोहोचली.

            प्रत्येक वेळी बाबा “काळजी करू नसो, पाऊस पडण्याची योग्य वेळ येईल”, “माझे तप सुरू आहे, मी जेव्हा पाऊस पाडेन व भानावर येईन, त्याअगोदर तू ते पैसे पोत्यात टाकून दूर घेऊन जा” असे सांगत असे. शिक्षकाने हे पैसे नातेवाईक, मित्र, सावकार, बँक आदींमधून घेऊन बाबाला दिले होते. प्रत्येकवेळी बाबा हा या शिक्षकाला भुलथापा मारीत होता. त्यानंतर हा बाबा पंढरपूर वारीस निघून गेला.

            पुढे ह्या शिक्षक महोदयांना पैसे घेण्याच्या करणीनुसार भरणी करायचीच होती. त्यांच्यामागे पैशांसाठी सावकार, मित्रमंडळी मागे लागायला सुरवात झाली. या शिक्षक महोदयांनी या बाबाला पैशांच्या पावसाचा लवकर बंदोबस्त करा म्हणून विनवण्या सुरू केल्या. तेव्हा बाबाने सांगितले, तुझे 23 लाख 50 हजार मी दुप्पट करून देईन पण पंढरपूरहून आल्यावर. अजून मुहूर्त मिळत नाहीय. मी येईपर्यंत माझा मुलगा नितीनकडे अजून दीड लाख दे, म्हणजे मी आल्यावर 50 लाख करून देणार. त्यानुसार गुरूजींनी आणखी 1 लाख रूपये बाबाच्या मुलाला गोंडखेड गावी दिले. आता तर या गुरूजींची पत कोठेही राहिली नव्हती. पैशांच्या तगादा त्यांच्या मागे लागला. देणेकर्‍यांना ते “दोन दिवस थांबा हो, गोसावीबाबा हे पैसे दुप्पट करून देतील, तेव्हा माझी तंगी हटणार आहे” त्यांच्या या विधानावर लोक हसून वेड्यात काढू लागले. अखेर त्यांनी आपण फसलो गेलो हे लक्षात आल्यावर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रकाश मुत्याल यांची भेट घेऊन आपबीती कथन केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस निरीक्षक डी.डी.गवारेंच्या नेतृत्वात गोंडखेड येथे जाऊन पंढरपूरहून आलेल्या सुरेश गोसावी उर्फ भोंदूबाबास ताब्यात घेऊन घराच्या झडतीत साधुचा वेष, रूद्राक्ष माळा, खंजीर वाद्य, कमंडलू, भस्म, ताईत आदी आक्षेपार्ह गोष्टी ताब्यात घेतल्या. शिक्षक संजय पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

            एका शिक्षकाने विशिष्ट लालचेपोटी या बाबाच्या भुरळ पाडणार्‍या गोष्टींना बळी पडल्याने त्यांचे नुकसान झाले. या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जामनेरने पोलिसांंच्या या कारवाईबद्दल अभिनंदन केले आहे. या बाबाने पोलीस तपासात हे पैसे जुगारात हरल्याचे सांगितले आहे. त्याचा मुलगाही ताब्यात घेतला गेला आहे.

विश्वजीत चौधरी, जळगाव