अं.नि.स.अलिबाग, जि.रायगड या शाखेच्या सभासद निर्मला फुलगावकर यांनी त्यांच्या पतीचे पहिल्या वर्षीचे श्राद्ध कोणताही धार्मिक विधी न करता केले. त्यांचे पती रायगड जिल्ह्यातील दोन मोठ्या शिक्षण संस्था ‘कोकण एज्युकेशन सोसायटी’ व ‘प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी’ या दोन्ही ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहात होते. रायगड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते.
या दिवशी जमलेले नातलग, स्नेही व मित्रमंडळींपैकी अनेकांनी आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या स्मृती जागवल्या. त्याचवेळी अंनिस माध्यमातून प्रबोधन करणारे अनेक लेख ज्यात ‘ऐसे गुरू अडक्याचे तीन’ हे संपादकीय, डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे अनेक लेख, ज्येष्ठ लेखिका विद्या बाळ यांचा लेख मोठ्या टाईपमध्ये झेरॉक्स करून ते बोर्डावर वाचण्यासाठी लावण्यात आले होते. त्याचवेळी चमत्कार सादरीकरणाचे प्रयोग करण्यात आले. अंनिस टीमने सहभाग घेऊन जमलेल्या मंडळींचे प्रात्यक्षिकांद्वारे प्रबोधन केले. भगत, बुवा, बापू हे समाजाची कशी फसवणूक करतात ते जमलेल्या मंडळींना समजले. करणीचा नारळ, स्वर्गातील स्थान, मंत्राने अग्नी पेटविणे इ.गोष्टी दाखविल्या गेल्या. याचवेळी त्यांची पुतणी सौ.नंदा भा.चौधरी, रोहा, जि.रायगड यांनी नेत्रदान व देहदान संकल्प करून मेडिकल कॉलेजकडून त्यांची नोंदणी झाल्याचे पत्र मिळाल्याने त्यांचे कौतुक व सत्कार केला गेला. तसेच त्यांचे मेहुणे अनंतराव सोमण यांनीही नेत्रदानाचा संकल्प केला. त्यांना संकल्पपत्र देऊन त्यांचाही सत्कार केला गेला.
-सुजाता दामोदरे, अलिबाग