जागतिक महिलादिनाच्या अनुषंगाने पुणे शहर अंनिस शाखेच्या महिलांनी ‘बोहरा समाजातील खतना प्रथा’ या विषयावर शबनम पूनावाला यांचे व्याख्यान आयोजित केले होते. शबनम पूनावाला यांचे कुटुंब त्यांच्या सुधारणावादी विचारांमुळे बोहरा समाजातून बहिष्कृत केलेले आहे, तरीसुध्दा त्यांनी आपले सुधारणावादी विचार हिरिरीने मांडणे सोडलेले नाही. गेली काही वर्षे शबनम पूनावाला या बोहरा समाजात असलेल्या खतना प्रथेविरोधात काम करत आहेत.
व्याख्यानाच्या दरम्यान शबनम पूनावाला म्हणाल्या, बोहरा समाजात स्त्रियांची होणारी खतना ही अत्यंत क्रूर व अमानुष प्रथा आहे. सहा-सात वर्षांच्या मुलीची केली जाणारी खतना ही त्या मुलीसाठी अत्यंत वेदनादायी असून त्या वेदना ती आयुष्यभर विसरू शकत नाही. ‘खतना’ म्हणजे स्त्रीच्या गुप्तांगाचा अग्रभाग कापणे होय. हे केवळ ब्लेडच्या सहाय्याने केले जाते. कोणतीही वैद्यकीय सुविधा न वापरता केली जाणारी खतना ही कोणत्याही दृष्टीने लाभदायक नाही. रक्तस्त्राव होऊन यानंतर अनेक मुली आजारी पडतात. स्त्रीच्या कामवासनांना वेसण घालण्यासाठी केलेली खतना स्त्रीला कामसुख पुरुषाच्या बरोबरीने मिळण्यापासून वंचित ठेवते.
शबनम पूनावाला पुढे म्हणाल्या, खतना या प्रथेला कोणताही धार्मिक आधार असेल, असे वाटत नाही. कारण बोहरा समाजाव्यतिरिक्त इतर कोणत्याही इस्लाम समाजात ही प्रथा नाही. इतर इस्लाम समाजातील स्त्रियांपेक्षा बोहरा समाजातील स्त्रिया या अधिक सुशिक्षित व आधुनिक आहेत, तरीही या समाजात ही प्रथा चालू आहे, याचे आश्चर्य वाटते. बहिष्कृत होण्याच्या भीतीमुळे कोणीही या विरुध्द आवाज उठवत नाही. परंतु ही प्रथा बंद झाली पाहिजे. डिसेंबर 2015 पासून आम्ही या विरुद्ध आवाज उठवित आहोत. इतर समाजातील महिलांनीही याला पाठिंबा दिला पाहिजे.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती केवळ हिंदू समाजातील अंधश्रध्दा विरुध्दच काम करते, हा गैरसमज जाणीवपूर्वक पसरविण्यात आला आहे. कुप्रथा; मग ती कोणत्याही धर्मियांची असो, आमचा त्याला विरोधच आहे, असे प्रतिपादन पुणे शहर अध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी केले. वनिता फाळके यांनी प्रास्तविक केले, तर रोहिणी जाधव यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला तरुण कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती.
– श्रीपाल ललवाणी
संपर्क : 9823977472