वटपौर्णिमा हे विषमतेला उघडपणे समाजमनात रुजवणारं व्रत आहे. तरीही खेडेगावातील स्त्रिया असोत की, मुंबई सारख्या महानगरातील, त्या अशिक्षित असोत की, अति उच्चशिक्षित प्रत्येक स्त्री त्याच श्रद्धेने ते व्रत करीत असते. यामागे स्त्रियांची नेमकी मानसिकता काय असते, हे समजून घेण्याचा प्रयत्न पनवेल शाखेने वटपौर्णिमेनिमित्ताने केला. पनवेल हा नवी मुंबई या आधुनिक शहराचाच एक भाग. येथे देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेला आणि शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत समाज राहतो. बहुसंख्य स्त्रिया स्वतःची नोकरी/ व्यवसाय करतात. अशा वातावरणातील स्त्रिया अशा परंपरावादी व्रतांकडे कशा प्रकारे बघतात, हा दृष्टिकोनही समजून घ्यायचा होता. यासाठी पनवेल शाखेकडून वेगळ्या पद्धतीने एक उपक्रम घेण्यात आला.
एका कथेच्या आधारावर सुरू झालेल्या या परंपरेला समजून घेत पुढे न्यायचे की नाही, याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांची व इतर मंडळींची याविषयीची मते जाणून घेण्यासाठी प्रश्नावलींचे संच करण्यात आले. या प्रश्नावलीच्या आधारे महिलांच्या कॅमेर्यासमोर प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी महिलांना ही पूजा का केली जाते? मनापासून करता की परंपरा म्हणून केली जाते? यामागे काही शास्त्रीय कारण आहे, असे वाटते का? यामागील आख्यायिका माहिती आहे का? माहीत नसेल तर ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? यासारखे प्रश्न विचारण्यात आले. मनापासून आणि परंपरा म्हणून ही पूजा करणार्या अनेक महिला होत्या, तर काहींचे म्हणणे होते की, ‘घरातील मोठे करत आले आहेत म्हणूनच आम्हालाही करावी लागते.’ याचा फायदा किंवा शास्त्रीय कारण आहे का, असे विचारल्यावर अनेकजणी निरुत्तर झाल्या होत्या. काही थोड्या व्यक्तींनी झाडाखाली ऑक्सिजन जास्त असतो आणि स्त्रियांना त्याची जास्त गरज असते अशासारखी मते मांडली. ‘ही परंपरा अशीच सुरू राहायला हवी, संस्कार पुढे न्यायला हवेत’ असे बहुतांशी लोकांचे म्हणणे होते तर काहीजण ‘पुढच्या पिढीने काळानुसार परंपरा पाळायच्या की नाही, याचा विचार केला पाहिजे,’ असे मत मांडत होते. असे मतं मांडणार्यांची संख्या कमी असली, तरी आश्वासक आहे.
यावेळी काही पुरुषांशीही संवाद साधला गेला. पुरुषांना विचारण्यात आले की, तुम्ही तुमच्या पत्नीसाठी मनापासून काय करता करता? त्यावेळी ‘आम्ही पत्नीच्या आनंदासाठी तिच्यासोबत इथे आलो आहोत,’ असे सांगण्यात आले. म्हणजे पुरुषांच्या दृष्टीने हे व्रत महिलांच्या आनंदासाठी होते.
काही महिलांनी याबाबत काहीही बोलण्याची तयारी दाखवली नाही. त्यांना आजूबाजूच्या वातावरणाचं दडपण असावं. कॅमेर्यासमोर बोलायला नकार; पण प्रश्नावलीचा अर्ज भरण्यात अनेक महिलांनी पुढाकार घेतला.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या सर्व महिलांनी, ‘या सर्व परंपरा तशाच पुढे नेण्यापेक्षा त्यामागे खरंच काही विचार आहे की नाही, हे पाहणे गरजेचे आहे, असे सांगणारे कोणीही आजपर्यंत भेटले नाही’ असेही नमूद केले. म्हणजेच आमच्या प्रश्नोत्तरांच्या संवादातून ‘असाही विचार करायचा असतो’ हा विचार त्यांच्यापर्यंत पोचला, याचे समाधान वाटते. काही महिलांनी मात्र स्पष्ट भूमिका मांडली, ‘काळानुसार बदलणे गरजेचे आहे. ही पूजा फक्त करायची म्हणून केली जाते, त्यापलिकडे या पूजेचे काहीही महत्त्व नाही याचा काहीही थेट फायदा होत नाही,’ असं त्यांनी मोकळेपणाने नमूद केले.
