Categories
चार्वाक कट्टा

बुवा-बाबा झालो असतो तर बरं झालं असतं!

ऑगस्ट - २०११

ज्योती : प्रतिक, यावेळेस तू जरा खूष झाला असशील ना! एकदम विरोधी असलेल्या दोन राजकीय नेत्यांनी अगदी हवी तशी प्रतिक्रिया दिली.

समीर : प्रतिक्रिया दिली की कबुली जबाब दिला?

ज्योती : म्हणजे? मला कळलं नाही.

समीर : “बुवा-बाबा झालो असतो तर बरं झालं असतं!”  हा कबुली जबाब म्हणायला हवा.

ज्योती : तू पण हद्दच करतो. प्रतिकसारखं तू पण नेहमी    तिरकसच बोलायला लागला आहेस उपरोधाने म्हटलेल्या वाक्याची, पण तुला समज नाही.

समीर : उपरोध मला कळतो. मला एवढंच म्हणायचं की हे नेते राजकारणात का आले? याचा कबुलीजबाब त्यांनीच दिला. आतापर्यंत इतके मस्त या बुवा-बाबांच्या मागे जात होते. तेव्हा त्यांचा हेवा राजकारण्यांना वाटला नाही पण इतका गडगंज पैसा सत्यसाईबाबाकडे सापडला तेव्हा मात्र त्यांना हेवा वाटायला लागला.

ज्योती : मला तुझं म्हणणं पटत नाही. आशिष, तुला काय वाटतं?

आशिष : मी समीरच्या मताशी सहमत आहे.

ज्योती : शेवटी मुलं-मुलं एकत्रच येणार!

शरयू :  ज्योती, तू उगाच मुद्दा सोडून भरकटायला लागलीस

ज्योती : खरं सांगू, थोडसं हलकं फुलकं बोलावं म्हणून मी काही बोलले तर समीर महाशय थेट लेक्चरबाजीच करायला लागले.

समीर : त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागतो. पण मी आज चांगल्या मूडमध्ये नाही. आणि राजकारण्यांच्या शेरेबाजीची मला खरोखरच चीड आली आहे. आता बॉम्बस्फोटाचं उदाहरण घे ना. प्रत्येकजण आपल्या पक्षाची भूमिका रेटून नेण्यासाठी याचा वापर करताना दिसतोय.

आशिष : परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे बॉम्बस्फोट होतात असं हास्यास्पद विधान पण करण्यात आलंय.

प्रतिक : त्याहीपेक्षा मला राहुल गांधीच्या विधानाची भयंकर चीड येते.

कल्पेश : पण मला सांग त्यांच्या विधानात चूक काय? खरोखर असे बॉम्बस्फोट थांबवणं शक्य आहे का?

शरयू : मला तर वाटतं सरळ पाकिस्तानवर हल्ला करून हा प्रश्न सोडवून टाकावा.

ज्योती : प्रश्न सोडवण्याची तुझी जर हीच पद्धत असेल तर देशाला आधी तुझ्यासारख्या नेत्यापासूनच वाचवायला लागेल.

प्रतिक : राहुल गांधी अशा पक्षाच्या प्रमुख फळीमध्ये आहेत की, जो सत्तेवर आहे पण आपण या घटनांना अप्रत्यक्षपणे जबाबदार आहोत हे मान्य   करण्यापेक्षा त्यांनी असं बोलावं हे ठीक नाही.

गौतम : त्यांच्या आजीचा हा गुण त्यांनी बरोबर उचलला आहे.

ज्योती : आता हे काय नवीन आणखीन.

गौतम : तुला सदाचारी बाबाची गोष्ट आठवते का?  बेकारी, दारिद्य्र दूर व्हावे म्हणून इंदिरा गांधींना यज्ञ केला होता. म्हणजे स्वत:चे अपयश सरळ दैव नावाच्या अज्ञात व्यक्तीवर ढकलून हे सर्वजण मत मागायला मोकळे!

शरयू : आपल्या बोलण्यामध्ये समीरच्या रागाचे कारण आपण विसरूनच गेलो. ज्या अर्थी शांत राहणारा समीर इतका चिडला आहे त्या अर्थी नक्कीच काहीतरी बिनसले असणार.

