अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र विवेक वाहिनी व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेच्या सहकार्याने राज्यातील वाढत्या व्यसनाधिनतेला बदनाम करण्यासाठी व्यापक चळवळ उभारणार आहे. या अभिनव मोहिमेची सुरवात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या सातारा येथील व्याख्यानाने 25 जून रोजी झाली.
महाराष्ट्रात तरूणांत तंबाखू व दारू याची व्यसनाधिनता वाढत आहे आणि पद्धतशीरपणे ते वाढविण्याचे धोरण चालू आहे. महाराष्ट्राच्या तरूणाईच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक आहे. शासन याबाबत गंभीर नाही व शासनावर दबाव आणू शकणारी जनचळवळ नाही. अशावेळी एकच मार्ग राहतो. तो म्हणजे समाजात व विशेषत: तरूणांत व्यसन बदनाम करण्याचा. आज अगदी उलट्या दिशेने व्यसन करणे हा आधुनिक जीवनशैलीचा, सुखाचा-स्वातंत्र्याचा मार्ग आहे आणि त्याला विरोध करणे हा कालबाह्य मागासलेपणा आहे असे वातावरण तयार होत आहे. त्याचा निर्धारपूर्वक प्रतिकार करून हे अभियान व्यसनाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करू इच्छिते. 26 जून हा आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवनविरोधी दिन म्हणून जगभर पाळला जातो. त्या तारखेला या अभियानाची सुरवात झाली. पहिला टप्पा आक्रमक प्रबोधनाचा असेल व तो 2 ऑक्टोबरपर्यंत चालेल. यामध्ये डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेऊन प्रबोधकांची फळी तयार करण्यात येईल. या प्रबोधनात तंबाखू वा दारू यामुळे व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय बरबादी कशी होते याची जाणीव समाजात व विशेषत: युवकांत पोहोचवली जाईल. व्यसन करणे हा स्वत:च्या व्यक्तिमत्वावरील कलंक आहे. दारू अथवा गुटखा याचा तिरस्कार करावयास हवा, असा आग्रह तयार करण्याचा प्रयत्न राहील. व्यसन बदनाम करणार्या घोषणा व पोस्टर याच्या राज्यव्यापी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 2 ऑक्टोबर ते 26 जानेवारीदरम्यान व्यसन करणार्या युवकाशी मी लग्न करणार नाही, असे युवतींचे निर्धार मेळावे शक्य तितक्या ठिकाणी आयोजित केले जातील. यात तरूणींच्या पालकांचा सहभागही मिळवला जाईल. पतीच्या व्यसनामुळे जीवन उद्ध्वस्त झालेल्या तरूणींचे अनुभव कथन या मेळाव्यात होईल. युवकांचे चला व्यसन बदनाम करू या, हे निर्धार मेळावे घेण्यात येतील. या युवकांनी आपल्या भागातील आमदाराला या अभियानाबाबत भूमिका घेण्यासाठी भाग पाडावे, असा प्रयत्न राहील. व्यसन बदनाम करणार्या पोस्टरचे प्रदर्शन महाविद्यालयांत भरविले जाईल. समाजातील विविध स्तरातील मान्यवर व्यसनाला बदनाम करण्याबाबत जाहीर भूमिका घेतील असा प्रयत्न केला जाईल. त्याला नकार देणार्या मान्यवरांची नावे जाहीर केली जातील. नामसदृश्यतेने व्यसनी पदार्थांच्या छुपेपणाने जाहिराती करणार्या सेलिब्रेटीजला युवकांनी हजारोंच्या संख्येने निषेधपत्रे पाठवावीत, ही मोहीम राबवली जाईल. 31 डिसेंबरच्या रात्री ठिकठिकाणी दारूची बाटली आणि गुटख्याच्या पुड्या याची होळी केली जाईल. शासनाने भूमिका घ्यावी यावर अभियानाचा भर राहणार नाही. आपले आणि आपल्यासारख्या अनेक युवक-युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या दारू-गुटख्याला निर्धारपूर्वक बदनाम करून हद्दपार करावे, ही मानसिकता तयार करण्याच्या मोहिमेत तरूणांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या अभियानांतर्गत करणार आहोत.
– डॉ. हमीद दाभोलकर