याबरोबरच यावेळी महिलांना समितीची भूमिका असणारे एक पत्रक देण्यात आले. समितीची भूमिका वटपौर्णिमेला वटसावित्रीची पूजा मोठ्या प्रमाणात करताना स्त्रिया दिसतात. म्हणजेच त्या वडाच्या झाडाची पूजा करून त्याला सात फेरे घालतात. ही वट सावित्रीची पूजा का केली जाते? ही पूजा ज्या कथेवर आधारित आहे, ती कथा काय आहे हे माहीत आहे का? असं विचारल्यावर लक्षात येतं की, अनेक नवविवाहितांना ती कथा नीटशी माहीतच नसते किंवा ती माहीत करून घेण्यासाठी फारसे प्रयत्न केलेले नसतात. केवळ कुटुंबाची परंपरा म्हणून हे व्रत करत असतात. आपल्याकडील स्त्रिया दोन गोष्टींसाठी वटसावित्रीचं व्रत करतात; एक म्हणजे नवर्याला/जोडीदाराला दीर्घायुष्य लाभावं आणि दुसरी म्हणजे जन्मोजन्मी, सातजन्मी तोच पती मिळावा म्हणून.
या कथेला आजच्या काळात कितपत महत्त्व आहे? आजच्या काळातील कोणतीही मुलगी अशा परिस्थितीतील मुलाशी लग्न करेल का? आईवडील तिचे लग्न अशा एका वर्षाचे आयुष्य असणार्या आजारी मुलाशी लावून देतील का? लयाला गेलेल्या साम्राज्याच्या राजाशी लग्न लावून दिल्यावर अशवप्तीला त्यांना मदत करावेसे का वाटले नाही? पण या कल्पनेला आपण प्रश्न विचारतो का?
ज्या स्त्रियांना पतीकडून सन्मान नाही, पती नांदवत नाही, तिला नांदायची इच्छा नाही, त्याही स्त्रिया अनेक वर्षेमाहेरी राहत असूनही ही प्रथा परंपरा म्हणून पार पाडतात. या परंपरेतून निर्माण झालेल्या सक्तीला स्त्रिया बळी पडत आहेत. या रुढी आणि परंपरा म्हणजे स्वतःला फसवण्याचं निमित्त आहे. उघडउघड या प्रथेतून स्त्री- पुरुष विषमता जोपासली जाते. कथा सत्य मानली, तर सावित्रीच्या बुद्धिचातुर्याचं, तिच्या जिद्दीचं नक्कीच कौतुक आहे; पण या व्रतात सवित्रीचं स्थान काय? यामध्ये स्त्रीचं कौतुक, तिला मान्यता नसून पती कसाही असला, तरी तो श्रेष्ठ आहे आणि जन्मोजन्मी त्याचाच स्वीकार करावा, हे बिंबवलं जातं. स्त्रीवर दुय्यमत्व बिंबवलं जातं. व्रत हे सावित्रीच्या सन्मानासाठी नसून पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. खरं पाहता उत्तम आरोग्य हे दोघांचंही असायला हवं आणि त्यासाठी वास्तववादी प्रयत्न करायला हवेत, हा विचार आजच्या शिक्षित स्त्रियांनी करावा व समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून मुक्तीचा मार्ग दाखवणार्या, स्त्री-पुरुष समतेचा विचार रुजवणार्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे व्रत आजच्या आधुनिक स्त्रीने स्वीकारावं अशा स्वरुपाचा एक चांगला संवाद या उपक्रमातून महिलांबरोबर घडवला गेला.

मुलाखतीव्यतिरिक्त काही महिलांनी आमच्याकडील प्रश्नावली भरून दिल्या; तसेच अनेकांनी आपल्या भूमिकेला ऐकण्यासाठी वेळ दिला. दुपारी 1.30 ते सायंकाळी 5 पर्यंत पनवेल पूर्व भागातील खांदेश्वर गार्डन या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. प्रत्यक्ष मुलाखती शाखेची महिला विभाग कार्यवाह नाजुका हिने घेतल्या. यावेळी शाखेच्या कार्याध्यक्ष वैदेही पाटील उपस्थित होत्या. वैभव शिंदे, सिद्धेश गोसावी, तनुश्री, हर्षल तांडेल यांनी तांत्रिक साहाय्य केले. तेजल खेडेकर, देवयानी पाटेकर यांनी महिलांशी बोलण्यात, त्यांना बोलतं करण्यात सक्रियता दाखवली.