समीर :  दादरला ज्या ठिकाणी स्फोट झाला तेथून मी थोड्या वेळापूर्वीच माझ्या बहिणीकडे गेलो होतो. स्फोटानंतर मी इतका घाबरलो की, जरा उशीर झाला असता तर काय झालं असतं या भीतीनेच माझे पाय जवळजवळ लुळेच पडले. त्या रात्री आणि दुसर्‍या दिवशी पण मी बहिणीकडेच राहिलो. सहसा मी टी.व्ही. बघत नाही. पण   त्या दिवशी बातम्या बघताना “मुंबई स्पिरीट” शब्द ऐकताना, इतका राग आला होता की असं वाटतं होतं की, ओरडून सांगावं की हे सगळं खोटं आहे.

प्रतिक : ते आता मीडियाला पण जाणवायला लागलंय.

गौतम :  यावेळेस सगळ्या बुवा-बाबांना पण विचारायला पाहीजे की, तुमचं अंतर्ज्ञान कुठे गेलं होतं? का नाही तुम्ही याची सूचना दिली?

प्रतिक : “ज्याच्या-त्याच्या नशिबात आहे ते घडणारच!” असं हे महाराजच म्हणतात असं नाही. तर प्रत्यक्ष लोकांच्या मनातही तशीच भावना आहे.

शरयू :  आणि अशा घटनांमधून ते आणखीनच अधोरेखित होतं.

ज्योती   : पण मला एक कळत नाही की, विज्ञान तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य सुकर झालं. निदान पहिल्यापेक्षा तरी जास्तच! पण त्याचं आपल्याला कौतुक नाही. या उलट अशा घटनाघडतात तेव्हा ‘नशिब’ कल्पनेचा मात्र बोलबाला जास्तच होतो.

कल्पेश : याचं कारण मला तरी वाटतं की, खात्रीने जे मिळतं त्यापेक्षा अचानक किंवा आपल्या योग्यतेपेक्षा जास्त मिळालं की, त्याचं अप्रूप जास्त असतं.

शरयू : तू आता काय तत्ववेत्याची भूमिका घेणार काय?

कल्पेश : यात ‘तत्वज्ञान कसलं आलंय. आपल्या प्रिन्सीपॉलचं उदाहरण घे ना. ते कट्टर नास्तिक आहेत. नशिब मानणार्‍यांचा ते उघडपणे अपमान करतात. कॉलेजच्या कार्यक्रमात कटाक्षाने धार्मिक प्रतिकं टाळतात.

आशिष : तू प्रिन्सीपॉल सरांची स्तुती चालवली आहेस की निंदा?

कल्पेश : मी फक्त एवढंच ठसवण्याचा प्रयत्न करत होतो की त्यांच्यासारखी व्यक्तीदेखील “अचानक” मिळालेल्या लाभावर खुष असते. दरवर्षी पावसाळ्यात कॉलेजमधील काही मुले तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य प्रशिक्षणाची शिबिरे घेतात. कुठलीही जबरदस्ती न करता देखील कॉलेजमधील बरीच मुले मोठा निधी उभा करतात. परंतु एका अनामिक व्यक्तीने पाच हजार रूपये दिले. या घटनेचं त्यांना किती अप्रूप होतं.

प्रतिक : मला तरी वाटतं मानवी स्वभाव थोडासा असा असणार हे मान्य करायला हवं.

गौतम : यातून तर नशिबासारख्या संकल्पनेचा जन्म होतो. त्यामुळे उगाच ‘मानवी स्वभाव’ म्हणून त्याचं कौतुक करायला नको.

शरयू : यात आणखीन एक गंमत लक्षात आली का?  इतर वेळेस प्रतिक नेहमी टीक करण्याच्या मूडमध्ये असतो. परंतु प्रिन्सीपलांबद्दल एकदम ‘मानवी स्वभाव’ वगैरे शब्द बाहेर पडायला लागले.

कल्पेश : कारण आपल्या आवडत्या व्यक्तीचे समर्थन करणे हेदेखील मानवी स्वभावच म्हणायला पाहीजे.

समीर : या स्वभावावर मात कशी करायची हे नंतर ठरवू पण वेळेचं भान विसरणं या स्वभावावर मात करू या आणि थांबू या.

–संजय सावरकर