Categories
संपादकीय

सी.बी.आय.ची उशिरा; पण योग्य कारवाई

जून - २०१९

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अ‍ॅड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना सी.बी.आय.ने केली अटक

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांना सी.बी.आय.ने शनिवारी, दिनांक 25 मे रोजी मुंबईतून अटक केली. डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणार्‍या दोघांना मदत करून या गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे. या दोघांनाही रविवार दिनांक 26 मे रोजी पुणे येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 1 जूनपर्यंत सी.बी.आय. कोठडी दिलेली आहे.

संजीव पुनाळेकर हा वकील असून हिंदू विधिज्ञ परिषदेचा सचिव आहे. भोपाळमधून भाजपच्या नव्याने निवडून आलेल्या खासदार प्रज्ञा ठाकूर, सुधाकर चतुर्वेदी यांचा मालेगाव प्रकरणात पुनाळेकर याने न्यायालयात बचाव केला होता. तसेच 2018 मध्ये नालासोपारा येथे शस्त्रे सापडल्याच्या प्रकरणातही पुनाळेकर हा आरोपींच्या बाजूने उभा राहिला होता. दाभोलकरांवर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्याचा आरोप असलेल्या आरोपींशी पुनाळेकरचा संपर्क होता व त्यांना लपण्यासाठी त्याने मदत केल्याचा आरोप सी.बी.आय.ने केला आहे.

विक्रम भावे हा ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील स्फोटातील दोषी असून त्याला सेशन्स कोर्टाने दहा वर्षांची सजा सुनावली असून सध्या तो उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनावर बाहेर आहे. या प्रकरणात भावेचा बचाव पुनाळेकर याने केला होता. डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींपैकी एक सचिन अंदुरे याच्याबरोबर भावेने डॉ. दाभोलकरांच्या पुणे येथील राहत्या घराची; तसेच प्रत्यक्ष गुन्हा करावयाच्या आधी तेथील परिसराची रेकी केल्याचे सी.बी.आय.ने म्हटले आहे.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनप्रकरणातील एका आरोपीला कर्नाटक एसआयटीने दाभोलकर खून प्रकरणासंदर्भात सी.बी.आय.कडे हस्तांतरित केल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबानुसार पुनाळेकर आणि भावे यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडणार्‍याकडील शस्त्रे व दुचाकी नाहीशी करण्याच्या कामी हल्लेखोरांना मदत केली असल्याचे सीबीआयने सांगितले. या आधी डॉ. वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, अमोल काळे, राजेश बंगेरा, अमित दिगवेकर यांना दाभोलकर खून प्रकरणात अटक झालेली आहे. आता त्यात पुनाळेकर आणि भावे यांची भर पडलेली आहे.

पुनाळेकरची अटक ही दाभोलकर खून प्रकरणातील एक महत्त्वाची घटना आहे. न्यायालयाने मारलेल्या कडक ताशेर्‍यानंतर जाग्या झालेल्या सीबीआयने आपल्या तपासाचा वेग वाढवलेला दिसत आहे.

दाभोलकर आणि त्यांच्यासारख्या इतर विचारवंतांना गोळ्या घालणे ही क्रौर्याची परमावधी होय. खरा धर्म लोकांना मारायला शिकवित नाही. तो सहिष्णू असतो; पण सहिष्णुता ही वरवर दाखवायची गोष्ट; आत मात्र क्रौर्य आणि सूडाची धगधगती आग, असे धर्म मानवतेचे शत्रू होत. आज जगभर धर्माच्या नावाने जे क्रौर्य सुरू आहे, त्याचा मुकाबला कसा करायचा हा चिंतेचा विषय असला, तरी आशेला जागा आहे. भारतातील किंवा जगातील न्यायव्यवस्था गुन्हेगारांना शासन करू शकते, हे सी.बी.आय.च्या वरील कृतीतून दिसत आहे. या बद्दल सी.बी.आय.चे अभिनंदन!

आता सी.बी.आय.ने दाभोलकरांच्या खुनाच्या मूळ सूत्रधाराला शोधून काढून दहशतवादाची पाळेमुळे खणून काढावीत, हीच अपेक्षा.